स्वत:पेक्षाही अधिक आपल्या गुरूवर आणि नृत्यावर प्रेम करणार्या सरोज खान स्वभावाने अत्यंत कडक होत्या. अर्थात हा कडकपणा नृत्य गुरू म्हणून. त्यांचे स्वत:चे अनेक वर्षांपासूनचे असे १८ शिष्य आहेत, ज्यांच्यावर त्यांनी मुलांसारखे प्रेम केले.
– – –
फाळणीच्या वेळी कराचीमधील एक पंजाबी सिंधी कुटुंब भारतात आलं. किशनचंद्र साधू आणि नोनी साधूसिंह नागपाल हे त्यांचे नाव. इथे येण्यापूर्वी किशनचंद श्रीमंत होते. फाळणीने त्यांच्या हातात दोन चटया देऊन भारतात पाठवले. मुंबईत आल्यावर ते पत्नीसोबत माहिमच्या एका चाळीत राहू लागले. त्याचं पूर्वीचं मोठं विश्व आकसून एका रूमपर्यंत येऊन पोहचलं. पहिली मुलगी झाली. निर्मला तिचं नाव. ही मुलगी तीन-साडेतीन वर्षांची झाली, तेव्हा तिच्या आईला तिचे वागणे विक्षिप्त वाटू लागले. आईने तिला उचलले आणि थेट डॉक्टरकडे घेऊन गेली.
‘काय झालं पोरीला?’
‘माहित नाही डॉक्टर साहेब, विक्षिप्त वागते.’
‘म्हणजे नेमकी कशी वागते?’
‘भिंतींवरील स्वत:ची सावली बघून शरीराच्या हालचाली करते…’
डॉक्टरांच्या लक्षात आले. पोरीला नाचायची आवड दिसते. लहानपणी अनेक मुलं स्वत:च्या सावलीकडे बघून विविध हातवारे करत असतात. निर्मला शांतपणे दोघांचा संवाद ऐकत होती. तिच्याकडे बघत डॉक्टर म्हणाले, ‘अहो तिला नृत्य करायला आवडतं. यात काय चुकीचं आहे?’
‘पण आमच्या सात पिढ्यात असे कोणीच नव्हते. गाणे, नृत्य, चित्र काढणे, संगीत असे आमच्याकडे कोणीच नाही…’ निर्मलाच्या आईला असे वाटत होते की आपल्या मुलीवर कुणीतरी छूमंतर केले किंवा तिच्या मेंदूत काहीतरी बिघाड आहे. डॉक्टरांच्या लक्षात सर्व काही आले. ते म्हणाले, ‘तुमच्या मुलीला काहीही झाले नाही. उलट चित्रपटक्षेत्रात तिला बाल कलाकार म्हणून काम मिळेल. शिवाय तुमची आर्थिक स्थितीही बेताची आहे, थोडे फार पैसेही मिळतील.’
पण चित्रपटक्षेत्राची ना त्या आईला माहिती होती ना तिच्या पतीला. डॉक्टरांची या क्षेत्रात ओळख होती. त्यांनी काहीजणांकडे या मुलीची शिफारस केली.
निर्मलाचे नृत्याचे वेड वयाबरोबर समांतर वाढत होते. तिला एका चित्रपटात श्यामा या अभिनेत्रीच्या लहानपणाची भूमिका मिळाली. हे तिचे पडद्यावरील पदार्पण. नंतर १९५३मध्ये तिला ‘आगोश’ या चित्रपटात एक भूमिका मिळाली. या चित्रपटात ती आणि बेबी नाज या दोघींवर एक गाणे चित्रीत झाले. ‘बासुरिया काहे बजाए…’ या गाण्यात बेबी नाज कृष्ण झाली होती आणि निर्मला बनली होती राधा. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आर. डी. माथूर. निर्मलाचे नृत्याचे कसब आजही या चित्रपटाची क्लिप बघताना जाणवते. पडद्यावर तिचे नाव निर्मला नाही, तर बेबी सरोज असे होते.
ही बेबी खर्या अर्थाने प्रकाशझोतात आली ती १९८९मध्ये. अर्थात १९७५पासूनच ती एक प्रोफेशनल कोरियोग्राफर म्हणून प्रस्थापित झाली होती, पण ती पडद्यामागे. चित्रपटसृष्टीला ती माहीत झाली होती, पण प्रेक्षकांना माहिती झाली ती १९८९मध्ये. त्यावेळी आताच्या इतकी प्रसारमाध्यमे नव्हती. १९८९मधील एन. चंद्राच्या ‘तेजाब’च्या ‘एक दो तीन, चार पांच…’ या गाण्याने सगळीकडे धूम उडवून दिली होती. सरोजला तिच्या आयुष्यातला पहिला फिल्मफेअर पुरस्कार या गाण्याने मिळवून दिला. विशेष म्हणजे १९८९च्या या गाण्याच्या अफाट लोकप्रियतेमुळेच फिल्मफेअरने नृत्य दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार सुरू केला, त्याआधी ही कॅटेगरीच नव्हती.
