दुसर्या दिवशी सकाळीच पोलिस स्टेशनमध्ये गडबड ऐकू आली. कोठडीचा दरवाजा उघडला गेला आणि भोंडवे, पेटकरला बाहेर काढून गाडीत घातलं गेलं. कोर्टात नेण्यात आलं. दोघांवर संशय असल्याचं सांगून पोलिसांनी त्यांच्यासाठी पोलिस कोठडी मागितली, ती मिळाली. अर्थात, पुढच्या सात दिवसांचीच कोठडी होती, त्याआधी पोलिसांना सगळं शोधून काढायचं होतं. वेळ निघून गेला, की पोलिसांची संधीही जाणार होती. तो दिवस तसाच गेला.
—-
दुपारचे तीन वाजले होते. माळवद गल्लीत फारशी वर्दळ नव्हती. ऊन चांगलंच तापलं होतं.
बहुतेकशी मंडळी कामावर गेली होती. जी माणसं घरी होती, ती जेवणानंतर जरा आळसावून विसावली होती. चिंचणीकरांच्या घरची बेल वाजली आणि चिंचणीकर काकू दार उघडायला दारापाशी गेल्या.
“काका आहेत का घरात?’’ बाहेरून आवाज आला.
“ते नाहीयेत. कोण हवंय?’’ काकूंनी दार उघडून प्रेमानं विचारलं.
“आम्ही वर्गणी मागायला आलो होतो, काकू.’’ त्यातल्या एकानं उत्तर दिलं.
“वर्गणी? आणि गणपती सुरू झाल्यावर? आता कसली वर्गणी?’’ काकूंना प्रश्न पडला.
“गणपतीच्या वेळी काही घरांची वर्गणी राहिली होती, काकू. तुमच्या इच्छेप्रमाणे देऊन टाका.’’
“कुठल्या मंडळाचे रे तुम्ही?’’ काकूंनी वर्गणीचं नाव काढायच्या ऐवजी प्रतिप्रश्नच केला. त्यावर ते कार्यकर्ते थोडेस गडबडल्यासारखे वाटले. “अं… आम्ही ते… उत्साही तरुण मंडळाचे कार्यकर्ते.’’ त्यांनी काहीतरी सांगायचा प्रयत्न केला, पण काकूंचा चेहरा प्रश्नांकित झाला.
“काकू, घरात दुसरं कुणी असेल तर त्यांना विचारा ना. त्यांना माहीत असेल, तुम्ही वर्गणी दिली नाहीये ते.’’ त्यांच्यातल्या एकानं सुचवलं.
“दुसरं कुणी नाहीये घरात. मीच आहे.’’ काकू म्हणाल्या आणि वर्गणी मागायला आलेल्या त्या तीन तरुणांची एकमेकांकडे नजरानजर झाली. काकूंना काही समजायच्या आत त्यातला एक जण पुढे आला आणि काकूंच्या तोंडावर एक रुमाल दाबण्याचा त्यानं प्रयत्न केला. दुसर्यानं त्यांचे हात मागे घट्ट धरून ठेवले आणि तो खिशातून दोरी काढू लागला. नक्की काय घडतंय, हे काकूंना कळत नव्हतं, तोंड दाबलं गेल्यामुळे ओरडताही येत नव्हतं. तेवढ्यात दारातून आणखी काही माणसं घरात घुसली आणि त्यांनी एकदम आरडाओरडा सुरू केला.
“ह्याला घ्या रे.’’, “पाटील, तिकडून घुसा.’’ “तो बघ, तिकडे पळाला…’’ “सोडायचं नाही ह्यांना…!’’ अशा आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. वर्गणी मागण्यासाठी आलेले ते तिघे हे कार्यकर्ते नव्हते, हे चिंचणीकर काकूंच्या लक्षात आलं होतं, पण नंतर दारातून अचानक आत घुसलेली ही माणसं कोण होती? त्यांनी त्या तिघांना पकडण्यासाठी आटापिटा का चालवला होता? काकूंना काहीच कळत नव्हतं.
तेवढ्यात झटापट करून त्या दोन कार्यकर्त्यांना पकडण्यात आलं. तिसरा गॅलरीकडे पळाला होता. `त्याला धरा, पकडा, उडी मारू देऊ नका,’ असं म्हणेपर्यंत तो गॅलरीतून उडी टाकून पसार झाला होता. त्या दोघांना धरल्यानंतर आता ती माणसं बोलायला लागली.
