अभिनय, दिग्दर्शन एका बाजूला सुरू असताना आज अभिराम भडकमकर या लेखकाकडे नाटक सिनेमा, संवाद, कादंबर्या या सर्व माध्यमात प्रचंड मागणी आहे. शिवाय वेगवेगळ्या सेमिनार, संमेलनांमध्ये वक्त्यापासून अध्यक्षपदांपर्यंतही आमंत्रणे आहेत. देवधर्मांच्या कर्मकांडांमध्ये न अडकणारा, वरवर नास्तिक वाटणारा अभिराम त्याच्या आई वडिलांप्रमाणेच परमेश्वराचे अस्तित्व मानतो असे दिसते. म्हणूनच त्याच्याकडून ‘सुखांशी भंडातो आम्ही ‘देहभान’ अशी मानवी मूल्यांवरची चर्चात्मक नाटके लिहून होतात.
– – –
चौपाटीवरच्या बिर्ला क्रीडा केंद्रात तेव्हा नाटकाच्या रिहर्सल व्हायच्या, स्पर्धा व्हायच्या, प्रयोग व्हायचे. क्रीडा केंद्र असले तरी तिथल्या रंगमंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात व्हायचे, आणि तिथून काही अंतरावर असलेल्या साहित्य संघ मंदिराला पर्याय म्हणूनही ते नाट्यगृह उपयोगात होते. अशा नाट्यगृहात हिंदी, मराठी, गुजराती नाट्यप्रयोग व्हायचे. तिथेच ‘पाहुणा’ (१९९२) या नवीन मराठी नाटकाची एक रिहर्सल होती, प्रयोगाला आठेक दिवस बाकी होते, त्यामुळे नाटक बर्यापैकी बसले होते. त्याचे दिग्दर्शन करीत होता अरुण नलावडे आणि प्रमुख भूमिका होत्या प्रशांत दामले, उषा नाडकर्णी, अरुण नलावडे, सोनिया मुळये, किशोर नांदलसकर, हेमंत भालेकर यांच्या. निर्माता दिलीप जाधव होता, तर लेखक होता अभिराम भडकमकर. आणि नाटकाचं संगीत मी करणार होतो.
रिहर्सलसाठी मी बिर्ला क्रीडा केंद्रला गेलो, तिथे नाटकाची रिहर्सल बघून लेखकालाही भेटता येईल म्हणून मी दिलीप जाधवला कळवले. रिहर्सलला जाऊन बराच वेळ झाला. तयारी सुरू होती… अजून लेखक कसा आला नाही म्हणून मी दिलीपला विचारले, तर दोन खुर्च्या सोडून बसलेल्या एका पोरगेल्याशा मुलाकडे पाहून दिलीप म्हणाला, ‘हा काय.. अभिराम भडकमकर ..’ असं म्हणून दिलीपने त्या मुलाशी ओळख करून दिली. मी आश्चर्यचकित झालो, नाटकाचे स्क्रिप्ट वाचले होते, नाटकाची बांधणी अत्यंत बांधेसूद होती. एक नायक, मुंबईत गायनकलेच्या व्यावसायिक शक्यता अजमवायला आलेला असतो, पेईंग गेस्ट म्हणून एका वृद्धेकडे राहात असतो. या एवढ्या अवाढव्य मुंबईत येऊन आपल्या गायनकलेला तो कशाप्रकारे लोकांसमोर आणतो याचा संघर्ष या नाटकात होता. शिवाय त्या अत्यंत फटकळ पण तितक्याच मायाळू स्वभावाच्या म्हातारीबरोबर नायकाचे जुळून आलेले ऋणानुबंध, त्या अथक संघर्षानंतरही कशात गुंतून न राहता, ’मी मुक्कामाच्या ठिकाणी न पोहोचता, प्रवासाचा आनंद घ्यायला निघालोय,’ असे