अवघी भूते साम्या आली।
देखिली म्या कै होती ।।१।।
विश्वास तो खरा मग।
पांडुरंग कृपेचा ।।२।।
माझी कोणी न धरो शंका।
ऐसे हो का निर्द्वंद्व ।।३।।
तुका म्हणे जे जे भेटे।
ते ते वाटे मी ऐसे ।।४।।
वरच्या अभंगात तुकोबारायांनी संतत्वाची कसोटी सांगितली आहे. या अभंगाला तुकोबांच्या जीवनातल्या एका प्रसंगाची पार्श्वभूमी आहे. तुकोबाराय दर वद्य एकादशीला आळंदीला जात असत. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात ते कीर्तन करत. नेहमीप्रमाणे तुकोबाराय एकदा मंदिरात गेले. त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते मंदिराला प्रदक्षिणा घालायला लागले. प्रदक्षिणा घालताना मंदिराच्या भोवती त्यांनी एक शेत पाहिलं. त्या शेतात जोंधळ्याची कणसं होती. कणसात टपोरे दाणे भरले होते. ते दाणे खायला अनेक पाखरं आली होती. ती पाखरे एकेक दाणा टिपत होती. तुकोबाराय प्रदक्षिणा घालताना त्या पाखरांना त्यांची चाहूल लागली. माणूस आल्याची चाहूल लागताच पाखरं उडून गेली. ते तुकोबारायांनी पाहिलं. ते कमालीचे संवेदनशील होते. त्यांना त्याचं फार वाईट वाटलं. ते कळवळले. पाखरं उडून गेली हा त्यांना त्यांचा स्वत:चा फार मोठा अपमान वाटला. संतत्वाच्या कसोटीला आपण उतरलो नाही असं त्यांना वाटलं. पाखरं निघून गेली म्हणून ते स्वत:लाच दोष द्यायला लागले. मुळात संतत्व म्हणजे अभय. संतांच्या सहवासात प्रत्येक जीव भयमुक्त व्हायला पाहिजे असं तुकोबांना वाटत होतं. इथे पाखरं उडून गेली म्हणजे त्या पाखरांना भीती वाटली याचं तुकोबारायांना दु:ख झालं. या उद्विग्नतेतूनच त्यांनी हा अभंग लिहिला.
मुळात कारुण्य ही संतवृत्तीची सर्वात महत्त्वाची कसोटी. संतांच्या कारुण्याची कक्षा फारच विस्तारित असते. त्या कक्षेत माणसं तर असतातच पण प्रत्येक जीवमात्रही असतो. कबिरांच्या मुलाची म्हणजे कमालाची एक कथा सांगितले जाते. कमाल गवत कापायला गेले. वार्यावर डोलणार्या हिरव्यागार गवताची कोवळी पानं पाहून ते भारावले. हातातलं खुरपं आपोआप गळून पडलं. सुंदर गवत पाहून कमालांच्या मनात कारुण्य उगवलं. ते गवत न कापताच माघारी गेले.
संतांचं कारुण्य असं विस्तारलेलं असतं. हे कारुण्य संतांच्या अनेक कथांतून दिसून येतं. चक्रधर स्वामींनी पहिलं सूत्र उच्चारलं ते सशासाठी. चक्रधर स्वामी जवळपास १२ वर्षे सालबर्डीच्या पर्वतावर राहिले होते. मौन राहूनच त्यांचं सालबर्डीच्या डोंगरावर चिंतन चाललं होतं. त्यांचा निर्विकार चेहरा पाहून आजूबाजूच्या प्राण्यापक्ष्यांनाही त्यांची भीती वाटत नव्हती. चक्रधर स्वामीही त्या प्राण्यांना घाबरत नव्हते. संत स्वत: निर्भय असतात आणि इतरांनाही निर्भय बनवतात. दहशत आणि दांडगाई हे शब्द संतांनी त्यांच्या शब्दकोशातून हद्दपार केलेले असतात. स्वामी १२ वर्षे मौन धारण करून चिंतन करत होते. तेवढ्यात एक ससा जिवाच्या अकांताने पळत आला. तो थेट स्वामींच्या मांडीखाली शिरला. तो ससा पैजेचा होता. शिकार्यांनी त्या सशाला मारण्यासाठी पैज लावली होती. ज्याचा कुत्रा सशाला पकडेल तो जिंकेल असं ठरलं होतं. त्यानुसार त्या सशाच्या पाठीमागे कुत्री सोडून दिली होती. तो ससा स्वामींजवळ आला आणि त्यांच्या मांडीखाली शिरला. त्या सशाला स्वामींची आधीपासून ओळख असावी. स्वामींच्या मांडीखाली लपल्यावर ते आपल्याला वाचवतील याची त्याला खात्री होती. ते शिकारी स्वामींजवळ आले. त्यांनी तो ससा पैजेचा आहे असं सांगून त्याला सोडायला सांगितलं. त्यावेळी स्वामींनी १२ वर्षांचं मौन सोडलं. एका मुक्या जिवाचा जीव वाचवण्यासाठी स्वामींनी मौन सोडलं. जंगलातला पालापाचोळा खाऊन जगणार्या सशाने कोणताही अपराध केलेला नसताना त्याला मारू नका असं स्वामींनी कळवळून सांगितलं. जे जे शरण आले त्यांना मरण देता येणार नाही असं सांगून स्वामींनी पहिलं सूत्र उच्चारलं. हे सूत्र होतं ‘एथ शरण आलेया काई मरण असे’. स्वामींच्या वृत्तीतला निर्विकारपणा त्या सशाने जाणला होता. त्यामुळेच तो ससा विश्वासाने त्यांच्या मांडीखाली शिरला. स्वामींच्या उपदेशामुळे ते शिकारी निघून गेले. ते निघून गेल्यानंतर स्वामींनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ‘महात्मे हो’ म्हणत त्याला जायला सांगितलं. या सशाच्या निमित्ताने मानवतेचं पहिलं सूत्र जन्माला आलं.
