□ आमची कबर बांधली तरी दिल्ली सोडणार नाही – राकेश टिकैत
■ अहो हळू, काहीतरी आयडिया देऊ नका. हे कबर बांधायला घेतील लगेच.
□ चांगला भाव मिळत नसल्याने शेतकर्यांवर शेतमाल फेकण्याची वेळ – शरद पवार
■ शेतकरी पूर्णपणे संपल्याशिवाय जमिनी मोकळ्या कशा होणार?
□ क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थी घडवावेत : राष्ट्रपती कोविद
■ आधी घडलेल्या क्षमतावानांचं काही करता आलं तर पाहा, खाविंद.
□ आपल्या सर्वांचे राजकारण होते, पण जनतेचा जीव जातो – मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
■ उद्धव साहेब, जनतेच्या जिवाची पर्वा तुम्हाला! ती विरोधकांना असती तर हजारोंच्या सभा घेतल्या गेल्या असत्या का, अनावश्यक यात्रा निघाल्या असत्या का?
□ शिक्षकांचा मार पडला नसता, तर भाषण द्यायला शिकलो नसतो : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
■ तुमच्या पक्षाच्या शाळेत फक्त भाषणाचे शिक्षक होते का हो? तुमचा अपवाद वगळता बाकीचे तेवढंच करताना दिसतात.
□ भारतीय जनता पक्षात महिलांचा सन्मान होत नाही – बेलापूरच्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा घरचा अहेर
■ कसा होईल सन्मान? महिलांना कमी लेखण्याचे संस्कार आहेत त्यांच्यावर.
□ सरकारी कर्मचार्यांना ताजेतवाने राहण्यासाठी ‘योगा ब्रेक’ मिळणार.
■ त्यात योगायोगानेच एखादा योगा करताना सापडणार!
□ कोरोनाने पोषक आहाराचे महत्त्व पटवून दिल्याने प्रोटीन, जीवनसत्त्वयुक्त आहाराला प्राधान्य, मैदायुक्त पदार्थ आहारातून बाद होत आहेत; एका पाहणीचा निष्कर्ष
■ स्वस्त मैदायुक्त पदार्थच ज्यांना परवडतात त्यांना पोषक आहाराचं महत्त्व पटून तरी काय उपयोग आहे?
□ काबूलमध्ये शांततेने निदर्शने करणार्या महिलांना तालिबानींची मारहाण
■ यात बातमी काय? कुत्रा माणसाला चावला, तर त्याची बातमी होत नाही. कुत्रा तेच करणार.
□ जनआशीर्वाद यात्रेने विरोधक भयभीत : भाजप अध्यक्ष नड्डा
■ चांगला विनोद. आता पुढचा सांगा.
□ जनता कधी जागी होणार? अण्णा हजारे यांचा सवाल
■ ती होईल जागी व्हायची तेव्हा… तुम्ही झोपा नीट… देशात अजून भाजपचीच राजवट आहे.
□ आमच्या आदेशाचा सन्मान होत नाही. आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका : सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला इशारा
■ तुम्हालाही आम्ही जुमानत नाही, आम्ही जनतेने निवडून दिलेले महाराजे आहोत, हेच तर दाखवून द्यायचं आहे त्यांना.
□ कोरोना संकटात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
■ दुष्काळात चौदावा… तेराव्या नंबरावर आहेत सोशल मीडियावर कोरोना(अ)ज्ञान पाजळणारे फॉरवर्डबाज.
□ कोरोनाकाळामुळे भीती, नैराश्य, राग अशा नकारात्मक भावना समाजात वाढीस लागल्या आहेत : पाहणीचा निष्कर्ष
■ समाजमाध्यमांमधला आभासी संवाद बंद करून वास्तवात एकमेकांमध्ये संवाद सुरू करण्याला आता पर्याय राहिलेला नाही.