बेबी सरोजला ‘सरोज खान’ बनण्यासाठी ३८ वर्षे संघर्ष करावा लागला होता. चार बहिणी व एक भाऊ अशा कुटुंबाला दारिद्र्याने आपल्या विळख्यात घेतले होते. भर म्हणून की काय वडिलांना कॅन्सरने गाठले आणि मृत्यूने ओढून घेतले. वडील अनंताच्या प्रवासाला निघून गेले, तेव्हा सरोज १० वर्षांची होती. ती कुटुंबात सर्वात मोठी; म्हणजे कुटुंबाचे पालनपोषण करण्याची नैतिक जबाबदारी आईनंतर तिचीच होती. तिच्यातले नैसर्गिक बालपण तिथेच खुरटले. हा काळ अत्यंत वाईट होता. तिची आई पातेल्यात पाणी ठेवून वर झाकणी ठेवे व म्हणे, ‘पोरांनो जेवण तयार होईपर्यंत जरा झोपा. मी उठवेन तुम्हाला जेवायला.’ त्यांच्या शेजारी एक मलबारी भजीवाला राहत असे. दिवसभर भजी विकून उरलेली भजी तो तिच्या आईकडे देई. आई खूप संकोच करायची. मग विचार करायची स्वत: एकवेळ उपाशी राहणे ठीक, पण पोरांना कसे उपाशी ठेवणार? त्या भज्यांत ब्रेडचे तुकडे मिसळून शिजवून ते पोरांना खाऊ घालत असे. हे सर्व सरोज बघत असे. वयाची १० वर्षे म्हणजे ना धड बालपण ना तरुणपण. लहान मुलांना ती मोठी वाटू लागली तर मोठ्यांना ती लहान.
सरोजला बालवयानंतरचा पहिला चित्रपट मिळाला तो तिच्या आवडत्या अभिनेत्रीचा म्हणजे मधुबालाचा. १९५८चा तो चित्रपट होता ‘हावडा ब्रिज’. शक्ती सामंतांच्या या चित्रपटात अशोककुमार व मधुबाला मुख्य भूमिकेत होते. यात ओ. पी. नय्यरचे बहारदार संगीत होते. यातील ‘आईए मेहरबां… बैठिए जाने जाँ…’ या गाण्यात सरोज खान हॅट घातलेल्या मुलाच्या वेषभूषेत नाचताना स्पष्ट दिसते. शीला विज ही ग्रुप डान्सर सरोज खानची लहानपणापासूनची मैत्रीण (शीला म्हणजे ‘श्री ४२०’ या चित्रपटातील ‘रमैया वस्तावया’ या गाण्यातील मुख्य डान्सर). त्यांच्या म्हणण्यानुसार सरोज लहानपणापासून मॉड रहात असे. तिला वेणी घातलेली मी कधी बघितलेच नाही. स्कर्ट, जीन्स तिला खूप आवडत असत. तिच्या नसानसात नृत्य भिनलेले होते. डान्स मास्टरचे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण ती करीत असे आणि त्या सर्व हालचाली स्वत: बिनचूक करून दाखवत असे.
एकदा शशी कपूरच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. शूटिंग संपले, पण पैसे आठ दिवसांनी मिळणार होते. दुसर्या दिवशी दिवाळीचा सण. घरात पैसे नाहीत. सरोज शशी कपूरजवळ गेली आणि अडचण सांगितली. शशी कपूरने आपल्याजवळचे २०० रुपये काढून तिच्या हाती ठेवले आणि म्हणाला, ‘माझ्याकडे इतकेच आहेत.’ त्यावेळी हे पैसे तिच्या कुटुंबासाठी किती अनमोल होते! ती सांगायची, ‘मी आजही ते पैसे परत केले नाहीत, हे ऋण मी आयुष्यभर असेच वाहून नेईन.’
