प्रबोधनकार ही एक जितीजागती चळवळ होती. पाक्षिक `प्रबोधन`च्या सुरुवातीच्या दिवसांतच याची अनुभूती दादरमधल्या तरुणांना आली. `प्रबोधन`ची कचेरी ही स्वाध्यायाश्रम बनून चळवळींचं केंद्र बनली होती.
– – –
`प्रबोधन` हे सामाजिक सुधारणांच्या चळवळींची भूमिका घेणारं आक्रमक पाक्षिक होतं. त्यामुळे राजकीय सुधारणांच्या आधी सामाजिक सुधारणा हव्यात असं मानणार्या विचारवंत कार्यकर्त्यांचं समर्थन त्याला मोठ्या प्रमाणात मिळू लागलं होतं. त्याविषयी प्रबोधनकार लिहितात, `आगरकरांच्या सुधारकानंतर सामाजिक सुधारणांच्या प्रश्नाला वाहिलेले `प्रबोधन` हेच एकमेव पाक्षिक असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक समाज सुधारणा धुरिणांचा त्याला पाठिंबा मिळत गेला. प्रिं. भाटे, प्रो. टिपणीस, गो. मा. चिपळूणकर, सोशल सर्विस लीगचे गोपाळराव देवधर, नागपूरचे नाना बेहरे, सातारचे भाऊराव पाटील, खामगावचे तात्यासाहेब कोल्हटकर, कोल्हापूरचे प्रो. डोंगरे, अण्णासाहेब लठ्ठे, भास्करराव जाधव, विठ्ठल गणेश प्रधान (कराची) किती नावे सांगणार?`
खरंतर हा गोतावळा `प्रबोधन`च्या आधीपासूनच गोळा झाला होता. प्रबोधनकारांनी १९२०च्या आधीपासूनच आताच्या महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंतही व्याख्यानांचे दौरे केले होते. मुंबईपासून इंदूरपर्यंत ते बेळगाव गोव्यापर्यंत त्यांचे दौरे सतत सुरू होते. त्यातून बहुजन समाजाचे शेकडो कार्यकर्ते त्यांच्याशी जोडत होते. दौर्यापेक्षाही पुस्तकांमुळे त्यांचं प्रभावक्षेत्र गावोगावी पोचलं होतं. या प्रभावाच्या केंद्रस्थानी दादर होतं. वाड्यांनी बनलेल्या एका खेडेवजा उपनगरापासून महामुंबईच्या सर्वाधिक प्रतिष्ठित परिसरापर्यंतचा दादरचा प्रवास तेव्हा सुरू होता. त्यात प्रबोधनकारांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान होतं. या काळात ते दादरमधल्या तरुणांचे सामाजिक आणि सांस्कृतिक नेतेच बनले होते.
प्रबोधनकार म्हणतात तसं १९२० ते २२ हा काळ दादरमधल्या तरुणांच्या जागृतीचा महत्त्वाचा काळ होता. सार्वजनिक वाचानालयं, सामाजिक कार्यकर्त्यांच्या संघटना, व्याख्यानमाला, सहकारी तत्त्वावरची दुकानं अशा संस्था नव्याने उभ्या राहत होत्या किंवा आकार धरत होत्या. प्रबोधनकार हे या सगळ्यात सक्रिय असणार्या अनेक तरुणांची एक प्रेरणा होते. कारण प्रबोधनकार ही फक्त व्यक्ती नसून एक चळवळच होती आणि त्यांच्याभोवती तरुण चुंबकासारखे गोळा होत होते. पण या तरुणांना गोळा होण्यासाठी एखादं ठिकाण नव्हतं. प्रबोधनकारांचं मिरांडा चाळीतलं घर आधीच छोटं होतं. त्यात गजबजलेलं होतं.
