साधारण २००८मधली गोष्ट… तेव्हा मी पुणे शहर पोलिस दलात क्राइम ब्रँचमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सामाजिक सुरक्षा ब्रॅन्चला काम करीत होतो. तारीख होती १२ जून २००८…
मॉन्सूनची सुरुवात झाली होती, संध्याकाळी ऑफिसमध्ये असताना माझे मित्र भाई डोळे व रविंद्र जोशी हे दोघेजण घाईघाईत तिथे आले. त्यांनी सांगितले की, आमचा मित्र आनंद कुलकर्णी (नाव बदललेले आहे) यांची मुलगी स्नेहा (नाव बदलले आहे) वय वर्षे १०, सहावीत शिकणारी ही मुलगी हरवली आहे. त्याबाबतची मिसिंग तक्रार त्यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनला दिलेली होती. तेवढ्यात घाईघाईत आनंद कुलकर्णीही तिथे आले. दररोज आपल्या डोळ्यासमोर खेळणारी, गप्पा मारणारी, अभ्यास करणारी, अनेक प्रश्नांची सरबत्ती करणारी, रात्री उशिरापर्यंत टीव्हीवर कार्टून पाहत बसणारी मुलगी अचानक गायब झाल्यामुळे ते कमालीचे अस्वस्थ झाले होते. आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, या चिंतेने त्यांना ग्रासले होते. पाण्याचा घोटही त्याच्या घशाखाली उतरत नव्हता, त्यांची ही अवस्था मला पाहवत नव्हती. म्हणून हा सर्व प्रकार मी सहाय्यक पोलिस आयुक्त विनोद सातव, डीसीपी क्राइम अनिल कुंभारे यांना भेटून हकीकत सांगितली.
दरम्यान आनंद कुलकर्णी यांच्या फोनवर अज्ञात महिलेने, ‘मुलगी माझ्या ताब्यात आहे, तीस लाख रुपये दिले नाहीत तर ठार मारू, अशी हिंदीतून धमकी दिली. हे ऐकताच त्याची शुद्ध हरपली आणि भोवळ येऊन ते धाडकन खाली कोसळले. त्यांना पाणी देऊन आम्ही सावरले. तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असा धीर देत त्यांना आधार दिला. आम्ही सारे क्राइम ब्रँच प्रमुख राजेंद्र सिंह (अॅडिशनल सीपी) यांचेकडे गेलो. त्यांनी पूर्ण माहिती घेतली. टीम जमा केली. त्यात प्रामुख्याने मी, खंडणीविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक किशोर जाधव, पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड इ. अधिकारी व कर्मचारी होते.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आमची मीटिंग विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये झाली. दरम्यान, कुलकर्णी यांच्या फोनवर पुन्हा त्या अज्ञात महिलेचा खंडणीसाठी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फोन आला, आम्ही दिलेल्या सूचनांप्रमाणे श्री. कुलकर्णी यांनी तो फोन रेकॉर्ड करून घेतला. त्यांना येणारे फोन पब्लिक बूथवरून येत होते. त्या अनुषंगाने बूथचालकाचा तपास सुरु केला होता. तो सापडला. रात्री नऊ वाजता कोणत्या महिलेने फोन केला, काही आठवते आहे का, अशी विचारणा करता, तो म्हणाला, होय, त्यावेळी एक महिला इथे आली होती. तिच्याबरोबर माझी सुट्या पैशांवरून जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे ती बाई माझ्या चांगलीच लक्षात आहे. तुम्ही मला ती दाखवलीत तर मी तिला ओळखेन, असे सांगितले.
दरम्यान, पुण्यातील सुप्रसिद्ध रेखाचित्रकार गिरीश चरवड यांनी बूथचालकाच्या सांगण्याप्रमाणे तिचे चित्र काढले, त्याच्या अनेक प्रति छापून त्या तपास टीमकडे पाठवण्यात आल्या, खबरे, मोडस ऑपरेंडी ब्युरो रेकॉर्ड यांच्याकडे त्याची पडताळणी केली. रात्रभर संपूर्ण क्राइम ब्रँचची टीम, विश्रामबाग पोलीस असे सर्वजण शहरातील लॉजेस, बस स्टँड, स्टेशन इत्यादी ठिकाणी स्नेहाचा फोटो व आरोपीचे रेखाचित्र घेऊन तपास करीत होते. कुलकर्णी दांपत्य अत्यंत चिंतेत आणि घाबरलेल्या मन:स्थितीत होते. तेही रात्री उशिरापर्यंत पोलिसांबरोबर होते. तुम्ही काळजी करू नका, तुमची मुलगी सापडेल, थोडा धीर धरा, असे सांगत आम्ही त्यांची समजूत काढत होतो.
