□ लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना; सरकारी खर्चाला ३० टक्के कात्री.
■ ये तो होना ही था! फक्त हे सगळं होण्याआधी अडवणार्या सगळ्या यंत्रणा काळझोपेत कशा आहेत, हा एक जागरुक नागरिकांना पडणारा आणि न सुटणारा प्रश्न आहे.
□ नितेश राणे पुन्हा बरळले; निधी पाहिजे तर भाजपात या महाविकास आघाडीचे सरपंच असतील तिथे रुपयाही देणार नाही.
■ त्यांच्या स्वत:च्या किंवा वडिलांच्या खिशातून देत असतील पैसे तर त्यासाठी या अटी ते घालणारच ना! सरकारचे म्हणजे जनतेचेच पैसे देण्याच्या बाबतीत या वल्ग्नना सुरू असतील, तर कोकणातल्या जनतेने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
□ मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठीच ट्रेडमार्क-पेटंट मुख्यालय दिल्लीला हलवणार -महाराष्ट्रद्वेष्ट्या भाजपचे नवे कारस्थान.
■ ते मुळात हलवायचं आहे ते अहमदाबादलाच. त्यासाठीच तिकडचा एक अधिकारी लॅटरल एन्ट्रीच्या माध्यमातून बोकांडी बसवलेला आहे. थेट अहमदाबादला नेले तर मुंबईत नकारात्मक प्रतिक्रिया उमटेल म्हणून दिल्लीमार्गे गुजरातला वळवण्याचं कारस्थान रचलं गेलं आहे. द्या गोयलांना आणखी मतं.
□ पळपुट्यांना पुरस्कार देणे हा महादजी शिंदे यांचा अपमान – संजय राऊत यांचे ज्योतिरादित्य शिंदे यांना उत्तर.
■ राऊत साहेब, मोठा वारसा सांगणारे आणि वेळ आल्यावर काँग्रेसमधून पळ काढणारे पळपुटे नेते हाही महादजींचा जिवंत आणि चालता बोलता अपमानच आहेत. त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा करणार?
□ दिल्लीतील ‘तो’ सत्कार साहित्य महामंडळाच्या परवानगीशिवाय – साहित्य वर्तुळात तीव्र नाराजीचे सूर.
■ कसले नाराजीचे सूर नि कसलं काय? सगळं संमेलन चार पैशांसाठी नेऊन राजकारण्यांच्या दावणीला बांधणार्यांना तो अधिकार तरी आहे का? दिवंगत बाळासाहेबांनी एकदा वैतागून दिलेली उपमा आता सार्थ करतायत.
□ काँग्रेसने भाकरी फिरवली… पटोले यांची उचलबांगडी; हर्षवर्धन सपकाळ नवे प्रदेशाध्यक्ष.
■ सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या हातात पक्ष दिला आहे. आता पक्षातले सरंजामदार त्यांना नीट काम करू देतील, हे पाहण्याची जबाबदारी दिल्लीतल्या मोठ्या नेत्यांची आहे. नाहीतर भाकरी फिरवली, खाली जाळच नाही, अशी परिस्थिती व्हायची.
□ बेरोजगारांना काम देण्याचा निर्णय घ्यायला सहा महिने का लागतात? – हायकोर्टाने महानगरपालिकेला फटकारले.
■ आहेत त्यांना पगार द्यायला पैसे नाहीत, वावदूक योजनांवर पैसे खर्च होत असतात, अशी खरी कारणं कोणती तरी महापालिका न्यायालयात सांगू शकेल का हिंमतीने?
□ मेहुल चोक्सीच्या मालमत्तांचा लिलाव होणार.
■ बैल (विदेशी) गेला, सुखासमाधानात राहिला आणि आता इकडे झोपा काढणारे झोपा करतायत… कशाला लोकांना मूर्ख बनवता?
□ धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; निवडणुकीत खोटी माहिती दिल्याने कोर्टाची नोटीस.
■ जोपर्यंत पाठिशी आहेत सुप्रीम आका, तोवर होणार नाही बालही बाका!
□ डहाणूमधल्या पोंदा हायस्कूलचे पोषण आहाराचे ८०० किलो धान्य गायब.
■ गायब… म्हणजे, हवेत मिसळले की जमिनीने गिळले की पाण्यात विरघळले… कोणीतरी ते मुलांच्या ताटांतून हिरावून नेले आहे. अशा वाळवीचेच पोषण सुरू आहे सगळ्या व्यवस्थेत.
□ मोदींच्या नावाचे ठाण्यात ग्रंथालय? ठाण्यात पालिका अधिकार्यांना पत्ताच नाही.
■ वाचनाचा देखावा करताना पानांच्या बाजूने ओल्या हिरवळीवर पुस्तक ठेवणार्या नेत्याच्या नावाने ग्रंथालय आहे, हीच मुळात किती महान गोष्ट आहे.
□ वॉर रूमवरून महायुतीत कोल्ड वॉर; फडणवीसांची वॉर रूम, तर शिंदेंची को-ऑर्डिनेशन रूम.
■ इतक्या बेटकुळ्या काढून दाखवण्याचं बळ त्यांच्यात आलं कुठून, हा खरा प्रश्न आहे. बाकी अनेक खानसामे एकत्र आले की अन्नपदार्थाचा सत्यानाश होतो, हे या थोर पुरुषांना माहिती असेलच.
□ मायदेशात पत्रकारांना टाळणार्या पंतप्रधानांची अमेरिकेत भंबेरी; अदानींबद्दल म्हणतात, ‘वैयक्तिक मुद्दा’!
■ बिचारे! इथे थोडी प्रॅक्टिस केली असती तर? पण दंभ आडवा येतो, अहंकार आडवा येतो आणि अज्ञान आडवे येते… ते तिकडे जाऊन उघडे पडते.
□ कुंभमेळ्याआधीच एकनाथ शिंदेंचा स्वतंत्र आखाडा; आढावा बैठकीकडे भाजप, अजित पवार गटाची पाठ.
■ कमालीच्या सुसंवादाने वाटचाल सुरू आहे तर सरकारची… जनतेला आमच्या शुभेच्छा कायमच आहेत.
□ महाराष्ट्र एकमेव राज्य, जेथे अतिक्रमण केल्यावर मोफत घर मिळते – हायकोर्टाने सरकारचे कान टोचले.
■ सरकारच्या कानाची चाळण झाली असेल एव्हाना, इतक्यांदा कान टोचले जातात हायकोर्टाकडून. उपयोग काय त्याचा! कशात काही फरक पडतो का? लोकांची वाफ निघून जाते.
□ राज्याला दहावी पास अर्थमंत्री लाभलेत – अंजली दमानियांचा अजित पवारांना टोला.
■ अंजलीबाई जरा दमाने घ्या! शिक्षण आणि कर्तबगारी, आकलन, विषयावरची पकड, बुद्धिमत्ता यांचा काही संबंध असतो, असं तुम्हाला आसपास पाहून वाटतं का? मेंदूगहाण शिक्षित भक्तांचा सागर उफाळलेला आहे राज्यात. देशात पवार आमचे राजकीय विरोधक आहेत, पण त्यांच्यावर असली टीका योग्य नव्हे. ते त्यांची बुद्धी, कर्तबगारी कशासाठी खर्च करतात, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
□ मिंध्यांना खुले आव्हान; गणेश नाईकांचा ठाण्यात जनता दरबार फिक्स.
■ सगळे एकमेकांचा करेक्ट कार्यक्रम करायला उत्सुक आहेत. तसे ते नेहमीच उत्सुक असतात. याच्यात राज्याचा आणि जनतेचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे.