वर्ष १९८९. त्यावेळी मी सटाणा पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम करीत होतो. त्यापूर्वी मी मालेगाव पोलीस ठाण्यात तीन वर्षं काम केलेले होते. मालेगाव ते सटाणा हे अंतर अवघे ३० किलोमीटरचे… त्यामुळे मालेगाव आणि आजूबाजूच्या परिसराची चांगली माहिती झाली होती. सटाणा पोलीस स्टेशनला दोन वर्षं झाली होती, त्यामुळे मला तिथली भौगोलिक आणि जनमानसाची चांगली माहिती झालेली होती. फार पूर्वीपासून हा परिसर पूर्णपणे बागायती असल्याने बर्याच लोकांनी आपली घरे शेतात केली होती.
एक दिवस सकाळी सात वाजता, पोलीस ठाणे अंमलदार माझ्या घरी आले. खूप जोरात सायकल चालवल्याने त्यांचा श्वास जोरात खाली वर होत होता, त्यांना बोलता येत नव्हते. त्यांची हालचाल पाहून काहीतरी गंभीर प्रकार झालेला आहे याची खूणगाठ मी बांधली. अंमलदारांना बसायला सांगून पाणी देऊन त्यांना शांत केले. मग त्यांनी सांगितलं की पाटणे शिवारात बाळासाहेब पाटील यांच्या वस्तीवर दरोडा पडला आहे. त्यामध्ये एक-दोन जण जखमी झालेले आहेत तसेच बराचसा किंमती ऐवज लुटून नेलेला आहे. ग्रामीण भागातल्या गुन्ह्यांमध्ये टॉप प्रायॉरिटी देता येईल, असा दरोड्याचा गुन्हा असतो. कारण, अशा दरोड्यामुळे शेतात, वाड्यावस्त्यावर राहणार्या इतर माणसांमध्ये घबराट निर्माण होऊन पॅनिक निर्माण होते. ठाणे अंमलदारांना मी पोलीस लायनीत पाठवून अधिकाधिक कर्मचार्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. अवघ्या १५ ते २० मिनिटांत मी पोलीस ठाण्यात हजर झालो. अर्ध्या तासात आठदहा पोलीसांना घेऊन मी जीपने पाटण्याकडे निघालो.
पोलीस ठाण्यात कामाच्या दृष्टीने गावांचे विभाग केलेले असतात. त्याला बीट असे म्हणतात. दरोडा पडला त्या बीटचे हवालदार धनाजी निकम सोबत होते. ते मूळचे बागलाण तालुक्याचे रहिवासी… वयानेही सिनियर. त्यांचा स्वभाव बोलका होता, त्यामुळे त्यांना या भागाची आणि माणसांची चांगली माहिती होती. ३० ते ३५ मिनिटांत आम्ही पाटलांच्या वस्तीवर पोहोचलो. मळ्यातील त्या वस्तीवर पाटील २० ते २५ वर्षांपासून राहत होते. घर मोठे बांधलेले होते. आजूबाजूला तीनचार गड्यांची (सालदारांची) घरे होती. घराच्या मागे जनावरांचा गोठा होता. सर्वजण आमची वाटच पाहत होते, ते अत्यंत भयभीत झालेले होते. त्यांनी सांगितलेली हकीकत अशी…
पाटलांच्या घरी मुलीचे लग्न असल्यामुळे घरात २० ते २५ हजार रुपये बँकेतून काढलेले होते. तसेच लग्नात मुलीला देण्यासाठी केलेले दागिने खरेदी करून ठेवले होते. अवघ्या १० ते १५ दिवसांवर लग्न आले होते. आदल्या रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमाराला कुत्री जोरजोरात भुंकू लागली… हा प्रकार काय आहे, आज कुत्री का इतकी भुंकतायत, म्हणून पाटलांनी गड्यांना हाक मारली. परंतु, थंडीच्या मोसमामुळे सर्वजण दार खिडक्या बंद करून गाढ झोपलेले होते. कुत्री भुंकायची थांबेनात म्हणून बाळासाहेब स्वत: टॉर्च घेऊन घराबाहेर