कुठली झक मारली आणि त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला गेलो, असे माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला झालं होतं. एक तटकरे सोडून पडेल चेहर्याचे नकली राष्ट्रवादीचे नेते, मंत्री, आमदार वर्धापनदिन सोहळ्याला हजर होते, असं पोक्या म्हणाला. व्यासपीठावरील सर्व नेत्यांच्या पराभवाच्या गायनापेक्षा अजितदादांच्या प्रदीर्घ पत्रकार परिषदेने तो जाम बोअर झाला. तो मला म्हणाला, अजितदादांच्या निष्ठावंत चेल्यांनी प्रेक्षागृह पूर्ण भरलेलं असलं तरी त्याला वर्धापनदिनाच्या उत्साहापेक्षा एखाद्या शोकसभेचा फील आला होता. सगळे नेते पक्षाला श्रद्धांजली वाहावी, अशा सुतकी चेहर्याने मृतवत झालेल्या पक्षाच्या आत्म्याला येत्या विधानसभेत तरी शांती लाभो, अशीच जणू प्रार्थना करीत होते. बाकीच्या वक्त्यांच्या भाषणात थोडी तरी धुगधुगी वाटत होती, पण अजितदादांच्या भाषणाचं चर्हाट आणि पत्रकार परिषदेतील त्यांनी तेच तेच मुद्दे चघळत लावलेली लांबण ऐकणार्यांना असह्य वाटत होती. मुळात पक्षच नकली असल्यामुळे त्या जीव नसलेल्या पक्षाबद्दल अजितदादांचं बोलणं इतकं कृत्रिम आणि फोल वाटत होतं की, पोक्या ती पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून माझ्या घरी आला तेव्हा मी त्याला म्हणालो, पोक्या हे तू चांगलं केलं नाहीस. उलट अशावेळी आपण कॉमेडी शो बघत आहोत, अशी कल्पना करून त्याचा आनंद घ्यायला हवा. आता तुला हा आनंद पुन्हा अनुभवायचा असेल तर त्यांना आता पुन्हा भेटून त्यांची फिरकीवजा मुलाखत घे आणि फ्रेश हो. त्यामुळे त्यांचंही समाधान होईल आणि तुलाही एकपात्री विनोदी अभिनय पाहण्याचं समाधान मिळेल. पोक्याला ते पटलं आणि तो वार्याच्या वेगाने अजितदादांची मुलाखत घेऊनही आला. तीच ही मुलाखत.
– नमस्कार अजितदादा. तुमचं खास अभिनंदन.
– ते कशाबद्दल? माननीय मोदीजींनी आमच्या पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद तर दिलं नाही ना?
– नाही हो. एका कॅबिनेट पदासारखी क्षुल्लक गोष्ट तुम्हाला कशाला देतील ते? उलट कॅबिनेटपेक्षा दुसरं काहीतरी मोठं देण्याचा त्यांचा विचार असू शकेल. कदाचित तुमच्या पक्षातील काही अति टॅलेंटेड नेत्यांना काम्पुचिया, होनोलुलू यासारख्या देशात भारताचे हायकमिशनर म्हणून सुद्धा नेमतील ते.
– आहेतच तशी माझ्या पक्षातली गुणी बाळं. मला विचारलं तर मी आमच्या परांजप्यांच्या आनंदची पहिली शिफारस करेन. काय अफलातून बोलतो तो.
– पण उभा कुठे होता तो?
– त्याची गरज नाही. अरुणाचलमध्ये माझ्या तीन सिटा आल्यात. त्यातल्या एकाला दम देऊन राजीनामा द्यायला लावीन आणि त्या जागी याला निवडून आणीन.
– अशी दमबाजीच नडली ना तुम्हाला बारामतीत. ते जाऊं दे, पण तुमचा वर्धापनदिन सोहळा अगदी दृष्ट लागण्यासारखा झाला. एक जागा जिंकूनसुद्धा तुमच्या पक्षाची सत्ता आल्यासारखा उत्साह होता. फिनिक्स की काय म्हणतात त्या पक्ष्यासारखी राखेतून भरारी घेण्याची ही आकांक्षा पाहिली की कधीतरी तुमच्या पक्षाची सत्ता महाराष्ट्रात येईल आणि तुम्ही मुख्यमंत्रीपदावरून भाजपसह सर्व पक्षांची तुमच्या गावरान भाषेत तासंपट्टी कराल, असं चित्र डोळ्यांसमोर उभं राहातं.
