दारू हवी पण त्रासदायक परिणाम नकोत… दारू प्याल्यानंतर काय होतं? दारू प्यायल्यावर समोरच्या गोष्टी दोनदोन तीनतीन दिसू लागतात.
दारू प्यायल्यावर पाय लडखडायला लागतात.
दारू प्यायल्यावर जिभेचा लोचा होता. जीभ जड होते, मराठी माणूस इंग्रजी बोलू लागतो.
जास्त झाली तर दुसर्या दिवशी डोकं दुखतं, जड होतं, पुढला दिवस वाईट जातो.
इंग्लंडमध्ये जवळपास प्रत्येकाकडं कार असते. दारू प्यालेल्या माणूस कायच्या काय वेगानं गाडी चालवतो, त्याची गाडी रस्त्यावर नाच केल्यासारखी चालते. मग ब्रिटीश पोलिस चालकाला धरतात. श्वासाची तपासणी करतात. यंत्रामधे पोलिसांना कळतं की चालकाच्या रक्तातलं अल्कोहोलचं प्रमाण मर्यादेच्या पलीकडं गेलंय. पोलिस पुन्हा रक्ताची तपासणी करतात. तिथंही प्रमाण वाढलेल्याचं लक्षात आलं की शिक्षा होते. लायसन्स जातं, कधी कधी तुरुंगवासही होतो.
आपल्याकडे सलमान खाननं दारू पिऊन गाडी चालवली, फुटपाथवरचा एक माणूस मेला. आपला भारत देश महान असल्यानं पोलिस, कोर्ट यांनी घोळ घातले. सलमान सुटला. पण ब्रिटनमध्ये ते शक्य झालं नसतं.
ब्रिटनमध्ये १०० मिली रक्तात ८० मि.ग्रॅ. अल्कोहोल ही मर्यादा असते, त्यापेक्षा जास्त अल्कोहोल सापडलं तर मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, तुरुंगवास, परवाना रद्द करणं इत्यादी शिक्षा संभवतात.
दारू पिणार्या माणसाची ब्रिटनमध्ये एकच चिंता असते, ती म्हणजे रक्तात अल्कोहोल ८० मि.ग्रॅ.च्या पलिकडे जाता कामा नये. एवढं तोलून मापून पिण्यायेवढं अध्यात्म दोन घोट पोटात गेल्यानंतर शिल्लक रहात नाही. तोल सांभाळणं आणि दारू या दोन परस्परविसंगत गोष्टी असतात.
तेव्हा ब्रिटीश माणसाच्या मनात येतं की दारू तर प्यायची पण ती रक्तात सापडली नाही तर काय मजा येईल. पण पोटात आणि डोक्यात असेल तर अल्कोहोल रक्तात सापडणारच. म्हणजे पुढले लोचे आलेच. तर ते लोचे कमी करायचे म्हणजे रक्तातलं अल्कोहोल पटापट पचून गायब झालं पाहिजे, अंतर्धान पावलं पाहिजे. पिणार्या माणसाच्या भाषेत बोलायचं तर तास दोन तास मजा झाली की गाडं (गाडीही) वळणावर यायला हवी, रक्तातलं अल्कोहोल नाहीसं व्हायला हवं.
पिणार्या माणसाची ही गरज लक्षात घेऊन एका ब्रिटीश कंपनीनं ‘सेफ शॉट’ नावाचं एक औषध तयार केलं. या औषधाला फळाच्या रसाचा स्वाद असतो. दारु पिऊन झाली की हे औषध प्यायचं. या औषधामुळं माणसाच्या रक्तातलं अल्कोहोलचं प्रमाण झपाट्यानं कमी होत जातं, थोड्याच वेळात तो माणूस ठीकठाक होतो, गाडी चालवून घरी जाऊ शकतो. असा त्या कंपनीचा दावा होता.
गार्डियन या पेपराच्या लिंडा जेडेस या पत्रकार महिलेनं सेफ शॉटची परीक्षा पहायचं ठरवलं.