“मॅडम, घाबरू नका. मी इन्स्पेक्टर विश्वास राईकवार.’’ त्यांच्यातल्या प्रमुख वाटणार्या माणसानं ओळख करून दिली. ही पोलिसांची टीम होती आणि आधी कार्यकर्त्यांच्या रूपात आलेल्या चोरट्यांवर पाळत ठेवून पोलिस घरात घुसले होते.
तिसरा चोर पळून गेला असला, तरी सापडेल, अशी पोलिसांची खात्री होती. हे पोलिस नक्की इथे कसे आले? वर्गणी मागण्याच्या निमित्ताने आपल्या घरात कुणीतरी चोरटे घुसणार आहेत, हे त्यांना कसं कळलं? या चोरट्यांनी आधीही कुठे गुन्हे केले होते का? असे अनेक प्रश्न चिंचणीकर काकूंना पडले होते. त्याचबरोबर आपण कार्यकर्ते म्हणून ज्या लोकांना घरात घेतलं, ते गुन्हेगार होते. त्यांनी आपल्याला हल्ला तर केलाच, पण पोलिस वेळेत आले नसते तर काय घडलं असतं, या विचारानंही त्यांचा थरकाप उडाला.
“आता तुम्हाला काळजी करायचं काहीच कारण नाही. आम्ही त्यांच्याकडे बघून घेऊ,’’ असा दिलासा इन्स्पेक्टर राईकवारांनी दिला, तरीही थोडी धाकधूक चिंचणीकर काकूंच्या मनात राहिलीच. पोलिसांनी त्या दोन्ही चोरट्यांना गाडीत घातलं. तिसर्या चोराच्या तपासासाठी वायरलेसवरून सगळीकडे निरोप द्यायला राईकवारांनी सांगितलं आणि ते स्वतः गाडीत बसले.
विकास भोंडवे आणि सचिन पेटकर अशी त्या दोन चोरांची नावं होती.
“तुमचा तिसरा साथीदार कुठाय रे?’’ इन्स्पेक्टर राईकवारांनी त्या दोघांना दरडावून विचारलं.
“काय कल्पना नाही साहेब. पळून गेला असेल कुठेतरी.’’ भोंडवे म्हणाला.
“त्याला पळायची एवढी हौस असेल ना, तर चांगलाच पळवू आम्ही त्याला. अगदी पाय तुटेपर्यंत पळवू!’’ दरडावल्याच्या सुरात राईकवारांनी सुनावलं.
“साहेब, चूक झाली आमची. त्या बाईंना त्रास द्यायचा विचार नव्हता. आम्ही आत्तापर्यंत कुणावरच हल्ला केलेला नाही साहेब. फक्त पैसे घेऊन पळून जाणार होतो साहेब.’’ भोंडवे गयावया करत म्हणाला.
“त्रास द्यायचा नव्हता? मग त्यांच्या घरी गणपतीची आरती करायला गेला होतात काय?’’ राईकवारांनी झाडलं, तशी त्यानं मान खाली घातली.
“याच्या आधी कुठल्या कुठल्या घरात घुसून चोरी केलेयंत? किती गुन्हे केलेत आत्तापर्यंत?’’ त्यांनी दोघांची बकोट धरून विचारलं. दोघंही भेदरून एकमेकांकडे बघायला लागले.
“बघताय काय? बोला पटापट, नाहीतर तुम्हाला बोलतं करण्यासाठी आणखी उपाय आहेत!’’ त्यांनी पुन्हा दम दिला.
“काय विचारतोय? तोंडं उघडा. कुठली कुठली घरं टार्गेट केली होती? किती माल लंपास केला? चोरलेला माल कुठे ठेवलाय? तुमच्या टोळीत आणखी कोण कोण होतं? तुमचा प्रमुख कोण आहे?’’ त्यांनी एकामागोमाग एक प्रश्नांच्या फैरी झाडल्या.
“साहेब, आम्ही खरंच याच्याआधी कुठेच चोरी केली नाही…’’ दोघांनी त्यांचं पालुपद कायम ठेवलं.
“खरं बोलताय ना?’’
“होय साहेब.’’
“बघा हं, विचार करून ठेवा. नंतर काही कळलं, तर…’’ राईकवारांनी त्यांच्याकडे रोखून बघितलं आणि त्यांच्या डोळ्यातली जरब बघून दोघंही जरासे टरकले.
“चव्हाण, पोरं लहान वाटतायंत. पहिलाच गुन्हा दिसतोय ह्यांचा. कदाचित आपल्याला मिळालेली माहिती चुकीची असेल. बघू, पुढे काय होतंय ते.’’ असं म्हणून राईकवार निघून गेले.
