आम आदमी पक्षाने एकाच वेळी श्रीमंत आणि गरीब या दोन्ही वर्गांना जोडले आहे व ती जोडणी हे भारतीय राजकारणातले एक वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे. झोपडपट्टीत काम करणारी राखी बिर्ला आणि आयटीमधले तरुण हे एकाच वेळी त्यांनी एकत्र आणले. हेच मला त्यांचे सर्वात मोठे सामर्थ्य वाटते.
कम्युनिस्ट पक्षाचे उदाहरण घेऊन हा मुद्दा जास्त स्पष्ट होईल. तुम्ही फक्त गरिबांचे संघटन केले तर तुमचा पक्ष, संघटना फक्त गरीब वर्गाभोवतीच फिरत राहतो. वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, कम्युनिस्ट पक्ष यांच्याबाबतीत हे अधिक स्पष्ट होईल. परंतु गरिबांच्या प्रश्नावर लढताना मध्यमवर्गीय, श्रीमंत यांनाही वेगवेगळ्या सुविधा देत आणि त्यांना ही भावतील अशी स्वप्ने दाखवत दोन्ही समाजघटक एकत्र आणण्यात आम आदमी पक्षाचे यश आहे.
मध्यमवर्गाला भ्रष्टाचाराची असलेली चीड, प्रस्थापित राजकीय पक्ष आणि नेते यांचा असलेला राग व राजकारणातील साधेपणाचे आकर्षण यावर आम आदमीने बरोबर बोट ठेवले आणि गरिबांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, अशा रीतीने दोन्हीही वर्ग जोडले… त्यामुळे या पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व, निर्णय घेणारा वर्ग हा मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आहे; तरीसुद्धा त्या वर्गातील तरुण आणि झोपडपट्टीतील गरीब माणसे यांना एकच धाग्यात त्यांनी गुंफले आहे. त्यात झाडू ही निशाणी आपल्या जातीव्यवस्थेत दलित श्रमिक वर्गाशी जोडलेली आहे. त्यामुळे नकळत श्रमिक वर्गाला, कष्टकरी वर्गाला दलितांना हा पक्ष आपला वाटतो. पण उच्चभ्रू वर्गालाही तो आपला वाटतो. आयटीमधील उच्चशिक्षित श्रीमंत तरुण-तरुणी झाडू हातात घेऊन आपच्या कार्यालयापुढे निवडणुकीत जिंकल्यावर नाचताना बघून खूप छान वाटते… दोन वर्गांना समान हितसंबंधांच्या पातळीवर आणण्यात आम आदमीचे यश मला महत्वाचे वाटते. इथून पुढे गरिबांच्या प्रश्नावर लढताना मध्यमवर्गाला, उच्च मध्यमवर्गात सोबत घेतले तर गरिबांचे प्रश्न अधिक वेगाने पुढे जातील अन्यथा तुम्ही एका वर्गापुरते अडकून राहाल, सर्व समाजाला सोबत घेऊ शकणार नाही.
– – – –
सर्वात वाईट प्रियंका गांधींचे वाटते…
निवडणूक संपली निकाल लागले, पण एका व्यक्तीचे जास्त वाईट वाटते त्या आहेत प्रियंका गांधी.
मी स्वतः घराणेशाहीचा विरोधक आहे.त्यावर लेखनही करतो. प्रियंका गांधी यांची व्यक्तिगत कमिटमेंट या निवडणुकीत जी दिसली आणि तरीही ज्या प्रकारे निकाल लागले ते बघता त्यांच्याविषयी विलक्षण सहानुभूती वाटते.
प्रियंका गांधी यांनी या निवडणुकीत उत्तर प्रदेशात १६७ सभा घेतल्या, ४२ रोड शो केले आणि पाच राज्यातल्या ३४० विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष संपर्क केला. निवडणुकीच्या मर्यादित कार्यकाळात प्रत्येक क्षण अन क्षण त्यांनी कसा वापरला हे लक्षात येते.
पुन्हा हे करताना महिलांचे प्रश्न, विकासाचे प्रश्न, धार्मिक राजकारणावर टीका असा अजेंडा त्यांनी पुढे आणला. उन्नाव, हाथरस येथील क्रूर बलात्काराच्या घटना, नंतर त्या गावांमध्ये जाण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्या प्रश्नांसाठी केलेला संघर्ष आजही स्मरणात आहे. पण तरीसुद्धा राजकीय भाषेत त्यांना अपयश आले आहे. त्यांच्याविषयी आकर्षण प्रचंड आहे, अगदी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा मोह आवरत नसल्याचे व्हिडिओही निवडणुकीत दिसले.
काँग्रेस पक्षाचे झाले असे आहे की ब्राह्मण मुस्लिम व दलित या तीन व्होट बँक अनुक्रमे भाजप, समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाकडे निघून गेल्या. त्यामुळे उत्तर प्रदेशात त्यांनी कितीही कष्ट घेतले तरी त्या कष्टाचे मतात रुपांतर होत नाही ही वस्तुस्थिती आहे, पण तरीही ज्या पद्धतीने त्या लढतात त्याला दाद द्यावी लागेल. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमधील सामाजिक मुद्द्यांवर सतत बोलतात. त्यातून तेथील अन्यायाला प्रतिरोध निर्माण होतो आहे हे त्यांच्या राजकारणाचे सामाजिक यश आहे.
दुर्दैवाने दोघांचाही चेहरा, कार्यपद्धती ही लोकांना राजकीय वाटत नाही. राजकारणातील ‘सामाजिक कार्यकर्ते’ अशा नजरेने लोक त्यांच्याकडे बघतात.. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रेम, आस्था, आकर्षण असूनही ते मतात रूपांतरित होत नाही व दुसरीकडे व्होट बँकही दुसरीकडे सरकलेली… गांधी राजकारणाबाबत गंभीर नाहीत असे म्हणताना वर दिलेली आकडेवारी आणि गेली दोन वर्षे प्रियांका यांचे उत्तर प्रदेशामधील सातत्य विचारात घेतल्यावर या अपयशाबद्दल नक्कीच वाईट वाटते.