जगात कुठे काही फुकट मिळते का? मिळत असेल तर त्याबद्दल आपल्या मनात शंका यायला हवी. पण तसे फार कमी वेळेला घडते.
सायबरविश्वात वावरताना कुणी मोफत सॉफ्टवेअर अथवा कोणत्या आकर्षक फाईल देण्याची ऑफर दिली तर काहीजण फुकट मिळतंय तर पदरात पाडून घ्या, असा विचार करून पुढचा मागचा विचार न करता बेधडकपणे पाऊल टाकतात. पण ही कृती करताना त्यामध्ये मोठा धोका असतो, याचा विचार कितीजण करतात? यातूनच ही मंडळी स्वतःची फसवणूक करून घेतात. हा सगळा प्रकार हा मीडिया बेटिंग म्हणून ओळखला जातो. (या बेटिंगचा बेट लावण्याशी काही संबंध नाही. मासे पकडण्यासाठी गळाला आमिष लावतात, त्याला बेट (bait) म्हणतात, त्या अर्थाचं हे baiting असतं.) माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एखादी गोष्ट फुकट मिळते म्हणून तिच्यामागे धावणे म्हणजे, आपण स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. आपली फसवणूक करून घेण्याचा हा एक प्रकार आहे. अशा प्रलोभनाच्या मोहात न पडता त्यापासून दोन हात दूर राहायला हवे.
मीडिया बेटिंगमध्ये सायबर चोरटे मालवेअर (म्हणजे तुमच्या संगणकामध्ये गुपचूप शिरून तिथली संवेदनशील माहिती चोरणारी, उलथापालथी घडवणारी घातक सॉफ्टवेअर) घातलेलं सॉफ्टवेअर अथवा मोहक आणि आकर्षित करणार्या फाइल्स मोफत डाऊनलोड करण्याच्या ऑफर देतात. सतत मोफत मिळवण्याचा सोस असलेली, तंत्रज्ञानाच्या बाबतीत फारशी जागरूक नसणारी मंडळी सहजपणे त्या मोहाला बळी पडतात आणि फसगत करून घेतात. यात आपल्या सगळ्या माहितीची चोरी तर होतेच, पण आपला मोबाईल, संगणक यांनाही धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण होते. ही थरारक कहाणी वाचा म्हणजे हे काय प्रकरण आहे ते कळेल.
ऑनलाइन क्षेत्रात हातखंडा असणारा एक ग्रुप होता. तो ‘द डिसेप्टिव्ह डाउनलोडर्स’ या नावाने ओळखला जायचा. मोबाईल, संगणकांशी छेडछाड करून फसवणूक करण्याचे धोरण त्यांनी आखले होते. त्यासाठी त्यांनी एका धूर्त योजनेची आखणी केली होती. या फसव्या ग्रुपने एक लोकप्रिय टोरंट वेबसाइट निवडली, जी पायरेटेड सामग्री होस्ट करण्यासाठी कुख्यात होती. (टोरंट हा मोठ्या आकाराच्या फाइल्स तुकड्या तुकड्यांमध्ये विभागून वेगवेगळ्या ठिकाणांहून एकाच वेळी डाऊनलोड करण्याचा एक फॉरमॅट आहे, मात्र, त्यातून बहुतेक ठिकाणी कॉपीराइटचा भंग करून पायरेटेड सिनेमे, व्हिडिओ, वेबसिरीज, गाणी, गेम्स आणि सॉफ्टवेअर वगैरे डाऊनलोड करण्याची बेकायदा सोय करून दिली जाते). वापरकर्त्याची मोफत सॉफ्टवेअर आणि मीडिया फाइल्सची भूक लक्षात घेऊन या ग्रूपने धोकादायक मालवेअर तयार केलं होतं. डिजिटल नाइटच्या कव्हरखाली, द डिसेप्टिव्ह डाऊनलोडर्सनी टोरंट वेबसाइटच्या पायाभूत सुविधांमध्ये घुसखोरी करत त्यांनी लोकप्रिय चित्रपट, संगीत आणि सॉफ्टवेअर म्हणून मुखवटा घातलेल्या बनावट फायली तिथे लावल्या होत्या.
या फायलींच्या माध्यमातून त्या डाऊनलोड करणार्या मंडळींची माहिती जमा करण्याचा उद्योग यशस्वीपणे केला जात होता. त्या बनावट फाइल्समध्ये ‘सुपरफास्ट इंटरनेट बूस्टर’ आणि ‘एक्सक्लुझिव्ह प्री-रिलीज मूव्ही’ यांच्यासारखी आकर्षक शीर्षके चिकटवण्यात आली होती. या ठिकाणी सर्च करणारी मंडळी देखील मोफत काहीतरी मिळण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढे कोणते धोके आहेत का, याचा विचार न करता धडाधड डाऊनलोड करत होती.
