काहीच दिवसांपूर्वी दिव्याची अमावस्या होऊन गेली. पण लहानपणी ऐकलेल्या चातुर्मासाच्या कथा माझ्या फँटसीप्रेमी मनाला कायम लक्षात राहिलेल्या आहेत. मला ती दिव्याच्या अवसेची कथा अजूनही फार फार आठवते. रात्री गावातील सगळे दिवे एकत्र येऊन गप्पा मारत झाडावर बसतात, ते दिवे हा एक भारी विलक्षण कल्पनाविलास होता.
आषाढी अमावस्या गटारी अमावस्या म्हणून प्रसिद्ध होण्याआधी दिव्यांची अवस, दीप अमावस्या म्हणून अधिक प्रसिद्ध होती. आषाढातला धुवाधार पाऊस, भर दिवसा भरून आलेली काळोखी, सततचा अपुरा प्रकाश अशा वातावरणात दीपपूजन करण्याची, दिव्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा खरोखरच कौतुकास्पद आहे. विशेषतः विजेचे दिवे येण्याआधी या साध्या तेलातुपाच्या दिव्यांचं कौतुक तरी किती वाटत असेल.
घरोघरी दिव्यांची पूजा होत असे. अजूनही काहीजण करत असतात. त्या दिवशी नैवेद्य म्हणून गंमत म्हणजे कणकेचे किंवा बाजरीचे दिवे करून खायची पद्धत असते. मला हे खायचे दिवे अतिशय आवडतात. एकतर वर्षभरात एकच दिवस हे दिवे केले जातात आणि करायला सोपे असतात. हे दिवे बघायलाही सुंदर दिसतात.
दिव्यांच्या प्रति कृतज्ञता दाखवायला दिवे करून खायची ही कल्पना कुणाला सुचली असेल त्याला प्रणाम.
लहानपणी दिव्याच्या अवसेला घरी बाजरीचा रवा काढून दिवे केले जायचे. ते वाफवून मग गूळ घातलेल्या दुधात कुस्करून खायचे. हे कणकेचे दिवेही केले जात. कणकेचे दिवे तूप घालून खायचे असतात.
बाजरीचे दिवे करायचे म्हणजे जरा घोळाचं काम असतंय. कारण बाजरी धुवून वाळवा, रवा काढा, उकड काढून परत दिवे वाफवा वगैरे कष्ट. त्यापेक्षा हे कणकेचे दिवे सोपे असतात. बहुतेक दरवर्षी कणकेचे दिवे करतेच. लहानपणी खूप गंमत वाटायची दिवे खायला तितकी आता वाटत नाही. तरी काही गोष्टी आपण फक्त आठवणीसाठी करतो.
कणकेचे दिवे
साहित्य :
अर्धी वाटी गूळ, एक वाटी पाणी, एक वाटी कणीक, अर्धा चमचा रवा, पाव चमचा मीठ, तेल आवश्यकतेनुसार.
कृती :
१. एक वाटी पाणी कोमट करून घ्यायचं. त्यात अर्धी वाटी गूळ विरघळून घ्यायचा.
२. एक वाटी कणकेला पाव चमचा मीठ, अर्धा चमचा रवा आणि थोडं तेल चोळून घ्यायचं. गुळाचं पाणी हळुहळू घालून घट्ट कणीक भिजवून घ्यायची. तेलाचा हात लावून पंधरा मिनिटे ठेवायची.
३. नंतर कणकेचे छोटे छोटे दिवे करून इडलीपात्रात किंवा कुकरमधे वाफवून घ्यायचे.
४. साजूक तूप घालून गरमागरम खायचे.
बाजरीच्या पिठाचे गोड दिवे
पद्धत १ :
साहित्य :
बाजरीचं पीठ एक वाटी, गूळ बारीक चिरून पाऊण वाटी, तेल एक चमचा, चिमूटभर मीठ, दूध आवश्यकतेनुसार.
कृती :
प्रथम एका बाऊलमध्ये दूध सोडून इतर सर्व जिन्नस नीट मिक्स करून घ्यावेत. नंतर त्यात दूध मिसळून आपण पोळ्यांना भिजवतो तसे पीठ भिजवावे. नंतर त्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून त्यांना दिव्यांचा आकार द्यावा. चाळणीला तेलाचा हात लावून त्यात हे सर्व दिवे ठेवावेत आणि कुकरची शिट्टी काढून दहा ते पंधरा मिनिटं वाफवावेत.
बाजरीचे गोड दिवे तयार आहेत.
टिपा :
१. पीठ भिजवायला दूधच वापरावे. पाणी नको. दुधाने खुसखुशीत आणि हलके दिवे होतात. पीठ जुनं असेल, विरी गेलेली असेल तर दूध थोडं गरम करून घ्यावे. पण शक्यतोवर ताजं पीठ वापरावं.
२. दिवे करताना पिठाची लाटी अंगठ्याने दाबून तिला उभट खोलगट आकार द्यावा आणि मग त्याच आकारात मोठे करावेत म्हणजे दिवे सुंदर आकाराचे होतात. पसरट होत नाहीत.
३. हे दिवे छान खमंग लागतात. गूळ आणि बाजरीची एकत्रित चव फारच छान लागते.
४. खाताना ह्यावर तूप घेतले तर चव अजून खुलते.
५. ग्लुटेन फ्री डाएटसाठी हा पदार्थ चांगला ऑप्शन आहे.
पद्धत २
साहित्य :
बाजरीचा रवा दोन वाट्या, मीठ, तेल, पाणी, दूध पाव लिटर, गूळ चवीनुसार.
कृती :
१. बाजरी दोन दिवस आधी धुवून, वाळवून मिक्सरवर बाजरीचा रवा करून घ्यावा.
२. एका पातेल्यात दोन वाट्या पाणी उकळत ठेवावे. त्यात दोन चमचे तेल व अर्धा चमचा मीठ घालावे. तेवढाच म्हणजे दोन वाट्या बाजरीचा रवा घेऊन उकळलेल्या पाण्यात घालावा व त्याची चांगली उकड काढावी.
३. उकड तयार झाल्यावर ती परातीत तेलाच्या हाताने चांगली मळून घ्यावी. त्याचे छोटे गोळे करून दिव्यासारखा आकार द्यावा.
४. एका मोठ्या पातेल्यात पाणी ठेवून त्यावर चाळणीला तेल लावून ठेवावी. चाळणीवर हे दिवे पालथे ठेवून त्यावर झाकण ठेवावे. १५-२० मिनिटे वाफवून काढावेत किंवा मोदकपात्रात वाफवले तरी चालतील.
५. नंतर पाव लिटर गार दुधात चवीनुसार गूळ घालून विरघळून घ्यावा. (गरम दुधात गूळ घातल्यास दूध नासतं). त्याबरोबर हे दिवे खायला द्यावेत.
(लेखिकेला पारंपरिक अन्नपदार्थांविषयी उत्सुकता आहे आणि पाककलेत रुची आहे.)