जसा मी मोठा होत गेलो, तसाच त्याबरोबर शिवसेना नामक एका लहान रोपट्याचे रूपांतर मोठ्या वटवृक्षात होताना पाहत होतो… यात साहेबांचं अतुल्य, भक्कम योगदान आणि असंख्य शिवसैनिकांची साथ मिळताना पाहत होतो. शिवसेनेला घडवताना तहानभूक विसरलेल्या, अतिशय व्यग्रतेत जीवन जगत असलेल्या मोठ्या साहेबांकडे एक कलासक्त मन आहे आणि ते सगळी स्पंदनं अलवारपणे टिपून घेतात, याचा थांग मलाही आधी लागला नव्हता… पण साहेबांचं मन टिपकागदासारखं होतं, याचा अनुभव पुढील आयुष्यात मला कायम येत गेला.
– – –
बाळासाहेबांशी माझी पहिली भेट नेमकी कधी झाली हे मला आता नीटसं स्मरतही नाही. मला कळायला लागल्यापासून मी त्यांना पाहतोच आहे. मी देखील बांद्र्याच्या कलानगरमध्ये राहत असे, त्यामुळे बाळासाहेबांचे ‘मातोश्री’ निवासस्थान म्हणजे जवळ जवळ माझा शेजारच. उद्धवजी, अन्य मित्र आणि मी सगळे मातोश्री निवासस्थानाच्या मागील मैदानात क्रिकेट खेळत असू. त्यामुळे मी माझ्या लहानपणापासूनच बाळासाहेबांना पाहत आलोय. मोठ्या साहेबांना नेहमी पक्षाच्या कामात व्यस्त पाहिलं, त्यांच्या आवाजात प्रेमळ आश्वासक शब्द पाहिलेत, त्यांच्या स्वरांतील जरब देखील जवळून पाहिली! जसा मी मोठा होत गेलो, तसाच त्याबरोबर शिवसेना नामक एका लहान रोपट्याचे रूपांतर मोठ्या वटवृक्षात होताना पाहत होतो… यात साहेबांचं अतुल्य, भक्कम योगदान आणि असंख्य शिवसैनिकांची साथ मिळताना पाहत होतो. शिवसेनेला घडवताना तहानभूक विसरलेल्या, अतिशय व्यग्रतेत जीवन जगत असलेल्या मोठ्या साहेबांकडे एक कलासक्त मन आहे आणि ते सगळी स्पंदनं अलवारपणे टिपून घेतात, याचा थांग मलाही आधी लागला नव्हता… पण साहेबांचं मन टिपकागदासारखं होतं, याचा अनुभव पुढील आयुष्यात मला कायम येत गेला.
माझ्या जीवनाच्या, कारकीर्दीच्या पुढच्या टप्प्यावर उद्धवजी राजकारणात आलेत आणि मी पर्यटन, मॉडेलिंग, अभिनय अशी मुशाफिरी करत होतो. माझ्या भटकंतीच्या अनुभवांवर मी ‘मार्मिक’मध्ये लिखाण करावं असं उद्धवजींनी सुचवलं. ‘मार्मिक’वर बाळासाहेबांचा खूप जीव… त्यात मी काय लिहिणार याचं दडपण मला आलं. ‘मार्मिक’ बाळासाहेब वाचणार, त्यांना अभिप्रेत असलेला दर्जा माझ्या लेखनात नक्कीच नसेल या अनामिक भीतीने माझी पाचावर धारण बसली होती. पण माझ्यावर भावाप्रमाणे प्रेम आणि आदरभाव असलेल्या उद्धवजींच्या आग्रहाला मानून मी ‘मार्मिक’मध्ये भटकंतीचे अनुभव लिहू लागलो.
चित्रपटात अभिनय करताना शूटिंगसाठी विविध स्थळी गेलो असताना त्या स्थळांविषयीचा आणि सहकलाकारांच्या खास आठवणींचा रम्य प्रवास म्हणजे चंदेरी भटकंती! या आठवणींवर मी पुस्तक काढायचे ठरवले, तेव्हा या पुस्तकाची प्रस्तावना बाळासाहेबांनी लिहिली हा मी आयुष्यातील सर्वोच्च सन्मान समजतो. बाळासाहेबांचे माझ्यावरचे पुत्रवत प्रेम आणि उद्धवजी यांचे अमूल्य योगदान माझ्या आयुष्यातील मोठा ठेवा आहे!
