स्वास्थ्य चांगलं असेल तर आरोग्यावरचा वैयक्तिक खर्च कमी होईल. यावरील ‘शशिकांत अहंकारी : दृष्टी आरोग्यक्रांतीची’ या ‘साधना प्रकाशना’कडून लवकरच प्रकाशित होत असलेल्या पुस्तकातील काही अंश.
– – –
अतुल देऊळगावकर
शशिकांत व शुभांगी या अहंकारी दांपत्याने ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’च्या साथीदारांना सोबत घेऊन गावोगावच्या निराधार आणि न शिकलेल्या महिलांना बहुश्रुत केलं. त्यांनी आत्मसन्मान म्हणजे काय हे माहीत नसणार्या महिलांचं मन, भावना आणि विचार यांना आकार दिला. त्यातून ‘गावाचा मनोभावे सांभाळ करणारी एकल महिला’ ही अशक्यप्राय वाटणारी कल्पना प्रत्यक्षात आली. गावांमध्ये स्वतःच्या घराच्या आत कोणाला किती येऊ द्यायचं हे जात पाहूनच ठरत असे. भारतवैद्य ते वातावरण भेदू शकल्या. त्या घटनेने बंदिस्त रचना असेलल्या गावांची (आणि तिथल्या घरांची) कवाडं उघडली गेली. शशिकांत यांनी त्या महिलांसाठी उत्तम सामाजिक भांडवल उपलब्ध केलं. त्यामुळे त्या महिलांना ‘आरोग्याचा अर्थ आम्हासिंच ठावा’ असा दुर्दम्य आत्मविश्वास आला. त्या इतर महिलांमध्ये, घरांमध्ये आणि गावांच्या सार्वजनिक आरोग्यामध्ये बदल घडवू शकल्या. त्यामुळे सामाजिक बदलाची अखंड शृंखला अभिक्रिया सुरू झाली आणि अचानक ११ मार्च २०२०ला ‘जागतिक आरोग्य संघटने’ने कोरोनाचा उद्रेक ही जागतिक महामारी असल्याची घोषणा केली. भारतात २४ मार्च २०२०च्या संध्याकाळपासून एकवीस दिवसांची संचारबंदी देशभर लागू करण्यात आली. एका विषाणूने समस्त जगाचे व्यवहार ठप्प पाडले. कोरोनाने २०२० व २०२१ या दोन वर्षांत भारतात चाळीस लाख तर जगात सुमारे सात कोटी बळी घेतले.
कोविड-१९च्या महासाथीमध्ये उपचारप्रणाली कशी असावी, कोविड-१९ वर निघालेल्या लसी खरोखरच उपयुक्त आहेत का, याबाबत जागतिक आरोग्य संघटना, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था आणि जगभरातील इतर शास्त्रज्ञ यांपैकी कुणाकडेही ठोस उत्तर किंवा उपाय नव्हता. मत-मतांतरांचा गदारोळ होता. कोणी बाबा-बुवा कोविड-१९ दूर करणारं आयुर्वेदिक रामबाण औषध सापडल्याचा दावा करत होते. ‘पणत्या दिवे लावून, ताटं थाळ्या वाजवून किंवा मंत्रोच्चार करून विषाणू निघून जातात’ असे समज करून दिले जात होते. काही जण वनस्पती काढे घेत होते, तर कुणी होमिओपॅथीची औषधं. सर्व औषध कंपन्यांनी त्या अज्ञानाच्या आणि भीतीच्या गोंधळात हात धुवून कमाई करून घेतली. कोरोनाची महामारी वेगाने पसरत, बळी घेत चालली होती. लोकांमध्ये विलक्षण भयाचं आणि असुरक्षिततेचं वातावरण होतं.
लोकं कोरोनाचा संसर्ग झालेली व्यक्ती आणि त्याचं घर यांच्याशी कटाक्षाने संबंध टाळत होते. कोरोना म्हणजे मृत्यू ही भावना बळावली. मित्र परिवार, नातेवाईक यांच्या निधनाच्या बातम्या ऐकून अनेकांना मनोविकार जडू लागले. औदासीन्य आणि विषण्णता यांची समाजावर दाट छाया बराच काळ टिकून राहिली. पुरुषांची मानसिकता दिवसभर घरात बसून राहण्यामुळे बिघडली होती. अस्थिरता व असुरक्षितता यांमुळे त्यांचा चिडचिडेपणा वाढला. कित्येकांची व्यसनाधीनता वाढली. परिस्थितीबद्दलचा सारा संताप घरातील बायकांवर निघू लागला. कौटुंबिक हिंसाचारात मोठी वाढ झाली. शशिकांत त्या सर्व घटनांनी चिंताग्रस्त झाले.
लोकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी देशातील व महाराष्ट्रातील आरोग्य चळवळीतील जाणकार अनेक मार्गांनी प्रयत्न करत होते. अनंत फडके, मोहन देस, शशिकांत आणि शुभांगी अहंकारी, मनीषा गुप्ते, आनंद निकाळजे, अशोक बेलखोडे, क्रांती रायमाने आणि विजय गायकवाड, आदी डॉक्टर मंडळी वारंवार सोशल मीडियाचा वापर करून एकमेकांशी आणि लोकांशी संवाद साधत होते. सुयोग्य व साधे उपचार कसे असावेत, याची माहिती देत होते. लेख लिहून कोरोनाची अनाठायी भीती व गैरसमज दूर करत होते.
‘कोरोना’सारख्या अक्राळविक्राळ संकटाला सामोरं कसं जावं, यावर भारतात व महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात मंथन घडत होतं. अनेक मतमतांतरं सोशल मीडिया आणि दृक्श्राव्य संवादयंत्रणा यांतून व्यक्त होत होती. त्या विषयावर डॉ. शशिकांत यांचं मत जाणून घेण्यासाठी त्यांना अनेक ठिकाणी बोलावलं जात होतं. डॉ. शशिकांत म्हणत, ‘आरोग्यसेवेमध्ये ‘फर्स्ट काँटॅक्ट केअर’ला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तिचा आरंभ गावापासून सुरू झाला पाहिजे. गावातल्या आरोग्यसेवा देण्यासाठी प्रशिक्षित व्यक्तीची आवश्यकता नाही. रुग्णाची लक्षणं ओळखून त्यांना प्राथमिक सेवा देणं व तातडीची काळजी घेता येणं, इतपत ज्ञान असलेली व्यक्ती गावातच असायला हवी. ती आरोग्ययंत्रणेचा भाग झाली पाहिजे. आम्ही याच संकल्पनेतून ‘भारतवैद्य’ तयार केले आहेत. त्यांच्यामार्फत गावातील जवळपास ८० ते ८५ टक्के आजार बरे करणं शक्य झालं आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ‘आशा’ कार्यकर्तीची नेमणूकही याच मॉडेलच्या आधारे झाली आहे. त्यांची उपयोगिता व त्यांचं मूल्य आता सर्वांच्या लक्षात येत आहे.’
आरोग्ययंत्रणांच्या प्रकृतीचं अचूक निदान करणारे शशिकांत, गावपातळीवर कोरोनासंबंधी घ्यावयाची काळजी आणि प्राथमिक उपचार यांसाठी नियोजन करू लागले. त्यांनी शंभर गावांतील उत्साही तरुण-तरुणींना गावाचे ‘प्रेरक’ आणि ‘प्रेरिका’ अशा स्वरूपात तयार केलं. त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत कोरोना साथीसंबंधी आरोग्याचं आवश्यक प्रशिक्षण दिलं. जेव्हा इतर गावांतले लोक वेशीवर बसून गावाकडे येणार्या मजुरांना निष्ठूरपणे हाकलून, परतवून लावत होते, तेव्हा ‘हॅलो’चे ‘प्रेरक’ व ‘प्रेरिका’ शरीरावर नखशिखांत सुरक्षित आच्छादन (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) घालून आणि हातात ध्वनिक्षेपक घेऊन सांगू लागल्या की ‘कोरोनाची ही केवळ आपल्यावरच नाही, तर संपूर्ण जगावर ओढवलेली आपत्ती आहे. आपणच आपलं, आपल्या कुटुंबीयांचं, तसंच आपल्या गावाचं रक्षण करूया. बाहेरगावी गेलेले आपलेच लोक आपल्याच गावी परत येत आहेत. ते त्यांना वाहन मिळत नसल्यामुळे शेकडो किलोमीटर चालत येत आहेत. अशा बिकट प्रसंगी गावांनीच त्यांना वार्यावर सोडलं, तर त्यांनी जावं तरी कुठे? ते आपलेच आहेत. त्यांना आपण गावात येऊ देऊ. त्यांना वेगळं ठेवून त्यांची काळजी घेऊ.’ ‘हॅलो’ची गावं आणि इतर गावं यात फरक होता तो असा!
‘प्रेरक’ आणि ‘प्रेरिका’ कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर सलोखा राखून कोरोनासंबंधी काळजी कशी घ्यावी, ते लोकांना समजावून सांगू लागले. त्याच वेळी प्रशासनासही सहकार्य करू लागलं. प्रेरक-प्रेरिकांनी लोकांना अन्नधान्य पुरवण्यासाठी मदतीचं आवाहन केलं आणि लोहारा-तुळजापूर तालुक्यातील पंधरा गावांतून मदत करणारे दानशूर लोक पुढे आले. जवळपास पन्नास क्विंटल धान्य जमा झालं. ते पुरेसं नव्हतं. लॉकडाऊनच्या काळात अल्पभूधारक आणि हातावर पोट असणारे लोक मेटाकुटीला आले होते. एकल महिला, मनोरुग्ण, निराधार आणि वयोवृद्ध यांचे हाल सुरू होते. ‘स्विस एड’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहयोगातून तशा ८६० कुटुंबांना दोन महिने पुरेल एवढा शिधा पोचवला गेला. सामूहिक स्वयंपाकघर उभारून तीनशे निराधारांना दोन वेळेचं जेवण पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली. दोनशे एकल महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचं अर्थसाहाय्य केलं गेलं. ‘सिपला फाऊंडेशन’मार्फत ऑनलाइन पद्धतीने पंचेचाळीस एकल महिलांना शिवणयंत्रावर चेहर्याचे मास्क शिवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं. त्यांना मास्कची निर्मिती व वितरण करून रोजगार मिळवून दिला.
संभाषण ठप्प पडत आहे, हे जाणवत होतं. त्याचा ताण वाढू नये. गावकर्यांना एकाकी वाटू नये. यासाठी त्यांनी तणावग्रस्त लोकांना हेरून त्यांच्याशी बोलण्याचा उपक्रम सुरू केला. देशभर गृहबंदी लागू असताना ‘हॅलो’चे चाळीस ‘मानसमित्र’ घराघरांत अडकून पडलेल्या लोकांचं मनोबल उंचावण्यासाठी समुपदेशन करत होते. तर ‘सावली’ आणि ‘हॅलो’चा ‘वनस्टॉप सेंटर’ उपक्रम, या दोन्ही ठिकाणी कौटुंबिक कुरबुरींवर समुपदेशन सुरू होतं. मुद्दाम नोंदवण्यासारखी बाब अशी की लॉकडाऊनच्या काळातदेखील ‘हॅलो’चं कार्यालय सुरूच होतं.
लॉकडाऊनच्या काळातली एक घटना. एके दिवशी एक वेगवान मोटारसायकल शशिकांत यांच्या घराजवळ येऊन थांबली. अणदूरजवळच्या धनगरवाडीची दोन मुलं एका बेशुद्ध मुलीला घेऊन आले होते. पाठोपाठ आणखीही काही माणसं आली. त्यातल्या एका वयस्कर माणसानं सांगितलं, ‘संगीतानं फाशी घेतली होती.’ तो गुन्हा असल्याने ती पोलीस केस होती. त्यात धोकाही होता. पण ही सारी माणसं शशिकांत यांच्या ओळखीची होती. शशिकांत यांनी त्या मुलीचा जीव वाचवणं गरजेचं असल्यानं लगेच उपचार सुरू केले. तिची हृदयक्रिया बंद पडली होती. त्यामुळे त्यांनी सी.पी.आर. (कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन) देऊन तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. इमर्जन्सीच्या वेळी केले जाणारे इतर उपचारही केले. संगीताने अर्ध्या तासानं डोळे उघडले. तिनं सर्व काही सुरळीत झाल्यावर शशिकांत यांना सांगितलं, की टाळेबंदीमुळे शाळा बंद होत्या. पण ऑनलाइन शिक्षण सुरू होतं. ते घेण्यासाठी तिच्याकडे मोबाइल नव्हता. तिच्या भावाला मोबाइल मागितल्यावर त्यानं तो द्यायला नकार दिला. तिनं आजोबांकडे त्याची तक्रार केली. तर त्यांनी, ‘तुला शिकून काय करायचंय?’ असं दरडावत तिलाच मारलं. ते तिच्या मनाला इतकं लागलं, की तिनं रागाच्या भरात फाशीच घेतली.
