अपेक्षेप्रमाणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२४च्या लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जाण्यासाठी महाराष्ट्रातील महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा त्यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केली. या पाठिंब्याच्या बदल्यात आपल्याला राज्यसभा किंवा विधानपरिषद असे काहीही नको असे स्पष्टपणे राज ठाकरेंनी सांगितले. राज यांच्या या घोषणेला मनसे सैनिकांचा अल्पसा प्रतिसाद मिळाला. नेहमीप्रमाणे टाळ्यांचा कडकडाट झाला नाही. २००९ची भूमिका २०१४ला नव्हती. तर २०१४ची भूमिका २०१९ला नव्हती आणि आता २०२४ला पुन्हा वेगळी भूमिका!
राज ठाकरे स्वार्थासाठी मनसे पक्षाची भूमिका नेहमी बदलतात. गेल्या १८ वर्षांचा त्यांचा बदलता स्वार्थी इतिहास हेच सांगतो.
‘माझा विरोध माझ्या विठ्ठलाला नसून त्याच्याभोवती जमलेल्या बडव्यांना आहे. शिवसेनाप्रमुख हेच माझे दैवत’ असे भावनिक उद्गार १८ डिसेंबर २००५ रोजी एका पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली. ९ मार्च २००६ रोजी स्वत: पक्षप्रमुख बनून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यांनी शिवसेना सोडण्याच्या मागे फक्त उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला विरोध हे एकमेव कारण होते आणि आजही उद्धव ठाकरेंनाच त्यांचा विरोध आहे.
राज ठाकरेंची सुरुवातीची काही वर्षे पक्षबांधणीसाठी गेली. सुरुवातीला स्वबळावर निवडणुका लढवल्या. मग २००९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे उतरली. लोकसभेसाठी १२ उमेदवार लढले. पण एकही निवडून आला नाही. या १२पैकी ११ उमेदवार राज ठाकरेंना सोडून गेले. आज फक्त एकमेव बाळा नांदगावकर त्यांच्यासोबत आहेत.
२००९च्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने महाराष्ट्रात १४३ उमेदवार उभे केले. त्यापैकी १३ उमेदवार विजयी झाले. पण या विजयाचा फायदा त्यांना पक्षबांधणीसाठी करून घेता आला नाही. त्यामुळे २०१४च्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. जुन्नरमधून एकमेव शरद सोनावणे हे मनसे आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी २०१८मध्ये राज ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करून उद्धव ठाकरे यांच्या हातून ‘शिवबंधन’ बांधून घेतले आणि घरवापसी केली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत १०१ उमेदवार उभे केले. त्यापैकी फक्त कल्याण (ग्रामीण) मधून राजू पाटील हे एकमेव मनसे आमदार निवडून आले. राज ठाकरे यांनी २०१४ आणि २०१९ साली घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे मतदारांनी त्यांना इंगा दाखवला, जागा दाखवली.
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याप्रमाणे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रत्येक निवडणुकीपूर्वी आपली भूमिका बदलली. ते महाराष्ट्रातील जनतेला पटले नाही. पुरोगामी महाराष्ट्रातील जनता आपले मत विचारपूर्वक मांडते. महाराष्ट्रातील मतदार कुठल्याही लाटेवर स्वार होणार नाही. राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी एक ब्ल्यूप्रिंट बनवली होती. महाराष्ट्रातील तरुणांना एक आशेचा किरण वाटत होता. पण ती ब्ल्यूप्रिंट येण्यास बराच उशीर केला. जेव्हा आली तेव्हा तो फुसका बार ठरला. महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला जेवढे समजते ते दुसर्याला समजत नाही हा फाजील आत्मविश्वास त्यांना आहे. आपल्यात जे ‘व्हिजन’ आहे, ते उद्धव ठाकरेंना नाही, अशी टीका याच फाजील आत्मविश्वासातून ते नेहमी करतात.