विधान करणारा मनस्वी नायक, या विषयावरचे हे नाटक एखाद्या प्रथितयश नाटकाकाराच्या कुवतीने लिहिले होते. त्याआधी ज्यातून अशोक सराफ यांनी अनेक वर्षानी मराठी रंगभूमीवर पुनरागमन केले होते, असे ‘हसत खेळत’ हे एक विनोदी नाटक याच लेखकाच्या नावावर होते. अशा लेखकाचे भारदस्त आणि वयस्कर रूप माझ्या डोळ्यासमोर होते. पण अभिराम भडकमकर नामक या लेखकाचे, नुकतेच मिसरूड फुटल्यासारखे अत्यंत तरुण आणि कोवळे रूप बघून मी खरंच आश्चर्यचकित झालो. नमस्कार चमत्कार झाल्यावर माझ्या लक्षात आले की हा मुलगा अत्यंत मोजके आणि नेमके बोलतो, उगाच बोलण्यात फापटपसारा नाही. माझ्या ज्येष्ठ असण्याचा त्याने मोजक्या आणि नेमक्या शब्दांत सन्मान केला आणि मी संगीत करतोय याचा आनंद व्यक्त केला. कारण त्याने माझी आधीची नाटकं आणि त्यातलं संगीत अनुभवलं होतं. त्या नाटकात एक दोन गाणी होती आणि बाकी पार्श्वसंगीत. ‘अक्का अक्का मला बसलाय धक्का, गाणं म्हणण्यासाठी मला मिळतोय पैका,’ हे धमाल गाणे मी स्वरबद्ध केले होते. प्रशांत दामले ते गाणे म्हणतो आणि त्याला नृत्यातून साथ द्यायचे अरुण नलावडे आणि सोनिया मुळ्ये (आताची परचुरे). एक अतिशय ताकदीचं नाटक लिहिणार्या अभिरामच्या लेखणीच्या मी प्रेमात पडलो. त्यावेळी हिट्ट झालेले नाटक आजही यूट्यूबवर मूळ संचात उपलब्ध आहे. अगदी त्यातल्या गाण्यांसह.
मितभाषी स्वभाव, चमकदार बोलकी नजर आणि मिश्किल शेरेबाजी एवढी गोष्टींवर अभिरामची कोणाबरोबरही दोस्ती होऊ शकते. तिथे मग वयाची मर्यादा नसते. त्याच्या शरीरयष्टीमुळे तो तरूणांना आपला वाटतो आणि लिखाणातल्या परिपक्वतेमुळे ज्येष्ठांना जवळचा वाटतो. एनएसडीचा स्नातक असलेला अभिराम तिथून खास अभिनय, दिग्दर्शन यात पदविका घेऊन आला होता. संपूर्ण नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतल्याने त्याच्या लिखाणात आलेला बांधेसूदपणा त्याच्या आधीच्या नाटकांत दिसत होता. मध्यंतरी काही हिन्दी मराठी नाटकं त्याने लिहिली, त्यातले ‘लडी नजरीया’ हे हिन्दी नाटक वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केले तर ‘देहभान’ हे नाटक कुमार सोहोनीने दिग्दर्शित केले.
कोल्हापूरात शालेय शिक्षण आणि पुण्यात महाविद्यालयीन आणि दिल्लीत एनएसडीमध्ये नाट्यशिक्षण घेतलेल्या अभिरामला नाटककार म्हणून बस्तान बसवायला वेळ नाही लागला. त्याची एकामागोमाग एक नाटके येतच गेली, कधी प्रायोगिक तर कधी व्यावसायिक. आणि मधल्या काळात नाटकांबरोबर हिन्दी/ मराठी मालिकांचेही अभिरामने लिखाण केले.
