दादरहून सातारा आणि सातार्याहून पुणे हा प्रबोधनकारांचा प्रवास म्हणजे संकटांची मालिकाच होती. ही संकटं थोडी थांबली ती एप्रिल १९२५ पासून. प्रबोधन छापखाना सुरळीत झाला आणि `कोदण्डाचा टणत्कार`च्या दुसर्या आवृत्तीला वाचकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे त्यांना मोठा आधार मिळाला.
– – –
एप्रिल १९२५चा चौथ्या वर्षाचा पहिला अंक हा प्रबोधनचा पुनर्जन्मच होता. जवळपास नऊ महिने थांबलेला प्रबोधनचा प्रवास त्यानंतर सुरळीत झाला. दुरुस्त्या केल्यानंतर मुद्रणयंत्र नीट झाल्यामुळे आता प्रबोधनकारांना तशी काळजी नव्हती. त्यांना छपाईचा धंदा नीट माहीत होता आणि त्यांच्या लेखणीवर वाचक फिदा होतेच. त्यामुळे या काळात प्रबोधनकारांच्या अडचणी बर्यापैकी दूर झालेल्या दिसतात. त्यांना भरपूर पैसा मिळत होता असं नाही, पण संसार नीट चालवता येईल, इतकी कमाई सुरू झाली. ती त्यांना पुरेशी होती. लहानपणापासून प्रबोधनकार आणि रमाबाई दोघांनीही प्रचंड गरीबी अनुभवल्यामुळे त्यांना काटकसरीत राहण्याची सवय होती. त्यावर ते दोघेही समाधानी होते, असं दिसतं.
प्रबोधनकारांनी या परिस्थितीचं वर्णन असं केलं आहे, प्रबोधन नियमित चालू झाला. छापखानाही व्यवस्थित बनला आणि लव्हाळ्या युवतीप्रमाणे लक्ष्मी जरी माझ्या गळ्यात चतुर्भुज धावत येऊन पडली नाही, तरी रोजच्या मीठ भाकरीची ददात तिने ठेविली नाही. मी. श्रीयुत वैâ. चित्रे आणि माझे विश्वासू चार कामदार देव बुद्धी देईल तसे, एका जीवाभावाने प्रबोधन कार्याचे गाडे रेटीत होतो. अल्पसंतोष हाच आमच्या जीवनाचा वाटाड्या असल्यामुळे सुक्या ओल्या भाकरीचे अमृत करून व्यवहार चालवीत होतो.
स्वतः लिहिलेल्या छोट्या मोठ्या पुस्तकांतून प्रबोधनकारांना प्रबोधनच्या तुलनेत चांगली कमाई होत असे, असं दिसतं. त्यामुळे थोडं स्थिरस्थावर होताच त्यांनी प्रत्येक वेळेस नवीन पुस्तकं छापण्याचा मनोदय प्रबोधनमधून व्यक्त केला आहे. यातली बहुतांश पुस्तकं ही प्रबोधनमधल्या लेखांचंच संकलन होतं. ती त्यांनी ग्रंथमालांच्या रूपाने प्रकाशित केली होती. एकदा सेटिंग झाल्यामुळे त्याची छपाई तुलनेने स्वस्तही पडत असावी. पण त्यांना सगळ्यात जास्त आधार दिला तो कोदण्डाचा टणत्कार या त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीने. प्रबोधनकार नोंदवतात, या वेळीच `कोदण्डाचा टणत्कार ग्रंथाची दुसरी आवृत्ती लिहून प्रसिद्ध केली आणि त्यामुळे माझी सांपत्तिक स्थिती पुष्कळच सावरली गेली.’