तर ही जेडेस बाई टेबलावर बसली. तिनं सात ग्लास वाईन प्यायली. श्वास तपासला. रक्तात १२० मि.ग्रॅ. अल्कोहोल होतं. म्हणजे ८० मि.ग्रॅ.पेक्षा किती जास्त. दोन तास जाऊ दिले. अल्कोहोलचं प्रमाण फक्त १० मि.ग्रॅ.ने खाली आलं होतं. या वेगानं अल्कोहोलचं प्रमाण ८० मि.ग्रॅ.च्या खाली आणायचं तर साताठ तास लागणार. म्हणजे तोवर बारमधेच मुक्काम करायची पाळी. किंवा यजमानाकडंच मुक्काम करावा लागणार. गाडी चालवत घरी जाता येणार नाही. सेफ शॉट फेल.
जेडेसबाईनं विचार केला की कदाचित सात ग्लास म्हणजे फार झाले, जरा कमी पिऊन औषधाचे परिणाम शोधूया. काही दिवसांनी या बाईंनी अर्धी बाटली वाईन घेतली, त्यावर जेवणही घेतलं, नंतर सेफ शॉट घेतलं. श्वासाची तपासणी केली.
मागल्यासारखंच. अल्कोहोल हटायला तयार नाही.
सेफ शॉट या उत्पादनात एसप्रेसो कॉफीचे चार घोट होतील येवढं कॅफीन होतं. शिवाय थिक्राईन आणि मेथीललिबरीन अशी दोन द्रव्यंही औषधात होती. ही रसायनं म्हणे मेंदू जागं ठेवतात. आणखी एक ह्युपरझाईन नावाचंही द्रव्यं त्यात घातलेलं होतं. त्याचंही काम मेंदूला सजग ठेवणं असं असतं असं त्या उत्पादकाचं म्हणणं.
म्हणजे लोचा कसा होता पहा. अल्कोहोल रक्तात असणार पण मेंदूवर त्याचा परिणाम होणार नाही असं काही तरी उत्पादकांच्या डोक्यात असावं. या उत्पादकानं भारतात फेरी मारली असती तर भारतीय पेदाड कसे आयुर्वेदिक मार्ग काढतात ते त्याला कळलं असतं. लिंबाचं सरबत पितात. ताक पितात. दारू हा सोमरस असतो, त्यावर नैसर्गिक ऑरगॅनिक उपाय.
जे असेल ते असो ब्रिटीश उद्योजक मेंदू ठीक करायला निघाला.
गार्डियननं शोधाशोध केली. या औषधाला अन्न आणि औषध तपासणी खात्यानं परवानगी दिलेली नव्हती. आणखी शोधाशोध केली. विविध युनिव्हर्सिट्या आणि प्रयोगशाळांत चौकशी केली. औषधांची तपासणी करण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. काही माणसांना औषध देतात काही माणसांना औषधाच्या नावाखाली निरुपद्रवी-काहीही परिणाम न करणारं पाणी देतात. अशी डबल ब्लाईंड तपासणी या औषधावर झालेली नव्हती. तपासणी करताना वैज्ञानिक रीतीनुसार मोठ्या प्रमाणावर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांवर प्रयोग करावे लागतात. तसे प्रयोग उत्पादकानं केले की नाही याची चौकशी गार्डियननं केली. कंपनीकडून समाधानकारक उत्तर गार्डियनला मिळालं नाही.
गार्डियननं अभ्यास करणार्या लोकांशी संपर्क साधला. अल्कोहोलचं मेटॅबॉलिझम पटकन करण्यावर कुठल्या युनिव्हर्सिट्या, प्रयोगशाळात संशोधन चाललंय याची चौकशी केली. वैज्ञानिकांनी सांगितलं की तसा विश्वास ठेवण्यालायक प्रयोग प्रकल्प कुठं चाललेला नाही.
