सिमन्सच्या वरळी ऑफिसमधे मित्राला भेटायला गेलो असताना, त्याने या सदरासाठी मराठी उद्योजकाचं नाव सुचवलं, राजेश सुटे. त्यांचा स्टँप (टपाल तिकीट नव्हे, आपल्या व्यवसायाची, पदाची अधिकृत मोहोर आपण ज्यातून उमटवतो, तो एकेकाळचा रबर स्टँप आणि आताचा यांत्रिक स्टँप) बनवण्याचा व्यवसाय आहे. मला प्रश्न पडला, स्टँप किती छोटा आणि नगण्य असतो. या अवघ्या पंधरा वीस रुपयांच्या स्टँपचा व्यवसाय असा कितीसा असेल?
मित्र म्हणाला, ‘अरे साडेचारशे रुपयांचा एक स्टँप आहे त्यांच्याकडे.’
ऐकून उडालोच.
म्हटलं, या व्यावसायिकाला भेटायलाच हवं. सिमन्सच्या कॅन्टीनमध्ये राजेश सुटे यांना भेटून त्यांचा व्यवसाय प्रवास ऐकायला मिळाला. ‘मी राजेश सुटे. माझा जन्म वर्धा जिल्ह्यात झाला. बाबा ट्रेझरी ऑफिसर, आई गृहिणी. आम्ही दोन भाऊ आणि एक बहीण. मी सात महिन्यांचा असताना आई वारली. घरात इतर सुखसोयी होत्या, पण आई नव्हती, त्यामुळे मी काहीसा गप्प गप्प असायचो, माझी मोठी बहीण मला आईच्या जागी होती. पुढे तिच्या लग्नानंतर ती कल्याणला आली, त्यामुळे बारावीपर्यंत शिक्षण वर्ध्याला झाल्यावर मी पुढील शिक्षणासाठी कल्याणला बहिणीकडे आलो. दुसर्याच दिवशी एका टेक्सटाइल कंपनीत रुजू झालो. तिथे दोन शिफ्टमध्ये म्हणजे दिवसाचे बारा तास काम करू लागलो. तोवर कधीही उभं राहून काम केलं नव्हतं, रात्री जागरण करून काम करायची सवय नव्हती. साड्यांवर मशीनने डिझाईन प्रिंट करणं हे माझं काम होतं. तीन महिन्यांनी प्रकृतीची होणारी आबाळ आणि शिक्षणासाठी वेळ न मिळणे या कारणांनी मी ती नोकरी सोडली. नवीन नोकरीच्या शोधात असताना एक जाहिरात वाचली, मार्वेâटिंगसाठी तरुण चुणचुणीत मुलगा हवा, संपर्क मयूर स्टेशनरी सीएसटी. तीन महिन्यांच्या नोकरीत मला एवढं पुरतं कळलं होतं की लेबर वर्क आणि ऑफिस जॉब माझ्यासाठी नाही. फिरण्याची आणि माणसांशी बोलण्याची मला आवड होती, त्यादृष्टीने हा मार्केटिंग जॉब मला बरा वाटला. मुंबईत पाय टाकल्यापासून ग्रामीण भाषेचा लहेजा हा मला जाणवलेला महत्वाचा प्रॉब्लेम. पण मेहनत करायची मानसिकता असेल तर भाषेचा अडसर जाणवणार नाही असा आत्मविश्वास मनाशी बाळगून इंटरव्ह्यूसाठी गेलो. जुजबी प्रश्न विचारून माझी निवड झाली आणि मी कामाला लागलो, सोबतच नाईट कॉलेजला प्रवेश घेऊन शिक्षण पुन्हा सुरू केलं. मयूर स्टेशनरी इथे परमाज कंपनीच्या सेल्फ इंक स्टँपची फ्रँचायझी होती. त्यांचे स्टँप तेव्हा चेन्नईहून तयार होऊन येत. पहिल्या दिवशी सीएसटीला कामावर जॉइन व्हायला निघालो, कल्याणहून लोकल पकडली ती भांडुपला बंद पडल्याने कॅन्सल झाली. बाजूच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन उभी दिसली, गर्दी कमी होती, अत्यंत चपळाईने मी ती ट्रेन पकडली आणि आतल्या गर्दीत जाऊन उभा राहिलो. तेव्हा ट्रेनमध्ये पुढील स्टेशन पुकारलं जात नसे. काही वेळाने पुन्हा कल्याण आलं, तेव्हा लक्षात आलं की एका प्लॅटफॉर्मच्या दोन बाजूंनी धावणार्या ट्रेन विरूद्ध दिशेकडे धावणार्या असतात. पुन्हा सीएसटी दिशेने जाणारी लोकल पकडली आणि कामावर पोहोचलो. पहिल्या दिवशी गर्दीची भीती वाटली, पण नंतर वाटलं, हेच लोंढे मला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणार आहेत, त्यामुळे न भिता, आत्मविश्वासाने या गर्दीचा भाग व्हायचं.