दिल्लीवारीविषयी स्पष्टीकरण देताना राज म्हणाले की, १९८० साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. कुणाला भेटणे हे गैर नाही. ऑगस्ट २०१८मध्ये राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांची पुणे येथे प्रगट मुलाखत घेत त्यांची वारेमाप स्तुती केली होती, तर जुलै २०१९मध्ये राज ठाकरे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीला जाऊन भेट घेतली होती. मार्च २०२४मध्ये भाजपाचे नेते अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा दिला. २०१८ साली राष्ट्रवादीचे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादीला अनुकूल भूमिका घेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर चौफेर टीका केली होती. हे भाजप नेते सोयीस्कररित्या विसरले. ‘अब की बार ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ पार’च्या उद्दिष्टासाठी भूतकाळातील टीका व अपमान भाजपाने निमूटपणे गिळला.
राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशात गुन्हे दाखल होतील म्हणून भाजपाच्या योगी सरकारवर टीका करीत मे २०२२मध्ये अयोध्येचा दौरा रद्द केला. मुंबई उत्तर भारतीयांना विरोध करतात म्हणून राज ठाकरेंना उत्तर प्रदेशात पाय न ठेवू देण्याचा गंभीर इशारा भाजपाच्या एका महाबली खासदाराने दिला होता. राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पूर्वी केलेली विधाने ही महायुतीच्या नेत्यांनी आठवावी…
– नरेंद्र मोदींइतका खोटे बोलणारा पंतप्रधान मी बघितला नाही (ऑक्टोबर २०१७).
– मोदी पंतप्रधान असले तरी त्यांचे सारे लक्ष हे गुजरातकडे असते (मार्च २०१९).
– एक असतो बसलेला मुख्यमंत्री तर एक असतो बसविलेला मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा बसविलेला मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही. (सप्टेंबर २०१५).
– ‘लाव रे तो व्हिडिओ’ मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणारा सचित्र पुरावा दाखवला (लोकसभा निवडणूक २०१९च्या प्रचारात सभेत).
– ही कोणती लोकशाही? विरोधात बोलल्यास अशा पद्धतीने आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. ईडीच्या चौकशीनंतर माझे तोंड गप्प होणार नाही.
– ज्यांना धमक्या दिल्या ते भाजपमध्ये गेले. मला अशा नोटिसींचा काही फरक पडत नाही (ईडीच्या नोटिसीनंतर प्रतिक्रिया ऑगस्ट २०१९).
– कलम ३७० रद्द केल्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले. मग ज्या राज्यांमध्ये कलम ३७० नाही, तेथे रोजगाराच्या संधी का उपलब्ध होत नाहीत? देशात बेरोजगारी वाढत आहे त्यावर मोदी काही बोलत नाहीत (ऑगस्ट २०१९).
मोदी व भाजपाविरोधात अशी अनेक विधाने त्यांनी केली होती. राज यांनी २०१४च्या निवडणुकीपूर्वी गुजरातचा दौरा केला होता. विकासाच्या ‘गुजरात मॉडेल’वर खूश होऊन त्यांनी नरेंद्र मोदींची तोंड फाटेपर्यंत स्तुती केली होती. नरेंद्र मोदींच्या प्रेमात पडले होते. भाजपालाही तेव्हा राज हवे होते. शिवसेनेचे खच्चीकरण करण्यास भाजपानेही त्याचा राजकीय वापर करून घेतला. २०१४मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत जिथे मनसेचे उमेदवार उभे आहेत, तिथे मनसेला मत द्या आणि जिथे मनसे नाही तिथे भाजपा उमेदवाराला मत देऊन नरेंद्र मोदींना दिल्लीला पाठवा, असे मोदींचे गोडवे गाणारे राज २०१९च्या निवडणुकीत मात्र देश वाचवायचा असेल तर ‘शहा-मोदी’ जोडगोळी पुन्हा निवडून देऊ नका असा विरोधी प्रचार करत महाराष्ट्रभर फिरले.
