सूप आणि सलाड हे दोन्ही पदार्थ कितीही आवडत असले तरी बर्याचदा नेहमीचे ६-७ सूपचे प्रकार आणि तितकेच किंवा त्यापेक्षा थोडे जास्त सलाडचे प्रकार काही काळानंतर कंटाळवाणे वाटायला लागतात. वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींशी ओळख असल्यास, देशविदेशातल्या प्रवासात तिथले स्थानिक पदार्थ खाल्ले असल्यास किंवा एकूणच खाण्याची आवड असल्याने वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये नवे पदार्थ खायला मिळतात आणि माहीत होतात. एखाद्या वेळी चाखून आवडलेल्या या पदार्थांच्या पाककृती शोधणं इंटरनेटमुळे तुलनेनं सोप्पं झालं आहे. बर्याचदा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये खाल्लेला एखादा पदार्थ खूप आवडतो. मग त्याची पाककृती शोधून ती करून बघितली जाते.
बहुतेक वेळा नवीन सूप, सलाड किंवा इतर काही पदार्थ करायचा असल्यास मी घरातल्या घटक पदार्थांपासून बनू शकतील असेच सलाड, सूप इंटरनेटवर शोधते. त्यांच्या कृती वाचून, त्यातला आपल्याला आवडू शकेल असा पदार्थ निवडून मग तो करून बघितला जातो. तीन चार महिन्यांपूर्वी दिल्लीतल्या थंडीत दिवसभर बाजारात फिरल्यानंतर एका ठिकाणी लाक्सा नावाचा सूपचा एक प्रकार खायला मिळाला. त्याच्या वर्णनामध्ये राइस नूडल्सचा उल्लेख असल्याने हे पोटभरीचे होईल याची खात्री होती. याआधी मी राइस नूडल्स असलेले सूप खाल्ले होते, घरी बनवलंही होतं. पण हे सूप मात्र याआधी खाल्लेल्या सगळ्या सूपपेक्षा वेगळं होतं. नारळाच्या दुधाची गोडुस चव, तिखटाचा तिखटपणा, आल्याची आणि लिंबाची चव आणि गवती चहाचा हलकासा वास असलेलं हे सूप मला खूपच आवडलं. थंडीने हात-पाय गारठलेले असताना ते गरम सूप खायला मिळाल्याने बहुदा त्याची चव जास्तच आवडली. हे सूप कुठलं आहे, कसं बनवतात, काय साहित्य वापरले जाते याचा लगेच शोधही घेतला.
नारळाचे दूध आणि गवती चहाचा वापर असल्याने हा बहुतेक थाई खाद्यपदार्थ असावा असा माझा अंदाज होता. शोध घेतल्यावर कळलं हा एक मलेशियन खाद्यपदार्थ असून त्याव्यतिरिक्त सिंगापूर, इंडोनेशिया आणि थायलंड या देशांमध्येही याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या केल्या जातात. मी कधी या किंवा त्याच्या आजूबाजूच्या देशांमध्ये गेले नाहीये. आपल्याकडे जितक्या सहजपणे चायनीज, इटालियन आणि हल्ली थोड्या फार प्रमाणात मोठ्या शहरांमध्ये मिडल इस्टमधले, मेक्सिकन, थाई, जापनीज किंवा कोरियन पदार्थ मिळतात, तसे फक्त मलेशियन किंवा सिंगापुरी, इंडोनेशियन पदार्थ मिळत नाहीत. मला तरी अजून या देशांमधले पदार्थ मेन्यूमध्ये असणारी फारशी ठिकाणं कधी दिसली नाहीत. लाक्सा आवडल्यामुळे एकूणच मलेशियात अजून कोणते पदार्थ प्रसिद्ध आहेत, त्यातले आरोग्यदायी, सोपे आणि आपल्याकडे मिळणार्या घटकांना वापरून करता येण्याजोगे कोणते पदार्थ आहेत, याचा शोध घेतल्यावर लक्षात आलं की, मलेशियन पदार्थांमध्ये भात, नारळ आणि बलाचान (फरमंटेड श्रिंप पेस्ट) या घटकांचा भरपूर वापर होतो. नारळ किंवा नारळाच्या दुधाचा आणि तांदळाचा भरपूर वापर मलेशियन स्वयंपाकात होत असल्याने इथले बरेचसे पदार्थ जास्त उष्मांक असलेले (कॅलरी डेंस) असतात. बरेच मलेशियन पदार्थ बनवताना तेलाचा वापर जास्त केला जातो. सोया सॉस, फिश सॉस किंवा बालचान असणार्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाणही जास्त असते. या कारणांमुळे बरेच मलेशियन पदार्थ आरोग्यासाठी चांगले समजले जात नाहीत. पण यातल्या बर्याच पदार्थांच्या बनवण्याच्या पद्धतीत बदल केल्यास, घटक पदार्थांमध्ये थोडा बदल केल्यास (साध्या तांदळाऐवजी ब्राऊन राइस किंवा हातसडीचा तांदूळ वापरणे, नारळाच्या घट्ट दुधाऐवजी पातळ दूध वापरणे किंवा कमी नारळ वापरणे) त्या पदार्थांना आरोग्यदायी बनवता येवू शकतं.
