सरधोपट सकाळचा पेपर चष्माच्या काचेतून बारीक बघत गोंगाट करणार्या टीव्हीसमोर बसून चहा घेत आहे. तोच उचके आत येतो.
‘येऊ का धोपट?’ उचके औपचारिक विचारत थेट सोफ्यावर येऊन बसतो.
‘तुम्ही होय? तुम्हाला केव्हापासून परवानगी घ्यावी लागतेय? या! अगं, ऐ! चहा आणते का?’ सरधोपट उचकेचं स्वागत करत थेट बायकोला आवाज देतो.
‘नको रे! आताच बौद्ध पोरांनी फुले जयंतीचे पेढे वाटले. त्यातले काही खाल्ले. त्यामुळं त्यावर चहा जाणार नाही,’ उचके चहाला नकार देतो.
‘म्हणजे ती पोरं इथं आली होती? आपल्या सोसायटीत?’ सरधोपट आश्चर्याने विचारतो.
‘नाही रे! चौकातून आलो ना? तिथे हे सगळं चालू होतं,’ उचके माहिती देतो.
‘बौद्धांच्या हातचे पेढे… नाही, तसं आमच्या ऑफिसमध्ये एक आदिवासी आहे बरं का?’ सरधोपट जरा चाचरत काही बोलू पहातो.
‘तुमचं गाव कोणतं?’ मध्येच सरधोपट शंकेनं गुगली टाकतो.
‘मी? ते टेंभे झरेगावचा राहणार. कामानिमित्त गाव सोडलं आणि फिरत फिरत इथे आलो… पण काहो? अचानक कसं काय विचारलंत?’ उचकेचा स्वाभाविक प्रश्न.
‘टेंभे झरेगाव? अर्रर्रर्र! म्हणजे तुम्ही आमचेच की हो! काही नाही. आधी खात्री करून घेतो मी! तसे आम्ही जात मानत नाही. पण दुसरं कुणी असलं तर वेगळा अर्थ काढतं ना? म्हणून हो! केवळ!’ दात दाखवत सरधोपट निलाजरेपणा दाखवतो.
‘मी गोडधोड कुणाच्याही घरचं खातो, फक्त मुसलमान सोडून,’ उचके सुरात सूर मिसळतो.
‘तेच मी पण जातबीत बघत नाही. फक्त लोरे बाबांचं जिथं नाव घेतलं जात नाही, तिथं मी पाणी पीत नाही,’ सरधोपट पेपर ठेवत माहिती देतो.
‘लोरे बाबा? मी कधी गेलो नाही, त्यांच्या मठात. पण नाव फार ऐकलंय!’ उचके हात जोडत भक्तिभाव दाखवतो.
‘हेच आपले संस्कार काही जातींत दिसत नाही. ते सरळ शिवीगाळ करतात. आता लोरे बाबांनी सर्वच जातीजमातीच्या भक्तांना आश्रय दिलाय की नाही? तरी त्यांची बदनामी?’ सरधोपट त्रागा करतो.
‘जाऊ द्या हो! आपल्याच जातीने ह्यांच्या लोकांना मोठा माणूस म्हणून डोक्यावर बसवलंय. त्यामुळे ही लोकं असलं धाडस करतात,’ उचके बोलता बोलता मागे बघतो. सरधोपटची मुलगी सावी मागील सोफ्यावर येऊन बसते.
‘खरंय! आपली लोकं सहज सगळ्या जातींच्या लोकांत जाऊन जेवण करतात, बसतात. उठतात. बोलतात. आता तर आपल्या जातीची पोरं लग्न करून यांच्या आणि निरनिराळ्या जातीच्या पोरी करून आणतायत. समाज स्वीकारतोय ना त्यांना?’ सरधोपट आणि उचकेत जातीची भलामण करण्याची चढाओढ लागते.
‘खरंय! आमच्या पुतण्यानं एक बामनाची, भाच्यानं माळ्याची, साल्याच्या साडूच्या पोरानं दलित पोरगी पळवून, कोर्ट मॅरेज करून आणली. कुणीच खळखळ केली नाही,’ उचके पुढल्या पायरीवर बसतो.
