“साहेब, माफ करा… चूक झाली माझी. मीच दारू प्यायला गेलो होतो जगन्याबरोबर… पण त्याचा खून मी नाही केलेला साहेब… खरंच नाही केलेला…!!’’ सख्या ओक्साबोक्शी रडायला लागला. जगन्याच्या मृत्यूचं त्याला खरंच वाईट वाटतंय की निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखा तो नाटक करतोय, हे कळायला मार्ग नव्हता.
—-
भूमकर वस्तीपासून लांब, एका मोकळ्या माळावरच्या झाडाखाली पार्टी रंगात आली होती. सख्या आणि जगन्या हे अनेक वर्षांचे जिगरी दोस्त दारू प्यायला बसले होते. हा दोघांचा नेहमीचा अड्डा होता. कधीतरी कामाचे जास्त पैसे मिळाले किंवा घरी काहीतरी आनंदाची गोष्ट घडली असेल, तर दोघं पार्टी ठरवायचे. आपापले खिसे उलटे करून जे पैसे जमतील, त्यातून दारू आणायचे आणि या झाडाखाली पीत बसायचे. आजही त्याच पद्धतीनं दोघांच्या गप्पांना ऊत आला होता. त्यातून वातावरणातली नशा आणि ते करीत असलेली नशा जास्त रंगत आणत होती.
“तुला सांगतो जग्या, आपल्या कामाला तोड नाही बघ. आपण ज्या कामाला हात लावू, ते पूर्ण केल्याबिगर आराम करतच नाही,’’ सख्या तोर्यात म्हणाला.
“अरे हट!! तुझ्या कामाचं कौतुक सांगू नकोस. मी ज्या घरातलं काम करतो ना, ती माणसं माझंच नाव सगळीकडे सुचवतात. म्हणूनच आज अॅडव्हान्समध्ये येवढे पैसे देऊन एका मोठ्या बंगल्याचं काम मिळालंय!’’ त्याच्यावर स्वत:चं कौतुक करत जगन्या म्हणाला.
एकूणच दोघं आपापल्या कामांच्या बाबतीत खुशीत होते. जगन्याला आज मोठ्या कामाची सुपारी मिळाली होती. त्यासाठीचे अॅडव्हान्स पैसेही तो घेऊन आला होता. आजची पार्टी त्याच्यातर्फेच होती.
“एक सांगू काय? आपल्या बायकांनी पण आपल्याला लई सपोर्ट केला राव. त्यांच्या मदतीशिवाय काही झालंच नसतं,’’ सख्या म्हणाला.
“सख्या, माझ्यापेक्षा तुझी बायको लई हुशार. दिसायला बी देखणी. खरं सांगू का, आता तुझी बायको हाय म्हणून जास्त काय बोलायचं नाही, बरोबर हाय, पण तिला बघितलं ना का चेहर्यावरनं नजर हटत नाही बघ,’’ जगन्या सांगायला लागला आणि सख्या अस्वस्थ झाला.
“आता जे हाय ते हाय. आपण जे मनात येईल ते बोलून टाकतो. माझी बायको बी तशी चांगली हाय दिसायला, पण तुझ्या बायकोची सर नाही तिला,’’ जगन्या बोलतच होता आणि सख्याची अस्वस्थता वाक्यागणिक वाढत होती.
“वहिनी म्हणून आदरच करतो आपण त्यांचा, पण त्यांनी निसतं नजर वर करून बघितलं, तरी असं वाटतं की…’’ जगन्या पुढे काही बोलणार, एवढ्यात खळ्ळकन काहीतरी फुटल्याचा आवाज झाला आणि जगन्या खाली कोसळला. एक किंकाळी रात्रीच्या अंधारावर भीतीचा भेसूर ओरखडा उमटवून गेली.
—–
पोलिसांना सकाळी वस्तीतल्या कुणाकडून तरी खबर मिळाली आणि इन्स्पेक्टर वाघमारे पथकासह घटनास्थळी पोहोचले. दारूच्या बाटल्या, चकण्याचे पदार्थ, डिश, असा सगळा पसारा पडलेला होता. जगन कामठेचा मृतदेह तिथेच बाजूला पडला होता. डोक्यातून वाहून गेलेल्या रक्ताचं थारोळंही दिसत होतं.
“सगळ्यात आधी कुणी बघितलं याला?’’ वाघमारेंनी तिथे जमलेल्या लोकांना बघून सवाल केला.