त्यांचा बालचान आपल्याकडे सहजा सहजी मिळत नाही. शिवाय फर्मंटेड श्रिम्प पेस्ट किंवा फिश सॉस या घटकांची चव आणि वास बर्यापैकी तीव्र असतो. नेहमी मांसाहाराची सवय असली तरी पहिल्यांदा वापरताना कदाचित सगळ्यांना याचा वास किंवा चव आवडू शकणार नाही. बलाचान, फिश सॉस यांच्यासारख्या आपल्याला सवय नसलेल्या किंवा सहज मिळत नसलेल्या घटकांना पर्यायी दुसरे काही पदार्थ वापरून किंवा हे पदार्थ न वापरताही मलेशियन पाककृती बनवता येऊ शकतात. अशा पाककृती तिथल्या पारंपारिक पाककृतींपेक्षा चवीला थोड्या वेगळ्या लागतील, पण आपल्या चवीनुसार, स्थानिक आणि आरोग्यदायी पदार्थांचा वापर करून तयार केलेल्या या पाककृती आपल्याला आवडू शकतात. लाक्सा, ग्रिल्ड फिश, नासी उलाम किंवा नासी केराबू (भाताचे सलाड किंवा भात असलेले सलाड), नासी लेमाक (नारळाच्या दुधात बनवलेला भात), अयाम पर्चिक (नारळाचे दूध वापरून केलेल्या सॉसमध्ये ग्रिल किंवा रोस्ट केलेले चिकन) हे काही मलेशियन पदार्थ आहेत ज्यांच्या पारंपारिक कृतीमध्ये थोडे बदल करून आपल्याला चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ बनवता येऊ शकतात.
लाक्सा
हे भाज्या, चिकन/ टोफू, राइस नूडल्स आणि नारळाचे दुध घालून बनवलं जाणारं एक सूप आहे. हे सूप बनवण्यासाठी लाक्सा पेस्ट वापरली जाते. ती काही मोठ्या दुकानांमध्ये किंवा ऑनलाइन विकत मिळते. ती घरीसुद्धा बनवता येते. लाक्सा पेस्ट उपलब्ध नसेल आणि बनवणं शक्य नसेल तर बाजारात सगळीकडे सहजपणे मिळणारी थाई रेड करी पेस्ट वापरून सुद्धा हे सूप बनवता येतं.
लाक्सा पेस्ट साहित्य : ७-८ लाल मिरच्या (वाळलेल्या आणि मध्यम तिखटपणा असणार्या), २ छोटे कांदे, ४-५ लसणाच्या पाकळ्या, एक ते दीड इंच आल्याचा तुकडा, ५-६ काजू किंवा भिजवून साल काढलेले बदाम, १ चमचा धणे पूड, १ चमचा जिरे पुड, १ चमचा हळद, गरज असल्यास तिखट, १ गवती चहाच्या कांदा, तेल, १ चमचा श्रिम्प पेस्ट, चवीप्रमाणे मीठ.
कृती : सगळे घटक पदार्थ एकत्र करून मिक्सरवर बारीक वाटून घ्यावेत. एका फ्रायपॅनमध्ये थोड्या तेलावर ही पेस्ट १५ ते २० मिनिटे (तेल वेगळं दिसेपर्यंत) अधूनमधून परतत शिजू द्यावी. ही तयार झालेली पेस्ट नंतर प्रिâजमध्ये ठेवून हवी तेव्हा वापरता येऊ शकते.