वाराणसी किंवा बनारस घराणे हे संगीत-नृत्य क्षेत्रातील सर्वात मोठे व महत्त्वाचे घराणे. मूळचे जयपूर येथे जन्मलेले बी. सोहनलाल हे या घराण्याचे कथक नर्तक. बी. हिरालाल, बी. चिनीलाल आणि बी. राधेशाम हे त्यांचे धाकटे तीनही भाऊ कथक शैलीचे नर्तक होते. बी. हिरालाल सर्व कुटुंबाला सोबत घेऊन दक्षिणेत स्थलांतरित झाले. तेथेच त्यांनी कांथा या तरुणीबरोबर लग्न केले आणि चेन्नईत (तेव्हाचे मद्रास) स्थायिक झाले. त्यांना चार मुलेही झाली.
बी. सोहनलाल हे त्या काळचे आघाडीचे चित्रपट नृत्य दिग्दर्शक होते. १९५८ ते १९७८ या काळातील जवळपास सर्व महत्त्वाच्या चित्रपटांत हे नाव तुम्हाला हमखास दिसेल. मधुमती, कल्पना, दिल अपना और प्रीत पराई, चौदहवीं का चांद, साहब बीबी और गुलाम, पारसमणी, मेरे मेहबूब, गाईड, आरजू, मेरा साया, ज्वेल थीफ या चित्रपटांतील अविस्मरणीय नृत्य दिग्दर्शन त्यांचेच आहे. एकदा ते मुंबईत आले असताना त्यांचे ग्रुपमधील सरोजकडे लक्ष गेले. त्यांनी बहुदा तिच्यातील क्षमता जोखली असावी. यावेळी सरोज अवघी १२-१३ वर्षांची होती. सोहनलाल नृत्याच्या स्टेप्स शिकवत असत, त्यावेळी सरोज अत्यंत बारकाईने त्या बघत असे. तिची निपुणता बघून त्यांनी तिला आपली सहाय्यक केले आणि लवकरच तिने एका नामवंत अभिनेत्रीला स्टेप्सही शिकवल्या.
१९६२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डॉ. विद्या’ या चित्रपटात वैजयंतीमाला मुख्य भूमिकेत होती. ती भरतनाट्यम शिकलेली अभिनेत्री. यातील एका क्लासिकल नृत्याच्या वेळी सोहनलाल वैजयंतीमालाला म्हणाले, माझी सहाय्यक तुम्हाला नृत्याच्या स्टेप्स सांगेल. गाणे होते ‘पवन दिवानी न मानी उडाये घुंगटा…’. सरोजपेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या वैजंयतीमालाला आश्चर्य वाटले की एवढीशी मुलगी काय करून दाखविणार! पण सरोजने चेहर्यावरील सर्व हावभाव, डोळ्यांच्या, हातांच्या हालचाली, अगदी सूक्ष्म बारकावे इतके अप्रतिम करून दाखविले की वैजयंतीमालाही अवाक झाली. या गाण्यासाठी वैजयंतीमालाला २२ रिटेक्स द्यावे लागले. तिने सरोजची तोंड भरून स्तुती केली आणि वर काही रक्कम बक्षीसही दिले. आजही जेव्हा तुम्ही हा चित्रपट बघाल तेव्हा लक्षात येईल की गाण्यातील प्रत्येक शब्दांवर वेगळी मूव्हमेंट आहे आणि ती रिपीट झालेली नाही. १९६२ ते १९७२ ही १० वर्षे सरोज सोहनलाल यांची सहाय्यक होती.
हे सर्व करीत असताना सरोजने सहा महिन्याचा एक नर्सिंगचा कोर्सही पूर्ण केला. आणि केईएम हॉस्पिटलमध्ये कामही केले. नंतर जेव्हा तिने टाईपरायटिंग आणि शॉर्टहँडचा कोर्स पूर्ण केला तेव्हा तिला वरळीच्या ग्लॅक्सो कंपनीत नोकरी मिळाली. याचवेळी ती मेकअपचे कामही शिकली. १९६३मध्ये प्रदीपकुमार आणि बिना रॉय यांचा ‘ताज महल’ चित्रपट गाजला, तो त्यातील रोशन यांच्या संगीतामुळे. या चित्रपटात रफी-आशा यांची एक कव्वाली आहे, ‘चाँदी का बदन सोने की नजर…’ यात मुख्य नर्तिका मिनू मुमताज आहे (मेहमूदची बहीण) आणि तिच्या उजवीकडे पाठीमागे सरोज आहे. या चित्रपटाचे मेकअपमन होते ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरी जुकर. या गाण्याच्या वेळी ते तेथे हजर होते. सरोजच्या चेहर्यावरील आणि डोळ्यांच्या हालचाली खूपच मोहक होत्या. ते दिग्दर्शक सादिक साहेबांना म्हणाले, या मुलीला समोर घ्या. यावर सादिक साब म्हणाले, तिला समोर घेतले तर मुख्य डान्सर मिनू मुमताज हिच्यासमोर फिकी पडेल. म्हणजे सरोज त्या वयात कुणालही भारी पडू शकत होती.