तरुण चळवळ्यांना भेटण्यासाठीचं ठिकाण लवकरच उभं ठाकलं. ते म्हणजे `प्रबोधन` कचेरी. नव्याने तयार झालेल्या खांडके बिल्डिंगमधल्या सहा नंबरच्या इमारतीत प्रबोधनकारांनी वरच्या मजल्यावर एक ब्लॉक भाड्याने घेतला. मित्रांनी त्यासाठी आर्थिक मदत केली होती. तो `प्रबोधन`चं ऑफिस बनला. त्याचबरोबर तो प्रबोधनकारांच्या वाचन-लेखनाचीही जागा बनला. तिथे प्रबोधनकारांचा सारा ग्रंथसंग्रहही एकत्रित झाला. आतासारख्याच तेव्हाही तरुणांना अभ्यास करण्यासाठी जागा नसायच्या. अशा पोस्ट ग्रॅज्युएशन आणि एलएलबी करणार्या तरुणांसाठी ती एक अपटूडेट अभ्यासिकाही बनली. अभ्यासू तरुणांसाठी वाचनालयही बनली. एकीकडे `प्रबोधन`च्या व्यवस्थापनाची कामंही तिथे चालत आणि तरुणांचा अभ्यासही. प्रबोधनकारांनी दूध, चहा, साखरेची व्यवस्था केली होती. त्यामुळे तरुण फक्त जेवणासाठी घरी जात, बाकी दिवसदिवसभर तिथेच रमत. या तरुणांना प्रबोधनकारांच्या लेखन आणि संशोधनात रूची वाढू लागली. संदर्भ शोधण्यासाठी ते मदत करू लागले. प्रबोधनकारांशी चर्चा विनिमयासाठी ती हक्काची जागा बनली. स्वाध्याय करण्यासाठीचा आश्रम म्हणून या प्रबोधन कचेरीला `स्वाध्यायाश्रम` असं नावही मिळालं.
स्वाध्यायाश्रमात गोळा झालेल्या तरुणांना समाजसेवेच्या कामात सक्रिय होण्याची इच्छा होती. अनेकजण त्यात सक्रियही होते. `प्रबोधन`च्या पहिल्या अंकात गोपाळराव चिपळूणकर यांचा `विसाव्या शतकातील सामाजिक व धार्मिक सुधारकांची कर्तव्ये` हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यातून अनेक तरुणांना समाजसेवेच्या क्षेत्रात उतरण्याची प्रेरणा मिळाली होती. सामाजिक नेतृत्व करण्यासाठी प्रभावी वक्तृत्वाची आवश्यकता होती. प्रबोधनकार हे गाजलेले वक्ते होतेच, शिवाय त्यांच्या `वक्तृत्वशास्त्र` या पुस्तकाला मान्यताही मिळालेली होती. त्यामुळे प्रबोधनकारांनी या तरुणांना प्रभावी वक्तृत्व शिकवण्याचा वर्ग सुरू केला. दर रविवारी दुपारी साडेतीन वाजता या तरुणांपैकी एकानेच एक विषय घेऊन आश्रमात भाषण द्यायचं. त्याच्या पत्रिका लाकडी हँडप्रेसवर छापून वाटायच्या, असा हा उपक्रम होता. त्यामुळे अनेक नवे तरुण श्रोतेही स्वाध्यायाश्रमाशी जोडले गेले.