आले. घराच्या मागील बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक पोलवरील लाइट बंद असल्यामुळे त्या भागात काळाकुट्ट अंधार होता. म्हणून त्यांनी त्या बाजूला टॉर्चचा प्रकाशझोत टाकला आणि त्या अंधारातून अचानक तीन-चार माणसे पुढे आली आणि त्यांनी बाळासाहेबांच्या अंगावर गोधडी टाकून त्यांना काठीचा फटका मारला. ओरडू नका, नाहीतर तोडून टाकू, असा दम देऊन त्यांना सोबत घेऊन दरोडेखोर उघड्या दरवाजातून घरात आले. तोवर घरातील इतर माणसांना जाग आलेली होती, त्यांनी घाबरून आरडाओरडा सुरू केला होता. दरोडेखोरांची संख्या सात ते आठ होती आणि त्यांच्या हातात काठ्या, कुर्हाडी होत्या. त्यांनी दम देऊन घरातल्या मंडळींना गप्प केले. तेवढ्यात रामभाऊ नावाचा गडी काय झाले हे पाहण्यासाठी धावत घरात आला. त्याच्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला, तो रक्तबंबाळ झाला, हाताला झालेली जखम त्याने उपरण्याने गुंडाळली. इतर गड्यांनाही आरडाओरडा ऐकू आला, पण त्यांच्या घराच्या कड्या बाहेरून लावलेल्या होत्या. वर दरोडेखोरांनी बाहेर यायचे नाही, असा दम दिला होता. ते बाहेर आले नाहीत. रामभाऊंच्या घराचा दरवाजा वाकडा असल्यामुळे त्याच्या घराला बाहेरून लावलेली कडी आतून दरवाजाला जोर लावताच निसटून उघडली गेली होती.
दरोडेखोरांनी सार्यांना कुर्हाडीच्या धाकाखाली ठेवून घर पालथे घालण्यास सुरुवात केली. घरातील, कपाटे, पेट्या, डबे, सगळे उघडून उलटे पालटे केले. पैसे आणि अन्य ऐवज ठेवलेले स्टीलचे कपाट मजबूत असल्याने त्यांच्याकडून उघडेना. त्याच्या देवघरात देवाच्या फोटोमागे ठेवलेल्या किल्ल्या दरोडेखोरांच्या हाती लागल्या. कपाट उघडून त्यातील २२ हजार रोख आणि ३० ते ३५ तोळे दागिने, चांदीच्या वस्तू असा किंमती ऐवज लुटून दरोडेखोर तिथून पसार झाले. हा प्रकार ४० ते ४५ मिनिटात झाला होता. जाताना दरोडेखोरांनी घराला बाहेरून कड्या लावल्या होत्या. त्यांनी ‘याद राखा आमची माणसे सकाळपर्यंत घराच्या आजूबाजूलाच आहेत’ असे दरडावल्यामुळे आणि झालेल्या प्रकाराच्या मानसिक धक्क्याने घरातले सगळे प्रचंड घाबरलेले होते. दरोडेखोरांनी घरातील टेलिफोनची वायरही तोडलेली होती. त्यामुळे त्यांना बाहेर कुठे संपर्क करता येत नव्हता. सगळे घाबरून घरातच बसले होते. सकाळी रानात जाणारी आजूबाजूची माणसे दिसल्यावर त्यांना हाक मारून दार उघडायला सांगितले. मग बाळासाहेबांनी शेजारच्या वस्तीवर जाऊन तिथून पोलिसांना फोन करून दरोड्याची माहिती दिली.
गावातील लोकांनी तिथे मोठी गर्दी केली होती. सुदैवाने गावचा पोलीस पाटील अनुभवी असल्यामुळे त्याने गावकर्यांना घटनास्थळातील वस्तूंना हात लावू दिला नव्हता. दरोड्यात जखमी झालेल्या रामभाऊ गड्याच्या अंगातील बंडी, धोतर रक्ताने लाल झालेले होते. तो जोरजोराने कण्हत होता. त्याला उपचारासाठी सरकारी दवाखान्यात पाठवायचे ठरले. पण तो जाण्यास तयार नव्हता. झाल्या प्रकाराने तो भलताच व्यथित झाला होता.
