२००२च्या शेवटी आणि २००३ साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांमुळे मुंबईसह देश हादरला. घाटकोपरमध्ये दोन डिसेंबर २००२ रोजी बेस्टच्या बसमध्ये स्फोट होऊन दोनजण ठार झाले होते. पाठोपाठ चार दिवसांनी ६ डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर रेस्टॉरंटमध्ये स्फोट होऊन २१ जण जखमी झाले होते. या आठवणी मुंबईकरांना होत असतानाच २७ जानेवारी २००३ रोजी सायंकाळी ७.३०च्या सुमारास विलेपार्ले (पूर्व) या उपनगरामध्ये भीषण बॉम्बस्फोट होऊन एक महिला ठार झाली आणि २७जण गंभीर जखमी झाले.
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून कर्जतला जाणार्या गाडीत रात्री ९.००च्या सुमारास प्रथम वर्गाच्या डब्यात भीषण बॉम्बस्फोट होऊन ११ जण ठार तर अनेक जण जखमी झाले. एक बॉम्बस्फोट मुलुंड स्टेशनवर झाला. मुंबईत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आणि मुलुंडमध्ये दुसर्या दिवशी उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. १४ एप्रिल २००३ रोजी पश्चिम उपनगरातील वांद्रे येथे क्रूड बॉम्बस्फोटात कृष्णदेव झा हा रखवालदार जखमी झाला. मुलुंडलाही बॉम्बस्फोट झाला. २५ ऑगस्टला झवेरी बाजार परिसरात बॉम्बस्फोट झाला. त्याचवेळी गेटवे ऑफ इंडिया येथे एक शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला, त्यात ५० ठार आणि १६० जण गंभीर जखमी झाले. मुंबईत ९ महिन्यात ७ बॉम्बस्फोट झाले. महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडी सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले.
मुंबई-महाराष्ट्रात पाकधार्जिण्या देशद्रोह्यांनी उच्छाद मांडला. राज्य व केंद्र सरकारच्या छाताडावर नाचून बेधुंद जात्यंध्यांनी ‘पाक झिंदाबाद’चा नारा दिला. हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहणे शिवसेनाप्रमुखांना शक्य नव्हते. ‘सामना’मध्ये अग्रलेख लिहिला गेला ‘हिंदुंनो, नुसते मरत रहा.’ ‘सामना’ने जागृत करण्याचा प्रयत्न केला, तरीही बॉम्बस्फोट थांबले नाहीत. इस्लामी अतिरेक्यांनी २८ जुलै २००३ रोजी घाटकोपर येथे बेस्टच्या बसमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट केला. यामध्ये ५ जण ठार व २५ जण जखमी झाले. शिवसेनेने दुसर्या दिवशी बंद जाहीर केला. हा बंद १०० टक्के यशस्वी झाला.
त्यावेळी शिवसेनेचे शिष्टमंडळ राज्यपाल डॉ. महंमद फजल यांना भेटले आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कडाडले, ‘पाकिस्तानात दहशतवादी कारवाया सुरू करा.’ अतिरेक्यांना फक्त अटक न करता त्यांचा एनकाउन्टर करून खात्मा करा, तरच दहशतवाद चिरडून टाकता येईल.’ पण सरकार नुसते ढिम्म!
दुसरीकडे बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी शिवसैनिक धावला. जखमींना रुग्णालयात हलवणे, आवश्यक तिथे रक्तपुरवठा करणे, रुग्णवाहिका सेवा, आदी सेवाधर्मात तो आघाडीवर राहिला. जखमींची जात-धर्म पाहिला नाही, तर सेवा हाच धर्म मानून शिवसैनिकांनी धावपळ केली. भक्षकाची नाही तर रक्षकाची भूमिका शिवसैनिकांनी नेहमीप्रमाणे बजावली.
दरम्यान, संसदेवर हल्ले करणार्या देशद्रोही अतिरेक्यांचे वकीलपत्र घेणार्या राम जेठमलानी यांच्या मुंबई कार्यालयावर शिवसेना दक्षिण मुंबई विभागातर्पेâ संतप्त शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली.