याच काळात मी एन. चंद्रा यांच्या आगामी मराठी सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी करार करायला अंधेरीच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. हा मराठी चित्रपट एका तेलगू चित्रपटावर आधारित होता. आधारित म्हणण्यापेक्षा आताच्या भाषेत त्याचा रिमेक करायचा होता. माझा ‘हमाल दे धमाल’ चित्रपट पाहून प्रचंड खूश झालेल्या एन. चंद्रांनी, त्यांच्या बॅनरचा पहिला मराठी चित्रपट मी दिग्दर्शित करावा यासाठी आठ दिवस आधीच फोन केला होता. त्यात माझ्या पटकथा-संवादांचे आणि दिग्दर्शनाचे त्यांनी अमाप कौतुक केले, त्यामुळे या चित्रपटाच्या रिमेकची संपूर्ण जबाबदारी ते माझ्यावर टाकतात की काय असे मला वाटले. त्या ऑफिसमध्येच त्यांचा स्टुडिओ होता, तिथे आम्ही एकत्रच तो तेलगू चित्रपट पहिला, ज्याचं नाव होतं ‘पेडडारीकम’. सिनेमा संपल्यावर चंद्राजी म्हणाले, पुरुषोत्तम, हमाल दे धमाल तू छान लिहिलायस, प्रश्नच नाही, पण या चित्रपटाच्या मराठीकरणाची आणि पटकथा-संवाद लिहिण्याची जबाबदारी मी अभिराम भडकमकर या नव्या लेखकाला द्यायची ठरवले आहे, मी त्याचं ‘हसत खेळत’ हे नाटक आणि काही मालिका पाहिल्यात, धमाल आहेत, तुला काय वाटतं?
‘खरे तर माझ्यावर लिखाणाची जबाबदारी नसेल, तर मला नेहमीच आनंद होतो. आणि त्यात अभिराम लिहितोय म्हटल्यावर मी खूशच झालो. ‘परवा मी त्याला बोलावले आहे, तुम्ही एकत्र बसा आणि एकूण चर्चा करून मराठी रिमेक मराठी वातावरणात कसा होईल ते बघा.’
आणि पुनः एकदा माझ्या आणि अभिरामच्या भेटी सुरू झाल्या. आमच्या या पटकथेच्या टीममध्ये तत्कालीन चित्रपट समीक्षक आणि आताचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट फेस्टिव्हल डायरेक्टर अशोक राणे हेही होते. एन. चंद्रा यांची खास परवानगी घेऊन अशोकने संपूर्ण चित्रपट लिखाण ते शूटिंग माझ्याबरोबर अटेंड केलं आणि एका चित्रपटनिर्मितीचा अनुभव घेतला. अभिरामचा हा पहिलाच चित्रपट होता. पटकथा-संवादलेखक म्हणून त्याचा कस लागणार होता, कारण आंध्र प्रदेशातील काही सांस्कृतिक परंपराही त्या चित्रपटात होत्या. त्यामुळे नुसते भाषांतर नव्हे तर वातावरणही वेगळे उभे करावे लागत होते.
अभिरामने पहिला सीन, एक उदाहरण म्हणून लिहिला, तो इतका बेमालूम होता की मूळ चित्रपटाचे ते भाषांतर न वाटता रूपांतर वाटत होते. त्यावरून पुढील चर्चांमधून तयार होणारा चित्रपट चांगला आकार घेईल याची खात्री पटली. या चित्रपटाचे नाव होते ‘घायाळ’. तो मूळ चित्रपटही ‘गॉडफादर’ या मल्याळम चित्रपटावरून घेतला होता. गावातील दोन प्रतिष्ठित घराण्यांचे आपसातील वितुष्ट. त्यातली एक कुटुंबप्रमुख स्त्री असते, दुसरा पुरुष. असा संघर्ष. मल्याळम आणि तेलगू हे दोन्ही दाक्षिणात्य बाजाचे चित्रपट असूनही तिथल्या मोठ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केल्यामुळे दर्जेदार आणि व्यावसायिकदृष्टया प्रचंड यशस्वीही होते. पण दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटसंस्कृती एकदम वेगळी असल्यामुळे त्याचा बाज मराठीत बदलत होता आणि तो सांस्कृतिक बदल असावा असे मला नेटाने वाटत होते. तेच नेमकेपणाने अभिरामने त्या संवादातून लिहून दाखवले. मराठी चित्रपटाची मल्टीस्टारर निर्मिती होती ती. नायक अजिंक्य देव तर नायिका म्हणून नवा चेहरा कविता लाड. एका बाजूला मधुकर तोरडमल, आणि त्यांच्या मुलांच्या भूमिकेत, शिवाजी साटम, अशोक सराफ, राज केतकर आणि अजिंक्य देव… तर दुसरीकडे पद्मा चव्हाण आणि त्यांची मुले, सुनील शेंडे, आनंद अभ्यंकर, अभय जोशी आणि जॉनी लिव्हरसह नातीच्या भूमिकेत कविता लाड. अशी तगडी स्टारकास्ट. ‘घायाळ’च्या पटकथालेखनाच्या वेळीच नेमकी मुंबईत दंगल उसळली आणि आम्ही रोज विविध ठिकाणी भेटून ते स्क्रिप्ट पूर्ण केले.
