महात्मा गांधी यांचे थोरले चिरंजीव हरीलाल यांच्या शोकांतिकेवर बरीच चर्चा झाली. कादंबर्या, पुस्तकं आणि नाटक, सिनेमेही आले. पण लोकमान्य टिळकांचे धाकटे चिरंजीव श्रीधरपंत यांची शोकांतिका कुणाला फारसी माहीत नाही. खरं तर त्यांचा संघर्ष जास्त महत्त्वाचा होता, कारण तो हरीलालसारखा वैयक्तिक नाही, वैचारिक होता.
– – –
सातार्यातून देशोधडीला लागल्यानंतर प्रबोधनकार पुण्यात आले आणि येताच शहरातले ब्राह्मणेतर पुढारी त्यांच्या अवती भवती गोळा झाले. त्यात केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, पांडुरंग राजभोज, श्रीपतराव शिंदे हे जवळपास रोजच त्यांना भेटायला येऊ लागले. त्यात लोकमान्य टिळकांचे सुपुत्र रामभाऊ आणि श्रीधरपंत टिळकही होते. पुढे प्रबोधनकार आणि प्रबोधनचं पुण्यात नीट बस्तान बसल्यानंतर तर हे दोघेही टिळक बंधू रोजच सकाळ संध्याकाळ प्रबोधनकारांच्या भेटीला येऊ लागले. टिळकांच्या कट्टर विरोधकाच्या घरी टिळकांचीच मुलं जाऊ लागल्यामुळे टिळकवादी प्रचंड अस्वस्थ झाले. प्रबोधनकार लिहितात, अहो, या ठाकर्याने टिळकांची पोरटीही बगलेत मारली की हो! अशी ब्राह्मणी कुजबूज नेहमी माझ्या कानावर येत असे.
अर्थातच त्या काळात महाराष्ट्राचा इतिहास लिहिणारे आणि तो लोकांपर्यंत पोचवणारे बहुसंख्य लेखक लोकमान्य टिळकांच्या प्रचंड प्रभावात असल्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांची शोकांतिका कधीच ठळकपणे समोर आली नाही. पण प्रबोधनकारांच्या आत्मचरित्रातल्या नोंदींमुळे या टिळकपुत्रांची वेदना आजच्या पिढीपर्यंत पोचत राहिली. पुढे १९३०च्या दशकात प्रबोधनकारांनीच त्यांच्या संपादनात निघणार्या प्रतोद या मासिकात रामभाऊंच्या संघर्षाची कैफियत सदररूपाने प्रकाशित केली होती. त्यांचं पुढे लोकमान्य टिळकपुत्रांची स्मृतिचित्रे अथवा टिळक पुत्र भारत या नावाने पुस्तकही आलं. पुढे एकविसाव्या शतकात काही अभ्यासकांच्या संशोधनामुळे विशेषतः श्रीधरपंतांचं कर्तृत्व काही प्रमाणात उजळून निघालं. डॉ. य. दि. फडके आणि डॉ. सदानंद मोरे यांनी विसाव्या शतकातल्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिताना, डॉ. अनंत देशमुख यांना श्रीधरपंतांवर एकमेव स्वतंत्र पुस्तक लिहिताना आणि डॉ. शत्रुघ्न जाधव यांना श्रीधरपंतांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी असलेल्या मैत्रीविषयी लिहिताना प्रबोधनकारांच्या लिखाणाचा संदर्भ घ्यावाच लागला. प्रबोधनकारांनी त्यांच्या समकालातला या काळोखातल्या कोपर्याचे तपशील नोंदवून ठेवले होते, त्याचा उपयोग या प्रत्येक अभ्यासकाला झाला. महाराष्ट्राच्या इतिहासातले असे अनेक काळोखी कोपरे प्रबोधनकारांमुळे नव्या पिढीला कळले आहेत.
