हल्ली कोणत्याही समारंभाला जायचे म्हणजे मला थोडी भीती वाटू लागलीय. असे वाटते की यजमानांना सांगावे आम्ही घरी बसतो तुम्ही झूमवर थेट प्रक्षेपण करा. कारण लग्न असो, वाढदिवस असो, साठी असो, मुंज असो अथवा बारसे, जिथे हे सर्व घडते ते होत असताना ते दिसू शकेल अशा मोक्याच्या सर्व जागा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर आणि स्वाट टीमला लाजवतील अशी अवजड आयुधे अंगाखांद्यावर बाळगून क्षणचित्रं टिपणारे लोक या मंडळींनी पटकावलेल्या असतात आणि बाकी उरलेल्या स्वयंघोषित हौशी मोबाईल फोटोग्राफरांनी, यात मित्रमैत्रिणी, शेजारचे, सोसायटीचे, हास्यक्लबचे, झालेच तर व्हॉट्सअप समूहातील दूरचे नातेवाईक, जवळचे स्नेही अनेक असतात. फक्त किराणा दुकानदार आणि दूध देणारे नसावेत (अशी आशा आहे). बाकी सर्व जण प्रोफेशनल फोटोग्राफर लाजेल अशा तोर्यात हातातील मोबाईल ‘ध्वज विजयाचा उंच धरा रे’च्या आविर्भावात पकडून फोटो काढत असतात, यातील ९० टक्के असतात सेल्फीवाले!!!
मला ते सेल्फी तंत्र आजही जमलेलं नाही, जेव्हा कधी काढण्याचा प्रयत्न करते तेव्हा माझा चेहरा दिसत नाही, वेगळाच भाग दिसतो किंवा मी सोडून मागील सर्व तरी दिसतात… तर मुद्दा होता या हौशी मोबाईल फोटोग्राफर मंडळींचा. आधी हे काम तरुणवर्गाकडे असायचे, आता त्यांचे आईबाप पण यात अहमहमिकेने सहभागी झालेले असतात.
लग्नात मंगलाष्टक चालू असताना तर समोर ही भाऊगर्दी, हार घालण्याचा क्षण टिपायची जी घाई या सगळ्यांना असते विचारता सोय नाही. भारत-पाकिस्तान युद्धात जगप्रसिद्ध युद्धतहावर जनरल नियाझी सही करत होते, तेव्हाही फोटोग्राफर असे दबा धरून बसलेले नसावेत. तेव्हा मोबाईल नव्हतेच म्हणा.
तर सांगायची गोष्ट म्हणजे आजकाल या मोबाईल फोटोग्राफर मंडळींनी डोक्याला शॉट केलाय. होते कसे की स्टेजसमोर खुर्च्या कोच असतात आणि तिथे वयोवृद्ध लोक बसलेले असतात. त्यांना आपणच सन्मानाने, आदराने त्या जागेवर बसवलेलं असतं, ते त्यांना समोर काय चाललेय हे सहज दिसावे यासाठी. पण फोटुग्राफर आणि व्हिडिओग्राफरांच्या मानवी तटबंदीमुळे फक्त वेगवेगळ्या कपड्यांतील पार्श्वभागच समोर दिसत राहतात आणि उडणार्या फ्लॅशमुळेच वर त्या मंचावर काय चाललंय याचा थोडा अंदाज मिळतो.
यातून जागा मिळाली तर प्रोफेशनल फोटो, व्हिडिओग्राफर असतातच. त्यांच्या वायरी केबलच्या जंजाळात न अडकता साडी सांभाळत कसा बुफे गाठायचा, यात मी तरबेज झाले आहे हल्ली.
फोटोग्राफरांना निदान रीतसर काँट्रॅक्ट तरी असते, सोहळ्याचं सर्वात योग्य जागेवरून चित्रण करण्याचं कामच त्यांना आपण दिलेलं असतं, त्यांचं आडवं येणं समजून तरी घेता येतं. पण हे नतद्रष्ट मोबाईलवाले? त्यांचं काय करायचं?