या साप्ताहिक व्याख्यानांसाठी विविध विषयांवरचे तज्ञ बोलवायला सुरुवात झाली. शिवाय कवी, कलावंत, आणि गायक-वादक यांनाही हा मंच मिळू लागला. भारतात कम्युनिस्ट चळवळीची सुरुवात करणारे नेते श्रीपाद अमृत डांगे यांचं कम्युनिझम या विषयावरचं पहिलं जाहीर व्याख्यान स्वाध्यायश्रमातच झालं. गो. मा. चिपळूणकर, प्रो. गोविंदराव टिपणीस, प्रिं. गोविंद चिमणाजी भाटे, नागपूरचे नाना बेहरे अशा विद्वानांची व्याख्यानं झाली. छत्रपती संभाजीनगरचे कवी पद्माकर यांचं काव्यगायनही झाली. तंबोरा, सतार आणि दिलरुबा एकाच वाद्यावर वाजवता येतील असं वाद्य शोधून काढणारे टुमणे यांच्या वादनाचाही कार्यक्रम झाला. पण सगळ्यात जास्त गर्दी ऋषी यांच्या प्लँचेटच्या प्रयोगाला झाली होती. एरव्ही फारतर २०-२५ जण गोळा व्हायचे. डोक्यावरून पाणी जायचं. पण प्लँचेटच्या प्रयोगांना पूर्ण मजला भरून गेला होता. त्यावर स्वाध्यायाश्रमाचे एक नेते असणारे भार्गवराव कोर्लेकर म्हणालेही, `आजवरच्या जित्या माणसांच्या भाषणांना जेमतेम २०-२५ मंडळी जमायची. पण आज मेलेल्या माणसांशी बातचीत करायला भलतीच गर्दी जमलेली आहे. यावरून जित्यांपेक्षा मेलेल्या माणसांचा लळा लोकांना बराच आहे, हे दिसून येते.`
स्वाध्यायाश्रमात अनेक मोठमोठी मंडळी राहण्यासाठीही उतरत. पुण्याचे गोपाळराव चिपळूणकर हे महिना दोन महिन्यांनी येत. आश्रमातल्या तरुणांशी मनसोक्त गप्पा मारत. विशेषतः अमेरिकेतल्या आठवणी सांगताना तासंतास निघून जात. कर्मवीर भाऊराव पाटील तर किमान पंधरवड्यासाठी मुक्कामासाठी येत. स्वाध्यायश्रमाच्या तालमीत तयार झालेल्या मान्यवर कार्यकर्त्यांपैकी एक म्हणून प्रबोधनकार कर्मवीर अण्णांचा उल्लेख करतात. कर्मवीरांनी प्रबोधनकारांशी चर्चेचा कीस पाडला आणि रयत शिक्षण संस्थेच्या भावी कार्याविषयीच्या योजना तयार केल्या. आज रयत शिक्षण संस्था आशियातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था मानली जाते. तिची आखणी प्रबोधन कचेरीतल्या चर्चांमधून झाली आहे. कर्मवीर प्रबोधनकारांना गुरू मानत. पण आज प्रबोधनकारांना हे श्रेय कुणी देताना दिसत नाही.
`प्रबोधन` पाक्षिक दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला प्रसिद्ध होत असे. दादरला असेपर्यंत पहिली दोन वर्षं ते अगदी नियमित प्रसिद्धही झालं. प्रसिद्धीच्या आधीच्या रात्री आश्रमातले सगळे तरूण व्यवस्थापक सुळे मास्तरांच्या देखरेखीखाली अंकांच्या पॅकिंगसाठी जागरण करत. पॅकिंगची कामं सुरू असतानाच अनेक सामाजिक प्रश्नांवर जोरदार वादविवाद, चर्चा होत. प्रबोधनकार म्हणतात, `प्रबोधन नाईटला जवळजवळ पार्लमेंटचे रूप नियमित येत गेल्यामुळे २५-३० मंडळी हमखास बिनचूक हजर असायची. त्या चर्चातूनच नवनवीन चळवळी हाती घेतल्या जात असत. स्वाध्यायाश्रम म्हणजे एखादा क्लब नव्हता. समाजसेवेचे कोणते ना कोणते काम प्रत्येकाला व्यक्तिशः नि संघशः करावेच लागे. महत्त्वाकांक्षी, हिंमती आणि उद्योगी तरुणांना कार्याचे केंद्र लाभल्यामुळे आणि वाजवी उत्तेजनाचा भरपूर पाठिंबा मिळाल्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे समाजसेवेची अनेक कार्ये त्यांनी हाती घेऊन संघटनांचा जोर वाढवला.`