आमच्या पाठोपाठ चार-पाच पोलीस मोटारसायकलवरून आले. सार्यांच्या मिळून तीन टीम तयार केल्या, त्यांना तपासाच्या सूचना देऊन कामे वाटून दिली. गावच्या आजूबाजूच्या परिसरात कुठे नवीन लोकांची वस्ती पडली आहे का, याचा शोध घ्यायला सांगितले. आजूबाजूच्या गावातील हिस्ट्री शीटर्स (म्हणजे पोलिसांत नोंद असलेले सराईत गुन्हेगार), लहानमोठ्या चोर्या करणारे गुन्हेगार कुठे आहेत, याचा तपास करायला सांगितले. दरोडेखोर ज्या दिशेने गेले तेथील रस्ते तपासून त्या भागात काही वस्तू किंवा दुवा मिळतो का, हे पाहायला सांगितले. घराच्या मागील बाजूस असलेल्या छोट्या टेकडीकडे जाणार्या रस्त्यावर चिखल होता. त्यात अडकून एक स्लिपर तुटलेली होती. थोड्या अंतरावर दुसरी स्लिपर टाकून दिलेली होती. त्या स्लिपर वस्तीवरील कुणाच्याच नव्हत्या. त्या दरोडेखोरांच्याच असाव्यात म्हणून कागदाच्या साहाय्याने उचलून त्यावर टोपल्या झाकून ठेवल्या.
घरातील इतर कुणी लोक जखमी नव्हते. गोधडी अंगावर असल्यामुळे बाळासाहेबांना काठीचा फटका लागला नव्हता. घराच्या पाठीमागील इलेक्ट्रिक पोलवरील बल्ब फोडला होता. पोल फारसा उंच नसल्यामुळे तो दगडाने किंवा काठीने फोडता येण्यासारखा होता. घरातील लोकांचे जाबजबाब झाले, गावातील लोकांकडे विचारपूस झाली. गावातल्या एकाच्या घरातून पोलीस कंट्रोल रूम, फिंगरप्रिंट ब्युरो, वरिष्ठ अधिकारी यांना फोनवरून हकीकत कळवली. तासाभरात वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी तपासाबाबत सूचना दिल्या. दरम्यान, मी रायटर जाधव, धनाजी निकम अशांनी मिळून फिर्याद, पंचनामा आदींची पूर्तता केली. सुमारे अडीच-तीनच्या सुमारास फॉरेन्सिकचे लोक आले. त्यांना कपाटावर काही फिंगरप्रिंट्स मिळाले. ल्युसी नावाची लॅब्रेडोर जातीची कुत्री आली… तिचे ट्रॅक रेकॉर्ड खूप उत्तम होते. तिने आतापर्यंत तीन दरोड्यांतील चोरट्यांना पकडून दिले होते. थेट दरोडेखोरांच्या वस्तीपर्यंत तिने माग काढलेला होता. सापडलेल्या संशयित स्लिपरचा वास तिला देण्यात आला. वास घेऊन ती निघाली, तिच्यामागे गावातील पाच-सहा तरुण आणि दोन पोलीस होते. तिने टेकडी ओलांडली आणि ती राखीव जंगलाच्या वरच्या बाजूला वळून झाडीत थांबून भुंकू लागली. तिथे एक कुर्हाड, जिलेबी चिवड्याचे कण चिकटलेले वर्तमानपत्राच्या पुडीचे कागद, विडीची थोटके पडलेली दिसली. ते सारे जप्त केले. त्यापुढे चार ते पाच किलोमीटर अंतरावर मालेगाव-सटाणा रोड होता. तिथपर्यंत कुत्री गेली. तिथे गेल्यावर स्वत:भोवती गोल फिरायला लागली, म्हणजेच दरोडेखोर तिथून एखाद्या वाहनाने गेले असावेत, असा अंदाज बांधला आणि आम्ही परत आलो.
बाळासाहेबांच्या शेजारील वस्तीवर जनावरांचा चारा तोडण्यासाठी कुर्हाड बाहेर ठेवली होती. तीच दरोडेखोरांनी वापरली होती. तपास टीम शोध घेत होत्या, पण हाती काही लागत नव्हते. दरोडेखोरांनी टाकलेल्या बिडीच्या दोर्यावरून कळाले की ती मालेगावात तयार झालेली बिडी होती. त्यावरून दरोडेखोर आजूबाजूच्या परिसरातील असावेत, असा अंदाज बांधून त्या दृष्टीने तपास सुरू केला. मालेगाव शहरात खबरे अॅक्टिवेट करण्यात आले. सराफ बाजारात कोणी दागिने वगैरे विकण्यासाठी आले होते काय, याची माहिती काढण्यात आली होती. सराफांना माहितीसाठी दागिन्यांचे वर्णन कळविण्यात आली होती.