बसवण्णांच्या काळातही अनेक शरणांच्या कथांमधून हाच संदेश दिला गेला आहे. किन्नरी ब्रह्म्यांची एक कथा आहे. त्या कथेनुसार एक व्यक्ती त्रिपुरांतक देवळात जात असतो. तो शेळीचा बळी द्यायला निघालेला असतो. शेळी घाबरलेली असते. प्राणपणाने ओरडत असते. ते पाहून किन्नरी ब्रह्म्या कळवळतात. शेळीची किंमत देऊन त्या शेळीची सुटका करतात.
खरं तर संतांचं मन विशाल असतं. व्यापक असतं. त्यांना हरेक जिवाला भयमुक्त करायचं असतं. त्यासाठीच त्यांची धडपड चाललेली असते. आपण मात्र सत्तांकांक्षी असतो. आपल्याला इतरांनी अंकित रहावं असं वाटतं. प्रत्येक जिवावर आपली दहशत असावी असं आपल्याला वाटतं. संत मात्र भयमुक्त करतात. प्रत्येक जिवाविषयीचं कारुण्य त्यांच्या चेहर्यावर ओसंडून वाहत असतं. त्यामुळे कोणताही जीव संतांना घाबरत नाही. उलट अधिक आनंदाने संतांजवळ जातो. ‘संताचिये गावी प्रेमाचा सुकाळ’ असं त्यामुळेच तुकोबाराय म्हणतात. जेव्हा तुकोबारायांना पाहून पाखरं उडाली तेव्हा तुकोबाराय दु:खी झाले. काही वेळ ते तसेच थांबून राहिले. थोड्या वेळाने बर्याच पाखरांनी गर्दी केली. ती पाखरे आली आणि तुकोबांच्या अंगाखांद्यावर खेळायला लागली. तुकोबारायांना त्यावेळी फार आनंद झाला. पांडुरंगाची खरी कृपा झाल्याचा तो पुरावा होता. ‘विश्वास तो खरा मग। पांडुरंग कृपेचा।’ असं तुकोबाराय दुसर्या चरणात म्हणतात. संतांनी एखाद्याला जीव लावला की आपोआपच समोरचाही संतांसाठी जीव लावतोच.
या बाबतीत संत बहिणाबाईंचं उदाहरण फारच हृद्य आहे. या बहिणाबाई म्हणजे संत बहिणाबाई पाठक. या तुकोबारायांच्या शिष्या होत्या. त्या कोल्हापुरात असताना त्यांनी तुकोबारायांच्या अभंगावरची कीर्तने ऐकली होती. त्या कीर्तनाने त्या भारावून गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्याकडे एक कपिला गाय आणि तिचं वासरू होतं. या गाय-वासरावर बहिणाबाईंचा फार जीव होता. त्या वासरालाही बहिणाबाईंचा फारच लळा लागला होता. ते वासरू बहिणाबाईंशिवाय इतरांनी टाकलेल्या चारापाण्याकडे ढुंकूनही पाहत नव्हतं. एकदा बहिणाबाईंना त्यांच्या नवर्याने मारहाण केली. त्या भोवळ येऊन पडल्या. काही दिवस त्यांची शुद्ध हरपली होती. तेव्हा वासराने इतरांनी टाकलेल्या चारापाण्याला स्पर्श केला नाही. चारापाणी मिळालं नाही म्हणून अखेर ते वासरू मेलं. काहीसा असाच प्रसंग चक्रधर स्वामींच्या जीवनातही आहे. चक्रधर स्वामी गेल्यानंतर त्यांच्या डांगरेश नावाच्या कुत्र्यानेही शोकाकुल होऊन जीव सोडला होता. यात कोणताही चमत्काराचा भाग नाही.
अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरणही देता येईल. श्यामची आई म्हणजे साने गुरुजींची आई गेली. त्यावेळी पाठोपाठ त्यांचं घरातलं मांजरही गेलं. श्यामची आई गेल्यानंतर त्यालाही फार दु:ख झालं होतं. मथी नावाच्या या मांजराने श्यामच्या आईसाठी जीव सोडला.