“मी बघितलं साहेब!’’ आत्माराम काडगे नावाचा एक माणूस पुढे आला. आपण सकाळी सायकलवरून चाललो असताना इथे अचानक नजर गेली आणि घाबरून पोलिसांना फोन केल्याची माहिती त्यानं दिली. वाघमारेंनी तिथे सापडलेल्या सगळ्या गोष्टींचा पंचनामा करायच्या सूचना केल्या. पोलिस पथक कामाला लागलं. फॉरेन्सिकची टीमही हजर होती, त्यांनी तिथे आणखी काही खुणा, पुरावे मिळतात का, याची तपासणी सुरू केली. जगन्याच्या डोक्यात घातलेल्या बाटलीचे अवशेष बाकी होतेच. त्याच्यावरचे ठसेही मिळण्यासारखे होते.
जगन इथे कुणाबरोबर यायचा, कुठल्या वेळी यायचा, वगैरे जुजबी प्रश्न विचारल्यानंतर तो नेहमीप्रमाणे सख्याबरोबर दारू प्यायला बसलेला असणार, याचा पोलिसांना अंदाज आला. सख्याचं घर भूमकर वस्तीतच होतं, ते शोधणं फारसं अवघड गेलं नाही. पोलिसांच्या भीतीने तो नातेवाइकांकडे जाऊन बसला होता. पोलिसांनी तिथे छापा घालून त्याला धरून आणलं.
“काय रे, का खून केलास मित्राचा?’’ पहिल्याच थेट सवालानं सख्या थरथरायला लागला.
“साहेब, मी… मी काय नाय केलेलं… खरं सांगतो साहेब… तुमची शप्पथ… काय नाय केलेलं मी…’’ तो गयावया करायला लागला.
“काही केलं नाहीस? मग जगन्याच्या डोक्यात घातलेल्या बाटलीवर तुझ्या बोटांचे ठसे कसे काय?’’ अजून ठशांचा रिपोर्टही आलेला नसताना वाघमारेंनी सरळ पोलिसी युक्ती वापरली.
“साहेब, माफ करा… चूक झाली माझी. मीच दारू प्यायला गेलो होतो जगन्याबरोबर…’’ सख्यानं लगेच सांगून टाकलं. “पण त्याचा खून मी नाही केलेला साहेब… खरंच नाही केलेला…!!’’ सख्या ओक्साबोक्शी रडायला लागला. जगन्याच्या मृत्यूचं त्याला खरंच वाईट वाटतंय की निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखा तो नाटक करतोय, हे काही कळायला मार्ग नव्हता.
“शिंदे, मला वाटतं सख्यानं काही केलेलं नाहीये,’’ सख्याला कोठडीत टाकल्यानंतर वाघमारे त्यांच्या सहकार्याशी बोलताना म्हणाले.
“सर…? ते दोघंच दारू प्यायला बसले होते. त्यानं स्वतः कबूल केलंय. तरीही तुम्ही असं कसं म्हणताय?’’ सबइन्स्पेक्टर शिंदेंना थोडं आश्चर्य वाटलं.
“हा सख्या फक्त घाबरून लपून बसला होता. जगन्या त्याचा जिगरी दोस्त होता. एवढ्या वर्षांत त्यांचं कधी भांडण झालं नव्हतं. आता रात्री दारूच्या नशेत दोघं भांडले असतील, पण त्यावरून कुणाचा खून करण्याएवढं धाडस सख्यामध्ये नाही. दारूच्या नशेत का होईना, एखाद्याचा खून करण्यापर्यंत त्याची मजल जाईल, असं वाटत नाही,’’ वाघमारेंनी स्पष्ट करून टाकलं.
दुसर्या दिवशी पोस्ट मार्टेमचा रिपोर्ट आला, डोक्यात वर्मी घाव बसून मृत्यू हे कारण लिहिलं होतं. त्याचबरोबर बाटलीवर मात्र सख्याबरोबरच आणखी कुणाचेतरी ठसे आढळून आले होते आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, हल्ला करणारा माणूस डावखुरा होता, हे जखमांवरून स्पष्ट होत होतं. याचा अर्थ, या दोघांबरोबर आणखी तिसरा कुणीतरी माणूस त्याच वेळी तिथे होता. आता त्याला शोधून काढणं, हे पोलिसांचं खरं कसब होतं.
सख्याला विचारल्यावर तो गोंधळूनच गेला, “तिसरा? नाही साहेब. तिसरा माणूस असता, तर मला दिसला असता,’’ सख्या म्हणाला.