सात-आठ दिवस आम्ही दरोड्याच्या घटनास्थळी जात होतो, गावात तपास करत होतो, पण कोणतीही नवीन माहिती मिळत नव्हती. हवालदार धनाजी निकम वस्तीवर जाऊन लोकांना बोलते करण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु त्यांनाही काही विशेष माहिती मिळत नव्हती. काम लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे अहोरात्र प्रयत्न सुरू होते.
पाटण्याला मुक्काम पडला होता. पाटलांच्या वस्तीवरील गड्यांबाबत चौकशी केली, तेव्हा ते गडी विश्वासातले आणि घरातलेच आहेत, असे बाळासाहेबांनी सांगितले. गावात फिरस्ते, पोपटवाले, गारुडी, भीक मागणारे, दरवेशी, पारधी इत्यादी कोणी येऊन गेले का याचा तपास केला, पण तसे कोणीही आले नव्हते. सटाणा गावात एसटी स्टँड, खानावळी, लॉटरी स्टॉल, पत्त्यांचे क्लब, देशी दारूची दुकाने, वेश्यावस्ती येथे खबरे अॅक्टिवेट करण्यात आले, परंतु तिथे देखील काहीच निष्पन्न झाले नव्हते.
हा तपास करत असताना मला आणि हवालदार धनाजी निकम, जाधव रायटर अशांना काही शंका आल्या होत्या, त्या पुढीलप्रमाणे होत्या…
१) दरोडेखोरांनी घरातल्या लोकांना मारहाण का केली नाही? दहशत बसविण्यासाठी दरोडेखोर नेहमी मारहाण करतात आणि इथे तर त्यांच्याजवळ कुर्हाडही होती.
२) गड्यांपैकी रामभाऊ एकटाच कसा काय पळत आला?
३) दरोडेखाेरांना कपाटाच्या किल्ल्या लगेच कशा काय सापडल्या?
४) लग्न जवळ आले तेव्हाच दरोडेखोर आले हा योगायोग कसा? इ. इ.
या शंकांमुळे आम्ही थोडे पेचात पडलो होतो. हे सगळे सुरू असताना नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने अशा प्रकारच्या गुन्हे करणार्या (एमओबी) संशयित गुन्हेगारांची लिस्ट पाठविलेली होती. त्यांना चेक करून झाले. पाटील वस्तीवर गुन्हेगारांचे फोटो दाखविण्याचा प्रयत्न झाला. परंतु गुन्हेगारांनी चेहरे झाकले असल्याने गुन्हेगार असे ओळखणे अशक्य होते. नाशिक सेंट्रल जेलमधून महिनाभरात बाहेर पडलेल्या नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारांची माहिती घेण्यात आली. मालेगाव आणि नाशिक येथील खबर्यांना अॅक्टिवेट केलं होतं. परंतु त्यांच्याकडूनही सकारात्मक माहिती मिळेना.
दहा बारा दिवसांनी तपासात भाग घेतलेल्या सगळ्या सहकार्यांची मीटिंग घेतली, त्यात मला आलेल्या सार्या शंका मी सहकार्यांना बोलून दाखवल्या आणि त्यांना आलेल्या शंका ऐकून घेतल्या. गडी रामभाऊ याला डॉक्टरांकडे घेऊन गेलेल्या पोलीस कर्मचार्याने सांगितले की, रामभाऊ जरा जास्तच रडत होता, मला त्यांनी मारून टाकले असते, देवाच्या कृपेने वाचलो, असे सारखे बडबडत होता. दवाखान्यातील कंपाऊंडर, कर्मचारी, डॉक्टर आणि इतर लोकांनाही सारखे तसे सांगत होता. हे थोडे संशयास्पद वाटत होते.