भाजपाच्या प्रचारातील मुख्य अस्त्र असलेल्या डिजिटल मिडियाचा राज ठाकरे यांनी पुरेपूर वापर केला आणि मनसेचा एकही उमेदवार उभा नसताना ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत महाराष्ट्रभर भाजपाविरोधात झंझावाती प्रचार केला. मात्र राज ह्यांच्या सभांची गर्दी मतांमध्ये परिवर्तित होऊ शकली नाही. उलट एकही उमेदवार नसताना घेतल्या गेलेल्या एवढ्या सभांचा खर्च दाखवायचा कुठे, हाच प्रश्न राज ठाकरेंना पडला.
त्यावेळी राज यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांसाठी एकूण ११ सभा घेतल्या, मात्र त्यातील केवळ तीन जागांवर राष्ट्रवादी विजयी झाली. विजयी झालेल्या तीनही उमेदवारांचा म्हणजे उदयनराजे भोसले (सातारा), सुप्रिया सुळे (बारामती), सुनील तटकरे (रायगड) यांचा स्वत:च्या मतदारसंघात मोठा दबदबा आहे. त्यामुळे राज ह्यांच्या सभांमुळे ते निवडून आले असे म्हणता येणार नाही. त्यामुळे आता राज यांनी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे फार फरक पडणार नाही. राज हे विश्वासार्हता गमावून बसलेले नेते आहेत. त्यांच्या या स्वार्थी निर्णयामुळे मनसैनिक संभ्रमात पडलेले आहेत. महाराष्ट्राच्या उरावर उठलेल्या मोदी-शहा या जोडीला पाठिंबा दिल्यामुळे ते मनसे सोडण्याच्या विचारात आहेत. हा पाठिंबा देऊन त्यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे. मनसेच्या मूळ भूमिकेशी विसंगत निर्णय घेऊन महाराष्ट्र विरोधकांशी संगत केली आहे.
राज ठाकरेंचा मोदी-शहांना बिनशर्त पाठिंबा म्हणजे मुंबईतील अनेक औद्योगिक कार्यालये, कंपन्या अहमदाबादला हलवण्याचा मोदी-शहांच्या निर्णयाला पाठिंबा. उद्योगधंदे गुजरातला स्थलांतरित केल्यामुळे बेरोजगार व मराठी तरुणांच्या संख्यावाढीस पाठिंबा. मुंबईचे आर्थिक केंद्र गांधीनगरला नेले. रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय, डायमंड उद्योग हलवून मुंबईचे आर्थिक महत्त्व कमी करण्याच्या मोदी-शहा यांच्या कुटील डावाला पाठिंबा. महाराष्ट्राला ओरबाडून, मुंबई केंद्रशासित करण्याच्या मोदी-शहांच्या प्रयत्नांना पाठिंबा. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडणार्या भाजपाला पाठिंबा. मराठी अस्मिता, महाराष्ट्राभिमान पायदळी तुडवणार्या भाजपाला पाठिंबा. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान करणार्या माजी राज्यपाल कोश्यारी यांच्या भूमिकेला पाठिंबा. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरीविरोधी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा. लोकशाही व संविधान न मानणार्या हुकूमशहाला पाठिंबा होय.
आज महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि एकूणच महाविकास आघाडीला जनतेचा जो भरघोस पाठिंबा मिळतो आहे त्याला अपशकुन करण्याचा राज यांचा प्रयत्न आहे. दोन वर्षापूर्वी गद्दारांनी शिवसेनेत फूट पाडून महाराष्ट्राची सत्ता संपादन केल्यानंतर मराठी मनात एक संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर उद्धव यांच्या सहानभूतीची लाट महाराष्ट्रात निर्माण झाली. उद्धव यांना सर्वत्र मिळणारा पाठिंबा राज यांना पाहवला नाही. उद्धवद्वेष त्यांच्या ठायी वसल्यामुळे त्यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. या त्यांच्या निर्णयामुळे मराठी मनात चीड निर्माण झाली आणि त्यांच्या विरोधात एक संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र लुटणार्यांच्या टोळीत स्वत:च्या स्वार्थासाठी राज ठाकरेंनी सामील होण्याचे पाप केले आहे. हे महाराष्ट्र आणि मराठी माणूस कधीच विसरणार नाही. राज ठाकरेंनी केलेला हा महाराष्ट्रद्रोह आहे!