ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी आमदार विवेक पंडित यांच्या आदिवासी-कष्टकर्यांसाठीच्या लढ्यातील हकीकती सांगणारे ‘आम्ही काय रं चिखुल खावा?’ हे पुस्तक नुकतेच डिंपल पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाले आहे… एका आदिवासीच्या ससेहोलपटीची हृदयद्रावक कहाणी सांगणारे त्यातील हे एक प्रकरण…
—-
झिपरू मुकणे. एक अतिशय सामान्य, बिनमहत्त्वाचे व दखल घेण्याची लायकी नसलेले आयुष्य जगणारा गरीब आदिवासी. झिपरू दारुड्या होता. सतत दारू पिऊन, झिंगून रस्त्यात पडायचा हा मूर्ख माणूस. तो शेरे गावातील बाळू चौधरी या उद्योजकाकडे काम करत होता.
बाळू चौधरी तसा मोठा माणूस. त्याची शेती पण आहे. बाळू चौधरीचा मुख्य उद्योग वीटभट्टीचा. दुसरा उघडपणे न सांगता येणारा (पण पोलिसांना अर्थातच माहीत असलेला) उद्योग म्हणजे हातभट्टीच्या दारूची भट्टी लावणे. पण बाळू देवमाणूस. आपल्याकडे असलेल्या मजुरांची सर्व प्रकारे काळजी घेणारा. त्याबाबतीत बाळूचे कौतुकच करायला हवे.
आता हेच बघा ना. हा झिपरू बाळू चौधरीकडे वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करत होता. त्याच्या बरोबरीने गावातील काळूराम मुकणे, (हा झिपरूचा चुलतभाऊ) पांडुरंग जाधव, शनवार वाघे आणि इका मुकणे हे कातकरी आदिवासी पण कामाला होते. भूतदयेपोटी व झिपरूने अगदी पायच धरले म्हणू बाळूशेठने झिपरूची बायको जया आणि त्याची विधवा बहिण बायजा यांना पण कामावर ठेवून घेतले. बायका जड कामाला फारशा उपयोगी नाहीत, पण झिपरू पाय सोडायलाच तयार नव्हता. शेवटी गरिबाचे घर चालायला हवे म्हणून घेतले दोघींना. झिपरूला दारू पिऊन, झिंगून रस्त्यात पडायची सवय होती. बाळूशेठने त्याला प्रेमाने, रागाने अनेकदा समजावले. काढून टाकायची देखील धमकी दिली, पण मग झिपरूची बायको आणि बहीण मध्ये पडायच्या. त्यामुळे त्याला माफ करायला लागायचे. तसा झिपरू कामाला वाघ, पण दारू प्यायला की बिनकामाचा होऊन जात असे.
एक महिन्यापूर्वीची गोष्ट. झिपरू झिंगून रस्त्यात पडलेला दिसला त्याच्या चुलत भावाला, काळूरामला. एरवी त्याने त्याला उठवून उचलून नेला असता घरी, पण झिपरूच्या पायाला खूप मोठी जखम झाली होती. म्हणून काळूराम काळजीपोटी धावत बाळूशेठला सांगायला गेला. शेठ भला माणूस. त्याने माणुसकीपोटी आपल्या मुलाला, गणेशला पैसे घेऊन काळूरामबरोबर पाठवला. गणेशने ताबडतोब झिपरूला रिक्षात घालून भिवंडीला ‘सोहम हॉस्पिटल’मध्ये भरती केले. त्याची तब्येत सुधारत होती, पण त्या दिवशी म्हणजे २० नोव्हेंबरला तो रात्री एकटाच बाथरूममध्ये गेला आणि पाय घसरून पडला. डोक्याला मोठी जखम झाली त्याच्या. म्हणून काळजीने त्याला कळव्याच्या महापालिका रुग्णालयात घेऊन जात होते तर तिथे पोचण्याआधीच मेला बिचारा. शेठने काळूरामला बोलावून त्याच्या ताब्यात प्रेत देऊन आणि गावी नेण्याची व्यवस्था करून अंत्यविधी उरकून टाकला. सगळा खर्च बाळूशेठने केला. एवढे कोणी करत नाही मजुरासाठी. शेठ भला माणूस.