या दरम्यान स्क्रिप्टव्यतिरिक्त अनेक विषयांवर मतमतांतरे झाली. अभिरामची राजकीय मते ठाम आहेत. आस्तिक आणि नास्तिक या विषयावरही त्याला सतत काहीतरी म्हणायचं असतं. या दोन्ही विषयांवर त्याचं बोलण ठाम असतं. विशेषत: राजकीय धारणा. त्यामुळे पुढे जेव्हा ‘जाऊबाई जोरात’ नाटक जेव्हा माझ्या डोक्यात घुमू लागले तेव्हा मी अभिरामला ते नाटक लिहिण्याची विनंती केली. विनंतीपेक्षा साईनच केले म्हणा ना. पण मी दिलेला चेक बरेच दिवस त्याने बँकेत टाकलाच नाही. म्हणून एके दिवशी विचारले, तर त्याने स्पष्ट सांगितले की ‘मला बहुतेक जमणार नाही. मी मला सुचलेल्या विषयांवर नाटके लिहिणे जास्त सोयीचे आणि योग्य समजतो.’ कोणताही आग्रह न धरता मी त्याचे विचार मान्य केले आणि तो प्रस्ताव बाजूला ठेऊन अखेर मीच ते नाटक लिहिले.
मात्र दुसरा जो विषय होता, आस्तिक नास्तिकतेचा, त्याविषयी बोलायचे ठरवले आणि एके दिवशी ‘ज्याचा त्याचा प्रश्न‘ हे नाटक त्याने लिहिलेलं रंगभूमीवर आले. त्याचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णीने केले आणि वंदना गुप्ते, गिरीश ओक, डॉ. शरद भुताडिया यांच्या अत्यंत दमदार भूमिका त्यात होत्या. आस्तिक आणि नास्तिकतेचे द्वंद्व या नाटकात अत्यंत नाट्यपूर्ण रीतीने दाखवले होते. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत पतीपत्नीमधली ओढाताण आणि आता लेखक कोणाच्या बाजूने झुकून नाटक संपवतो, अशी उत्सुकता असताना अत्यंत संयमी शेवट दाखवण्यात अभिराम यशस्वी झाला होता. उत्तम लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन यामुळे नाटक अंगावर येत असे. आणि देवाच्या अस्तित्वावर आणि त्यामुळे येणार्या मर्यादा आणि आस्तिकतेमुळे येणारी निष्क्रियता, नािस्तकतेमुळे येणारे एकाकीपण यावर पुढे कधी अभिराम नाटक लिहील असे वाटले नव्हते. पण ते त्याने उत्तम लिहिले. नेमका त्या वर्षी मी नाट्यदर्पणसाठी परीक्षक होतो. आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ हे अभिरामचे नाटक आणि ‘जावई माझा भला’ हे रत्नाकर मतकरींचे नाटक यांच्या खूप मोठी चुरस होती. ‘जावई माझा भला’ हे नाटक विजय केंकरेने दिग्दर्शित केले होते. पण ‘ज्याचा त्याचा प्रश्न’चा विषय या नाटकाला प्रथम पुरस्कार देऊन गेला. त्यावेळी आम्हा परीक्षकांमध्ये झालेला वाद हा नाटकातल्या आस्तिक आणि नास्तिक वादापेक्षा भयंकर होता. पण आम्ही तरीही तो वाद त्याच पातळीवर करून निकाल लावला.
