खरंतर मला सोशल मीडियाचे जास्त वेड नाही. फेसबुक, व्हॉट्सअपपासून मी जसे डास, ढेकूण यांच्यापासून दूर राहावे तसे दूरच राहतो. पण म्हणतात ना की माणसाचे नशीब कधी दुर्दैवाच्या फेर्यात सापडेल ते सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे ती दुर्दैवी घटना माझ्या आयुष्यात घडली.
झाले असे की माझा शाळेतील जुना मित्र मिलिंद उर्फ मिल्या अचानक पुन्हा, इतक्या वर्षांनी माझ्या संपर्कात आला. अनेक वर्षांपासून खरं तर आमचा काहीच संपर्क नव्हता. पण त्याला कुठून तरी माझा नंबर मिळाला आणि त्याने मला फोन केला. खरंतर शाळेतील जुन्या मित्राचा इतक्या वर्षानंतर फोन यावा, ही किती आनंदाची गोष्ट! त्यामुळे मलासुद्धा खूप आनंद झाला. पण त्यावेळी पुढे येणार्या संकटाची मला चाहूल लागली नाही. मी त्याच्याशी भरभरून बोललो, जुन्या मित्रांची चौकशी केली. मिल्या पण खुश झाला आणि खूप वेळ बोलत राहिला. आमचे कुटुंब, मुले, नोकरी याबद्दल आम्ही खूप बोललो. नंतर मग एकमेकांच्या संपर्कात राहण्याचा वायदा करून आम्ही फोन बंद केला.
अशा प्रकारे या सगळ्या घटनेची सुरुवात अगदी शांतपणे झाली. मग एक दिवस मिल्याने अचानक सकाळी मला सुप्रभातचा मेसेज पाठवला. मला तो मेसेज पाहून आनंद वाटला, मी पण त्याला सुप्रभातचा मेसेज पाठवला. त्याच रात्री त्याने पुन्हा गुड नाईटचा मेसेज पाठवला. मला थोडे विचित्र वाटले, पण एवढ्या जुन्या मित्राने आवर्जून मेसेज पाठवला, म्हणून मी पण त्याला प्रत्युत्तर दिले. आणि तेथेच माझी चूक झाली!
त्यानंतर मग त्याने मला रोज सकाळ संध्याकाळ मेसेज पाठवणे सुरू केले. मी त्याला प्रत्युत्तर देत नसे. तरीही त्याने सुविचार पाठवायला सुरुवात केली. अनेक सुविचार वाचून आधी तर माझे मनोरंजन झाले पण मग त्याचा कंटाळा येऊ लागला. काही दिवसात तर त्याने माझ्यावर फॉरवर्ड मेसेजचा माराच सुरू केला. दिवसाच्या प्रहरात कधीही फोन उघडा, त्याचा मेसेज आलेलाच असे. त्यात जगाच्या पाठीवरील कुठल्याही गोष्टीवरील अनावश्यक माहिती, आरोग्य विषयक सल्ला, इतिहासाचे दाखले असा विविध प्रकारचा मजकूर असे. मी त्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली पण तिथेच हा प्रकार थांबला नाही.
मी कुठलाच विरोध करत नाही हे बघून मिल्याची हिम्मत वाढली. त्याने हळूहळू मला वेगवेगळ्या ग्रूपमध्ये अॅड करायला सुरुवात केली. मी आधी दुर्लक्ष केले, पण त्याचा खूप त्रास होऊ लागला. मला कविता आवडतात असे मी त्याला चुकून सांगितले होते. मग काय त्याने मला वेगवेगळ्या कवितांच्या ग्रूपमध्ये अॅड केले. सकाळपासून कवितांचा मारा या ग्रूपमधून होत असे. त्या कविता मी बहुधा वाचत नसेच, पण कधीतरी चुकून वाचल्या तरी तरी दिवसभर डोके भणभण करी. दोन पेग घेतल्यानंतर माणसाला जसे वाटते तसे मला वाटायचे. पण दिवसेंदिवस त्रास वाढतच गेला.
मुक्तछंदातील अगम्य कविता, चित्रविचित्र भाषेतील दुर्बोध कविता वाचून मी झोपेतही दचकून उठू लागलो.
एक दिवस तर बायकोच्याही लक्षात आले.
ती म्हणाली, ‘काय चाललंय तुमचं हल्ली? तुमचे चित्त काही थार्यावर दिसत नाही.’
‘विशेष काही नाही, सकाळपासून डोके ठणकते आहे’ मी म्हणालो.
‘डोके ठणकायला काय झालं आहे? चांगला चार कप चहा ढोसलाय सकाळपासून’ ती म्हणाली.
‘अगं ते व्हॉट्सअपवर…’ मी बोलून गेलो आणि जीभ चावली.
‘सारखे ते मोबाईल आणि व्हॉट्सअप बघत असता, मग काय होणार आहे? आणि आजकाल सारखे झोपेतही दचकून उठता? काय झाले आहे तुम्हाला’ तिने विचारले.
आता तिला काय सांगू मी याच विचारात पडलो, पण मग तिला सगळे सांगून टाकले. त्यामुळे मला जरा मोकळे वाटले. तिने मला सुचवले, ‘अहो, एकदा त्या सोशलानंद महाराजांना जाऊन भेटा. त्यांनी अनेक लोकांचे प्रश्न सोडवले आहेत. ते काहीतरी उपाय सांगतील.’
सोशलानंद महाराज म्हणजे आमच्या भागातील मोठे प्रस्थ! अध्यात्म आणि सोशल मीडिया यांची आगळी वेगळी सांगड घालून ते समाज प्रबोधन करीत आणि भक्तांना मार्गदर्शन पण करीत. त्यामुळे ते विशेषत: तरुण वर्गात खूप लोकप्रिय झाले होते.
मला पत्नीचा सल्ला पटला. मी दुसर्याच दिवशी सोशलानंद महाराजांच्या आश्रमात गेलो. मी गेलो तेव्हा बरीच मंडळी तेथे जमली होती आणि महाराजांचे प्रबोधन सुरूच होते. मी तिथेच एका कोपर्यात बसलो आणि ऐकू लागलो. महाराज सांगत होते, ‘भवसागर हा व्हॉट्सअप ग्रूपसारखा आहे महाराजा! त्यात जो बुडाला तो बुडाला! जन्ममृत्यूच्या फेर्याप्रमाणे त्यातून मग सुटका नाही. म्हणून भक्तांनी अष्ट्रोप्रहर सावध रहावे. आपल्याला कुणी नको त्या ग्रूपमध्ये अॅड करणार नाही याची दक्षता घ्यावी. भगवंताने हे सोशल मीडियाचे जाळे निर्माण केले आहे ते भक्तांची परीक्षा पाहण्या साठीच’.
महाराजांचे बोलणे ऐकून मी चांगलाच प्रभावित झालो. व्हॉट्सअप ग्रूपचे ते अगदी अचूक वर्णन करत होते.
महाराजांचे प्रवचन संपल्यावर प्रश्नोत्तराच्या वेळेत माझी व्यथा त्यांना सांगितली.
महाराजांनी शांतपणे माझे म्हणणे ऐकून घेतले आणि मग त्यांच्या धीरगंभीर आवाजात बोलू लागले, ‘वत्सा! तू एकटा नाहीस. सोशल मीडियाच्या मंथनात अशी अनेक अजाण बालके दिशाहीन झाली आहेत! आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठीच तर आम्हाला परमेश्वराने भूतलावर पाठविले आहे!’
मला एकदम भरून आले, मी व्यथित आवाजात विचारले, ‘पण महाराज आता यावर उपाय काय? नाही हे सहन होत मला आता. या कविता वाचून एक दिवस वेड लागेल मला.’
महाराजांनी थोडा वेळ डोळे बंद करून विचार केला आणि मग एक डोळा बारीक करून ते म्हणाले, ‘सोडून दे तो ग्रूप हिंमत करून! संतांनी पण सांगितलेच आहे की सोडी तोडी भवपाशा.’