लोकमान्य टिळक जेव्हा सहा वर्षांसाठी मंडाले तुरुंगवासात गेले तेव्हा श्रीधरपंतांचं वय अवघं १२ वर्षांचं होतं. मोठा भाऊ रामचंद्र वयाने थोडा मोठा. आई सत्यभामाबाई आजारी. अशा वेळेस टिळकांनी त्यांचे भाचे धोडोपंत विद्वांस यांच्या हाती घराची जबाबदारी सोपवली. केसरी मराठा वृत्तपत्रांच्या ट्रस्टवरदेखील ते ट्रस्टी होते. टिळकांचा विश्वनाथ हा अगदी हाताशी आलेला कर्तबगार मुलगा काळाने हिरावून नेला. त्यामुळे ते आणि त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई एकप्रकारे खचल्याच. टिळक मंडालेच्या तुरुंगात असतानाची सहा वर्षं ही रामभाऊ आणि श्रीधरपंतांच्या ऐन जडणघडणीची होती. भाचे धोडोपंतांना लिहिलेल्या पत्रांत टिळक दोन्ही मुलांच्या प्रगतीची चौकशी करत होते, त्यांच्यासाठी सूचना करत होते. पण ते मुलांपर्यंत पोचत होते का आणि कसे पोचत होते, याबद्दल आज काही सांगता येत नाही. धोंडोपंत हे कर्तव्यनिष्ठ असल्याचे दाखले त्यांच्या समकालीन मंडळींनी नोंदवले आहेत. टिळकबंधूंचं मात्र तसं मत नव्हतं.
टिळकांची दोन्ही मुलं हुशार होती. थोरले रामभाऊ उत्तम फुटबॉलपटूही होते. पण टिळकांनी त्यांच्या फुटबॉलप्रेमाला उत्तेजन दिलं नाही. तेही केवळ तो इंग्रजी खेळ आहे म्हणून. भारतीय व्यायाम करावा म्हणून तशी व्यायामशाळा गायकवाड वाड्यात सुरू केली. पहिल्या महायुद्धात टिळकांनी ब्रिटिश लष्करातल्या भरतीला प्रोत्साहन दिलं होतं. त्यानुसार रामभाऊ लष्करात जाणारही होते. पण ते वैद्यकीय चाचणीत कमी पडले. मुंबईच्या प्रसिद्ध जेजे हॉस्पिटलशी जोडलेल्या ग्रँट मेडिकल कॉलेजात ते डॉक्टरकीचं शिक्षण घेऊ लागले. त्यांच्याच वर्गात प्रख्यात व्याकरणतज्ञ आणि धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या नात मुक्ताबाईही होत्या. आडनावातल्या सुरवातीच्या टी या अक्षरामुळे दोघे डिसेक्शन पार्टनर होते. दोघे एकत्र अभ्यासही करत. पण टिळकांची मुंबईतली दुराग्रही मित्रमंडळी त्यामुळे अस्वस्थ झाली. त्यांना दोघांचं लफडं असल्यासारखं वाटत होतं. त्यांनी टिळकांना कळवलं. तर्खडकर वैश्यवाणी होते. त्यामुळे मुलाने आंतरजातीय लग्न केलं तर त्यांच्या सामाजिकदृष्ट्या प्रतिगामी राजकारणाला सोयीचं नव्हतं. त्यांच्या विरोधकांनी त्याचं भांडवल करून त्यांना त्यांच्या ब्राह्मणी अनुयायांपासून वेगळं पाडण्याची भीतीही त्यामागे असू शकते.