‘मी तर ऑफिसातल्या आदिवासीचा डब्बा रोज खातो,’ सरधोपट आणखी वरच्या पायरीवर बसतो.
‘नाही, आम्हीही ऑफिसात एकत्र बसतो जेवण करण्यासाठी! वेगळं नसतं त्यांत काही,’ उचके माघार घेत नाही. तोच टीव्हीवर एक नेत्याचा लाईव्ह बाईट दाखवणं चालू होतं…
‘हा पक्का जातीयवादी माणूस. याच्यामुळे आणि याच्या कार्यकर्त्यांमुळे महाराष्ट्रात जातीयवाद पसरला आहे बघ. हा नेहमी त्याच्या जातीबद्दल बोलतो,’ सरधोपट आक्रमक होत बोलतो.
‘बाबा, मागासांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी मेळावे घेऊन सामाजिक, जातीय विषय मांडण्यात कसला आलाय जातीयवाद? उलट ते त्यांच्या जातीवर होणार्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध भांडत आहेत. त्यांना वाचा फोडत आहे… ‘ सावी न राहवून मध्येच बोलते.
‘मग मग आपल्या नेत्यांनी असं काही बोललं तर? उद्याच्या पेप्रात, बातम्यांत त्यांचा उद्धार केला जाईल ना?’ सरधोपट लंगडं समर्थन करतो.
‘बाबा, आपल्या जातीचा सामाजिक आर्थिक स्तर उंच आहे ना? आपल्यावर कोण अत्याचार करतंय? उलट आपण ब्राह्मण्याच्या पखाली आहोत…’ सावी आणखी बोलू पाहाते.
‘काहीही नको बोलू. तुला काय कळते जात? आता तू आणि तुझ्या मैत्रिणी एकाच शाळेत शिकतात. एकाच बेंचवर बसतात. एकत्र जेवण करतात. आता कुठे राहिलाय जातीयवाद? आणि कोण राहिलंय मागास? उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,’ सरधोपट त्याचं सरधोपट आकलन मुलीला ऐकवतो.
‘मग आता पहिल्यासारखं राहिलं नाही. सगळ्या लोकांकडे किमान मोटरसायकल आलीय ना? आता कुणी मागास राहिलंच नाही. मी तर म्हणतो, आता आरक्षणाची सुद्धा गरज राहिली नाहीय. ते सुद्धा काढून टाकलं पाहिजे. त्याच्यामुळं जातीयवाद वाढलाय,’ उचके सरधोपटला खुल्ला पाठिंबा देतो.
‘अगदी माझ्या मनातलं बोलला उचके तुम्ही!’ सरधोपट टाळ्या पिटतो.
‘खरंच बाबा, जातीय भेदाभेद, अस्पृश्यता, जाती आधारित अन्याय्य अत्याचार संपलाय असं तुम्हाला वाटतं?’ सावी बापाला प्रश्न घालते.
‘तर तर..!’ सरधोपट ठाम राहतो.
‘मग बाबा आपल्या सोसायटीत किती लोक दलित आणि मागास जातींतली आहेत हो?’ सावी प्रश्न करते.
‘कदाचित नसतीलच! पण त्यांना घेता आला असता की फ्लॅट! कुणी अडवलं होतं?’ सरधोपट मुलीला काहीतरी उत्तर देतो.
‘समजा ह्या सोसायटीत आपल्या आधी दहाएक दलित आदिवासी किंवा भटक्या जातींतल्या कुणी फ्लॅट घेतले असते तर आपण इथे आलो असतो?’ सावी बापाला कोडं घालते.
‘परवडलं असतं तर घेतलंच असतं की! काय उचके? आपण फक्त सोयीसुविधा बघतो. बाकी…’ सरधोपट लटकं समर्थन करतो.
‘ बाबा, माझ्या कॉलेजजवळच्या एका हाऊसिंग सोसायटीत यापेक्षा स्वस्त फ्लॅट मिळत असताना केवळ समोरचा फ्लॅट कुणी दलित व्यक्तीने घेतलाय हे कळताच तुम्ही बुकिंग रद्द करून आला होता. आठवतं?’ सावी बापाला कोंडीत पकडते.