‘पण महाराज काही विपरीत तर होणार नाही ना?’ मी संशयाने म्हणालो.
‘अरे परमेश्वरावर विश्वास ठेव, तो तुला योग्य मार्ग दाखवेल.’ महाराज दोन्ही हात वर करून म्हणाले. ती मला आटोपते घ्यायची सूचना होती, कारण मागे रांगेत अजून बरीच मंडळी उभी होती. मी बाजूला उभ्या असलेल्या महाराजांच्या परमभक्ताजवळ भरपूर दक्षिण देऊन बाहेर आलो. पण मला महाराजांनी योग्य दिशा दाखविली याचा आनंद झाला.
मग मात्र मी मन पक्कं केलं आणि महाराजांच्या सल्ल्यानुसार एक दिवस सकाळी सकाळीच ग्रूप सोडून दिला!
ग्रूप सोडल्यावर मला एकदम हलके वाटू लागले. मनावरचा ताण कमी झाला. मी ऑफिसमधून घरी येताना बायकोसाठी तिला आवडणारे आइस्क्रीम पण घेऊन आलो. ग्रुप सोडला तरी कोणी काही म्हटले नाही याचा मला खूप आनंद झाला. त्या रात्री मला खूप शांत झोप लागली. पण मला हे लक्षात आले नाही की ती वादळापूर्वीची शांतता होती.
दुसर्या दिवशी सकाळी मिल्याचा फोन आला. त्याने जरा रागातच विचारले, ‘तू ग्रूप सोडलास असे कळले. का सोडलास?’
‘अरे, मला कवितेतले काही कळत नाही. म्हणून मी सोडला’ मी जरा गडबडून म्हणालो.
‘मग तू ग्रूप जॉईन का केलास’ तो म्हणाला.
‘अरे मी कुठे जॉईन केला. मला तर तूच अॅड केले’ मी म्हणालो.
‘पण आता काही उपाय नाही. मला पण असेच कुणीतरी अॅड केले होते. अजूनपर्यंत माझाही ग्रूप सुटलेला नाही’ तो दुःखाने उसासा सोडीत म्हणाला.
‘मग आता?’ मी विचारले.
‘पहा जरा सांभाळून राहा. ही कवी मंडळी काही बरोबर नसतात’ तो चाचरत म्हणाला.
‘म्हणजे काय?’ मी घाबरून विचारले.
‘काळजी घे’ असे म्हणून त्याने फोन बंद केला.
आणि त्यानंतर मग मला विचित्र अनुभव येत गेले. एक दिवस तर मोबाईलवर निनावी फोन आला. त्याने डायरेक्ट विषयालाच हात घातला.
‘तुम्ही तो ग्रूप सोडला हे बरे नाही केले’ तो म्हणाला.
‘कोण बोलताय तुम्ही?’ मी घाबरून विचारले.
शाश्वताशी आमुचे नाते,
काय विचारता आम्ही कोण?
दात पाडूनी हाती देऊ,
हाती देऊ करंटी अन द्रोण’
त्याने एकदम कविताच म्हणायला सुरुवात केली.
मी जरा घाबरलो, ‘तुम्हाला काय म्हणायचे ते स्पष्ट बोला ना!’
‘तुम्ही ग्रूप का सोडलास?’ परत तोच भारदस्त आवाज. ‘अहो, मला कवितेतील काही कळत नाही, म्हणून सोडला. माझ्यासारख्या अरसिक माणसाला ग्रूपमध्ये ठेवून तुम्हाला काय उपयोग आहे?’ मी काकुळतीने म्हणालो.
‘तुला तर व्यवहारातील काही कळत नाही, असे तुझी बायको म्हणते. मग तू काय जगायचेही सोडून देणार?’ तो आता एकदम अरेतुरे वरच आला आणि धमकावणीच्या सुरात बोलू लागला. याला घरातील गोष्टी कशा कळल्या, याचेही मला जरा आश्चर्यच वाटले.
‘तुला तुझा जीव प्यार असेल तर मुकाट्याने ग्रूप जॉईन कर, नाही तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत’ प्रत्येक शब्दावर जोर देत तो म्हणाला आणि त्याने फोन बंद केला.