अल्कोहोल हे ब्रिटनच्या दृष्टीनं चिंतेचं प्रकरण झालंय. ब्रिटनमधली माणसं जरा जास्तच अल्कोहोल घेतात. अमेरिकेत समजा सरासरी माणूस वर्षाला नऊ लिटर दारू पितो तर ब्रिटनमधे वर्षाला ११ लिटरपेक्षा जास्त दारू पितो. वैद्यकीय आणि आरोग्य खातं सांगतं की दारूमुळं माणसांची वजनं वाढताहेत, त्यातून स्वतंत्र आरोग्याच्या समस्या उभ्या रहात आहेत.
ब्रिटनचे नुकतेच हकालपट्टी झालेले पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोविडच्या काळात सार्वजनिक अल्कोहोलवर निर्बंध आल्यावर अल्कोहोलचा विरह सहन झाला नाही; त्यांनी स्वत:च केलेले कायदे पायदळी (नव्हे तोंडी) तुडवले आणि १० डाऊनिंग स्ट्रीट या अधिकृत कार्यालय-निवासस्थानी पार्टी केली. ते त्यांच्या अंगाशी (नव्हे गळ्याशी) आलं आणि त्यांना पंतप्रधानपद सोडावं लागलं.
त्यांच्यानंतर ऋषी सुनाक पंतप्रधान झाले. त्यांनी दारूवर कर वाढवला. म्हणजे दारूत जेवढं अल्कोहोलचं प्रमाण जास्त तितका त्यावरचा कर जास्त. असं काहीतरी कर असं त्यांना त्यांच्या सासूबाई सुधा मूर्ती यांनी सांगितलं असावं. कर वाढवला की किंमत वाढते आणि माणसं कमी पितात. ब्रिटीश माणूस आर्थिक बाजूनं विचार करत असतो त्यामुळं तसं घडत असावं. सुनाक यांनी दारू महाग केल्यावर दारू उद्योग वैतागला, त्यांनी आपल्या आर्थिक स्वातंत्र्यावर गदा आणल्याची तक्रार केली. पण सरकारनं कर कमी केले नाहीत.
तर मुद्दा असा की अल्कोहोलशी सध्या ब्रिटीश समाज झटापट करतो आहे. त्या झटापटीतलीच एक पळवाट सेफ शॉटवाले शोधत होते. दारू प्या पण पटकन अल्कोहोल नाहीसं करा.
पण सेफ शॉट फेल गेलंय. त्यांची संशोधनाची दिशा चुकली किंवा त्यांनी पुरेसं संशोधन न करताच त्यांचा प्रॉडक्ट बाजारात आणला. सेफ शॉट या औषधामध्ये तसं काही घातक नाहीये, पण सेफ शॉटबद्दल गैरसमज करून घेऊन माणसं दारू पीत बसण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे सेफ शॉट हे उत्पादन त्यात जे गुण नाहीत ते लोकांना सांगतंय.
गार्डियननं त्या प्रॉडक्टचा अभ्यास केला ही गोष्ट महत्वाची. त्या उत्पादनाबद्दल जी काही माहिती उपलब्ध आहे ती गार्डियनच्या फीचरनं लोकांसमोर ठेवली. अनुभव असा की आपलं उत्पादन घातक आहे असं कोणी सांगणं उत्पादकाना आवडत नाही. कंपन्यांना कधी कधी घातकपणा माहित असतो, पण कंपन्या तो लपवतात. कधी कधी कंपन्यांना घातकपणा माहित नसतो कारण पुरेशा तपासण्या कंपनीनं केलेल्या नसतात, शॉर्ट कट मारलेला असतो. अशा वेळी कंपन्यांचा प्रयत्न असतो की समाजात चर्चा होऊ नये. वर्तमानपत्रांना जाहिराती देऊन गप्प केलं जातं. पेपरांचं मुख्य उत्पन्न अलीकडं जाहिरात हेच असल्यानं पेपर आंधळेपणानं जाहिराती घेतात. बातमीदारांना गुंगवणं, त्यांना खाऊ पिऊ घालणं, त्यांचे परदेश दौरे घडवून आणणं, त्यांना नाना प्रकारे पैसे व वस्तू पोचवणं याही वाटा कंपन्या अवलंबतात. थोडक्यात असं की बातमीदार, संपादक आणि पेपर त्यांचं कर्तव्य करत नाहीत.