—
२९ नोव्हेंबर २०११. शहापूरला पोचायला दुपारचे तीन वाजले होते. श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर, विजय जाधव, दशरथ भालके इत्यादींना सकाळीच शेरे गावात जाऊन झिपरू मुकणे याची पत्नी जया व इतरांना शोधून आणण्यासाठी पाठवले होते. सकाळी झिपरूच्या हत्येबद्दल कळलेली वार्ता केवळ दुःखद नव्हे तर संतापजनक आणि क्लेशदायक देखील होती. खरे तर अशी घटना घडू शकते यावर क्षणभर विश्वास ठेवणे देखील कठीण गेले. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन खात्री करावी म्हणून हातातली सगळी कामे बाजूला टाकून शहापूरला जायला निघालो होतो. मी पोहोचेपर्यंत कार्यकर्त्यांनी मयत झिपरूची बायको जया त्याची बहिण बायजा व इतरांना एकत्र केले होते. तहसीलदार, पोलीस अधीक्षक व अन्य अधिकारी विश्रामगृहावर उपस्थित झाले होते.
पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक व पूर्ण खबरदारी घेऊन तयार केलेली झिपरूच्या मृत्यूची कथा, जी सुरुवातीला दिलेली आहे ती आम्ही ऐकली. माझ्या पोलिसांनी पूर्ण प्रामाणिकपणे व पारदर्शक पद्धतीने पोलीस प्रोसिजरनुसार तपास केला आहे असे पोलीस अधीक्षक साहेबांनी दिलेले सर्टिफिकेट देखील मी शांतपणे ऐकून घेतले. मी फक्त ऐकण्याचे काम करत होतो.
या अशाच रचलेल्या कथा आणि त्या कथांतील पात्रांना मी यापूर्वी ठाणे जिल्ह्यात, मराठवाड्यात, मध्य प्रदेशात आणि नेपाळमध्येही भेटलो होतो. आज अनेक वर्षांनी त्या दुःखद आठवणी पुन्हा जाग्या होत होत्या. माझी अस्वस्थता वाढवत होत्या. माझ्या अंतःकरणात आग पेटली होती.
पोलिसांनी वरीलप्रमाणे झिपरूच्या मृत्यूची कथा लिहिली होती आणि त्या कथेला पूरक असे जाबजबाब देखील नोंदवले होते. तहसीलदार आणि झिपरूच्या मृत्यूत काहीही काळेबेरे नसल्याचे पोलीस बेमुर्वत छातीठोकपणे सांगत होते. झिपरूचे प्रेत काळूरामने ताब्यात घेतले होते. तो झिपरूचा चुलतभाऊ होता आणि त्याच्याबरोबरच बाळू चौधरीकडे कामाला होता. पोलिसांनी सांगितलेली कहाणी काळूरामने त्याच्या भाषेत सांगितली. झिपरू दारू प्यायचा म्हणून रस्त्यावर पडला आणि त्याच्या पायाला जखम झाली हे तो पुन्हा पुन्हा ज्या पद्धतीने सांगत होता त्यावरून त्याला ते पढवले गेले होते हे कळत होते. शिवाय बोलताना त्याच्या झोकांड्या जात होत्या. त्याला भरपूर दारू पाजून आणलेले होते.
आतापर्यंत भीती व पोलीस व वरिष्ठ सरकारी अधिकार्यांच्या उपस्थितीमुळे दडपणाखाली गप्प असलेली झिपरूची बायको जया काळूरामचे बरळणे सहन न होऊन अचानक उसळली आणि त्याच्या अंगावर धावून गेली. ‘मेल्या, तू खोटा बोलतोस. माझ्या नवर्याला साखलीने बांधला होता. त्याला पायरीचे (पहारीचे) चटके दिले आणि मग त्याला मारून टाकला…’ जया म्हणाली. मी जयाला आवरले, शांत केले आणि तिला काय घडले ते न घाबरता सांगायला सांगितले…
…आता झिपरूने काय भोगले आणि त्याचा मृत्यू कसा झाला याची खरी हृदयद्रावक कहाणी समोर आली.
झिपरूने बाळू चौधरीकडून काही पैसे अंगावर घेतले होते व त्याच्या मोबदल्यात तो, जया व त्याची विधवा बहीण बायजा असे तिघेजण त्याच्याकडे काम करत होते. अंगावर घेतलेल्या पैशांचा हिशोब पूर्णच होत नव्हता आणि एवढी प्रचंड मेहनत करून हातातोंडाची गाठ पडत नव्हती. दारू कुठून पिणार होता झिपरू? बाळूराम चौधरीकडे माणुसकी तर नव्हतीच, पण त्याचा स्वभाव अतिशय संशयी आणि संतापी होता. संतापाचा झटका आला की त्याला आवरणे कठीण होते. सगळे मजूर त्याच्या दहशतीखाली होते. झिपरू दुसरीकडे काम शोधतो आहे असा त्याला संशय होता. दिवाळीच्या दिवशी बाळूराम चौधरी, त्याची बायको नागिन आणि मुले गणेश आणि बंटी यांनी झिपरूला त्याच्या घरातून खेचून बाहेर काढून मारत-मारत बाळूशेठच्या शेतामधल्या घरात नेले आणि साखळदंडाने बांधून घातले. त्याला प्रचंड मारहाण सुरू झाली. तापलेल्या पहारीने त्याला चटके पण दिले. जयाने वारंवार मालकाकडे विनवण्या केल्या, त्याचे पाय धरले पण त्याला दया आली नाही. तो जयाला तिच्या नवर्याला भेटू देखील देत नव्हता. खिडकीतूनच ती त्याला बघायची. जया जसेजसे वर्णन करत होती तसतसे तिथे असलेल्या पोलीस व शासकीय अधिकार्यांचे चेहरे पडत होते. त्यांच्या नजरा खाली झुकल्या होत्या.