कोल्हटकर, कालेलकर यांची आखीव रेखीव कौटुंबिक जिव्हाळ्याची नाटके मागे पडली आणि कानेटकर, दळवी, मतकरी, पाटोळे यांच्या नाटकांनी व्यावसायिक रंगभूमी व्यापली. त्यानंतर पुढच्या पिढीतले नाटककार प्रशांत दळवी, अजित दळवी, अभिराम भडकमकर, गिरीश जोशी, प्र. ल. मयेकर आणि जयंत पवार या नाटकाकारांच्या नाटकातून वैविध्यपूर्ण विषय नाटकात आल आणि व्यावसायिक रंगभूमीवर लेखनातून विविध विषयांचे प्रयोग होऊ लागले. विशेषत: आधीच्या लेखकांच्या नाटकात सामाजिक आशय आला तरी चर्चात्मकता विशेष नसायची, नाट्यपूर्ण घटनांनी नाटक पुढे जायचे. मात्र या नव्या लेखकांनी वेगळे विषय नाट्यपूर्ण पद्धतीने हाताळत त्यात त्यासंबंधी आवश्यक असलेल्या चर्चा डावलल्या नाहीत आणि रासिकांनीही त्या उचलून धरल्या. पुढे हे सर्व लेखक माध्यमाच्या बंधनात न अडकता, मालिका, सिनेमा या क्षेत्रातही लेखनकौशल्यामुळे कुठे कमी पडले नाहीत.
अभिराम तर एनएसडीमधून आलेला. केवळ सिनेमे लिहीत न बसता त्याने त्यात भूमिकाही करायला सुरुवात केली आणि केवळ भूमिकाच न करता पुढे दिग्दर्शन क्षेत्रातही उतरला आणि ‘आम्ही असू लाडके’सारखा अत्यंत संवेदनशील असा चित्रपट करून मतिमंद मुलांच्या केविलवाण्या जगण्यातून अर्थ शोधून काढून त्यांच्यातल्या आत्मसन्मानाची त्यानं जाणीव करून दिली. सिनेमातली ही अभिरामची मोठी कामगिरी.
लेखनाची कामे एवढी वाढली की अभिरामाला ज्याचं सर्वात जास्त आकर्षण होतं त्यातला अभिनय करणं हे मागे पडत चाललं होत. म्हणून मग त्यानंतर अभिरामने लेखनासाठी विचारले असता ‘अट’ घालायला सुरुवात केली. ती अट होती, ‘त्यातली एक भूमिका मी करणार’. ह्या अटीमुळे अनेक निर्माते दिग्दर्शक बुचकळ्यात पडले. एक दिग्दर्शक म्हणून मी त्याच्याशी वाद घातला की बाबा, भूमिकांसाठी नट निवडणे हा सर्वस्वी दिग्दर्शकांचा हक्क आहे. त्यावर तू गदा नको आणूस, पण त्याने ऐकले नाही. त्याच्या या अटीमुळे कामांचा ओघ कमी झाला, तरी बंद नाही झाला. मात्र त्याच्या या धोरणाची त्याच्यावर खाजगीत टीका होऊ लागली, पण त्याचे सिनेमे येतच गेले. कारण त्याच्यातला विनोदी किंवा संवेदनशील लेखक हवाहवासा वाटत असे. महेश कोठारेच्या ‘पछाडलेला’ या चित्रपटात तर तीन महत्वाच्या भूमिकेतली एक अभिरामने केली होती. पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर यांच्याप्रमाणे स्वत: लिहिलेल्या चित्रपटात काम करणारा अभिराम भडकमकर हा अलिकडच्या पिढीतला एकमेव लेखक म्हणायला हरकत नाही.
ही अट त्याने ‘बालगंधर्व’ या चित्रपटात मात्र ठेवली नाही. कारण काय असे विचारले तर ‘विषय’.. एवढं एकच उत्तर त्याने दिले. या चित्रपटाच्या विषयाने अभिरामला खरोखरच झपाटले होते. प्रचंड संशोधन करून त्याने तो चित्रपट लिहिला आणि तो अतिशय सुंदरही लिहिला. एका समृद्ध नटाची शोकांतिका उभी करायची होती, तीही अशा नटाची जो अनेकांचे श्रद्धास्थान आहे, अनेकांचे प्रेरणास्थान आहे. या चित्रपट लिखाणाच्या संशोधनातून अभिरामला एक नवा फॉर्म सापडला, तो म्हणजे कादंबरीचा. आणि त्याला नवे क्षेत्र खुणावू लागले. नाटक-सिनेमा म्हणजे निर्माता-दिग्दर्शक आलेच, तसेच कादंबरी म्हणजे प्रकाशक आणि प्रकाशन संस्था आलीच. अभिराममध्ये कादंबरी लिहिण्याचा गुणधर्म सहजासहजी आलेला नाही, त्याला कदाचित शालेय जीवनातच त्याचे बाळकडू मिळाले असावे.