एकदा एका आजीच्या बाजूला बसले होते. मंगलाष्टक सुरू होते, समोर ही गर्दी, आजी वैतागून एकाला म्हणाल्या, अरे जरा बाजूला व्हा, बघू देत आम्हाला!!
पोट्टा बोलतो कसा, आजी फॉरवर्ड करतो थांबा!!
अरे सोन्या, तू फॉरवर्ड करायच्या आधी आजी फॉरवर्ड झाली तर?
हातात मोबाईल घेऊन संपूर्ण हॉलभर क्लिकक्लिकाट करत मोकाट फिरणार्या या मंडळींनी पूर्ण कार्यक्रमाचा विचका करण्याचा विडा उचलला आहे आजकाल. परत जिथे तिथे सेल्फी. जो प्रसंग समोर घडतोय तो बघणे महत्त्वाचे की तो आपल्या मोबाईलमध्ये अट्टाहासाने टिपणे महत्त्वाचे. एका मिलेनियल सुपुत्राने मला सांगितलं की फोटोपेक्षा पोस्ट महत्वाची असते आंटी! स्टेटस (आजकाल याचा अर्थ व्हॉट्सअपचे स्टेटस, तुमची समाजातील पत नाही) आणि इन्स्टा स्टोरी सर्वात आधी पोस्ट करायची असते.
न राहवून मी विचारलं, ‘मग नंतर त्याचे काय होते?’
‘म्हणजे काय आण्टी, ऑफकोर्स डिलिट होते.’
‘अरे गधड्या मग आम्हाला का बघू दिलं नाहीस नीट?’
अर्थात हा प्रश्न विचारेपर्यंत तो मोबाईलधारी कार्टा गायब झाला.
बरं हे काही सोहळ्याच्या यजमानांना सांगायची सोय नाही. अनेकजण त्यांचे नातेवाईक आणि उरलेले त्यांच्या पाल्याचे मित्र मैत्रिणी. आजकाल तर खुद्द यजमान पण तेच करताना दिसतात. एका लग्नात मुलीची माय, एका हातात मोबाईल घेऊन दुसर्या हातानं मम म्हणत होती.
आता मंगलाष्टक म्हणणार्या गुरुजींनी अंतरपाट धरून दुसर्या हातानं सेल्फी काढलाय इतकेच बघायचं बाकी आहे.
वास्तविक हल्ली लग्न ठरण्याआधी फोटोग्राफर बुक होतात. लग्न होण्याआधीचे मेहंदी हळद असे कार्यक्रम, लग्न, स्वागत समारंभ आणि या सर्वांचे अल्बम, व्हिडिओ इत्यादी या सगळ्याचे बिल काही लाखात जाते. प्रत्येक क्षण टिपायला हवा ही मुख्य अट. अरे हो, प्री वेडिंग शूट राहिले.
ज्याचा त्याचा पैसा, जसा हवा तसा खर्च करावा. पण समारंभाला जेव्हा पाहुण्यांना त्यातही ज्येष्ठ नातेवाईकांना आमंत्रित करता, तेव्हा त्यांची सोय बघणे महत्वाचे असते. जेव्हा मोबाईल नव्हता, तेव्हा लग्न म्हणजे नातेवाईक एकमेकांना भेटणे, वरवधूंच्या पालकांनी पाहुण्यांना भेटून बोलणे, आग्रह करणे, रिसेप्शनला फोटो काढणे असे होते.. हल्ली पालकांची जागा नवरा-नवरीच्या मित्र मैत्रिणींच्या टोळक्याने बळकावली आहे. लग्नाचा खर्च आपल्याच खिशातून केलाय असे वावरत असतात लेकाचे.
मला या सगळ्यात काहीएक प्रॉब्लेम नाही, पण ज्यासाठी आलो आहोत, तो समारंभ व्यवस्थित बघता यावा ही माझी इच्छा असते. ती आजकाल पूर्ण होत नाही.
हे कमी म्हणून की काय जिथे तिथे सेल्फी पॉइंट्स असतात. तिथे एकमेकां सहाय्य करू या न्यायाने मनमुराद फोटो काढणे चालू असते.
