संतोषजी, गॅस झालाय हो… फुकटात आराम पडेल, असा काहीतरी उपाय सांगा ना!
– नाना भिंगार्डे, पाचगणी
काडी लावा… गॅस वासाला सुद्धा शिल्लक राहणार नाही. माझ्यापुढे देशाचे… समाजाचे… जगाचे किती प्रश्न आहेत… तुम्ही कुठे असे प्रश्न विचारताय… (इकडे मलाही सहन होत नाहीय आणि सांगताही येत नाहीय.)
माझ्या डोक्यावर कर्ज खूप वाढलंय… परदेशात पळून जाणं योग्य ठरेल का? की भाजपमध्ये जाऊ?
– विलास उंडे, शेगाव
कशाला पळून बिळून किंवा कुठल्या पार्टीत जाताय… भक्त बना… भक्ती करा… (देवाची). फक्त भक्ती मनातल्या मनात न करता खुलेआम करा… (देवाला) विरोध करणार्यांना विरोध करा… आणि मग बघा कर्जच काय, तुम्ही केलेले कांड सुद्धा माफ होतील… असं लोक बोलतात… (मी सुद्धा आता कर्ज घेऊन बुडवायचा विचार करतोय!)
आजकाल आमदार, मंत्री वगैरे शिवराळ बोलतात, कोणाचीही गचांडी धरतात, मुस्काटीत मारतात… हे जनतेचे सेवक आहेत ना? की राजे आहेत?
– शाल्मली गोडसे, पुणे
मग तुमचं काय म्हणणं आहे… आमदार आणि मंत्री झाल्यावर त्यांनी काय सूत कातावं? सुसंस्कृतपणे वागावं? (तसं वागले तर उगाच ते लोकांना आवडतील. आणि ‘जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला…’ म्हणजे काय हे मंत्री आणि आमदारांना माहीत असल्याने ते आपण देवाला आवडू बिवडू म्हणून घाबरत असतील… म्हणून असे अरेरारीने वागत असतील बिचारे… त्यांच्या मनाविरुद्ध.)
पाण्यात बुडी मारण्याच्या पोषाखाच्या वर पाण्यात बुडू न देणारे टायर परिधान केलेल्या माणसाला काय म्हणतात?
– रोहन पोंक्षे, सदाशिव पेठ, पुणे
नेहमी खरं बोलणारा, जैसा बोले तैसा करणारा, निगर्वी, सर्व धर्म समभाव मानणारा (तुम्हाला काय विचारायचंय ते मला समजलंय.. मला काय उत्तर द्यायचंय ते तुम्ही समजून घ्या… उगाच वेड पांघरून लक्षद्वीपला जायचा प्रयत्न करू नका!)
जराजराशाने ज्यांच्या भावना दुखावतात, ते लोक आपल्या भावना इतक्या नाजुक कशा, याचा विचार का नाही करत? त्यावर उपचार का नाही करून घेत?
– रवींद्र पोकळे, जुन्नर
ज्या धंद्यावर आपण पोट भरतो, तो धंदा आपण बंद करण्याचा विचार करतो का? काय तुम्ही पण विचारताय रवींद्रराव. (माणसं आपापल्या अकलेच्या लायकीप्रमाणे पोट भरतात… कोणी दुसर्याच्या भावना जपण्याचं काम करतो. कोणी स्वत:च्या भावना दुखावून घेण्याचा धंदा करतो.)
राम मंदिर तर झाले, आता रामराज्य केव्हा येईल?
– श्रीराम पितळे, ठाणे
आधी वनवासाची १४ वर्षे पूर्ण होणार, रावणाचा पराभव होणार. मग रामराज्य येणार… (याचा कलियुगातील राजकारणाचा संबंध नाही. रामायणात जसं लिहिलं आहे तसंच उत्तर दिलं आहे.)
कोणत्याही गोष्टीत शेवटी सत्याचा विजय होतो, शेवटी प्रेम जिंकतं, असं सांगितलं जातं… जे योग्य आहे, चांगलं आहे, ते आधी का नाही जिंकतं?
– श्रावणी कांबळे, घाटकोपर
सत्याचा विजय सुरुवातीला झाला तर मग शेवटी काय होणार?? आणि सत्याचा विजय सुरुवातीला झाला तर परत तुम्ही विचाराल सत्याचा विजय शेवटी का होत नाही? (असं नाही करू?… धर्मग्रंथात सांगितलेल्या गोष्टींवर प्रश्न नाही विचारू. नंतर लोकांची माफी मागायची आहे का?)
संतोष साहेब, ही दुनिया गोल आहे की एक जत्रा आहे? जरा समजावून सांगता का मला?
– शीला प्रभू, हडपसर पुणे
दुनिया गोल आहे असं मी म्हटलं तर तुम्हाला ती काय चपटी करायची आहे का? (दुनियेचं ‘वाटोळं’ होतंय यावर आपण बोलूया. तर आपण विचारवंत तरी ठरू.) आणि दुनिया जत्रा आहे की नाही माहित नाही, पण देशाची हास्य जत्रा झालीय (असं विरोधक म्हणतात, मी नाय बोलत ब्वा…).
यंदा मी बारावी परीक्षा देणार आहे. पुढे काय करू ते आपण सांगाल फार बरे होईल.
– ओमकार साळुंखे, माढा, जिल्हा सोलापूर
परत ऑक्टोबरला परीक्षा द्यायची तयारी करा… (स्पष्ट बोललो म्हणून रागावू नका.. बारावीनंतर पुढे काय करू? असा सल्ला माझ्या मुलांनीही मला विचारला नाही. त्यात तुम्ही मला एवढा मान दिल्यावर मी जरा भांबावूनच गेलोय…)