कोदण्डाचा टणत्कार अर्थात भारत इतिहास संशोधक मंडळास उलट सलामी या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९१८ साली आली होती. त्याने प्रबोधनकारांना ओळख मिळवून दिली. इतिहासाचार्य राजवाडेंसारख्या प्रतिष्ठित संशोधकाची मांडणी साधार लोळवून बहुजनांना इतिहासाकडे बघण्याचं नवं भान देणारा हा ग्रंथ ठरला. ब्राह्मणी इतिहास लिहिणार्या राजवाडे कंपूला हरवता येतं, हा विश्वास या पुस्तकाने बहुजन समाजातल्या सुशिक्षितांना दिला. पहिल्या आवृत्तीला सात वर्षं उलटून गेल्यामुळे त्याच्या नव्या आवृत्तीची प्रतीक्षा होतीच. त्यामुळे या आवृत्तीला जोरदार प्रतिसाद मिळाला. पहिल्या आवृत्तीचं स्वरूप हे प्रामुख्याने राजवाडेंच्या निष्कर्षांना प्रतिवाद असं होतं. पण दुसर्या आवृत्तीत प्रतिवादाच्या पुढे जात इतिहासलेखनाच्या बहुजनी दृष्टिकोनाची नवी मांडणी आहे. एकूण सात सविस्तर प्रकरणांमध्ये ही मांडणी केलेली आहे. शेवटी प्रबोधनमधला एक लेखही आहे. `कोदण्डाचा टणत्कार’ची पहिली आवृत्ती आज उपलब्ध नाही. वाचकांसाठी ही दुसरी आवृत्तीच उपलब्ध आहे. ती prabodhankar.com या वेबसाईटवर वाचताही येईल.
प्रबोधनकारांनी हा ग्रंथ छत्रपती शाहू महाराज आणि तेव्हा नुकतेच निधन झालेले रायबहादूर भाईसाहेब गुप्ते यांना अर्पण केला आहे. इंदूरच्या होळकर संस्थानात दिवाण म्हणून ठसा उमटवणारे भाईसाहेब हे उत्तम इतिहासकारही होते. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या इतिहासावर राजवाडे कंपूने लावलेलं लांच्छन दूर करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. अर्पणपत्रिकेत प्रबोधनकारांनी त्यांचं वर्णन असं केलं आहे, आंग्लाईच्या पहिल्या भर अमदानीत चांद्रश्रेणीय कायस्थ प्रभू समाज आत्मज्ञानपराङ्मुख झाला असता, स्वार्थत्यागपूर्वक जुन्या ऐतिहासिक बखरींचा जीर्णोद्धार करून त्यांच्यात आत्मज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणारे इतिहासपंडित प. वा. रायबहादुर भाईसाहेब गुप्ते.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच प्रबोधनकारांनी प्रास्ताविक खुलासा लिहून दुसर्या आवृत्तीची भूमिका स्पष्ट केली आहे. ती वाचल्यावर या आवृत्तीचं महत्त्व स्पष्ट होतं, या पुस्तकाची पहिली आवृत्ति कार्तिक शु १५ त्रिपुरी पौर्णिमा शके १८४० (ता. १७ नवंबर १९१८) रोजी प्रसिद्ध झाली व अवघ्या एकच महिन्यांत सर्व प्रति खलास झाल्या तेव्हांपासून आतापर्यंत मागणीचा जोर सारखा वाढत आहे. पहिली आवृत्ति इन्फ्लूएंझाची साथ अगदी जोरात असताना घाईघाईत दोन छापखान्यांत कशी तरी छापून काढली होती. या द्वितीयावृत्तीत पुष्कळच नवीन मजकूर घालून कित्येक अस्पष्ट विधाने स्पष्ट केली आहेत. विशेषतः छत्रपती संभाजीच्या चरित्रावर अगदी नवीन प्रकाश पाडणारा ऐतिहासिक मजकूर वाचकांना