एक उदाहरण आहे.
एक बहुराष्ट्रीय कंपनी रसायनं करते, रंग निर्माण करते. या कंपनीचे रंग वापरून लहान मुलांची खेळणी तयार केली जात असत. आढळून आलं की खेळण्यांना दिलेले रंग घातक होते, त्यांनी कॅन्सर होऊ शकत होता. स्टीव कोल नावाच्या पत्रकारानं घातकता शोधली. त्यावर लिहिलं. बोंब झाली. लोकांनी अमेरिकन सरकारकडं मागणी केली की त्यांनी वरील खेळण्यांवर बंदी घालावी. झालं. अमेरिकन संसदेनं कमिटी नेमली, चौकशी आरंभली. कंपनी लईच दांडगी होती. लॉबिंग करणारे (लॉबिंग म्हणजे रदबदली) लोक सरसावले. या लोकांच्याही मोठ्या कंपन्या असतात. नाना युक्तिवाद घेऊन त्यांनी संसदेवर दबाव आणला. कंपनीनं स्वतंत्रपणे पेपरांवर दबाव आणले, बदनामी कायद्याच्या कारवाया सुरू केल्या. पण स्टीव कोल आणि त्याला पाठिंबा देणारे पेपर बधले नाहीत. शेवटी कंपनीला ती खेळणी बाजारातून काढून घेतली.
संसद, सरकार, पेपर यांच्यावर दबाव आणण्यावर सरकारनं अमाप पैसा खर्च केला. तो पैसा योग्य संशोधनावर खर्च केला असता तर किती तरी कमी पैशात चांगली खेळणी तयार होऊ शकली असती. उद्योगातून प्रदूषित पदार्थ बाहेर पडू नयेत यासाठी कायद्यानं काही यंत्रणा सांगितल्या आहेत, कायदेही केले आहेत. यंत्रणा उभारण्यावर समजा १०० रुपये खर्च होतात, कंपनी तो खर्च टाळते. नंतर लफडं होतं आणि ते निस्तरण्यासाठी कंपनी लाख रुपये खर्च करते. असो. तर जेडेस बाईनी एका उत्पादनाची चौकशी करून त्याबद्दलची माहिती पेपरात छापली. कंपनी काय करते पहायचं. बहुदा कंपनीला ते औषध मागं घ्यावं लागेल.
त्या कंपनीना भारतात ते औषध विकणं शक्य आहे. गंगेच्या काठावर कमंडलू घेतलेल्या बाबाला धरायचं. तो सांगेल की वरील औषध आयुर्वेदिक आहे, कारण त्यात नैसर्गिक अशा कॉफीच्या बियांची भुकटी घातलीय. प्रश्न संपला. त्या औषधाच्या खोक्यावर तळाला अगदी अणुरेणूच्या आकाराच्या शब्दांत लिहायचं की कुठल्याही औषधाचा गुण व्यक्तिसापेक्ष असतो. कोणाला औषध लागू पडतं, कोणाला पडत नाही, कोणाला पाच टक्के लागू पडतं कोणाला शंभर टक्के लागू पडतं. सबब उपभोत्तäयाचं समाधान झालं नाही तर त्याची जबाबदारी उत्पादकावर नाही. कंपनी गाजत असलेल्या नटाला धरेल. तो नट औषधाची जाहिरात करेल. भाडोत्री लोकांना स्टुडियोत बसवून भाडोत्री डॉक्टर करवी औषधाच्या गुणांची जाहिरात करेल. पेपर आणि चॅनेल कशाला मरायला जातील या प्रकरणात. त्यांना जाहिरात दिली प्रश्न मिटला. बातमीदार तर पुढार्यांची वक्तव्यं छापण्यात गुंग.
आता ब्रिटनमधे काय होतंय ते पाहायचं.