आहे तो क्षण अनुभवायचा की त्याला फोटोत बंदिस्त करून ठेवायचे? मंगलाष्टक संपता संपता आई वडिलांचे भरलेले डोळे, नवरीची आनंद आणि किंचित दुखःमिश्रित भावना, नवर्याचा थोडा गोंधळलेला, थोडा उत्सुक चेहरा, करवलीचा तोरा, आत्या मामा मावश्यांचे आनंदी भाव, हे सगळे प्रत्यक्ष बघण्यात, अनुभवण्यात जी मजा असते ती हल्ली मिळत नाही.
लग्न सोडा, एका ज्येष्ठ जोडप्याच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली. नातवंडं, मुलं यांनी हौसेने जंगी समारंभ ठेवला, या आजी-आजोबांचे नातेवाईक स्नेही पण साधारण ७५-८० वयाचे. साहजिक ते बसून बघत होते, केक कापून हार घालायच्या वेळी स्टेजसमोर या मोबाईल फोटोग्राफरची तुडुंब गर्दी, बसलेल्या कोणालाही ना तो क्षण बघता आला, ना त्यांचे उखाणे ऐकता आले.
आयुष्यातील प्रत्येक वेगळा क्षण असा कॅमेर्यात बंदिस्त करण्याची ही लाट नक्की काय सांगते?
अगदी आपल्या मुलाच्या शाळेच्या समारंभात पण पालक बिनदिक्कत उभे राहून मोबाईलमध्ये शूट करत असतात. अरे तो सोन्यासारखा प्रसंग बघा की आधी डोळे भरून… कॅमेरा भरायची घाई काय एवढी? एखादे गाणे म्हणताना, नाच करताना, भाषण देताना मुलाच्या चेहर्यावर उमटणारे भाव डोळ्याने टिपणे महत्त्वाचे की ते शूट करणे? आणि हल्ली तर पालकच इतके इशारे करत असतात की भीती वाटते, आता थोड्या वेळाने हेच स्टेजवर चढून नाचू लागतात की काय?
या मानसिकतेमागील कारण मला अजून उमगले नाहीये. तरुण सोडा, पण बर्यापैकी मोठ्या वयाचे अंकल-आंटीही असे करू लागतात, तेव्हा हेच का तुमचे संस्कार? असे विचारावेसे वाटते.
एक लक्षात घ्या, इथे प्रश्न वयाचा किंवा शिष्टपणा करण्याचा बिलकुल नाही, तर औचित्याचा आहे. आपल्या वागण्याने अन्य लोकांना त्रास होऊ शकतो किंवा होतोय हेच यांच्या खिजगणतीत नसते. वडाला जशा पारंब्या तशा या लोकांच्या हाताला मोबाईल असतो. भीती वाटावी इतपत हे वागणे वाढत चालले आहे. तुम्ही काय गोंधळ घालणार, फोटो काढणार, सेल्फी घेणार ते खुशाल करा लेको.
हल्ली लोक आपले सोशल मीडियावरील आयुष्य रंगवण्यात इतके मग्न होतात की त्यांच्या आयुष्यातील कौटुंबिक जिव्हाळ्याचे क्षण कापरागत उडून जाऊ लागले आहेत. नातवाच्या वाढदिवसाला त्याच्या उष्ट्या तोंडाचा घेतलेला पापा, आज्जीला वाकून नमस्कार करताना तिचा डोक्यावरून फिरणारा हात, रिसेप्शनला उभा असणारा लेक बघताना वडिलांना वाटणारा अभिमान, अशा अनेक अनेक घटना, निव्वळ डोळ्याने अनुभव्यात अशा, पण फोटोच्या असोशीपायी नाहीशा होत चालल्या आहेत.
तरी मी जेवताना बिवताना फोटो काढणारा आला की मास्क चढवून बसते, घे फोटो बाबा!! मला एक नक्की माहिती असते, माझा चेहरा फार बघणेबल पण नाही, त्यामुळे तो याने टिपला तरी फायनल अल्बममधे जाणे अशक्य. थोडक्यात काय, किती क्लिकक्लिकाट करायचा तो दुसरीकडे करा, माझ्यासारख्या लोकांच्या डोक्याला शॉट देऊ नका, ही नम्र विनंती.