प्रथम याच पुस्तकांत पहावयास मिळत आहे. प्रस्तुत पुस्तक प्रथमत: भारत इतिहास संशोधक मंडळास प्रत्युत्तरादाखल म्हणून जरी लिहिले होते, तरी विधाने स्पष्ट करताना घातलेल्या चर्चात्मक मजकुरामुळे, त्याचे एकांगी स्वरूप जाऊन, त्याला एका इतिहासविषयक चिकित्सक निबंधाचे स्वरूप आले आहे. किंबहुना असेही म्हणता येईल की हे पुस्तक म्हणजे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे रहस्य अचुक पटविणारे हँडबुक होय. भिक्षुकी कारस्थानामुळे क्रांतीचक्रात सर्वस्वाचा होम झाला असता आणि हुंडाविध्वंसनाच्या चळवळीमुळे आमच्यावर बिथरलेल्या कायस्थ प्रभू निंदकांच्या विरोधाचा जोर भयंकर असताहि, ही द्वितियावृत्ती लिहून काढण्याइतकी मनाची शांती ज्या भगवान श्रीकृष्णाने अभंग राखिली त्याला अनन्य भावे साष्टांग प्रणिपात करून हा टणत्कार निस्पृह व विवेकी देशबांधवांना विचारक्रांतीकारक होता, अशी अपेक्षा करून `शंभर वर्षापूर्वीचे महाराष्ट्र अथवा हिंदवी स्वराज्याचा खून या ऐतिहासिक ग्रंथाच्या प्रकाशनाकडे वळतो.’
या मनोगतात सांगितलेलं शंभर वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र हे पुस्तक प्रबोधनकारांना हाती घेता आलेलं दिसत नाही. तशी सवडच त्यांना मिळालेली दिसत नाही. हिंदवी स्वराज्याचा खून हे छोटं पुस्तक नंतर लवकरच आलं. पण त्याची सविस्तर मांडणी प्रकाशात येण्यासाठी १९४८ साल उजाडावं लागलं. प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी या त्यांच्या अजरामर पुस्तकाचा संकल्प शंभर वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी वारंवार केला गेला.
प्रबोधनकारांनी या खुलाशात ‘कोदण्डाचा टणत्कार’चं वर्णन `ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे रहस्य अचुक पटविणारे हॅन्डबुक असं बिनचूक केलं आहे. प्रबोधनकारांनी विक्रेते आणि जनसंपर्क अधिकारी म्हणून आधी आणि नंतरही काम केलं होतं. त्यामुळे त्यांची जाहिरातींची भाषा आणि मांडणी यावर उत्तम पकड होती. प्रबोधनमधल्या त्यांनी केलेल्या जाहिराती हा खरं तर वेगळ्याच अभ्यासाचा विषय आहे. ‘कोदण्डाचा टणत्कारा’च्या जाहिराती एप्रिल १९२५च्या अंकात आल्या आहेत. त्यातल्या जाहिरातींची कॉपी वाचून आजही हे पुस्तक विकत घ्यावंसं वाटतं. तेव्हा तर या पुस्तकावर उड्याच पडल्या.
जाहिरातींमध्ये प्रबोधनकारांनी कोदण्डाचा टणत्कार विकत घेण्याच्या आवाहनाचा पहिला नमुना असा, मराठेशाहीच्या उत्पत्ति स्थिती लयाची स्पष्ट चिकित्सा करणारा, संभाजी छत्रपतींच्या चरित्रावर नवीन प्रकाश पाडणारा आणि ब्राम्हण ब्राम्हणेतर भेदाचे अचूक निदान ठरविणारा श्रीयुत ठाकरे कृत `कोदण्डाचा टणत्कार. सुधारून वाढविलेली दुसरी आवृत्ती प्रत्येक शिवभक्ताने वाचून मनन केल्यास, त्याला आत्मप्रबोधनाचा मार्ग स्पष्ट दिसू लागेल.’