स्वाध्यायाश्रमातल्या काही तरुणांनी गोविंदाग्रज मंडळ स्थापन केले. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचं सांस्कृतिक प्रतीक असलेले राम गणेश गडकरी यांच्या प्रतिभेने हा तरूणवर्ग प्रभावित झाला होता. त्यामुळे त्यांच्या टोपणनावाने ही साहित्यिक संघटना उभी राहिली होती. त्यात भार्गवराव कोर्लेकर हे कार्याध्यक्ष तर मोरेश्वर देशमुख चिटणीस होते. गडकरी ज्यांना गुरू मानत अशा श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या उपस्थितीत गडकरींचा स्मृतिदिन साजरा करण्याचं या तरुणांनी ठरवलं होतं. त्याआधी `गोविंदाग्रजांच्या पाच कविता`, `कवनगुच्छ`, `गीतोपायन` आणि `फुलांची ओंजळ` अशी चार छोटी कवितांची पुस्तकं प्रकाशित करून या संस्थेने आपल्या कामाची दखल घ्यायला लावली होती. आता प्रबोधनकारांच्या निवडक लेखांचा संग्रह `स्वाध्यायसंदेश` या नावाने कार्यक्रमातच प्रकाशित करण्याचा निर्णय गोविंदाग्रज मंडळाने घेतला होता. शिवाय या कार्यक्रमात राजसंन्यास नाटकातले काही प्रवेश पहिल्यांदाच रंगमंचावर आणण्याची तयारी त्यांनी केली होती. पण या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून येण्यास श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी नकार कळवला होता. त्यामुळे तरुणांचा हिरमोड झाला. त्यामुळे प्रबोधनकारांनी कोल्हटकरांना अर्जण्ट तार पाठवून येण्याची विनंती केली.
कोल्हटकरांची तब्येत चांगली नसतानाही प्रबोधनकारांची विनंती त्यांना अव्हेरता आली नाही. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी तसं सांगितलंही, `(तारेचा कागद दाखवत) हे माझ्या हातात पडलेले वारंट पाहताच कसलीही सबब न सांगता मुकाट्याने मला येथे येणे अगदी भागच पडले. ठाकर्यांचा हुकूम हा असा करडा असतो. त्यांचा नि माझा आजवरचा ऋणानुबंधच इतका जबरदस्त आहे.` कोल्हटकरांच्या हस्ते `स्वाध्यायसंदेश`चं प्रकाशन झालं.
`स्वाध्यायसंदेश` हे प्रबोधनकरांचं एक महत्त्वाचं पुस्तक आहे. प्रबोधन आणि इतर नियतकालिकांत प्रकाशित झालेले त्यांचे २२ लेख या पुस्तकात आहेत. गोविंदाग्रज मंडळाचे चिटणीस म्हणून मोरेश्वर देशमुख यांचं नाव प्रकाशक म्हणून आहे. त्यात सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजचे प्राचार्य गोविंद चिमणाजी भाटे यांची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेतल्या या उतार्यावरून या पुस्तकाचं स्वरूप लक्षात येऊ शकतं, `लेखकाला जुने भिक्षुकशाहीचे बंड मोडावयाचे आहे; त्यांना जातिनिर्बंध शिथिल करावयाचे आहेत; त्यांना आचारविधीचे वर्चस्व नाहीसे करावयाचे आहे; त्यांना समाजाचे गतानुतिकत्व घालवून टाकावयाचे आहे. नव्याजुन्याच्या कलहात नव्याचा पक्ष स्वीकारून त्यांना समाजामध्ये नव्याची आवड उत्पन्न करावयाची आहे. सारांश रा. ठाकरे हे समाजाच्या सर्वांगीण सुधारणेचे भक्त आहेत व ही समाजसुधारणा-भक्तिरूपी भावना तरुण पिढीत उद्दीपित करण्याचे त्यांच्या निबंधाचे ध्येय आहे. त्यांचे हे सर्व लेख भावनाप्रधान आहेत. त्यात जुन्या मतावर व जुन्या मताभिमान्यांवर मर्मभेदी कडक टीका आहे. त्यात नव्या मतांचा जोराचा व जोरदार भाषेत पुरस्कार केलेला आहे.`