“वेगळं काही दिसण्याच्या अवस्थेत तरी होतात का तुम्ही?’’ वाघमारेंनी दरडावून विचारलं, तसा सख्या खजील झाला. आपल्या समोरच आपल्या जिगरी दोस्ताचा मृत्यू झाला आणि आपण त्याला वाचवूही शकलो नाही, ही खंत सख्याचं मन खात होती.
जगन कामठेचं वस्तीत कुणाशी वैर होतं का, याची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली. ज्या अड्ड्यावरून ते नेहमी दारू आणायचे, त्याचा मालक भिवाजी सोलकर याच्याशी एकदा जगनचं भांडण झाल्याचं पोलिसांना समजलं. सुट्ट्या पैशांवरून काहीतरी वाद झाला होता आणि तो अगदी हमरीतुमरीवर आला होता. वाघमारेंनी मालकाला चौकशीसाठी पोलिस स्टेशनवर बोलावून घेतलं.
“साहेब, जगन्या आणि सख्या, दोघंही नेहमी अड्ड्यावर यायचे. कधी तिथेच बसायचे, कधी बाटल्या घेऊन त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी बसायला जायचे. काल पण ते तिकडेच गेले होते,’’ काही आढेवेढे न घेता सोलकरनं सांगून टाकलं. ते दोघं कुठे बसतात, कुठली दारू पितात, किती तर्रर्र होतात, हे माहीत असणारा फक्त तो एकटाच होता. त्यामुळे घटनास्थळी हजर असलेला तो तिसरा माणूस हा सोलकरच असण्याची शक्यता होती. जगन्याच्या खुनाचं कारण काय असेल, ते मात्र पोलिसांच्या लक्षात येत नव्हतं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली, पण त्यातून फारसं काही हाती लागलं नाही. बाटलीवर त्याच्या बोटांचे ठसे होते, पण बाटली त्याच्याकडचीच म्हटल्यावर त्यात धक्कादायक वाटण्यासारखं काहीही नव्हतं. मुख्य म्हणजे तो डावखुरा नव्हता.
“जगनबद्दल गेल्या काही दिवसांत काही वेगळं जाणवलं होतं?’’ वाघमारेंनी जगनच्या बायकोला, स्वातीला विचारलं. तिला तर काय बोलावं, काही कळत नव्हतं. ती नुसती रडत राहिली. वाघमारेंनी मग एका लेडी सबइस्पेक्टरला ही जबाबदारी दिली. तिच्याकडून जगन्याच्या वागण्याबोलण्याबद्दल सगळी माहिती काढली गेली, पण त्यातूनही नवीन काही सापडलं नाही. जगन्या आणि सख्या एकत्र असताना कुणी तिसर्यानं येऊन खून केला असेल, हे जरा विश्वास ठेवण्याच्या पलीकडचंच होतं. फिरून फिरून सख्यावरच संशय जात होता, तसे पुरावेही उभे करता आले असते, पण वाघमारेंना मनातून ते काही पटत नव्हतं. आपलं अपयश झाकण्यासाठी संशयिताला गुन्हेगार ठरवणं हे त्यांना मान्य नव्हतं. नाही म्हणायला एक कारण होतं, जगन्याचं सख्याच्या बायकोबद्दल असलेलं आकर्षण. जगन्या येता जाता तिच्यावर लक्ष ठेवायचा, तिच्याशी बोलायची संधी साधायचा, हेही पोलिसांना वस्तीत चौकशी केल्यावर समजलं होतं. त्या रागातून खरंच सख्यानं त्याचा खून केला असेल का, या एका प्रश्नाची उकल व्हायची होती.
बायको, एक मुलगा, एक मुलगी, असं छोटं आणि सुखी कुटुंब होतं जगन्याचं. पण आता कुटुंबाच्या सुखालाच दृष्ट लागल्यासारखी झाली होती. महिन्याचं भागून थोडे पैसे साठवता येतील, एवढी कमाई जगन्या करत होता. पण त्याचं काम होतं कंत्राटावर आधारित. जेवढी कंत्राटं, तेवढे पैसे. आता तोच गेल्यावर घरात पैसे कुठून येणार? भूमकर वस्तीत चौकशी करून जगन्याची बायको स्वाती, मुलं, त्यांचं कुटुंब यांच्याबद्दल जी काही माहिती मिळेल, ती पोलिसांनी जमवली.
यातली एक माहिती नवीन आणि इंटरेस्टिंग होती. ती ऐकून वाघमारेंचे डोळे चमकले.