या तथाकथित लफड्याचा सुगावा लागताच टिळकांनी रामभाऊंना चांगलंच फैलावर घेतलं. त्यांना त्यांचा पार्टनर बदलायला सांगितला. पण रामभाऊ टिळकांचेच चिरंजीव होते. ते सुधारणावादी विचारांचे होते. केवळ आडनावांच्या इंग्रजी स्पेलिंगमधल्या आद्याक्षरांमुळे हा य्ाोगायोग जुळून आला आहे, आपला मुक्ताबाईंशी लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. तसं प्रपोजलही कुणी कुणाला दिलेलं नाही. त्यामुळे आपण पार्टनर बदलण्याची मागणी करणार नाही, असं त्यांनी स्पष्टच सांगितलं. पण मुलावर विश्वास न ठेवता टिळकांनी प्राचार्य डॉ. नाडगोर यांना सांगून तो बदल करून घेतला. त्यामुळे रामभाऊ दुखावले. त्यांनी टिळकांनी स्पष्टच सुनावलं की दोन साहित्यिक घराण्यांतील व्याकरणकारांच्या नाती-नातवांचं लग्न होऊन दोन हिंदू घराणी जातभेद विसरून एकत्र येत असतील, तर त्यात गैर काय? दादोबा पांडुरंग हे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून गौरवले गेलेले व्याकरणकार म्हणून प्रसिद्ध होतेच. पण लोकमान्य टिळकांच्या वडिलांनीही मराठी व्याकरणावर पुस्तक लिहिलं होतं. त्याचा हा संदर्भ होता. हे लग्न झालंच तर टिळकांच्या घराण्यात एखादा मोठा व्याकरणकार किंवा डॉक्टर निपजेल, असं रामभाऊंना वाटत होतं. पण टिळकांच्या `लोकसंग्रहा`च्या हट्टासमोर त्यांचं काही चाललं नाही. पण त्यामुळे ते कायमचे मनाने वडिलांपासून दूर गेले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
रामचंद्र उर्फ भाऊ आणि श्रीधरपंत उर्फ बापू या भावंडांचे स्वभाव वेगळे होते. प्रबोधनकार लिहितात, `बापूचा स्वभाव त्रासिक असला तरी फार सोशिक होता, पण रामभाऊचा स्वभाव वरवर जरी धिम्मा वाटला तरी ऊठ सोट्या तुझं राज्य हा प्रकार फार. `श्रीधरपंत अत्यंत संवेदनशील, भावनाप्रधान, कविमनाचे आणि बुद्धिमान तरुण होते. विशेष म्हणजे ते स्वतंत्र विचारांचे होते, असं डॉ. सदानंद मोरे सांगतात. त्यातला त्यांचा स्वतंत्र विचार हा स्वभावविशेष महाराष्ट्राच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा होता. कारण श्रीधरपंतांचा जन्म झाला तो १८९६ साली. म्हणजे त्यांना समजायला लागल्यापासून लोकमान्यांच्या मृत्यूपर्यंतचा काळ हे खर्या अर्थाने टिळकयुग होतं. टिळक फक्त स्वातंत्र्य चळवळीचे नेते नव्हते, तर देशभर त्यांच्या विचारांचा आणि व्यक्तित्वाचा प्रभाव असणारे हजारो तरुण होते. पण दोन्ही टिळकपुत्र याला अपवाद ठरले. राजकीय सुधारणा आधी की सामाजिक सुधारणा, या वादात त्यांनी लोकमान्यांची राजकीय सुधारणांची बाजू घेतली नाही.
१९१८ साली ज्युनियर बीए करताना फर्ग्युसन कॉलेजच्या मॅगझिनमध्ये त्यांनी या विषयावर एक इंग्रजी लेख लिहिला होता. मुळात लोकमान्यांच्या विरोधकांचा बालेकिल्ला असणार्या फर्ग्युसन कॉलेजात त्यांनी शिकणं हेच आश्चर्य होतं. या लेखात श्रीधरपंतांनी लिहिलंय, राजकीय आणि सामाजिक सुधारणा हातात हात घालूनच चालल्या पाहिजेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे, कारण राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या उदात्त ध्येयाकडे नेणार्या कठोर कर्तव्याच्या मार्गावरील मातृभूमीच्या रथाची ती दोन चाके आहेत. लोकमान्य जिवंत असतानाच श्रीधरपंत एका प्रकारे त्यांच्या मुख्य भूमिकेच्या विरोधी भूमिका मांडत होते. सामाजिक सुधारणा या राजकीय सुधारणांपाठोपाठ आपोआप येतील, ही लोकमान्यांची भूमिका त्यांना मान्य नव्हती.