अभिरामला अभिनयाच्या आवडीने जरी लहानपणापासून या क्षेत्राचे आकर्षण असले तरी तो कोल्हापुरात ज्या शाळेत शिकला त्या शाळेचे अध्यक्ष वि. स. खांडेकर होते आणि खांडेकरांची मुलगी मंदाकिनी खांडेकर या त्याच्या शिक्षिका होत्या. शिवाय ज्येष्ठ साहित्यिक ग. प्र. प्रधान यांच्या भगिनीही त्या शाळेत शिक्षिका होत्या, त्यामुळे त्या शाळेचे सांस्कृतिक वातावरण आपोआपच वाचन आणि लेखनाकडे कल घेणारे होते. त्यामुळे अभिरामला वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली आणि त्याच्यातल्या लेखनगुणांची चाहूलही अर्थातच या शिक्षिकांनाही लागली. शालेय जीवनातच अभिराम काही काही लिहू लागला. सहावी आणि सातवीत असताना त्याने कथा लिहायला सुरुवात केली आणि तो शाळेतल्या या शिक्षिकांच्या लक्षात येऊ लागला. बारावीपर्यंतचे त्याचे शिक्षण कोल्हापूरच्या याच शाळेत झाले. नंतर नोकरीच्या निमित्ताने कोल्हापुरात पुण्याहून स्थलांतरित झालेले अभिरामचे वडील पुनः बदली होऊन सहकुटुंब पुण्यात आले. पुण्यात त्याच्या लेखनाच्या कक्षा वाढल्या आणि ’पुरुषोत्तम करंडक स्पर्धे’त खास विद्यार्थ्यांसाठी असलेला एकांकिका लेखनाचा पुरस्कार अभिरामला मिळाला आणि तिथून खरी त्याच्या लेखन कारकीर्दीला सुरुवात झाली. पुण्यातच ‘ड्रॉपर्स’ या प्रायोगिक नाट्यसंस्थेत अभिराम दाखल झाला, तिथे सुहास कुलकर्णी, सुधीर मुंगी आदी रंगकर्मींची साथ लाभली आणि नाट्यविषयक शिक्षण घेण्याची उत्सुकताही निर्माण झाली. तिथूनच प्रेरणा मिळून अभिरामने दिल्लीला एनएसडीमध्ये प्रवेश घेतला आणि तो नाटकाकडे गांभीर्याने पाहू लागला. एनएसडीमध्ये बी. व्ही. कारंथ यांच्या सहवासात नाट्यविषयक समृद्धी आणि मार्गदर्शन लाभले, ते अत्यंत मोलाचे ठरले. अभिरामवर चेकोव्ह, बी. व्ही. कारंथ, पु. ल. देशपांडे, जी. ए. कुलकर्णी यांचा प्रभाव असला तरी त्याच्या लेखनशैलीवर यापैकी कोणाचाच प्रभाव नाही. सर्व त्याच्यासाठी प्रेरणादायीच ठरले.
