ताड ताड ताऽड ताऽड… ताड ताड.. सारखा आवाज येतोय. कुठून येतोय माहितीय का? काय म्हणता, कोणाच्या तरी लग्नाच्या वरातीत ताशा वाजतोय? अहो नाही. हा ताशाचाच आवाज आहे, हे बरोबर ओळखलंत. पण हा ताशा वरातीत वाजत नाहीय, महाराजा. मराठी ताशा विभाग, नवीन प्रशासन भवन, ८वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ३२ येथून हा आवाज येतोय. या पत्त्यावरून येणारा ताडताड ताडताड आवाज ऐकून सध्याचे मराठी भाषा मंत्री अगदी हैराण झालेत. काय ती भाषा, काय तो ताशा, काय ते हाटील..
आ हा हा हा!
मराठी माणसांनो, मराठी भाषा विभागांतर्गत विश्वकोश, भाषा संचालनालय, साहित्य आणि संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था आणि मराठी शब्दकोश या संस्थांचं कामकाज चालतं, हे तुम्हाला माहीत आहे काय? म्हणजे तिथून जे काही चालतं, कसं बसं चालतं, काय काय चालतं त्या सगळ्याचा आणि तुमचा तसा काही संबंध नाही म्हणा. पण तेही आपण दिलेल्या करांच्या (म्हणजे टॅक्समध्ये पैशामधून चालतं, त्यामुळे आपल्याला ते माहीत असावं जरुरीचं आहे.)
तर ते विश्वकोश नावाचं प्रकरण काय असतं? हे तुम्हाला माहित आहे काय? नाही? काही हरकत नाही. बरं साहित्य आणि संस्कृती मंडळ हे नाव तरी ऐकलं असेल कधीतरी- नाही? ओके ओके. नो प्रॉब्लेम. मराठी भाषा मंत्री महोदयांनाही अगदी आतापर्यंत ही काय प्रकरणं आहेत हे माहीत नव्हतं. जेव्हा विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित आणि राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे या दोन अध्यक्षांनी अलीकडे तडकाफडकी राजीनामे दिले आणि महाराष्ट्रात सर्वत्र ताशा तडतडू लागला तेव्हा मभामं (मराठी भाषा मंत्री) एकदम जागे झाले.
अरेच्चा! आम्हाला तर आतापर्यंत फक्त महामंडळ माहीत होती. पण अशी नुसती मंडळं पण असतात काय? आणि या मंडळाचा मराठी भाषा विभागाशी संबंध आहे? मग यात लक्ष घातलंच पाहिजे. आधीच त्या `कोबाड गांधीनं आमच्या मराठी भाषा विभागाचं फ्रीडम फ्रॅक्चर करून ठेवलंय. त्या पुस्तकाच्या अनुवादाला पहिल्यांदा पुरस्कार जाहीर केला, मग रद्द केला, त्यावरून काही लेखकांनी परत पुरस्कार परत केले, पुरस्कार समितीच्या आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या काही सदस्यांनी राजीनामे दिले, मग तर लोक आमच्याबद्दल काय वाट्टेल ते बोलू लागले- च्यामारी ते सगळं निस्तारता निस्तारता नाकी नऊ आले. त्या पुस्तकात नक्षलवाद्याचं उदात्तीकरण आहे, म्हणून पुरस्कार रद्द केला, अशी सारवासाराव करून मिटवा-मिटवी होते न होते तो चक्क दोन महत्त्वाच्या अध्यक्षांनी राजीनामे दिले- केव्हातरी मराठी भाषा विभागात काम करणार्या तराटी अधिकार्यांची हजेरी घेतली पाहिजे- पण तूर्तास आधी दीक्षित आणि मोरे यांना राजीनामे परत घ्यायला लावले पाहिजेत- नाहीतर आणखी अब्रू जाणार, चल बाबा गाडी काढ, हां पुण्याला जायचंय ताबडतोब, डॉक्टर सदानंद मोरे यांच्या घरी.