दवाखान्यात मी स्वत: जाऊन कर्मचारी, कंपाऊंडर आणि मेडिकल ऑफिसर डॉक्टर शरद वाघ यांच्याशी याबाबत चर्चा केली. डॉ. वाघ खूप अनुभवी डॉक्टर होते. तेही म्हणाले, हो, तो जरा जास्तच बडबडत होता आणि तेवढ्यात त्यांना एकदम काहीतरी आठवले. त्यांनी केस हिस्ट्रीचे पुस्तक आणि मेडिकल सर्टिफिकेटचे कार्बन कॉपी पुस्तक आणले. दोन्ही वाचून ते म्हणाले, मला त्याचवेळी जरा संशय वाटत होता. कारण रामभाऊ कुर्हाडीने जखम झाल्याचे सांगत होता, परंतु जखम कापीव होती. ती तीक्ष्ण हत्याराने कापल्यासारखी आणि वरच्या वर होती, खोलवर नव्हती. मीही दरोड्यातली कुर्हाड बघितली होती, ती बोथट होती, ती शेवटलेली (धार लावलेली) नव्हती. त्यामुळे आमचा संशय वाढला. धनाजी निकम यांनी मालकाकडे रामभाऊबद्दल पुन्हा चौकशी केली, परंतु तो आपला नातेवाईक असून अत्यंत विश्वासू असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.
दोन-तीन दिवसांनी धनाजी निकम घटनास्थळी परत गेले आणि तिथून थेट माझ्याकडे आले, मला म्हणाले, साहेब, एक गोष्ट मनात सारखी येतेय… रामभाऊ पळत आला त्यावेळी त्याने धोतर आणि बंडी अंगात घातलेली होती. रात्रीच्या वेळी गडी लोक धोतरावर झोपत नाहीत तर पट्ट्यापट्ट्याची अंडरपँट घालून झोपतात. मी लक्षात येणार नाही अशा पद्धतीने रामभाऊकडून माहिती काढली तेव्हा तो धोतरावर नाही तर अंडरपँटवर झोपतो, असे त्यानेही मला सांगितले आहे. मग बाळासाहेबांचा आरडाओरडा ऐकून तो पळत आला, तेव्हा अंडरपँटवर कसा नव्हता? आमचा रामभाऊवरचा संशय अधिकाधिक बळावला. आम्ही त्याच्यावरच पूर्ण फोकस करण्याचे ठरविले.
हवालदार निकम यांना आणखीही माहिती मिळाली. पूर्वी एकदा रामभाऊच्या मुलाने त्याच्याकडे सायकल विकत घेण्यासाठी हट्ट केला होता, तेव्हा त्याने मुलाला खूप मारलं होतं. पण दोनतीन दिवसांपूर्वी तो दारू पिऊन आल्यानंतर बायको त्याला दारू पिणे, पैसे खर्च करणे यावरून बोलली तेव्हा तो नशेत ओरडत होता, मी भरपूर दारू पिणार, इंग्लिश दारू पिणार आणि पोराला सायकलही घेऊन देणार.
आता आमची खात्रीच झाली की इथेच कुठेतरी पाणी मुरतेय. दरोडा टाकण्याच्या पद्धतीवरून तो सराईत दरोडेखोरांनी टाकलेला नसावा, असे मला सारखे वाटत होतेच. रामभाऊ मालेगावच्या पलीकडे पाच किलोमीटरवरच्या एका गावात राहात होता. तिथल्या खबर्यांकडून माहिती मिळाली की दरोड्याच्या चार पाच दिवस आधी रामभाऊ गावात आला होता आणि गावातला चोर्या करणारा पिराजी आणि इतर पाचजणांबरोबर सारखा फिरत होता. गावाबाहेरच्या हातभट्टीच्या अड्ड्यावर त्यांची दारू पार्टी झालेली होती. दरोड्यानंतर पिराजी तीनचार दिवस गावात नव्हता. काहीही कामधंदा नसताना तो हातभट्टी सोडून सध्या देशी दारूच्या अड्ड्यावर दारू पीत होता. खाटकांकडून मटण व कोंबडी विकत घेत होता.