‘चंदेरी-भटकंती’चे प्रकाशन माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी करावे आणि अभिषेक बच्चन-अमिताभ बच्चन या मान्यवर कलाकारांसोबत मी फिल्म केल्याने त्यांनाही पुस्तक प्रकाशनासाठी आमंत्रित करावे असा माझा मानस होता. त्या काळात अमिताभ यांच्या प्रतीक्षा बंगल्यात दरवर्षी होळी खेळण्यासाठी मला आमंत्रण असे… पण उत्तम स्नेहसंबंध असून अमिताभ यांनी होकार दिला नव्हता. किंबहुना बाळासाहेबांनी देखील तोपर्यंत माझ्या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली नव्हती. ते लिहितील की नाही, अशीही शंका होतीच! मनाची घालमेल चालू असता उद्धवजींचा फोन आला आणि त्यांनी ‘मातोश्री’मध्ये बोलावलं, ‘मिलिंद, तुझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे, येऊन पाहा, कशी वाटते!’
धडधडत्या अंत:करणाने मी ‘मातोश्री’वर पोहोचलो आणि साहेबांनी लिहिलेली प्रस्तावना वाचून डोळ्यांमध्ये आनंदाश्रूंचा महापूर दाटला! आम असो अथवा खास, कुणालाही दरारा वाटेल असं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व. त्यांचा आब खूप असे. पण त्यांच्या हृदयात इतकं अमृत असू शकतं, हे मला त्या क्षणी प्रथमच प्रकर्षाने जाणवलं! आयुष्यभर प्रोत्साहन देतील असे त्यांचे शब्द आणि कौतुक मला कायम पुरून उरणारे आहे. मी त्यांना आणि उद्धवजींना मातोश्रीमध्ये भेटलो, तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष भेटीतही माझी पाठ थोपटली… बाळासाहेबांशी असलेलं भावनिक नातं त्या क्षणानंतर हृदयावर कायमच कोरलं गेलं! स्वतःच्या असंख्य जबाबदार्या, पक्षाचे व्याप सांभाळून अनेकांच्या आयुष्यात प्रोत्साहन आणि आनंदाचं कारंजं निर्माण करणारे बाळासाहेबांसारखे नेता खरंच दुर्मिळ… साहेबांनी लिहिलेली प्रस्तावना मी खंडाळ्याच्या बंगल्यात दर्शनी भागात सजवून ठेवलीये… कारण बाळासाहेबांनी केलेलं कौतुक मला तमाम पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ- हृदयाच्या समीप आहे… सदैव असेल!
साहेबांच्या कोमल हृदयाचा आणखी एक प्रसंग मला आठवतोय. माझा मुलगा अभिषेक याचा अठरावा वाढदिवस होता… त्याने बाळासाहेबांबद्दल खूप ऐकलं होतं… तोही त्यांना दैवत माने. त्याने मला विचारलं, बाबा, मला आज बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळतील का? त्यांचे चरणस्पर्श होतील का?’
अभिषेकच्या इच्छेला मी काय उत्तर देणार होतो? साहेबांची व्यग्रता मी जाणून होतो. अभिषेकला साहेबांच्या भेटीचे कुठलंही आश्वासन मी देऊ शकत नव्हतो. मी उद्धवजींना फोन केला आणि लेकाला बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळतील का, असं विचारलं. १५ ऑगस्टला उद्धवजींचा फोन आला… १६ला अभिषेकचा वाढदिवस असतो. उद्धवजींनी आम्हाला मातोश्रीवर आमंत्रित केलं… अभिषेकला जणू स्वर्ग गवसला!
आम्हाला बाळासाहेबांची जेमतेम दोन मिनिटे मिळतील असं वाटत असताना साहेबांनी बराच वेळ दिला. अभिषेकला खूप छान मार्गदर्शन केलं आणि हो त्यांच्या छायाचित्रकाराने आमच्या सगळ्यांची छायाचित्रं टिपली… ती छायाचित्रांची प्रâेम देखील आम्हाला त्यांच्याकडूनच भेट म्हणून लाभली. मी आणि माझ्या कुटुंबासाठी केवढे भाग्याचे, लाखमोलाचे क्षण होते ते… बाळासाहेबांच्या सहवासातील त्या मंतरलेल्या क्षणांचे गारुड आजही मन:पटलावरून दूर झाले नाही!
राम गोपाल वर्मा याने निर्मिती व दिग्दर्शन केलेल्या ‘सरकार’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला बाळासाहेब आमंत्रित होते. मी देखील या शोला उपस्थित होतो. शो संपल्यानंतर राम गोपाल वर्मा यांना आवर्जून माझ्याविषयी सांगत ते म्हणाले, ‘आप मिलिन्द को जानते हैं? बहुत अच्छा कलाकार है! आप इनको आपकी आनेवाली फिल्म में जरूर आजमाएं!’ इतका आपलेपणा- प्रेमअगत्य दाखवणारे बाळासाहेब माझ्यासाठी नेहमीच दैवत आहेत! पुढे मी यथावकाश रामूच्या फिल्ममध्ये काम केलं देखील… पण प्रत्येकवेळी बाळासाहेबांचं शब्द आठवत राहिलेत…
बाळासाहेबांसारखीच ऋजुता, माधुर्य असलेल्या त्यांच्या कुटुंबाकडूनही मला, माझ्या कुटुंबाला नेहमीच प्रेम, आदर मिळत आलाय… बाळासाहेबांची उणीव मला नेहमी जाणवते… पण त्यांची प्रेमळ छाया, आशीर्वाद आजही माझ्यासोबत आहेत, ही माझी भावना कायम राहील! त्यांच्या ऋणातून उतराई नाही होऊ शकणार!