शशिकांत यांनी तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. त्यांनी तिला पुढील उपचारासाठी सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवून दिलं. मात्र, ते त्या घटनेमुळे कमालीचे अस्वस्थ झाले. ते नेहमी म्हणायचे, तसा हा केवळ आरोग्याचा प्रश्न नव्हता. तर गरिबीचा, लिंगभाव असमानतेचा आणि शिक्षणाचा प्रश्न होता. अनेक गावांतील कित्येक मुली त्या समस्येला सामोर्या जात होत्या.
शशिकांत यांनी नेहमीप्रमाणे संगीताची कहाणी स्वतःच्या सर्व सहकार्यांना सांगितली. त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि मोबाइल नसल्यामुळे अतीव त्रास होणार्या व्यक्तींची यादी तयार करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे गावातल्या विधवा आणि एकल महिलांच्या मुली, तांड्यावरच्या मुली आणि दलित मुली यांना ‘मोबाइल देण्याचा प्रयत्न करूयात’ असा निर्णय ठरला. त्यांनी आर्थिक मदतीचं आवाहन केलं. आसपासच्या चार तालुक्यांतील रहिवाशांच्या संवेदनशीलतेमुळे तब्बल अठरा लाख रुपये गोळा झाले.
शशिकांत कोणताही निर्णय घेताना त्या त्या विषयातील अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेत असत. त्यांनी पैसे जमा झाल्यानंतर त्यातून ‘कोणता मोबाइल विकत घ्यावा? त्याचा शिक्षणासाठी कसा उपयोग करावा?’ याविषयी लोकविज्ञान चळवळीतील त्यांचे मित्र, ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळा’चे (एमकेसीएल) व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्याकडे विचारणा केली आणि त्यांच्या सल्ल्यानुसार काही टीव्ही संच आणि काही मोबाइल विकत घेतले. सावंत यांनी पहिली ते दहावीचा सर्व अभ्यासक्रम ‘एमकेसीएल’तर्फे शशिकांत यांना ऑनलाइन तयार करून दिला. ते टीव्ही संच गावाच्या शाळेत किंवा मंदिरांच्या सभागृहात ठेवण्यात आले. संबंधित विषयांचे शिक्षक तो नवा अभ्यासक्रम टीव्हीचा वापर करून शिकवू लागले. त्या कृतीमुळे तीस ते पस्तीस गावांमधील सुमारे दीड हजार मुलामुलींच्या शिक्षणाची सोय झाली. त्या उपक्रमाला मिळणार्या मोठ्या प्रतिसादामुळे तो उपक्रम लॉकडाऊननंतरही सुरू राहिला. शशिकांत यांना संगीताच्या कहाणीमुळे आलेली अस्वस्थता ग्रामीण शिक्षणात सकारात्मक बदलाच्या रूपाने बाहेर पडली.
शशिकांत यांना सार्वजनिक आरोग्याबाबतची केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून केली जाणारी उपेक्षा त्रासदायक होत असे. ते त्यांच्या त्या वेदना वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींतून स्पष्टपणे व्यक्त करत. गावातील गरिबाला कोणताही आजार झाला, तर विनासायास सर्व तपासण्या व उपचार व्हावेत, यासाठी ते वेळोवेळी झगडत राहिले. त्यांना, ‘कोरोना आपत्तीतून लोकांच्या आरोग्यविषयक जाणीवेत व त्यामुळे त्यांच्या वर्तनात बदल होतील का?’ असा प्रश्न हमखास विचारला जायचा. वास्तवाची अचूक जाण असणारे शशिकांत म्हणत, ‘आपले लोक फार विसराळू आहेत. कोरोनाकाळ आणि त्याने दिलेले धडे लोक विसरून जातील. आता दिसणारी संवेदनशीलता व जागरूकता फार काळ टिकणार नाही. यापूर्वीच्या अनुभवांवरून असंच वाटतं. पण तसं होता कामा नये. यापुढील काळात आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागणार आहे. आपल्याकडील आरोग्यविषयक पारंपरिक ज्ञान समजून घेऊन व्यायाम, योगासने व संतुलित आहार यांचा अवलंब करण्याची गरज आहे. स्वास्थ्य चांगलं असेल तर आरोग्यावरचा वैयक्तिक खर्च कमी होईल. महात्मा गांधी यांनी सांगितलेली ग्रामस्वराज्य व ग्रामआरोग्याची जीवनशैली मानणारे व आचरणात आणणारे लोक वाढले पाहिजेत.’