मग आम्ही एका रात्री पिराजी आणि त्याच्या तीनचार साथीदारांना उचलून आणले. नेहमीच्या पद्धतीने ‘पाहुणचार’ करून विचारपूस केली तेव्हा पुढील हकीकत कळाली…
रामभाऊ आणि पिराजी हे लहानपणापासूनचे दोस्त. दोघे मिळून लहानलहान पीकचोर्या करायचे. पुढे रामभाऊ बाळासाहेबांकडे सालगडी म्हणून कामाला लागला आणि तिकडेच वस्ती करून राहत होता. दरम्यान इकडे पिराजीने गावात एका दारू प्यायलेल्या मोटारसायकलस्वाराला चाकू दाखवून दरोडेखोरी केली होती आणि त्यात त्याला अटकही झालेली होती. पिराजी मुळातच जरा धाडसी स्वभावाचा होता. रामभाऊचीही वृत्ती थोडीशी गुन्हेगारी स्वरुपाची होती. मालकाकडे लग्न आहे आणि मालकाने बँकेतून भरपूर पैसे काढून आणलेले आहेत तसेच घरात मुलीसाठी दागिनेही तयार करून ठेवलेले आहेत, अशी माहिती त्याने पिराजीला दिल्यावर त्यांनी दरोडा टाकण्याचे ठरवले. यासाठी दोन तीन मीटिंग घेतल्या, चर्चा करून प्लॅन ठरला. साथीदारांनी कोणत्या रस्त्याने यायचे, वस्तीवर कुठून प्रवेश करायचा, ते ठरलं. मागील पोलवरील लाइट दगड मारून फोडायचा, इतर दोन गड्यांच्या घरांना बाहेरून कडी लावायची हे ठरलं. रामभाऊच्याही घराला कडी लावायचे ठरल्यावर तो म्हणाला, नको मी पळत येतो, तेव्हा तुम्ही मला खोटे खोटे मारा. मी सुरीने हातावर कापून घेतो, म्हणजे कपड्यावरील रक्त पाहून माझा कोणाला संशय येणार नाही. तुम्हाला कपाटाच्या किल्ल्या कुठे ठेवल्यात, हे खुणेने मला सांगता येईल.
ठरल्याप्रमाणे सगळे घडले. अमावस्येच्या अंधार्या रात्री सहा सात साथीदार जमवून त्यांनी मालेगाव-सटाणा रोडवर टेम्पो पकडला. महाल पाटणे गावाकडे जाणार्या फाट्याजवळ रस्त्यावर उतरून चालत आले. बाजूच्या वस्तीवरून दांडकी व कुर्हाड घेतली. मालकांच्या अंगावर गोधडी टाकून दांडक्याने मारून त्यांनी घरात प्रवेश केला आणि ठरल्याप्रमाणे रामभाऊला कुर्हाडीने मारल्याचे नाटक केले. रामभाऊने कपाटाच्या किल्ल्या कुठे ठेवल्या हेही खुणेने दाखवले. पैसे, दागिने लुटून दरोडेखोर जंगलातून पसार झाले. दरोड्यासाठी येतानाच त्यांनी वाटेवर राखीव जंगलात झाडावर जिलबी आणि भजीचे पुडे असलेली पिशवी टांगून ठेवली होती. ती विश्रांती घेता घेता फस्त केली, बिड्या प्यायले. संरक्षणासाठी बरोबर आणलेली कुर्हाड तिथेच टाकून दिली. मुख्य रस्त्यावर चालत जाऊन एका ट्रकला हात देऊन ते ट्रकने मालेगावात आले. सकाळी चालत गावात पोहोचले. एक दिवस गावात थांबून पिराजी त्याचा एक साथीदार औरंगाबादला गेले आणि तिथे त्यांनी चोरलेले दागिने विकले. आलेले पैसे सगळ्यांना ठरल्याप्रमाणे वाटून दिले. पैसे आल्याने त्यांचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अचानक वाढले. हातभट्टीऐवजी ते देशी दारू पिऊ लागले. पोटभर मटण, कोंबडी खाऊ लागले. रामभाऊला त्याच्या हिश्शाचे पैसे घेण्यासाठी गावी यायचे होते. परंतु मध्येच गावी गेलो तर मालकाला संशय येईल म्हणून तो गावी आलेला नव्हता. पैसे येणार असल्याने तो बायकोपाशी मुलाला सायकल घेऊन देणार, वगैरे बडबडला होता आणि तेथेच तो फसला.
औरंगाबादहून दागिने हस्तगत करण्यात आले, पिराजीच्या घरातून तीस हजार रुपये कॅश जप्त करण्यात आली. रामभाऊ, पिराजी आणि त्यांच्या सगळ्या साथीदारांना अटक करण्यात आली. हा तपास म्हणजे टीमवर्क, सहकार्यांशी सुसंवाद, सूक्ष्म अवलोकन, वैद्यकशास्त्राची मदत, खबर्यांचं सहकार्य इत्यादी गोष्टींचा उत्तम समन्वय आहे.
– राजेंद्र भामरे
(लेखक पुण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)