पहिला ब्रेक
एनएसडीहून शिक्षण पूर्ण करून आल्यावर अभिराम तडक मुंबईत आला. कारण मनोरंजन कलाक्षेत्रात पुढे जायचं असेल तर मुंबईशिवाय पर्याय नव्हता. अनेक ओळखी इथे त्याला उपयोगी पडल्या आणि अभिनयाची कामे मिळू लागली. हिन्दी, मराठी मालिकांमध्ये लेखन करता करता त्याला अभिनयाची कामंही मिळू लागली. असाच एकदा कुठेतरी अरुण नलावडे त्याला भेटला आणि काही नवीन नाटक बिटक आहे का विचारले, त्यावर अभिरामने एक गोष्ट ऐकवली आणि त्यावर ‘हसत खेळत’ हे एक विनोदी नाटक त्याने लिहून दिले. ते ‘सुयोग’ या संस्थेने रंगभूमीवर आणले. नंतर पुढे ‘पाहुणा’ आले. ‘घायाळ’ने चित्रपटलेखनाची कारकीर्द सुरू झाली ती अगदी आजपर्यन्त.
‘बालगंधर्व’च्या लेखनानंतर आणि भव्य यशानंतर त्याला पुण्यातील राजहंस प्रकाशनाच्या दिलीप माजगावकरांनी बोलावून घेतले आणि बालगंधर्वांचे चरित्र लिहिणार का, म्हणून विचारणा केली. त्यातूनच त्याला वाटले की चरित्रापेक्षा कादंबरी लिहिली तर? खूप काही लिहिता येईल. त्यात अनेक नाट्यपूर्ण गोष्टी विस्ताराने आणता येतील. या विचाराने त्याने माजगावकरांना हो म्हटले आणि कादंबरीचे लिखाण सुरू केले.
ब्रेक के बाद
‘असा बालगंधर्व’ ही कादंबरी अत्यंत परिणामकारक आहे. मी ती एका बैठकीत वाचली. सिनेमा पहिलेला असूनसुद्धा त्यातली उत्सुकता कुठे कमी पडू दिली नाही अभिरामने. हीच लेखन शैली ‘अॅट एनी कॉस्ट‘ या कादंबरीसाठी महत्वाची ठरली. आजच्या ‘कटथ्रोट’ स्पर्धेच्या जगाचं, म्हणजे मालिका विश्वातल्या कॉर्पोरेट जगाचं अत्यंत परिणामकारक वर्णन या कादंबरीत आहे. बघता बघता अभिरामची तिसरी कादंबरीही आली आणि गाजली.. ती म्हणजे ‘इनशाल्लाह..’ कोल्हापुरातील त्याच्या वास्तव्याचा तो एक अभ्यासपूर्ण परिपाक आहे. मुस्लिम वस्तीचे एक वेगळेच, म्हणजे खरे आणि वास्तववादी स्वरूप या कादंबरीत उतरवून सद्यस्थितीतील त्या धर्मीयांची एक वेगळीच मनोधारणा दाखवण्यात अभिरामला यश आले आहे. या तिन्ही कादंबर्या या अभिरामच्या नाट्य आणि चित्रपट लेखन कारकीर्दीतील शिखरावर असताना आल्या. त्याच वेळी दोन वर्षांपूर्वी ‘संगीत नाटक अकादमी’चा अत्यंत मनाचा पुरस्कारही अभिरामला मिळाला.
अलीकडेच अभिरामच्या आईचे कोविडने निधन झाले, तेव्हा ती ९३ वर्षांची होता. दीर्घकाळ मातृसेवेचे भाग्य अभिरामला लाभले. त्याच्या कारकीर्दीत आईचे मोलाचे योगदान असावे. तिच्याविषयी बोलताना एक वेगळाच आदर त्याच्या बोलण्यात जाणवतो. तिला शिक्षणाची प्रचंड आवड, पण ती पुरी झाली नाही म्हणून तिने वाचन सुरू केले आणि पुस्तकांचा प्रचंड साठा करून मुलांमध्येही वाचनाची आवड निर्माण केली. अगदी रामायण, महाभारताचे खंड, उपनिषदे, पुरणांचे खंड, मराठी आणि हिंदी भाषांमधले, विकत घेऊन सातत्याने वाचले आणि मुलांमध्येही ते पेरले. शाळा कॉलेज आणि एनएसडीव्यतिरिक्त हे संस्कारही अभिरामसाठी मोलाचे ठरले. त्याची फलश्रुती म्हणजे इतक्या कमी वयात अत्यंत समृद्ध भाषेतली आणि विचारांतली लेखन सामुग्री अभिरामच्या हातून घडली.