प्रबोधनच्या वाचकांना त्यांनी केलेलं आवाहन असं होतं, प्रबोधनाला जीवदान देऊन त्याच्या हातून विचारक्रांतिकारक देशसेवा व्हावी, अशी आपली इच्छा असल्यास `कोदण्डाचा टणत्कार’ या ऐतिहासिक महत्त्वाच्या ग्रंथाची ताबडतोब मागणी करा. आपल्या समविचारी इष्टमित्रांना एकेक प्रत घेण्याची आणि प्रबोधन मासिकाचे वर्गणीदार होण्याची आग्रहाची विनंती करा. पाच रुपये मनी ऑर्डरने पाठविणारांना टणत्काराच्या ५ प्रति र. बु. पोष्टाने पाठवू.’
‘कोदण्डाचा टणत्कार’ वाचकांपर्यंत पोचवण्याच्या संदर्भात एक महत्त्वाची चौकट जून १९२५च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. ती अशी, फक्त सार्वजनिक लायब्रर्यांसाठी- एका सज्जन गृहस्थानी आपल्या मृत पत्नीच्या वार्षिक श्राद्धानिमित्त कोदण्डाचा टणत्कार या ग्रंथाच्या २५ प्रति २५ सार्वजनिक ग्रंथमंदिरांना बक्षिस देण्यासाठी किंमतीचे रु. २५ आम्हाकडे पाठवविले आहेत. अट एवढीच की, ते ग्रंथमंदीर प्रबोधन मासिकाचे वर्गणीदार असावे, किंवा नवीन वर्गणीदार व्हावे. (सार्वजनिक लायब्रर्यांना सवलतीची वर्गणी रु. ३ आहे. ही रक्कम म.आ. ने पाठवावी किंवा टणत्कार व्हीपीने मागवावा.) – मॅनेजर, प्रबोधन, पुणे शहर.’ त्या काळात मृत पत्नीच्या वार्षिक श्राद्धाच्या निमित्ताने पुस्तकं वाटणारा प्रबोधनचा वाचक हा विरळाच म्हणायला हवा. आणि त्यांनी भेट म्हणून दिलेल्या रकमेतून सार्वजनिक ग्रंथालयांना नवीन वर्गणीदार बनवण्याची संधी म्हणून बघणारा प्रबोधनकारांसारखा कल्पक विक्रेताही तितकाच विरळा म्हणायला हवा. याच अंकात `कोदण्डाचा टणत्कार’सोबत `भिक्षुकशाहीचे बंड, स्वाध्याय संदेश ही प्रबोधनकारांची पुस्तकंही विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात आहे. विशेष म्हणजे प्रबोधनचे पहिल्या दोन वर्षांचे अंक त्या काळच्या पद्धतीप्रमाणे पुस्तकासारखे बांधून प्रत्येकी ४ रुपये किमतीला उपलब्धही करून दिलेले आहेत. या पुस्तकांमुळेच आज प्रबोधनचे बहुतांश अंक उपलब्ध झाले आहेत.
थोडक्यात नव्या छापखान्याने आणि ‘कोदण्डाचा टणत्कार’च्या दुसर्या आवृत्तीने प्रबोधनकार पुण्यात स्थिरावले. त्यामुळे प्रबोधनकारांना पुण्यातून हाकलवण्याची स्वप्नं पाहणारे ब्राह्मणी गुंड अस्वस्थ झाले. त्यातून नवा संघर्ष उद्भवणार होताच. पण प्रबोधनकार त्या सगळ्याला पुरून उरणार होते. त्याची प्रबोधनकारांना जाणीव होतीच. त्याविषयी प्रबोधनकार लिहितात, `बुधवारातून हुसकावला, पण लेकाचा सदाशिव पेठेत उपटला म्हणून कारवाईखोर नारो-सदाशिव-शनवार्यांच्या अंगाचा तीळपापड उडाला. तो काळच तसा कठोर संघर्षाचा होता. ब्राह्मण ब्राह्मणेतरांत आडवा विस्तव जात नव्हता. खरा जातीयवाद त्याकाळीच उफाळलेला होता.