१९६२पासून मास्टर सोहनलाल यांच्या प्रत्येक चित्रपटात सरोज सहाय्यक होती. ती त्यांची पट्टशिष्या झाली. सामान्यत: या परंपरेत गुरू आपल्या शिष्याला मनगटावर गंडा बांधतात, पण एक दिवस गुरू सोहनलाल यांनी सरोजच्या गळ्यात काळा धागा बांधला. सरोजला वाटले आपले लग्न गुरूशी झाले. गुरूचे वय होते ४१ वर्षे तर शिष्या होती १३ वर्षांची. शिवाय गुरूला चार मुलेही होती. पण सरोजला मात्र याचा थांगपत्ता नव्हता. १४व्या वर्षी सरोजने आपल्या पहिल्या मुलाला हमीद याला जन्म दिला. आज हा मुलगाही प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक राजू खान या नावाने ओळखला जातो. पण जेव्हा सोहनलाल यांनी आपले नाव या मुलाला देण्यास मनाई केली, तेव्हा सरोजला मोठा धक्का बसला. तिला तेव्हा समजले की सोहनलाल चार मुलाचे पिता आहेत. तोवर सरोज एखाद्या सवाष्णीसारखी साजश्रृंगार करीत असे. साहजिकच हा घाव तिच्या जिव्हारी लागला. १९६५मध्ये ते दोघे पती पत्नी म्हणून विभक्त झाले. मात्र सहाय्यक म्हणून सरोज ७२पर्यंत त्यांच्यासोबतच होती. कलेसाठी ही फार मोठी किंमत सरोज यांनी चुकवली.
१९६३ ‘दिल ही तो है’ या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक सोहनलालच होते. या चित्रपटातील ‘निगाहे मिलाने को जी चाहता है…’ या कव्वालीचे जेव्हा चित्रीकरण सुरू झाले, तेव्हा सोहनलाल परदेशात गेले होते. नृत्य कंपोज कोण करणार? निर्माते सरोजला म्हणाले, सोहनलाल नाहीत. तुम्ही त्यांच्या सहाय्यक आहात, तेव्हा तुम्हीच कंपोज करा. पण नृत्य कसे कंपोज करायचे ते सरोजला माहीत नव्हते. सरोज म्हणाली, मी स्वत: नृत्य करून दाखवेन या गाण्यावर हवे तर… आणि त्यांनी सर्व हावभाव कव्वालीसोबत करून दाखविले आणि ते गाणे पिक्चराईज झाले. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी तिने स्वतंत्रपणे हे नृत्य कंपोज करून दाखविले.
अभिनेत्री साधना ही सरोजची पूर्वीपासूनच फॅन होती. १९७५मध्ये साधनाने आपले पती आर. के. नय्यर यांच्यासोबत ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात पहिल्यांदा सरोज स्वतंत्र नृत्य दिग्दर्शक बनली. ग्रुप डान्सर म्हणून सुरुवात केल्यानंतर स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळवायला सरोजला १७ वर्षे लागली. मात्र ही १७ वर्षे प्रचंड कष्ट आणि समस्यांने भरलेली होती. ‘गीता मेरा नाम’मधील त्यांचे काम सुभाष घई यांना खूप आवडले आणि त्यांनी ‘विधाता’ या चित्रपटात त्यांना संधी दिली.
१९८३मध्ये प्रदर्शित झालेल्या घईंच्या ‘हिरो’ या चित्रपटाने खर्या अर्थाने चित्रपटसृष्टीला सरोज यांच्या क्षमतेची ओळख पटली. आणि नंतर त्यांनी केलेला प्रत्येक चित्रपट त्यांना यशोशिखराकडे घेऊन गेला. नगीनामधील (१९८६) ‘मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा…’, मिस्टर इंडियामधील (१९८७) ‘हवा हवाई…’, तेजाब (१९८८), चांदणी (१९८९), बेटा (१९९२), डर, बाजीगर खलनायक (१९९३), मोहरा (१९९४), याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (१९९५), परदेस (१९९७), हम दिल दे चुके सनम, ताल (१९९९), लगान (२००१), देवदास (२००२), स्वदेस, वीर जारा (२००४), फना (२००६), गुरू (२००७), तारे जमीं पर, जब वुई मेट (२००७), खट्टा मिठा (२०१०), राऊडी राठोड, अग्नीपथ (२०१२), गुलाब गँग (२०१४) अशा एकाहून एक सरस चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले.