यांच्यातलाच एक होता आशुतोष. त्याला सिनेमे पाहण्याची विशेष आवड होती, नव्या सिनेमाचा शोध घेत असताना तो या जाळ्यात अलगद फसला. त्याने एक्सक्लुझिव्ह प्री-रिलीज मुव्हीमध्ये जाऊन तिथले सिनेमे डाऊनलोड केले. त्याच्यासोबतच अनेकांनी त्या आकर्षक आणि मोहक दिसणार्या फाइल्सचा लिंक डाऊनलोड केल्या. हा सगळा फसवा प्रकार होता, त्यामुळे ओघानेच त्याचा मोबाईल आणि संगणक यावर त्याचा चांगलाच दुष्परिणाम झाला होता. त्यानंतर या ग्रुपने त्याचा वापर करून एक भयानक मोहीम सुरू केली. हे डाऊनलोड करणार्या व्यक्तींना एक मेसेज पाठवून तुमची सर्व माहिती आमच्याकडे आहे, ती आम्ही कधीही उघड करू शकतो, अशी धमकी दिली, त्यामुळे या सगळ्या मंडळींची भीतीने गाळण उडाली. आशुतोषलाही असा मेसेज आला. हा काय प्रकार आहे, याचा शोध घेण्यासाठी त्याने आयटीमध्ये काम करणार्या मित्राला फोन करून हा प्रकार सांगितला. तू, एखाद्या साइटवरून फाइल डाऊनलोड केली होतीस का, अशी विचारणा करताच त्याने एका साइटवरून काही सिनेमांच्या फाइल्स डाऊनलोड केल्या होत्या, असे आशुतोष म्हणाला. त्यावर ‘अरे, बापरे’ अशी प्रतिक्रिया देत तो मित्र म्हणाला, तिथेच गडबड झाली आशुतोष! त्या फाइलच्या माध्यमातून तुझ्याकडील माहिती समोरच्या व्यक्तीने चोरली आहे, त्याचा आधारे तुला आता धमकी देण्यात येत आहे. या मंडळींनी काहीजणांची संवेदनशील माहिती उघड केली होती, या प्रकारामुळे त्यांचे धाबे दणाणले होते. आता पुढे आणखी काय होणार, या चिंतेने त्यांना ग्रासले होते. अखेरीस त्यांनी एका प्रसिद्ध सायबरतज्ज्ञाची मदत घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. दुसर्या बाजूला पोलिसांकडे त्याची तक्रार देण्यात आली. सायबरतज्ज्ञाने आणि पोलिसांनी एकत्रपणे तांत्रिक गोष्टीचा आधार घेत हा सगळा प्रकार कसा आणि कुठून घडला याचा शोध घेतला, तेव्हा कोलकात्यामधील एका गावातून चार-पाच तरुणांच्या टोळक्याचा शोध लागला. काहीतरी फुकट मिळवण्याच्या नादात गेलेली मंडळी त्यांच्या जाळ्यामध्ये सहजपणे फसली होती. मीडिया बेटिंगच्या या प्रकारापासून आपण स्वतःला दूर ठेवू शकता, त्यासाठी काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
हे लक्षात ठेवा…
– इंटरनेटवर कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, ज्या ठिकाणी मोफत शब्द येतो, तिथे फसवणूक होऊ शकते, हे डोक्यात ठेवा.
– आपल्याला माहित नसणार्या स्त्रोतांकडून फायली डाऊनलोड करताना कायम जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. ज्या गोष्टी मोहक असतात तिथे फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. सावधगिरीवर भर द्या. फुकट आणि आकर्षक दिसणार्या गोष्टींपासून कायम दूरच राहणे पसंत करा.
– सायबर सुरक्षेबाबत कायम जागरूक राहा. स्वत:ला कायम अपडेट ठेवा.
– आपल्या संगणकामध्ये अँटीव्हायरस यंत्रणा अपडेट करा, त्यामुळे कधी कोणत्या मालवेअरने चुकून संगणकामध्ये प्रवेश केला तर त्याला रोखता येणे सहजशक्य होईल. आपला संगणक, मोबाईल यामध्ये आवश्यक असणारी अँटीव्हायरस यंत्रणा कायम अपडेट ठेवा. फसव्या प्रलोभनांना बळी पडू नका.
– आपल्या संगणकाची ऑपरेटिंग सिस्टम, सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन्स नियमितपणे अपडेट ठेवण्यास कायम महत्व द्या, त्याच्या सुरक्षेवर कायम भर द्या.