संतांना जीवमात्रांविषयी वाटणारं ममत्व हा त्यांचा स्थायीभाव आहे. तुकोबांच्या लेखी तर तीच संतत्वाची कसोटी आहे. त्यामुळेच ‘माझी कोणी न धरो शंका’ असं ते म्हणतात. संतांजवळ गेल्यानंतर आपल्याला अभय मिळणार याची प्रत्येकाला खात्री वाटली तरच त्या व्यक्तीचं संतत्व सिद्ध झालं असं म्हणता येईल. अगदी सामान्य माणसापासून ते प्राणी-पक्षी आणि अगदी झाडाझुडपावरही प्रेम करता यावं हाच संतत्वाचा गाभा आहे.
प्रत्येक माणसात एक शिकारी प्राणी असतो. त्या प्राण्यात इतरांची शिकार करण्याची वृत्ती असते. ही शिकार वेगवेगळ्या पातळ्यांवर असते. इतरांनी आपल्या अंकित असावं असं वाटणं म्हणजे एक प्रकारची शिकारच आहे. जेव्हा माणसातला ‘शिकारी प्राणी’ गळून पडतो तेव्हा त्याची संतत्वाकडे वाटचाल होते. आपल्यातलं हिंसक शिकारीपण निघून गेल्यानंतर कोणालाच आपल्यापासून धोका वाटत नाही. संतांनाही नेमकं हेच हवं आहे.
तुकाराम महाराज म्हणतात की, जे जे मला भेटतात ते ते मीच आहे असं मला वाटतं. हे जग म्हणजे एकाच परमेश्वराचा विलास आहे असा संतांचा सिद्धांत आहे. थोडक्यात प्रत्येक जीव हा परमेश्वराचा अंश ठरतो. या न्यायाने आपल्यात आणि समोरच्या जिवात कोणताच फरक उरत नाही. त्यामुळेच ज्ञानेश्वरीत भक्तियोग सांगताना माऊली म्हणतात, ‘जे जे भेटीजे भूत। ते ते मानिजे भगवंत। ऐसा भक्तियोग निश्चित। जाण माझा।’ माऊलींना म्हणायचं आहे की प्रत्येक जीवमात्रात परमेश्वर पहायला शिकलं पाहिजे. तोच खरा भक्तियोग आहे.
अनेकांना संतांच्या या कथेत अतिशोक्ती वाटेल. अव्यवहार्यता वाटेल. आपण त्या कथेमागची भूमिका समजून घेतली पाहिजे. संवेदनशीलता हाच संतत्वाचा गाभा आहे हे तत्व समजून घेतलं पाहिजे. कदाचित संतांप्रमाणे आपल्याला प्रत्येक जीवमात्राला भीतीमुक्त करता येणार नाही. आपण किमान माणसांनी आपल्यावर विश्वास ठेवावा असं वागायला हवं. कोणीही आपल्या धाकात राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
पाखरांनाही आपला धाक असू नये असं तुकोबारायांना वाटत होतं. याचा अर्थ तुकोबारायांचा कोणावरच धाक आणि वचक नव्हता असं नाही. त्यांचा धाक होता तो साधुत्वाच्या नावाने लोकांना फसवणार्यांना. ‘तोवरी तोवरी माळामुद्रांची भूषणे। जोवरी तुक्याचे दर्शन जाहले नाही।’ असं तुकोबाराय म्हणतात. जोवर तुकोबारायांचं दर्शन झालं नाही तोवर माळामुद्रांची ढोंगबाजी करता येते असं तुकोबाराय सांगतात. ‘तोवरी तोवरी जंबुक करी गर्जना। जवं त्या पंचानना देखिले नाही।’ असं एक उदाहरण त्यांनी दिलं आहे. जोवर सिंहाचं दर्शन होत नाही तोवर अस्वलाच्या गर्जना असतात. अस्वलाला जसा सिंहाचा धाक असतो तसा भोंदूगिरी करणार्या बुवाबाजांना तुकोबांचा धाक आहे. हा धाक नैतिक आहे. आजही या प्रकारची भोंदूगिरी करणारे लोक घाबरतात ते तुकोबारायांच्या अभंगांना. हा नैतिक धाक वेगळा आणि सत्तेच्या बळावर कमावलेला धाक वेगळा. नैतिक धाक अखेरपर्यंत टिकणारा तर सत्तेचा धाक सत्तेपाठोपाठ लगेच कोसळणारा असतो. सत्तेपुढे कोणी शहाणपणा चालवत नाहीत, त्यामुळे सत्ता असेतोवर धाक असतो. सत्ता गेली की धाकही जातो. सत्तेचा धाक हा निष्पापांना असतो तर नैतिकतेचा धाक अपराध्यांना असतो. त्यामुळेच पाखरांना जवळ करणारे तुकोबाराय भोंदूगिरी करणार्या लोकांना मात्र जवळ करायला तयार नाहीत. ‘तुका म्हणे सांगो किती। जळो तयांची संगती।’ असं त्यामुळेच म्हणतात. आपण संतविचारांच्या धाकात राहिलो तर इतरांच्या धाकात राहण्याची गरजच नाही.
– हभप ज्ञानेश्वर बंडगर