२००७मध्ये डॉ. शारदा रामनाथन या दिग्दर्शिकेचा ‘श्रिंगारम’ हा चित्रपट आला. पूर्णत: भारतीय नृत्यकलेचा अविष्कार असणार्या या चित्रपटासाठी सरोज यांना बोलावण्यात आले होते. यात पूर्ण शास्त्रीय पद्धतीचे भारतीय नृत्ये त्यांनी कंपोज केली. यातील एका नृत्यात ‘पदम’ या प्रकारात गाण्यातील फक्त एका ओळीत सरोज खान यांनी १६ विविध प्रकारच्या भावमुद्रा करून दाखविल्या. डॉ. शारदा रामनाथन म्हणतात, मी त्यांचे वर्णन ‘स्पीचलेस’ असे करेन. त्यांनी स्वत: या भावमुद्रा मोजल्या आहेत.
झगमगत्या चंदेरी दुनियेतले जब वुई मेट, देवदास आणि श्रिंगारम या तीन चित्रपटांसाठी तीन राष्ट्रीय पुरस्कार तर तेजाब, चालबाज, सैलाब, बेटा, खलनायक, हम दिल दे चुके सनम, देवदास आणि गुरू असे सात फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले, पण वैयक्तिक आयुष्यातील वेदनांनी त्यांची पाठ सोडली नाही.
सरोज यांना कॅमेरा मुव्हमेंटचेही उत्तम ज्ञान होते. जो सेट लावलेला आहे त्याचे, जे कलाकार त्यात भाग घेत आहेत त्या सर्वांचे त्या बारकाईने निरीक्षण करत. ‘देवदास’चा प्रमियर झाला, तेव्हा सरोज दवाखान्यात बेडवर होत्या. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी भेटायला गेले तेव्हा त्यांनी लगेच विचारले, ‘सिटी बजी या नहीं हॉल में… लोगों ने सिक्के उछाले या नहीं…’ अर्धवट कॉन्शस असलेली ही बाई फक्त आणि फक्त नृत्यच जगणारी होती.
सोहनलालपासून झालेली दोन मुले राजू खान आणि हिना खान, तर नंतर सरदार रोशन खानपासूनची मुलगी सुकन्या खान अशी तीन मुले. मात्र २०१२मध्ये हिना खान मृत्यू पावली. आपल्याकडे सर्व काही असताना आपण मुलीला वाचवू शकलो नाही, याची त्यांना आजही खंत आहे. दुसर्या लग्नाच्या खूप आधीच त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. दुसरी मुलगी दुबईला डान्स क्लास चालवते. चित्रपटांनंतर टीव्हीवरील नृत्याच्या अनेक रियालटी शोजमध्ये त्या जज होत्या. मुंबईत त्यांची नृत्य शाळा होती, जिथे अनेक तरुण तरुणी नृत्याचे धडे गिरवत. स्वत:पेक्षाही अधिक आपल्या गुरूवर आणि नृत्यावर प्रेम करणार्या सरोज स्वभावाने अत्यंत कडक होत्या. अर्थात हा कडकपणा नृत्य गुरू म्हणून. त्यांचे स्वत:चे अनेक वर्षांपासूनचे असे १८ शिष्य आहेत, ज्यांच्यावर त्यांनी मुलांसारखे प्रेम केले. सेटवर येण्यापूर्वी जर कोणी रंगभूमीला नमस्कार केला नाही, तर त्या प्रचंड रागावत असत. २०१२मध्ये फिल्म्स डिव्हिजनने त्यांच्यावर एक सुंदर डॉक्युमेंटरी तयार केली ती बघण्यासारखी आहे. १९५८मध्ये सुरू झालेला त्यांचा नृत्याचा प्रवास ३ जुलै २०२० ला मात्र थांबला. शरीर स्थूल झाले असले तरी सेटवर जाताच त्यांचे शरीर चपळ होत असे. डोळे, भावमुद्रा, पदन्यास त्याच गतीने होत. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘मेरे गुरू हर वक्त मेरे सामने होते हैं. जब भी मैं काम करने लगती हूँ तो वह मेरे अंदर प्रवेश करते हैं और मेरा काम पुरी शिद्दत से पूरा हो जाता है. आज मैं जो कुछ भी हूँ, मेरे गुरू की वजह से…’ आपल्या गुरुप्रती इतक्या टोकाचे समर्पण करणारे आणखी कुणी असेल असे मला तरी वाटत नाही.