त्या दोन्ही चोरट्यांना आता थोडंसं हायसं वाटलं.
“आरं ए पोरांनो, लहान दिसता वयानं. मी सांगतोय ते पटत असेल तर ऐका. साहेब चांगला माणूस आहे. तुमच्या वयाकडे बघून त्यांनी तुम्हाला जास्त मारलं नाही. आणखी कुठं कुठं काय केलं असेल, तर आत्ताच सांगून टाका. एकदा साहेब चिडले की मग काय खरं नाही तुमचं.’’ हवालदार चव्हाणांनी त्यांना समजावलं.
“साहेब, ही पहिलीच चोरी होती आमची. पुन्हा असं नाही करणार. सांगा ना तुमच्या साहेबांना!’’ दोघांनी पुन्हा तेच रडगाणं सुरू केलं, तेव्हा चव्हाण जरा वैतागले.
“बरं बरं. तरी पण विचार करा. काही सांगावंसं वाटलं, तर आम्हाला सांगा. नाहीतर काय होईल, ते तुमचं नशीब.’’ असं सांगून निघून गेले. दोन्ही चोरट्यांनी एकमेकांकडे बघितलं.
दुसर्या दिवशी सकाळीच पोलिस स्टेशनमध्ये गडबड ऐकू आली. कोठडीचा दरवाजा उघडला गेला आणि भोंडवे, पेटकरला बाहेर काढून गाडीत घातलं गेलं. कोर्टात नेण्यात आलं. दोघांवर संशय असल्याचं सांगून पोलिसांनी त्यांच्यासाठी पोलिस कोठडी मागितली, ती मिळाली. अर्थात, पुढच्या सात दिवसांचीच कोठडी होती, त्याआधी पोलिसांना सगळं शोधून काढायचं होतं. वेळ निघून गेला, की पोलिसांची संधीही जाणार होती. तो दिवस तसाच गेला.
तिसर्या दिवशी राईकवार पोलिस स्टेशनला आले, त्यांनी पेटकरला वेगळ्या कोठडीत टाकायची सूचना केली आणि काही वेळानं ते स्वतः कोठडीत गेले. पेटकर एका कोपर्यात ढोपरात मान खुपसून बसला होता. दार उघडून इन्स्पेक्टर साहेब आत आल्याची चाहूल लागताच तो जरा सावरून बसला.
“आम्हाला सोडा साहेब. आम्ही स्वतःहून तुम्हाला सगळं सांगितलंय. हा पहिलाच गुन्हा होता साहेब. खरंच आम्ही काय केलेलं नाही. आम्हाला जगू द्या.’’ तो लगेच गयावया करू लागला. रात्रभर कोठडीत तो रडत होता, ही बातमी राईकवारांना समजली होती. एकदोनदा आईच्या नावानंही त्यानं हंबरडा फोडला होता.
“आई एकटीच असते का घरी?’’ राईकवारांनी त्याला समजुतीच्या स्वरात विचारलं. मग त्यानंही रडत रडत ती कशी एकटी आहे, घरची परिस्थिती कशी गरीबीची आहे, बाप अधूनमधून गायब असतो, हे सांगितलं.
“तुझ्याबद्दल वाईट वाटलं, म्हणूनच तुझ्याशी बोलतोय. तुमच्याबरोबर असलेल्या तिसर्या माणसाला आम्ही काल रात्रीच धरलंय. त्यानं गुन्हा केल्याचं कबूल केलंय. त्या दिवशी त्याच्याकडून चुकून एकावर हल्ला केला गेला, असं म्हटलंय त्यानं.’’
“हल्ला?’’ पेटकरनं चमकून बघितलं.
“हां. याच्याआधी एका घरात तुम्ही असेच चोरी करायला घुसला होतात. तूच ते घर हेरून ठेवलं होतंस. घरात एक म्हातारी आणि दोन मुलं, एवढीच माणसं होती. त्यावेळी त्या म्हातारीवर तुम्ही चाकूनं हल्ला केला, त्यात ती जायबंदी झाली. सगळा गुन्हा स्वतः केल्याचं तुझ्या दोस्तानं कबूलही केलंय. तू आणि भोंडवे आधीच पळून गेला होतात, म्हणाला.’’
“हां… होय साहेब. आम्ही घाबरलो होतो. साहेब, खरंच मी कुठलाच गुन्हा केलेला नाही हो. मला सोडा.’’ पेटकर पुन्हा गयावया करू लागला. एव्हाना चव्हाणही आत आले होते. त्यांनी राईकवारांच्या कानात काहीतरी सांगितलं. राईकवारांनी समजल्यासारखा चेहरा केला.