– खरंय ते. आमच्या पक्षाला छत्रपती शाहू महाराज, फुले, आंबेडकरांच्या विचारांची परंपरा आहे तो पक्ष…
– नका त्या महापुरुषांची नावं घेऊ. त्यांच्या नावांशिवायही तुमच्या पक्षाची नाव सत्तेचा पैलतीर गाठू शकते, इतकी तुमच्या स्वत:च्या विचारांची ताकद आहे.
– थांब… थांब… मला हे वाक्य लिहून घेऊ दे. वा, वा, क्या बोल्या!
– जसा हरिणीला आपल्या बेंबीतील कस्तुरीचा थांग न लागल्यामुळे ते त्याच्या शोधासाठी सैरावैरा धावत असतं, काजव्याला आपल्या पार्श्वभागातील प्रकाशाची जाणीव नसते, तसंच झालंय तुमचं. तुझं आहे तुजपाशी, पण तू जागा चुकलासी. एक जागा आली म्हणून काय झालं? तटकरेंची ही अभेद्य तटबंदी भक्कम झाली की तुमच्या विचारांच्या बारामती सिमेंटने…
– बापरे! हे जर मला निवडणुकीच्या आधी बोलला असतास तर किती ऊर्जा भरली असती माझ्यात. शेवटच्या क्षणी सुनेत्राच्या पराभवाची खात्री पटल्यामुळे तोंड पाडून बसलो नसतो मी. कट्टर मुकाबला करून दोन लाख मतं आणखी खेचून आणली असती. तेव्हा कुठे होतास रे माझ्या सोन्या!
– अजून वेळ गेलेली नाही. मोठी झेप घेण्यापूर्वी चार पावलं मागे यावं लागतं. तसं झालंय तुमचं. त्या धूर्त, कारस्थानी फडणवीसांना धडा शिकवायचा असेल, तर तुम्ही अजूनही घरवापसी करा. नाहीतरी तुम्ही षण्मुखानंदच्या भाषणात राष्ट्रवादी पक्ष स्थापन करणार्या काकांविषयी कृतज्ञता व्यक्त केलीच होती ना!
– पहिल्यांदाच लाखातलं बोललास. काकांपासून वेगळा होताना माझा हॅम्लेट झाला होता रे. माझ्याबरोबर आलेले सहकारीसुद्धा काकांकडे जाण्याची भाषा करताहेत. माझ्याआधी ते गेले तर माझी नाचक्की होईल. आणि हे सहकारीसुद्धा माझं कुठे ऐकताहेत! पराभवानंतर एकेक तारे कसे तारे तोडताहेत ते बघा. नग आहेत नग. ते छगन भुजबळ नेहमी वाकड्यातच बोलत असतात. एवढा गूढ स्वभावाचा माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. काहीजणांनी तर वर्धापनदिनाच्या आधीच नांगी टाकलीय. मला आता असं वाटतंय की, हे सगळं राजकारण सोडून मोदीजींच्या आधी हिमालयात जाऊन ध्यान करावं.
– हे बरोबर वाटलं तरी असं खरोखर करू नका. तुम्ही महत्वाकांक्षी आहात. मुत्सद्दी आहात. या स्वभावाला थोडी नम्रतेची झाक द्या. अहंकार दूर सारा. म्हणजे काकांच्या सान्निध्यात राहून आत्मविकासाच्या वाटा प्रकाशाने उजळून जातील. आत्ता काकांना शरण गेलात सारं काही विसरून, तर काका सर्व काही विसरून सुप्रियाप्रमाणे तुम्हाला मोठं करण्यात हात आखडता घेणार नाहीत.
– मलाही ओढ लागलीये काकांकडे जाण्याची. त्या मोदीजींची गुलामी पत्करण्यापेक्षा काकांशी इमानाने वागलो, तर काका लवासापेक्षाही मोठं मन दाखवून मला कुठल्या कुठे नेतील यावर माझा विश्वास आहे. थँक्यू पोक्या, थँक्यू.