अनेक अविवाहितांच्या बाबतीत सर्वांना प्रश्न पडतो की, काय कारण असेल याचे?.. काहींना वेळ नसतो, काहींना संधी मिळत नाही, काही उगाचच रखडतात तर काहींचे योग जुळून आलेले नसतात वगैरे.. पण हा लेख वाचून जर अभिरामला मुली सांगून आल्या तर? या मिश्किल प्रश्नावर तेवढेच मिश्किल उत्तर अभिराम देतो.. ‘काही उपयोग नाही, नाटक, सिनेमा, अभिनय आणि लेखन यातच कारकीर्द करायची आणि लग्न या प्रकारापासून लांब राहायचे, या गोष्टी मी तरुण्यात पदार्पण करतानाच ठरवल्यात आणि आजपर्यन्त त्या तडीस नेल्यात. मी या निग्रहांवर ठाम आहे. माझा बराच वेळ मनन चिंतनात जातो. लिखाणात जातो, मित्रमंडळी अमाप आहेत, इथे पावलोपावली अनेक अशा गोष्टी घडत असतात ज्यात माझे योगदान लोकांना हवे असते, मला ते द्यायला आवडते. एकटेपणाची जाणीव अजिबात कुठे नसते, इतका मी माझ्या कामात व्यग्र असतो.’
हे खरे आहे, अभिनय, दिग्दर्शन एका बाजूला सुरू असताना आज अभिराम भडकमकर या लेखकाकडे नाटक सिनेमा, संवाद, कादंबर्या या सर्व माध्यमात प्रचंड मागणी आहे. शिवाय वेगवेगळ्या सेमिनार, संमेलनांमध्ये वक्त्यापासून अध्यक्षपदांपर्यंतही आमंत्रणे आहेत. आणि हे सर्व वाढतच चालले आहे. त्यामुळे देवधर्मांच्या कर्मकांडांमध्ये न अडकणारा, वरवर नास्तिक वाटणारा अभिराम त्याच्या आईवडिलांप्रमाणेच निर्गुण निराकार अशा परमेश्वराचे अस्तित्व मानतो असे दिसते. म्हणूनच त्याच्याकडून ‘सुखांशी भांडतो आम्ही’, ‘देहभान’ अशी मानवी मूल्यांवरची चर्चात्मक नाटके लिहून होतात आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’सारखे वैचारिक नाटक लिहून, थोर लेखक हेमिंग्वे यांच्या लेखनविषयक मताप्रमाणे, ‘लेखकाने न्याय करू नये, केवळ यथोचित परिस्थिती आणि वास्तव लिखाणातून मांडावे,’ या तत्वाप्रमाणे समाजातील वास्तव समोर मांडतो. रसिकांसाठी निर्णय घेण्याचा विचार त्यांच्यावरच सोडून देतो.
आज इतक्या वर्षांच्या रंगकर्मीय प्रवासानंतरही आयुष्याविषयी घेतलेल्या निर्णयांवर ठाम असलेला अभिराम त्याच शैलीत लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन करण्यास सज्ज आहे. प्रत्येक कलाकृतीला नव्याने सामोरं जायची त्याची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. सुखांशी भांडत भांडत, प्रत्येक प्रश्न हा ज्याचा त्याचा असतो या विचाराने वादविवादात शेवटपर्यंत खिंड लढवणारा लेखक अभिराम यापुढे कोणते शिवधनुष्य उचलतो याकडे सर्वांचे लक्ष असतेच. मला मात्र वाटते की त्याबरोबरच, कधीतरी त्याच्या अभिनयक्षमतेला आव्हान देणारी भूमिका त्याला मिळेल आणि त्यात तो ‘अॅट एनी कॉस्ट’ स्वत:ला अभिनेता म्हणूनही सिद्ध करेल. पुनः एकदा त्याच्याकडून ‘आम्ही असू लाडके’सारखी लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयात बाजी मारणारी जबरदस्त संवेदनशील चित्रपट कलाकृती घडो, हे मागणे त्याच्यासाठी अस्तित्वात नसलेल्या निर्गुण निराकार परमेश्वराकडे मागावेसे वाटते.