केंद्रीय ऊर्जामंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात अनंत गीते यांची तसेच अवजड उद्योगमंत्री म्हणून सुबोध मोहिते यांची आणि अर्थ राज्यमंत्री म्हणून आनंदराव अडसूळ यांची यावर्षी निवड करण्यात आली. सुरेश प्रभू यांना मंत्रीपदाचा दर्जा देऊन नद्याजोडणी प्रकल्पाचे अध्यक्ष करण्यात आले. दोन मंत्री, एक राज्यमंत्री आणि नद्याजोडणी प्रकल्पाचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी त्यांच्याकडे आलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. अनंत गीते म्हणाले, ‘विशेष सुधारणांसाठीच्या रु. ३,५०० कोटींचा पुरेपूर वापर केला जाईल आणि ग्रामपंचायत व सहकारी संस्थांना वीज वितरणाचे अधिकार देण्यात येतील’ तर सुबोध मोहिते यांनी ‘नागपूर येथे १००० मेगावॅट विद्युत प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली. त्यांनी विदर्भात अवजड उद्योग आणण्यासाठी रतन टाटा यांच्याबरोबरही चर्चा केली. तिघा केंद्रीय मंत्र्यांनी आपला ठसा उमटवला.
२१व्या शतकातील जलनीती या चर्चासत्राचे, हरितक्रांतीचे जनक आणि सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी मुंबईत उद्घाटन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रीय जलविश्वस्त मंडळ स्थापन करण्यात यावे अशी सूचना केली. तर सुरेश प्रभू यांनी सांगितले की जलनीती, जननीती आणि वननीती या त्रिमूर्ती एकत्र आल्या तरच विकास शक्य आहे. आपले अध्यक्षपद किती मोठे आहे हे सांगताना सुरेश प्रभू यांनी नद्याजोडणी प्रकल्पाची गरज किती मोठी आहे हे सांगितले आणि पाण्याला राजकारणापासून दूर ठेवा अशी विनंती केली. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, हिंदुस्थानातील पाणी प्रश्नावर काम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. देशातील नद्याजोडणी प्रकल्प अंमलात आल्यास हिंदुस्थान जगातील एक महाशक्ती बनू शकेल.
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एनडीएच्या घटक पक्षांचा मान कायम राखला. खासदारांच्या संख्येनुसार केंद्रीय मंत्रीपदे दिली. त्यामुळे शिवसेनेकडे दोन केंद्रीय मंत्रीपदे, एक केंद्रीय राज्यमंत्रीपद आले. लोकसभेच्या अध्यक्षपदी मनोहर जोशी होते, तर सुरेश प्रभू यांच्यावर नद्याजोडणी प्रकल्पाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. २०१४ व २०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. परंतु पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेला एक केंद्रीय मंत्रीपद देऊन बोळवण केली. श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांनी युतीधर्म पाळला. नंतरच्या भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांनी तो हुकुमशाही वृत्तीने पायदळी तुडवला.
उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या सरकारने रामभक्त आंदोलकांवर बंदी घातली. तेव्हा उत्तर प्रदेशातील सुमारे १५०० शिवसैनिकांनी बंदी झुगारून अयोध्येत मुसंडी मारली.
ठाण्याचे शिवसेनेचे आमदार व पहिले जिल्हाप्रमुख मो. दा. जोशी यांचे निधन झाले. तत्पूर्वी २००१ साली धर्मवीर आनंद दिघे यांचेही निधन झाले होते. मो. दा. जोशींच्या निधनाने हा दुसरा धक्का ठाण्यातील शिवसैनिकांना बसला. पण ठाण्यातील शिवसेना पदाधिकार्यांनी व सामान्य शिवसैनिकांनी खचून न जाता ठाण्यातील शिवसेनेचे समाजकार्य सुरूच ठेवले. सामाजिक बांधिलकीत कुठलीही कसर बाकी ठेवली नाही.