हा प्रकार अपहरणाचा असल्यामुळे त्याचा तपास अत्यंत गुप्ततेने करावा लागत होता. आरोपींना तपासाबाबत कळले तर आणखीही काही गंभीर प्रकार घडू शकला असता.
दुसर्या दिवशीच्या सकाळी पुन्हा त्या महिलेचा कुलकर्णीना फोन आला, तिने ३० लाख रुपये खंडणीची मागणी केली आणि दम दिला की, ‘तुम चाहो तो फोन टेप करो, हमको कोई फर्क नहीं पडता.’ आम्ही त्या फोनचा अभ्यास केला तेव्हा ही बाई गुन्हेगारी क्षेत्रात नवखी असावी, असा आमचे प्राथमिक मत झाले. तिने तीस लाख रुपये दुपारी एक वाजेपर्यंत श्रमिक भवनाजवळील साईमंदिराच्या जवळ घेऊन येण्यास सांगितले. दुपारी बाराच्या सुमारास क्राइम ब्रँच टीमने वेशांतर केले आणि कोणाच्याही लक्षात येणार नाही, अशा रीतीने साई मंदिराच्या आजूबाजूला ट्रॅप लावला. पोलिसांच्या बरोबर त्या अज्ञात महिलेला पाहिलेला व ओळखणारा बूथचालकही होता.
बरोबर एक वाजण्याच्या सुमारास एक महिला साई मंदिराजवळ रिक्षातून उतरली. पोलिसांसोबत असणार्या बूथचालकाने त्या महिलेला तात्काळ ओळखले. पोलिसांना तशी खूण केली. आमच्याबरोबर टीममधील तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक फुगे, महिला कर्मचारी धनश्री मोरे, वांजळे, माळी व पंच कुंजीर, साळुंके इत्यादींच्या टीमने त्या बाईला ताब्यात घेतले. बाजूला असणार्या चौकीत नेऊन विचारपूस सुरू केली. तिने आपले नाव राणी गायकवाड आहे असे सांगितले. ती पुण्यातील कॉल सेंटरला काम करीत होती. तिथे तिची ओळख अनिल सिंग याच्याशी झाली होती आणि अल्पावधीतच त्याचे रूपांतर प्रेमात झाले होते. अनिल सिंग आणि राणी या दोघांच्या गाठीभेटी सुरु झाल्या होत्या, हॉटेलिंग करणे, फिरायला जाणे, सिनेमा पाहणे, असे कार्यक्रम नियमितपणे सुरु झाले होते. अनिल सिंगने एमबीए केले होते. नोकरीत मिळणारे पैसे कमी आहेत, या भावनेतूनच या दोघांना विनाकष्ट पैसे मिळवण्याचा मोह झाला होता.
राणीला लहानपणापासून गुन्हेगारी विश्वाशी निगडित असणार्या कथा वाचण्यामध्ये विशेष रस होता. वाहिन्यांवर लागणारे क्राइम शो न चुकता पाहणे, गुन्हेगाराने तो गुन्हा कसा केलाय याचा अभ्यास करणे, यामध्ये पहिल्यापासूनच स्वारस्य राहिले होते. कोणतेही कष्ट न करता पैसे मिळविण्याच्या हेतूनेच या दोघांनी दहा वर्षाच्या स्नेहाला किडनॅप केलेले होते. नरपतगीर चौकाजवळील ओरिएंटल लॉजमध्ये एक रूम भाड्याने घेऊन तिथे तिला ठेवले होते. आपल्याला ठरल्याप्रमाणे पैसे मिळाले की ती अनिल सिंगला फोन करुन कळवणार होती. त्यानंतर तो मुलीला सोडून देणार होता. त्याप्रमाणे आम्ही राणीला पैसे मिळालेले आहेत म्हणून सिंगला फोन करण्यास सांगितले, तिने सिंगला फोन केला. त्याप्रमाणे सिंगने मुलीला सदाशिव पेठेत शू वर्ल्ड दुकानाजवळ सोडण्यास जात असल्याचे सांगितले. त्याने स्नेहाला तेथे सोडले आणि अलगदपणे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. स्नेहाची पोलिसांनी सुटका केली. आई-वडिलांना समोर पाहताच स्नेहाने आणि आईने एकमेकांना पाहताच जोरात हंबरडा फोडला. चार दिवसांपासून गायब असलेली मुलगी सुखरूप असल्याचे पाहून आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. हा प्रसंग पाहून पोलिसांचे डोळे नकळत पाणावले. पोलिसांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनतीमुळे याचा छडा लागला होता, त्यामुळे या दोघांनी पोलिसांचे आभार मानले.