असे धमकीचे फोन मला वारंवार येऊ लागले तरी मी बधलो नाही. मग त्या कवीमंडळींनी नवीन प्रयोग सुरु केलेत. एक दिवस सकाळी उठलो आणि दारासमोरची वर्तमानपत्र उचलले तर त्यातून दोन तीन कागद खाली पडले. पाहिले तर त्या लालभडक अक्षरात, हिंदी-मराठी भाषेत लिहिलेल्या अगम्य कविता होत्या. त्यातील बर्याचशा कविता माझ्या डोक्यावरून गेल्यात तरी काही ओळी जशा की,
‘सरफरोशी की तमन्ना
अब हमारे दिल में है
देखना है जोर कितना
बाजू-ए-कातिल में है’
वगैरे वाचून समजले. मी ग्रूप सोडला ही बाब ही मंडळी एवढ्या गांभीर्याने घेतील असे मला वाटलेच नव्हते.
एक दिवस तर कमालच झाली. आमच्या साहेबांनी मला केबिनमध्ये बोलावले. ते म्हणाले, ‘मिस्टर देसाई, हे मी काय ऐकतो आहे तुमच्याबद्दल!’
‘काय झालं सर? ऑफिसच्या कामात माझे काही चुकले आहे का?’ मी घाबरून विचारले.
‘मी ऐकले आहे की तुम्ही नवकविता करता! तुम्हाला माहीतच असेल की आपल्या कंपनीचे याबाबतचे नियम खूप खडक आहेत. मी तुमच्यावर ऑफिसची शांतता भंग करण्याच्या आरोपाखाली शिस्तभंगाची कारवाई करू शकतो. असे बेताल वर्तन या कंपनीत चालवून घेतले जाणार नाही’ साहेब गरजले.
‘साहेब मी काय माझ्या सात पिढ्यातही कोणी कविता लिहिल्या नाहीत’ मी काकुळतीने म्हणालो.
‘सर, तुम्हाला कोणी सांगितले की मी कविता करतो म्हणून?’ मी उत्सुकतेने विचारले. त्यानिमित्ताने ऑफिसमध्ये आपले हितशत्रू कोण असावेत याचा मला अंदाज घ्यायचा होता.
‘मला कुणाचा तरी निनावी फोन आला होता. त्यात तुम्ही दिवसाला एक या हिशोबाने महिन्याला तीस कविता लिहिता, अशी कुणीतरी माहिती दिली’ साहेब म्हणाले. ‘तरीच मला आश्चर्य वाटले की ऑफिसमध्ये तर तुम्ही दिवसातून एकही काम पूर्ण करू शकत नाही, मग रोज एक कविता कशी काय लिहिता!’
‘सर, हे माझ्याविरुद्धचे काहीतरी कुभांड आहे. मी एक व्हॉट्सअप ग्रूप सोडला म्हणून हे सगळं सुरू आहे’ मी म्हणालो.
‘ग्रूप सोडला म्हणून? कमालच्ा आहे’ साहेब आश्चर्याने म्हणाले
‘साहेब, तुम्हाला एक प्रश्न विचारू का?’ मी नम्रपणे विचारले.
‘विचारा’ साहेब म्हणाले.
‘तुम्ही कधी कुठला ग्रूप सोडला आहे का?’
साहेब विचारात पडले, त्यांचा चेहराही पडला.
‘एकदा प्रयत्न केला होता, सौ च्या माहेरच्या मंडळींचा ग्रुप होता तो’ साहेब गंभीरपणे म्हणाले.
‘मग काय झालं साहेब?’ मी उत्सुकतेने विचारले.
‘नको आता त्या कटू आठवणी!’ साहेब अचानक पाठीत उसण बसल्यासारखा अविर्भाव करून म्हणाले. त्यांच्या पाठदुखीचे रहस्य मला तेव्हा उमगले. पण त्या दिवसापासून साहेबांचे वागणे मात्र बदलले आणि ते माझ्याशी जरा सहानुभूतीने वागू लागले.