या स्वतंत्र भूमिकेचा पहिली झलक महाराष्ट्राने त्यांच्या लग्नात पाहिली. रामभाऊ डॉक्टरकी शिकत असल्यामुळे त्यांचं लग्न शक्य नव्हतं, त्यामुळे कॉलेजात शिकणार्या २२ वर्षांच्या श्रीधरपंतांचा नंबर लागला. चिरोल खटल्यासाठी विलायतेत गेलेल्या टिळकांनी समुद्रगमनाचं प्रायश्चित्त घ्यावं, अशी त्यांच्या कर्मठ अनुयायांचंच म्हणणं होतं. आपण सार्वजनिक कामासाठी समुद्र ओलांडून परदेशात गेलो असल्याचा खुलासा टिळकांनी केली. पण तो सनातन्यांनी मानला नाही. प्रायश्चित्त पुढे ढकलणार्या टिळकांना लग्नकार्य आल्यामुळे आणखी टंगळमंगळ करता येईना. ते प्रायश्चित्तासाठी तयार झाले. पण अशा वेडगळ कल्पना श्रीधरपंताना मान्य नव्हत्या. त्यांनी वडिलांशी वाद घातला. तुम्ही प्रायश्चित्त घेणार असाल, तर लग्नच नको, असा हेका त्यांनी धरला. पण लोकमान्यांच्या आग्रहापुढे त्यांचं काही चाललं नाही. दिनकरराव जवळकरांचं खरं मानायचं तर लोकमान्यांनी सोन्याचा योनीसारखा आकार बनवून तो दरवाजासारखा ओलांडला आणि ते शुद्ध झाले.
वडिलांविषयी प्रचंड आदर आणि प्रेम असूनही श्रीधरपंतांचे त्यांच्याशी खटके उडत होते. पुढचा काळ हा टिळकांच्या अनुयायांचा तोकडेपणा दाखवणारा होता. त्यापैकी अनेकजण तर टिळकवादाच्या नावाखाली केवळ त्यांच्या पोटजातीचं मोठेपण सांगत फिरत होते. लोकमान्य या सनातनी अनुयायांकडे कानाडोळा करत होते. श्रीधरपंतांच्या लग्नाच्या दरम्यानच लोकमान्यांचा चिरोल खटल्यासाठी झालेला खर्च भरून काढण्यासाठी त्यांना निधी गोळा केला जात होता. त्यात भ्रष्टाचार झाल्याचा दावा संदेशकार अच्युतराव कोल्हटकरांनी केला होता. त्यांनी टिळकांच्या अनुयायांना फंडगुंड असं नावही दिलं होतं. अच्युतराव हे स्वतःच टिळकांचे भक्त असूनही हे आरोप करत असल्यामुळे अविश्वासाचं गढूळ वातावरण निर्माण झालं होतं. इथे टिळकांचे डावेउजवे हात साहित्यसंम्राट न.चिं. केळकर आणि नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर एकमेकांशी भांडत होते. छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात वेदोक्ताची चळवळ ऐन भरात आली होती. ब्राह्मणेतर नेते टिळकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते. ती अनेकदा चुकीची असली तरी सनातनी ब्राह्मणांचे पुढारी अशी टिळकांची प्रतिमा अधिक घट्ट बनत चालली होती. तर दुसरीकडे महात्मा गांधींचं नेतृत्व वेगाने पुढे येऊ लागलं होतं. त्याम्ाुळे टिळकांचे अनुयायी अस्वस्थ झाले होते.
या वातावरणात श्रीधरपंत आणि रामभाऊंचा टिळकभक्तांविषयी अपेक्षाभंग होत असल्यास नवल नव्हतं. एकीकडे वडिलांविषयी प्रेम आणि त्याच वेळेस त्यांच्या अनुयायांविषयी तीव्र नाराजी अशा कैचीत दोन्ही टिळकबंधू सापडले होते. त्यापैकी टिळकपुत्रांना अनेकांचा वैयक्तिक अनुभव फारच वाईट आला असावा. लोकमान्यांच्या मृत्यूनंतर तर हा तिढा अधिकच टोकदार बनत गेला. तेव्हा अस्वस्थ टिळकपुत्रांना प्रबोधनकारांचा आधार वाटला आणि ते स्वाभाविकपणे त्यांच्या जवळ गेले.