शब्दांकन : पूजा सामंत
‘चंदेरी भटकंती’ या मिलिंद गुणाजी लिखित
पुस्तकाला बाळासाहेबांनी दिलेली प्रस्तावना
`गुणाजी’ आडनावाचा सन्मान!
मिलिंद गुणाजी या गारगोटीचा हिरा कधी झाला व त्याला किती पैलू आहेत हे त्याच्या `चंदेरी भटकंती’ या पुस्तकावरून नजर फिरवल्यावर दिसते. परंतु एकंदर हा हिरा नसून माणिकमोती आहे हे त्याच्या `चंदेरी भटकंती’ पुस्तकाचा शिंपला उघडल्यावर दिसून येते. बहुतेक मिलिंदचा जन्म `स्वाती’ नक्षत्रामध्ये झाला असावा असे वाटते. हा मिलिंग भटक्या समाजाचा नेता वाटतो. सतत भटकत असतो. देश आणि देशांतर करताना अनेक फुलांवर बसून तेथील अनुभवांचे मध तो चाखीत असतो आणि तो गोडवा सगळयांना वाटत असतो. या मिलिंदने `गुणाजी’ या आडनावाचा योग्य सन्मान केला आहे. या मिलिंदच्या भ्रमंतीचे वेड इतके जबरदस्त आहे की आज जर होनाजी बाळा हयात असते तर सांगा `मुकुंद’ कुणी हा पाहिला याऐवजी सांगा `मिलिंद’ कुणी हा पाहिला असे म्हटले असते!
त्याच्या आयुष्यातील चढउतार पाहताना त्याला डोंगदर्यांची चढउतार करण्याची सवय लागली. देशादेशांतील भ्रमंती करताना त्याचे जे अनुभव आहेत ते कुठल्याही विद्यार्थ्याला भूगोलाचे पुस्तकी ज्ञान होणार नाही तेवढे `चंदेरी भटकंती’ वाचल्यावर होते. महाराष्ट्रातील महान, सर्वश्रेष्ठ भूषण पु. ल. देशपांडे यांच्या `अपूर्वाई’ इतक्याच ताकदीने मिलिंद गुणाजीने आपल्या आयुष्यातील घडामोडींवर ही `अपूर्वाई’ अवर्णनीय केली आहे. मिलिंदकडे जबरदस्त भाषाशैली आहे. त्याच्या लेखणीत वाचकाला आकर्षित करण्याची ताकद आहे. काही पदार्थ असे असतात की, खाऊ लागलो की ते खाणे आवरणे कठीण होते. उदा. पुणेरी मिसळ, गिरगाव चौपाटी भेळ, पाणीपुरी, त्यावेळच्या तांब्यांच्या हॉटेलमधील थालीपीठ व डाळिंबी, छबिलदासच्या गल्लीतील कुलकर्णींची भजी, मामा काणेंचा बटाटेवडा, भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगा किंवा हिवाळ्यात शेतावर जाऊन त्या थंडीच्या गारव्यात शेकोटी पेटवून त्यावर भाजलेला हुरडा खाण्यात जी एक और मजा असते. तीच चव व चविष्टपणा या खवय्या `मिलिंद’च्या पुस्तकातून पानोपानी आढळतो. मिलिंद एक हुरहुन्नरी जवान आहे. त्याच्या आयुष्याच्या हिर्यााच्या कोणत्या पैलूबद्दल लिहावे व बोलावे हे कठीण आहे. आयुष्य कसे असावे व कसे जगावे हे मिलिंदच्या `चंदेरी भटकंती’ या पुस्तकावरून ज्याने त्याने समजावे. मिलिंद, नावाने तू जरी `मिलिंद’ असलास तरी खर्याखुर्या अर्थाने `गुणाजी’ आहेस. माझा तुझ्या भटकंतीला मन:पूर्वक आशीर्वाद. माझे हे आशीर्वाद गोव्याच्या `हुमण’इतकेच तुला चविष्ट लागतील. प्रत्येकाने हे `चंदेरी भटकंती’ वाचलेच पाहिजे ही आग्रहाची शिफारस.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
आपला नम्र
बाळ ठाकरे
(शिवसेना प्रमुख)