“शिंदे, आता सांगतो तसं करा. हा धागा आपल्याला हातातून जाऊ द्यायचा नाहीये.’’ त्यांनी धडाधड सगळ्या टीमला सूचना केल्या. जगन्याशी संबंधित सगळ्यांचे फोन कॉल रेकॉर्ड्सही मागवून घेतले. एका कॉल रेकॉर्डवर नजर गेल्यावर त्यांच्या मनातला संशय आणखी बळकट झाला.
“शिंदे, आपल्याला पुन्हा एकदा गुन्हा घडला त्या ठिकाणी जायला पाहिजे,’’ त्यांनी सूचना केली आणि घटनास्थळी जाऊ सगळी शोधाशोध केली. गळ्यातली एक सोन्याची चेन त्यांना मिळाली. हा महत्त्वाचा पुरावा होता.
इकडे पोलिसांचं पथक त्यांच्या सूचनेप्रमाणे सगळीकडे लक्ष ठेवून होती. दोनच दिवसांनी त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. एका पथकानं काशीनाथ सावळे नावाच्या एका, खाजगी सावकारीचा धंदा करणार्या टग्या माणसाला उचलून आणलं.
“साहेब, हा वस्तीमध्ये सावकारीचा आणि त्याचबरोबर अमली पदार्थ विकायचा धंदा करतो,’’ शिंदे म्हणाले. त्याला थोडा पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यानं कुणाकुणाला किती दराने व्याज देतो, किती आणि कुठे अमली पदार्थ सप्लाय करतो, हे सगळं सांगितलं. छोटा माणूस आहे, जाऊ द्या, वगैरे गयावयाही करायचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेतलं आणि त्याच्या मदतीनं एक सापळा रचला.
सावळेच्या जुगाराच्या अड्ड्यावरच हे सगळे धंदे चालायचे. त्या दिवशी संध्याकाळी त्याच्या अड्ड्यावर एक नेहमीचा चेहरा आला.
“आज पाच हजारावर खेळणारेय आपण. आधीचे सगळे दहा हजार पण भरून टाकलेत. आज आपल्याला काय बोलायचं नाही… काय?’’ तो चेहरा म्हणाला. नेहमीच्या टेबलवर तो बसणार, एवढ्यात त्याची मान कुणीतरी घट्ट पकडली.
“नितीन जगन कामठे! चला, खेळ संपलाय तुझा!’’ ते शिंदे होते. जगनच्या मुलाला त्यांनी बरोबर पकडीत धरला होता. विनवण्या करत, आपण लहान आहोत वगैरे काहीतरी सबबी सांगायचा प्रयत्न त्याने केला, पण पोलिसांनी ऐकून घेतलं नाही.
“बापाचा खून तूच केलास ना? सगळं समजलंय आम्हाला. का केलास, तेवढं सांग. त्याच्याशी काही वैर होतं की आणखी काही?’’ वाघमारेंनी असा थेट सवाल केल्यावर नितीनचं सगळं अवसान गळून पडलं. त्यानं सरळ गुन्ह्याची कबुली देऊन टाकली.
“बापाकडं लई पैसा होता साहेब, पण तो मला कधी द्यायचा नाही. कायम त्याच्याकडे हात पसरायला लागायचे,’’ नितीन रागारागानंच सांगायला लागला.
“पैसे कशासाठी हवे होते तुला? नशा करायला, जुगार खेळायलाच ना?’’ वाघमारेंनी दरडावून विचारलं, तसा नितीन गप्प झाला.
“जुगाराच्या अड्ड्यावर लई उधारी झाली होती. नशा करायला बी पैसे कमी पडत होते. त्या दिवशी बापाला भरपूर पैसे मिळालेत, हे कळलं होतं. त्याच्या दारू प्यायच्या अड्ड्यावर जाऊन पैसे हिसकावून घ्यायचे, असं ठरवलं होतं. पण नंतर बाप बेदम मारेल, असं वाटलं. त्याच धुंदीत त्याच्या डोक्यात बाटली घातली. सख्याकाका बरोबर होता तो पळून गेला आणि मी बापाकडचे सगळे पैसे काढून घेतले.’’ नितीनने आता काय घडलं ते सांगितलं.
“फक्त नशेसाठी आणि जुगारासाठी बापाचा खून केलास तू. त्याला तसाच सोडून निघून आलास… पोरगा नाही, वैरी आहेस वैरी!’’ वाघमारेंनी त्याला सुनावलं. नशा माणसाला कुठल्या थराला नेऊ शकते, या विचारानं त्यांनाही काही काळ सुन्न वाटायला लागलं.
(लेखक मालिका व चित्रपट क्षेत्रात नामवंत संवादलेखक आहेत)