आम्ही स्नेहाकडे चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की, बाबांनी मला सदाशिव पेठेत असणार्या माझ्या आजीच्या घरी सोडले होते. बाबा आजीला घेऊन दवाखान्यात गेले होते. स्नेहाला वही विकत घ्यायची असल्याने ती शेजारच्या जोशी (नाव बदललेले आहे)आजींबरोबर वही घेण्यास गेली. तिथे वही न मिळाल्याने ती दुसर्या दुकानात गेली. जोशी आजींना घरी काम निघाल्याने आणि स्नेहाला तेथील रस्ते माहीत असल्याकारणाने ती एकटीच दुसर्या दुकानाकडे निघाली होती.
यावेळी राणी आपल्याला शिकार मिळते आहे का, याचा शोध घेत होती. तेव्हा स्नेहा दिसली. राणीने संधी साधत स्नेहाशी गोड बोलत, गप्पा मारायला सुरुवात केली. तिच्याशी बोलताना फूस लावून तिने तिची सगळी माहिती काढून घेतली आणि ती अनिल सिंह याला कळवली होती. दरम्यान त्याने ओरिएंट लॉज बुक केला आणि राणी तिला कधी घेऊन येत आहे, याची वाट पाहात तो थांबला होता. राणीने तिला गोड बोलून तिचे नाव, पत्ता ,बाबा काय करतात इत्यादी गोष्टी विचारून घेतल्या व चॉकलेट देऊन लॉजवर आणले. तिकडे जात असताना राणीने स्नेहाला तुझे आई बाबा इकडेच येणार आहेत, त्यांनी तुला इथेच राहण्यास सांगितले आहे, असे सांगत तिला त्या लॉजवर नेले. राणीच्या त्या बोलण्यावर स्नेहाचा विश्वास बसला होता, त्यामुळे स्नेहाने लॉजवर जातांना कोणताही आरडाओरडा, दंगा केला नाही, त्यामुळे कोणालाही त्याचा संशय आला नाही.
दुसर्या दिवशी दुपारी तुला सदाशिव पेठेत शू वर्ल्डजवळ सोडणार असल्याचे अनिल सिंगने तिला सांगितले, त्यावर तिचा विश्वास बसला होता. आरोपी अनिल सिंग हा मूळचा बनारसचा, परंतु मुंबईत त्याचे कुटुंब स्थायिक झालेले होते. त्याने पुण्यातून एमबीए केलेले होते व तो एका कॉल सेंटरमध्ये तो काम करीत होता.
गुन्हा उघड झाल्यानंतर अॅडिशनल सीपी राजेंद्र सिंह यांची प्रेस कॉन्फरन्स होती. आरोपी अनिल सिंगचा मोबाइल माझ्या ताब्यात होता. पत्रकार परिषद सुरु होण्याच्या अगोदर पाच मिनिटे आधी, अनिलच्या वडिलांचा फोन आला, ते म्हणाले, ‘तुमचे व तुमच्या साहेब लोकांचे काय पैसे असेल ते देऊन टाकतो, परंतु अनिलला सोडा. यावर मी म्हणालो, त्याची आम्ही फक्त चौकशी करतो आहोत, चौकशी झाली की त्याला सोडून देणार आहोत. हे ऐकताच पत्रकार परिषदेमध्ये एकच हशा पिकला.
वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे गुन्ह्याचा तपास खंडणीविरोधी पथकाने विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे दिला. पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे यांनी गुन्ह्याचा पुढील तपास केला. आरोपीचा आवाज फॉरेन्सिक लॅबकडून तपासून आला. इतरही अनेक पुरावे गोळा करण्यात आले व गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र कोर्टात पाठविण्यात आले. न्यायाधीश श्री. भगुरे (अॅडिशनल सेशन कोर्ट पुणे) यांचे न्यायालयात व नंतर अॅडिशनल सेशन कोर्ट श्री. शिरसीकर यांचे कोर्टात हा खटला चालला. सरकार पक्षातर्फे या खटल्याचे कामकाज श्रीमती उज्वला रासकर यांनी चालविले. फिर्यादी पक्षाकडून अॅड. सुपेकर हे होते. कोर्टाने दोघेही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
– राजेंद्र भामरे