तर मंडळी मग मंत्री महोदयांच्या तातडीने पुण्याला गेले. तेथे मोरे यांच्या घरी डॉक्टर दीक्षित आणि डॉक्टर मोरे यांची त्यांनी भेट घेतली. चर्चा केली. विश्वकोश आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या कामात यापुढे कुठलाही सरकारी हस्तक्षेप होणार नाही, वित्तीय अडवणूक होणार नाही, अशी लेखी आश्वासने दिली आणि मग दोन्ही तज्ज्ञ विद्वानांनी आपापले राजीनामे मागे घेतले. बरे झाले. यानिमित्ताने डॉक्टर दीक्षित म्हणजे अब्दुल सत्तार नव्हेत आणि डॉक्टर मोरे म्हणजे राज्यपाल कोशारी नव्हेत हे महाराष्ट्राला आणि मभामं महोदयांना कळले. मराठी भाषेत अजून `जनाची नाही मनाची तरी लाज बाळगली पाहिजे’ हा वाक्यप्रचार टिकून आहे.
आणि म्हणून मराठी ताशा विभागाने पुढचं `विश्व मराठी संमेलन’ घेताना थोडी तरी लाज बाळगली पाहिजे. नुकत्याच झालेल्या विश्व मराठी संमेलनात आपापसात ढोल-ताशे खूप वाजवून झाले. या संमेलनात मराठी भाषेसंदर्भात, मराठी संस्कृती संदर्भात साधक-बाधक चर्चा न करता, नट-नट्यांचे कार्यक्रम आणि वाजंत्र्यांचे संगीत-बिंगीत उत्सवी पद्धतीने आयोजित केले गेले. असे काही संमेलन मुंबईत होत आहे. हे मराठी विश्वालाच जिथं माहीत नव्हतं तिथं अखिल विश्वातील मराठी माणसांना त्याबद्दल काय अवस्था असणार? परिणामी संमेलनातील खुर्च्या ओस पडल्या. तिथं दर्दीही आले नाहीत आणि गर्दीही. मराठी भाषा अधिकार्यांचे खिसे `कट प्रॅक्टिस’ने भरले असतील कदाचित. पण मराठीचे खिसे फाटकेच राहिले.
`मराठी शब्दकोश’ हा उपक्रम मराठी भाषा विभागाच्या अंडरच येतो बरं का. तर मध्यंतरी खोके, बोके, हाटील, डोंगर, झाडी, दाढी असे काही शब्द मराठी शब्दकोशातून हटवण्याचा त्यांचा विचार चालला होता. पण मग हे केलं तर त्याची अधिकच चर्चा होणार आणि अब्रूचा खर्च वाढत जाणार, हे `मभामं’च्या लक्षात आलं आणि तो विषय तिथंच थांबला. `कोबाड गांधी’चा पुरस्कार हटवला तर झालं उलटंच. त्या पुस्तकाची अधिकच चर्चा झाली आणि हजारो प्रती विकल्या गेल्या. `लोकवाङ्मय गृहा’ला एकदम लॉटरीच लागली. हे बघून आता काही बुडीत मराठी लेखक आणि प्रशासक मंत्रीमहोदयांना भेटून आमच्या पण पुस्तकावर बंदी घाला किंवा त्यांना पुरस्कार जाहीर करून मग रद्द करा, अशी मागणी करू लागले आहेत.
तुम्हाला सांगतो, विश्वसनीय सूत्रांकडून आम्हाला असंही समजलं की पुढच्या `विश्व मराठी संमेलन’ सुरत किंवा गुहाटी इथं होणार असून सुप्रसिद्ध भाषामारक शिंदुर्ग सम्राट नातारा यांना संमेलनाध्यक्ष होण्याची विनंती करण्यात आली आहे. नुसतेच ते मराठी रुदय सम्राटांना भेटले आणि आपल्याला चांगलं मराठी नीट बोलायला शिकवावं अशी मरूस (मराठी रुदय सम्राट) यांना त्यांनी विनंती केली. पुढील विमसंचे उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध संस्कृती रक्षक माननीय चित्रा मॅडम येतील काय, अशीही चाचपणी मराठी ताशा विभागाकडून करण्यात येत आहे. `गुजरातीचे मराठीला योगदान’ या मुख्य परिसंवादात देगंफ, एशि, प्रद लोणचेवाले, राक घाटकोपर, कारीट मुलूंडे आदी महनीय वस्ते सहभागी होण्याची शक्यता आहे. दरम्यान कवी संमेलनात फक्त ४० कवींचा समावेश केला जाणारा असून कोणी नार्वेकर नावाचे महाकवी त्यांचे संमेलन करणार आहेत, अशी ताडताड कुजबूज मराठी ताशा विभागात सुरू असल्याची बातमीही नुकतीच आमच्या पायी आली आहे.