“चव्हाण, ह्याला उगाच पकडलं आपण. गरीब आहे बिचारा.’’ ते पेटकरकडे बघत म्हणाले. त्याचा चेहरा किंचित खुलला. त्याचवेळी राईकवार जागेवरून उठले आणि त्यांनी खाणकन त्याच्या कानाखाली वाजवली. पेटकर झिडपिडला आणि खाली पडला. पाठोपाठ दोन लाथा त्याच्या कंबरेत बसल्या. तो कळवळला.
“ओ साहेब… काय करताय ओ…? मी काहीच केलं नाही साहेब… गरीब आहे मी…!!’’ तसाच ओरडत तो म्हणाला.
“गरीब? हरामखोर!! खून केलायंस तू. तू कसला रे गरीब?’’ असं म्हणत राईकवारांनी त्याला आणखी दोन थोबाडीत मारल्या. काय होतंय, हे त्याला कळतच नव्हतं.
मानकरवाडी भागात बंगल्यात एकट्याच राहणार्या एका आजोबांचा काही दिवसांपूर्वी खून झाला होता. गणपतीची वर्गणी मागण्याच्या निमित्तानं घरात घुसलेल्या काही जणांनी घर लुटून त्यांचा खून केला, असा संशय होता. चोरटे मात्र सापडले नव्हते. अशाच प्रकारचे आणखी काही गुन्हे परिसरात घडल्याच्याही तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे पोलिसांनी सापळा रचला होता. खरे कार्यकर्ते कुठले आणि हे बनावट कुठले, हे ओळखणं हीच खरी कसोटी होती. शिवाय खरे गुन्हेगार घरात घुसल्यानंतर काही गंभीर घडू नये, य्ााचीही काळजी घ्यायची होती. पोलिसांनी डोळ्यात तेल घालून पहारा केला आणि चिंचणीकरांच्या घरात हे चोरटे घुसले, तेव्हा त्यांना बरोबर ओळखून त्यांच्यावर झडप घातली. भोंडवे आणि पेटकर ताब्यात आले.
बंगल्यातल्या त्या आजोबांच्या खुनाशीही त्यांचाच संबंध असावा, असा पोलिसांचा संशय होता, पण भक्कम पुरावे नव्हते. चोर स्वतः कबुली देत नव्हते. शेवटी पोलिसांनी पेटकरला असं घोळात घेऊन त्याच्यावर डाव उलटवला. याच काळात त्यांना पेटकरच्या विरोधात भक्कम पुरावेही मिळाले होते. त्यांना बंगल्यात शिरताना शेजारी राहणार्या एका बाईनं बघितलं होतं, म्हातार्या आजोबांवर वार करतानाही तिला खिडकीतून दिसलं होतं. भीतीपोटी ती गप्प राहिली होती. खुनासाठी वापरलेल्या हत्यारावर पेटकरच्याच हातांचे ठसे सापडल्याचं चव्हाणांनी आत्ताच राईकवारांना येऊन सांगितलं होतं.
“त्या आजोबांना तूच मारलंस की नाही, बोल!’’ असं म्हणून राईकवारांनी पट्ट्याला हात घातला, तसा तो त्यांच्या पाया पडला आणि त्यानं गुन्ह्याची कबुली दिली.
“तू सांगितलेली तुझ्या एकट्या राहणार्या आईची कहाणी खोटी आहे, हे आम्हाला आधीपासूनच माहीत होतं.’’ राईकवार त्याला म्हणाले. मग चव्हाणांकडे बघून ते हसले.
“फक्त त्या म्हातारीची कहाणी आम्ही तुला रचून सांगितली, हे तुला माहीत नव्हतं. आणि तुझा तो तिसरा साथीदारही अजून सापडला नाहीये आम्हाला. पण आता तूच त्याच्याबद्दल माहिती देणार आहेस!’’ राईकवारांनी बजावलं.
“गणपती विघ्नहर्ता आहे रे. त्याच्या उत्सवाची वर्गणी काढायचं निमित्त करून तुम्ही लोकांना लुटत होतात. एकाचा खून केलात. गणपतीच्या कार्यकर्त्यांना बदनाम केलंत. आता तुम्ही काही वाचत नाही!’’ राईकवारांनी त्याला ठणकावलं आणि ते कोठडीतून बाहेर पडले.
– अभिजित पेंढारकर
(लेखक चित्रपट आणि मालिकालेखनात कार्यरत आहेत.)