एक ग्रुप सोडला इतकंच, त्याचे एवढे परिणाम होतील असे मला कधीच वाटले नाही. मिल्याने मला कुठल्या संकटात लोटले आहे याची जाणीव झाली आणि त्याचा खूप संताप आला.
आणि मग एक असा प्रसंग घडला जो मी आयुष्यभर विसरुच शकणार नाही. त्या दिवशी ऑफिस मधून घरी यायला थोडा उशीरच झाला. दारातच बायको सचिंत चेहर्याने उभी होती. तिचा चेहरा पाहून मी जरा चरकलोच.
‘का गं काय झालं?’ मी विचारलं.
‘आपला पिंटू मित्रांसोबत खेळायला गेला होता, तो अजून घरी आलाच नाही’ ती म्हणाली.
‘इथेच मित्रांसोबत खेळत असेल’ मी म्हणालो.
‘त्याच्या सगळ्या मित्रांना विचारले पण कुणालाच माहिती नाही’ ती म्हणाली.
आता मात्र मी घाबरलो. रात्रीपर्यंत आम्ही शोधाशोध केली, पण पिंटूचा काही पत्ता लागला नाही. शेवटी कंटाळून पोलिसांना फोन करणार, तेव्हढ्यात माझा फोन वाजला.फोन उचलला तेव्हा समोरचा माणूस बोलला,
‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे!’
‘कोण बोलताय तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला?’ मी घाबरून बोललो.
‘तुमचा मुलगा सुरक्षित आहे, पण तो घरी सुखरूप यायला हवा असेल, तर तुम्हाला आमची मागणी मान्य करावी लागली’ तो म्हणाला.
‘काय हवे आहे तुम्हाला? पाच लाख रुपये हवेत ना? तुम्ही म्हणाल तिथे आणून देतो, पण माझ्या मुलाला सोडा’ मी काकुळतीने म्हणालो.
‘आम्हाला तुमचे पैसे नको आहेत. दुसरंच काहीतरी हवे आहे’ एकेका शब्दावर जोर देत तो म्हणाला.
‘काय हवे आहे तुम्हाला? काही पण मागा पण माझ्या मुलाला अपाय करू नका’ मी म्हणालो.
‘तुम्हाला आमचा ग्रुप पुन्हा जॉईन करावा लागेल’ तो म्हणाला.
‘कुठला ग्रुप?’ मी आश्चर्याने विचारले.
‘तोच आमचा कवितांचा ग्रुप आणि पोलिसांना कळवाल तर याद राखा’ प्रत्येक शब्दावर जोर देत तो म्हणाला आणि त्याने फोन बंद केला. त्याची ती लकब मला ओळखीची वाटली. मी त्याला होकार दिला आणि काही वेळातच पिंटूही परत घरी आला.
तो परत आला तेव्हा चांगलाच आनंदात होता. तो म्हणाला, ‘बाबा, त्या काकांनी मला चॉकलेट तर दिलेच पण वरून चांगल्या बालकविता पण वाचून दाखवल्यात.’
मी डोक्यावर हात मारून घेतला. मग त्याने निरागसपणे विचारले, ‘बाबा, तुम्ही त्यांचा ग्रुप का सोडलात? ते काका तर किती चांगले आहेत’
आता मात्र मला हसावे की रडावे तेच कळेना. अशाप्रकारे मी तो कवींचा ग्रुप पुन्हा जाईन केला! बाजूच्या मंदिरात सोशलानंद महाराजांचे प्रवचन सुरू असावे. इतक्या लांबूनही त्यांचा आणि भक्तमंडळींचा स्वर ऐकू येत होता. फेस विठ्ठल, बुक विठ्ठल
ग्रुप विठ्ठल, अॅडमिन विठ्ठल!
मी संतापाने खिडकी लावून घेतली.
– म्हणूनच सांगतो तुम्ही जर कंटाळून कुठला ग्रुप सोडणार असाल तर दहादा विचार करा! मी ग्रुप सोडला होता, त्याचे काय झाले हे नेहमीच लक्षात ठेवा!