श्रिम्प पेस्ट उपलब्ध नसल्यास किंवा वापरायची नसल्यास त्या पेस्टमुळे येणार्या उमामी चवीसाठी फिश सॉस, मिसो पेस्ट, सोया सॉस असे इतर उमामी चव देणारे घटक पदार्थ वापरता येतील. ही पेस्ट किंवा पर्यायी घटक पदार्थ वापरला नाही, तर फक्त ती हलकी उमामी चव येणार नाही.
लाक्सा सूपसाठी : झुकिनी, मशरूम, गाजर, रंगीत ढोबळ्या मिरच्या, ब्रोकली इत्यादींपैकी हव्या त्या २-३ भाज्या, २५० ग्राम बोनलेस चिकन, २ चमचे लाक्सा पेस्ट, १ चमचा साखर किंवा गुळाची पावडर, २-३ लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, १ गवती चहाचा कांदा, टोफू, अंडी, राइस नूडल्स, १ कप नारळाचे दूध, १-२ चमचे तेल, व्हेजिटेबल स्टॉक वा पाणी, चवीप्रमाणे मीठ, वरून घालायला कोथिंबीर, लिंबाच्या चकत्या/ फोडी, ओबडधोबड कुटलेले शेंगदाणे.
कृती : गवती चहाचा कांदा, आले आणि लसूण बारीक चिरून एका जाड बुडाच्या भांड्यात थोड्या तेलावर परतावे. यामध्ये लाक्सा पेस्ट घालून २-४ मिनिटे परतावी. यामध्ये चिकनचे तुकडे घालून परतावे. चिकनच्या तुकड्यांचा रंग बदलायला लागला की १-२ मिनिटात यात भाज्या घालून परतावे. यानंतर यात व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी घालून चिकन आणि भाज्या शिजू द्याव्यात. चिकन आणि भाज्या शिजल्यावर यात नारळाचे दूध, चवीप्रमाणे मीठ, साखर आणि हवे असल्यास थोडे तिखट किंवा मिरे पूड घालावी आणि सूप परत थोडा वेळ उकळू द्यावे.
सूपमध्ये चिकन शिजत असताना, हवे तितके फ्लॅट राइस नूडल्स पाकिटावर दिलेल्या सूचनांनुसार शिजवून घ्यावेत. टोफू वापरणार असाल तर टोफूचे तुकडे एखाद्या फ्रायपॅनमध्ये थोडे परतून घ्यावेत. अंडी उकडून घ्यावीत.
सर्व्ह करताना बाऊलमध्ये थोडे राईस नूडल्स ठेवून त्यावर हे सूप वाढावे. त्यावर टोफू, अंडी, लिंबाच्या चकत्या, कुटलेले शेंगदाणे आणि भरपूर कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
लाक्सा पेस्टऐवजी रेड करी पेस्ट वापरताना २-३ चमचे रेड करी पेस्ट आणि थोडे तिखट वापरावे. वेगन लाक्सा करायचे असल्यास चिकनऐवजी टोफू आणि बीन स्प्राऊट्स वापरता येतील.
काकडी आणि अननसाचे मलेशियन सलाड
साहित्य : २ काकड्या, दीड वाटी अननसाचे तुकडे, १ कांदा, मूठभर डाळिंबाचे दाणे, मूठभर पुदिना, मूठभर भाजलेले शेंगदाणे.
ड्रेसिंगसाठी : १ लाल मिरची (तिखट), अर्धा लिंबू, अर्धा चमचा सोया सॉस किंवा फिश सॉस, १ चमचा गुळाची पावडर. किंवा साखर, पाव चमचा चिंचेचा घट्ट कोळ, चवीप्रमाणे मीठ.
कृती : काकडी आणि अननसाचे तुकडे एकत्र करावेत. त्यात उभा पातळ चिरलेला कांदा घालावा. डाळिंबाचे दाणे घालावे. हे सगळे सलाडचे पदार्थ एकत्र करावेत. एका भांड्यात ड्रेसिंगसाठी लाल मिरची बारीक चिरून घ्यावी. (मिरची खूप तिखट असल्यास बिया काढून मग चिरावी). त्यात लिंबाचा रस आणि ड्रेसिंगचे इतर साहित्य मिक्स करावे आणि थोडे फेटून घ्यावे.
सलाडच्या पदार्थांवर हे ड्रेसिंग, हातानेच थोडी चुरडलेली पुदिना पाने आणि भाजलेले शेंगदाणे घालावेत आणि एकत्र करावे. शेंगदाणे आख्खे घालण्याऐवजी थोडे ओबडधोबड कुटूनही घालता येतील.