‘नाही, तिथल्या फॅसिलिटी खराब होत्या. शिवाय डीलर…’ सरधोपट लंगडी बाजू सावरू बघतो.
‘बाबा, तुम्ही मित्र म्हणून ज्या काकांना आणता, त्यात आपल्या आणि वरच्या जातींतल्यानाच घरी का आणता? त्या दिवशी बाजारात एकजण भेटला. करवंद विकत होता. त्याकडून मित्र म्हणून फुकट करवंदं घेतलीत. पण त्यांना ह्या दाराच्या आत कधी येऊ दिलं नाही. का?’ सावी एक एक मुद्दा उकरून काढते.
‘अगं, त्याची बायामुलींबद्दल नजर वाईट आहे…’ सरधोपट मोघम एक आरोप आपल्याच मित्रावर लावतो.
‘मग त्याच्या हातून मला करवंद घ्यायला लावली होती, तेव्हा तीच नजर शुद्ध झाली होती का? आणि ते एक काका इथं सोफ्यावर बसून बायांबद्दल वाईट कमेंट करत असतात. ते आपल्या नात्यातले म्हणून त्यांना घरात आणता ना?’ सावी बापाला घेरते.
‘नेमकं कोण गं?’ सरधोपट अगदी अज्ञान बनत विचारतो.
‘तेच बाई म्हणजे पायातलं पायताण म्हणणारे काका. त्यांची मुलींकडे बघण्याची नजर किती हिणकस आहे. श्शीः! तुम्ही त्यांना तरीही घरात घेऊन येता. माझ्या मैत्रिणी ते असले की बाहेरच थांबतात…’ सावी तक्रार करते.
‘अगं आधी नाही का सांगायचं?’ सरधोपट उसणं अवसान आणतो.
‘मी तर असले वाईट नजरेचे लोकं बाहेरच…’ उचके बापलेकीत मध्येच बोलू बघतो.
‘तुमचं सांगू काय?’ सावी उचकेवर एक जळजळीत नजर फेकते. तसा उचके घाईने निघून जातो.
‘बाळा, तू मला सांगत जा ना! असं ह्या गोष्टी…’ सरधोपट मुलीचं मन राखण्याचा प्रयत्न करतो.
‘बाबा, मी लिव्ह इनमध्ये राहायचं ठरवते आहे. जोडीदार भटक्या जातींतला आहे. हे सांगू?’ सावी एकदम विषय पालटते.
‘मूर्ख! थोडी मोकळीक दिली तर मन मानेल ते करशील? अगं ऐकते का? आपली पोर गुण उधळायला लागली. माझंच चुकलं. लोरे बाबा म्हणत होते तसं सेकंड इअरलाच हात पिवळे करून द्यायला हवे होते,’ सरधोपट चिडतो.
‘बाबा, माझ्या आयुष्यात सध्या कुणीही नाही. फक्त तुमच्या डोक्यात जात आणि पुरुषसत्ताक वृत्ती कशी बसलीय ते दाखवायला मी असं बोलले. जात न मानणारे तथाकथित तुम्ही आपल्या मुलीनं भटक्या जातींतल्या मुलाबरोबर राहणं, हे सहनच करू शकत नाही. एकतर तुमच्या लेखी बायको-मुलगी म्हणजे इभ्रतीच्या वस्तू! बरोबर ना? त्यांना स्वातंत्र्य कसं देणार ना तुम्ही?’ सावी कडाडते.
‘चार बुकं शिकलीस म्हणजे बापालाच ज्ञान देशील? इथून पुढं तुझं बाहेर फिरणंच बंद करतो मी! थांब!’ सरधोपट लेकीला धमकी देतो.
‘मी चाललेय फुलेवाड्यात. मैत्रिणींसोबत. पुढचे चार दिवस माणसाला पशुचा माणूस बनवणार्या दोन गुरुशिष्याच्या जयंत्या आहेत. त्यांकडून तुमच्यासाठी काही ज्ञान घ्यायला मी जाणार आहे. समताआधारित समाजनिर्मितीत मीही खारीचा वाटा उचलणार आहे. जय ज्योती! जय भीम!’ सावी पाठीला बॅग अडकवून बाहेर पडते.
सरधोपट केवळ बघत बसतो.