मोठ्या माणसांचे पाय मातीचे निघण्याचा अपेक्षाभंग आपल्या देशाला नवा नाही. आता तर काही उद्योगपतींच्या हातांमधली बाहुलीही लोक देव म्हणून भजू लागले आहेत, जिथे मुळात मोठी माणसंच राहिली नाहीत, तिथे मातीच्या पायांचा चिखलच अधिक तुडवावा लागणार, यात काय आश्चर्य?
इन्फोसिसचे नारायण मूर्ती हे नवमध्यमवर्गाचे आदर्श. त्यांनी मध्यंतरी देशातल्या युवकांना आठवड्याचे ७० तास काम करा, असा संदेश दिला. म्हणजे दिवसाचे दहा तास. रविवारची सुट्टी पकडली तर जवळपास १२ तास. बाहेरचं सगळं जग वर्क लाइफ बॅलन्स ही संकल्पना धरून त्याप्रमाणे कामाचे तास, आठवड्याचे कामाचे दिवस कमी करत आहे. कर्मचार्यांचं व्यक्तिगत आयुष्य, त्यांची विश्रांती, त्यांना इतर काही छंद, विरंगुळा यांना वेळ देता यावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी ते आवश्यक आहे. अशावेळी मूर्ती यांनी ही उफराटी अपेक्षा व्यक्त केली.
आता एल अँड टी या कंपनीच्या सुब्रम्हण्यन या सर्वोच्च अधिकार्याने तर मूर्ती यांच्यावर कडी केली. मी तुम्हाला रविवारी कामाला लावू शकत नाही, याचं वाईट वाटतं, असं आपल्या कर्मचार्यांना सांगून, किती वेळ बायकोच्या तोंडाकडे बघत बसणार, असा प्रश्नही त्यांनी केला.
हा योगायोग नाही. या देशाला बलशाली वगैरे बनवण्याच्या नावाखाली त्याचं वेठबिगारीस्तानात रूपांतर करण्याची ही योजना आहे. केंद्र सरकारचे त्या दिशेने जाणारे काही कायदे मंजूर होण्याच्या बेताला असताना मूर्ती आणि सुब्रम्हण्यन यांच्यासारखे सरकारस्नेही उद्योगपती, व्यावसायिक ही विधानं करत आहेत.
या व्हाइट कॉलर वेठबिगारीचे आधुनिक काळातले जनक नारायण मूर्ती हेच आहेत. ते आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्या साध्या राहणीमानाच्या गाथांनी अनेक मध्यमवर्गीय भाबडी हृदयं आजही भरून येतात. जगात माहिती तंत्रज्ञान क्रांती घडत असताना नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस ही सेवा पुरवठादार कंपनी स्थापन करून लाटेवर योग्य वेळी स्वार होण्याचं व्यवहारचातुर्य दाखवलं. त्याचा आपल्याकडे डांगोरा असा पिटला गेला, जणू नारायणमूर्ती यांनीच आयटी क्रांती घडवून आणली! प्रत्यक्षात त्यांनी व्हाइट कॉलर आयटी मजुरीचंच काम निर्माण केलं आणि तेही भारतात स्वस्तात होत होतं, म्हणूनच भारताकडे येत होतं. या कामातले ग्राहक परदेशांतले, त्यांच्या वेळा आपल्यापेक्षा वेगळ्या, अमेरिकेतल्या तर थेट उलट्या. इकडे दिवस तेव्हा तिकडे रात्र. त्यामुळे तिकडे दिवस असताना त्यांना सेवा पुरवणारे निशाचर आयटी कर्मचारी निर्माण करणं, त्यांना घरी जाण्याची संधीच नाही, तर मग त्यांच्यासाठी विश्रांतीगृहं, मनोरंजनाची साधनं, खानपानगृहं आणि इतर क्षेत्रांच्या तुलनेत आकर्षक पगार देणं, अशी व्यवस्था मूर्ती आणि या क्षेत्रातल्या बाकीच्या सगळ्याच कंपन्यांना करावी लागली.