अखेर जया खूप धावपळ करून मुरबाडला एका संस्थेकडे गेली. त्यांनी तिचा जबाब नोंदवून घेण्यापलीकडे काय केले हे कोणालाच कळले नाही. कोणी तरी सांगितले म्हणून जया एका व्हेंडरकडे गेली. त्यांनी तिला पोलीस अधीक्षकांच्या नावे वरील माहितीचा अर्ज लिहून दिला. कुणा भल्या माणसाच्या मदतीने तो अर्ज तिने स्पीडपोस्टाने पोलिसांना पाठवला. पण काहीही झाले नाही.
अखेर एक दिवस तिचा नवरा नव्हे तर त्याचा मुडदा गावी आला. त्याच्या प्रेताजवळ तिला अखेरच्या दर्शनालाही जाऊ दिले नाही.
झिपरू मरून गेला. सर्व हाल-अपेष्टांमधून त्याची सुटका झाली. जयाची कहाणी ऐकून काय बोलावे, तिचे कोणत्या शब्दात सांत्वन करावे हे मला कळेना. माझ्या सहानुभूतीच्या शब्दांचा काय उपयोग होता तिला? मी निर्णय घेतला प्रत्यक्ष घटनास्थळी जाण्याचा. जयाला पुढे घालून आम्ही सगळे बाळूराम चौधरीच्या शेतावरील घराकडे निघालो. शेरे गावाच्या कातकरी वस्तीजवळ गाडी सोडून जंगलाच्या दिशेने चालत निघालो. काही अंतर पायवाटेने चालल्यावर नुकतीच विझवलेली दारूची भट्टी दिसली. त्या भट्टीच्या बाजूलाच बाळू चौधरीचे शेतावरचे घर होते. पोलिसांनी दरवाजा उघडला. आत कोंबड्यांचा उग्र दर्प येत होता. घरात गेल्यानंतर झिपरूला बांधून ठेवलेली खोली जयाने दाखवली. मधल्या दरवाजाकडून खिडकीच्या दिशेने असलेल्या खोलीकडे गेलो. खोलीभर मूत्राचे डाग होते. सुकलेल्या रक्ताचे देखील डाग होते. ‘हे पाह्य माझ्या नवर्याचे कपडे’, एका पोत्यात भरून ठेवलेले झिपरूचे कपडे दाखवत जया किंचाळली. ‘इथेच ठेवला होता माझ्या नवर्याला बांधून त्या मेल्यांनी.’ आपला गुन्हा उघडकीला येणार नाही याची त्या नराधमांना इतकी पक्की खात्री होती आणि त्यांनी शासकीय व पोलीस पातळीवर इतका पक्का ‘बंदोबस्त’ केला होता की, गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याची काळजीही त्यांनी घेतली नव्हती.
आम्ही शहापूरला परत आलो. आतापर्यंत काहीही न केलेल्या पोलिसांनी निमूटपणे जयाचा जबाब नोंदवून घेतला. मालक, त्याची बायको व दोन्ही मुलांवर वेठबिगारीचा व खुनाचा असे दोन गुन्हे दाखल झाले. चौघांना अटक झाली. दुसर्या दिवशी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना भेटून सीआयडी चौकशीची मागणीही मान्य करून घेतली.
मनात विचार येतात की, स्वातंत्र्य, न्याय, माणुसकी या शब्दांना काय अर्थ आहे? संविधान, कायदा हे फक्त कागदावरच आहेत का? प्रशासन व पोलीस यंत्रणा आपले खरे कर्तव्य पाळायला कधी शिकणार? मूर्च्छित पडलेली आमच्या समाजमनाची संवेदना कधी जागृत होणार? ही र्हासप्रक्रिया कधी थांबणार? किती वाट बघायची?
सुरेश भटांनी म्हटल्याप्रमाणे अखेरचा श्वास घेताना माझ्या मनात याच ओळी येणार का?
‘अखेर आसवे किती पुसायचीच राहिली
अखेर अंतरे किती जळायची न थांबली’