कामाचे ठराविक तास ही कल्पना मोडीत काढली जाण्याची ती सुरुवात होती. आयटी कर्मचार्यांना व्यक्तिगत आयुष्यच उरणार नाही, कुटुंबासाठी वेळ नाही, झोप नाही, अस्वस्थता, व्यसनं, मौजमजेच्या ठरीव कल्पना, अनारोग्यकारक लाइफस्टाइल या सगळ्याची देणगी भारतीय तरुणाईला याच क्षेत्राने दिली. त्याचबरोबर कर्मचार्यांना कितीही तास राबवून घ्यायचं, ही वेठबिगारी संस्कृतीही मूर्ती यांच्यासारख्याच उद्योजकांनी आणली. तारुण्याच्या जोशात आणि चकचकीत ऑफिसेस, समाजात मिळणारा मान, हातात खेळणारा पैसा, अधून मधून परदेशांत जाण्याची संधी या लाभांमुळे एका पिढीने ही आयटी मजुरी आनंदाने आणि अभिमानाने केली. त्याची फळं आता चाळिशी-पन्नाशीत असलेली ही पिढी भोगतेच आहे.
२०२०च्या कोविड उद्रेकानंतर हा मूर्ती पॅटर्न देशभर अधिक क्रौर्याने रेटण्याची व्यवस्था झाली. काही दोष नसताना घरात बंदिस्त झालेल्या अनेकांच्या नोकर्या घरबसल्याच गेल्या. ज्यांच्या राहिल्या त्यांच्यावर आपण उपकार करतो आहोत, असा आव व्यवस्थापनांनी आणला. तेव्हा निम्मे झालेले अनेकांचे पगार आता चार वर्षांनीही पूर्वपदावर आलेले नाहीत (वार्षिक वाढ वगैरे लांबच), काम डबल झालं होतं, ते कमी झालेलं नाही. काम केलं नाही तर नोकरी जाईल, ती याहून कमी पगारावर करायला बेरोजगारांची फौज खडी आहेच. त्यामुळे मानेवर जू ठेवून काम करत राहायचं, हेच एका मोठ्या नोकरदारवर्गाचं भागधेय बनून बसलेलं आहे.
अशा परिस्थितीत नारायण मूर्ती सांगणार ७० तास काम करा, सुब्रम्हण्यन सांगणार रविवारी पण काम करा, ९० तास काम करा; पगार किती तासांचा देणार आहात, ते कोण सांगणार? नारायण मूर्ती ज्या वयातल्या तरुणांना देशकार्याला (यांच्याकडे वेठबिगारी हे देशकार्य!) वाहून घ्यायला सांगत आहेत, त्या वयात त्यांनी स्वत: इतके तास काम केलं असतं, तर सुधा मूर्तींशी त्यांची गाठभेट तरी झाली असती का? सुब्रम्हण्यन यांना ५१ कोटी रुपये पगार आहे. एवढा पगार विभागून दिला तरी पाचदहा हजार लोक घरसंसार सोडून, कपड्यांची बॅग भरून कंपनीतच मुक्कामाला येऊन राहतील.
देशाच्या अर्थव्यवस्थेचे बारा वाजलेले आहेत. रुपया नीचांकी अवस्थेत आहे. देशाची जी काही संपत्ती दिसते, ती मोजक्या माणसांच्या हातात एकवटलेली आहे. मोठी जनसंख्या उपाशी, बेरोजगार, दिशाहीन आणि अस्वस्थ होत चाललेली आहे. कायम शेठजींच्याच दावणीला बांधलेल्या सत्ताधारी पक्षाकडे यातले काहीही सुधारण्यासाठी आवश्यक अर्थज्ञानाचीच वानवा आहे. नवीन कायदे आणून सर्व स्तरांवरच्या कामगारांचं वेठबिगारांमध्ये रूपांतर करण्याची कॉर्पोरेट मालकांची इच्छापूर्ती करायला त्यांचे चौकीदार बांधील आहेत.
अखंड हिंदुराष्ट्र वगैरे कधी व्हायचे त्याचा पत्ता नाही, सध्याची वाटचाल वेठबिगारीस्तानाकडे सुरू आहे.