पहिल्या दिवसापासूनच मार्केटिंगला सुरुवात झाली, मला कंपनीने सायकल दिली. कुलाबा, नरिमन पॉईंट, नेपियन सी रोड या भागात मला स्टॅम्प मार्केटिंगसाठी फिरायचं होतं. नरिमन पॉइंटची ऑफिसेस ही माझी पहिली असाईनमेंट होती. इतक्या हायफाय एरियात फिरताना सोबतच्या काही मुलांना जरा टेन्शन यायचं, पण मी त्या मानाने स्ट्रेस फ्री होतो, कारण हा जॉब मी स्वखुशीने निवडला होता. मला या शहराची ओळख करून घ्यायची होती, इथल्या गगनचुंबी इमारती, रस्ते, मोठमोठाली ऑफिसेस या सगळ्यांचा मला परिचय करून घ्यायचा होता. त्यामुळे कुठल्याही भागात काम करायला मी उत्सुक होतो. म्हणायला इंग्रजीची थोडी भीती होती, पण माझा आत्मविश्वास आणि मराठी हिंदी भाषेचा उत्तम उपयोग यामुळे मी त्या कामात तरून जात असे.
उन्हातान्हात फिरून वस्तू विकणे या मार्केटिंग जॉबसाठी मराठी मुलं उत्सुक नसतात. कंपनीला अजून दोन माणसं हवी होती. त्यासाठी मी कॉलेजच्या काही मित्रांना विचारलं, तर ऑफिसमधे झाडू मारणार्या प्यूनची नोकरी चालेल, पण जास्त पैसे मिळवून देणारा मार्केटिंग जॉब नको असं ते म्हणाले.
स्टँप व्यवसाय आवडायला लागला तेव्हा मी स्टँपचा इतिहास वाचत गेलो, आज ज्याला आपण शिक्का अथवा स्टँप म्हणतो ते मोहर म्हणून ओळखले जात. अधिकृत खलित्यावर राजाची मोहर उमटवली जायची. आजही सरकारी कामकाजात गुप्त माहिती पाठवताना पाकिटावर किंवा मतदानपेट्या ने-आण करताना मेणाचा शिक्का उमटवला जातो. सरकारी कामकाजात लाकडी शिक्यांचा वापर ब्रिटिश राजवटीत सुरू झाला. धातूच्या एक एक अक्षरांचा ब्लॉक करून छापखान्यात कागदावर छपाई केली जायची. याच तंत्राचा वापर करून लाकडी ठोकळ्यावर रबर चिटकवून शिक्के बनवले जायचे. १९९४ साली मी जेव्हा स्टँप व्यवसायात आलो, तेव्हा रबरऐवजी नायलॉन (पॉलिमर) आणि लाकडी ठोकळ्याऐवजी अॅक्रलिक हॅण्डलचे आकर्षक नायलॉन स्टँप बाजारात आले होते. पण तेव्हाही लाकडी आणि रबर स्टँपचीच विक्री अधिक होती. कारण रबर स्टँप पंधरा रुपयांना विकले जात, तर नायलॉन स्टँप पन्नास रुपयांना. या तुलनेत आम्ही विकत असलेल्या सेल्फ इंक स्टँपची किंमत सहा सात पटीने जास्त होती. आमचे दर मात्र साइजनुसार साडे तीनशे ते बाराशे रुपये असायचे.
हे स्टँप महाग का आहेत हा प्रश्न मी आमच्या शेठला विचारला तेव्हा तो म्हणाला, या जगात पन्नास रुपये किलोचा बासमती तांदूळही खपतो आणि दहा रुपये किलोचा साधा उकडा तांदूळसुद्धा संपतो. दोन्ही विकले जातात. तुला तुझ्या ग्राहकांपर्यंत पोहचता यायला हवं. लाकडी स्टँप वजनाने जड आणि दिसायला ओबधोबड होते. रबराची अक्षरे उंच सखल असल्याने बर्याचदा शिक्यातील अक्षरे पुसट यायची. नायलॉन स्टँप दिसायला छान आणि वजनाने हलका असला तरी शिक्का मारायला शाईचा स्टँप पॅडसोबत बाळगावा लागायचा. स्टँप पॅडमधे स्टँप बुडवून कागद पत्रांवर उमटवला की काहीवेळा शाई कागदावर पसरायची असे अनेक प्रॉब्लेम होते. या तुलनेत सेल्फ इंक स्टँपमधे शाई इनबिल्ट असायची आणि याने कागदावर मारलेले शिक्के नीटनेटके आणि उठावदार दिसत. हे फायदे पटवून दिले की ग्राहक आमचे स्टँप घेत असत. पण हे इतकं सोपं नव्हतं. पंधरा रुपयात बनणार्या स्टँपने जर आमचं काम चालतंय तर तुझा चारशे रुपयांचा स्टँप मी का घेऊ? असा प्रश्न मला ग्राहक विचारीत. एका दिवसात ही मानसिकता बदलणे शक्य नव्हतं. मी ऑफिस ऑफिस फिरत स्टँप विकायचा प्रयत्न करत राहिलो.
एकदा एका कॉर्पोरेट ऑफिस असलेल्या एका इमारतीत स्टँप विकायला घुसलो असता वॉचमनने मला बकोटी धरून बाहेर काढलं आणि पुन्हा इथे पाऊल टाकू नको असा दम दिला. वाईट वाटलं, पण हार मानली नाही. काही दिवसांनी त्याच विभागात फिरत असताना त्या इमारतीबाहेर नवीन वॉचमन दिसला. नवीन वॉचमनकडे बघून न बघितल्यासारखं करत मी पुन्हा इमारतीत स्टँप विकायला गेलो. त्या दिवशी चार ऑफिसमधून ऑर्डर्स मिळाल्या. जेव्हा पंधरा दिवसांनी मी बनवलेले स्टँप द्यायला तिथे गेलो, तेव्हा ज्याने मला बाहेर काढलं तोच गेटवर उभा होता. पण माझ्याकडील तेथील चार ऑफिसेसचे व्हिजिटिंग कार्ड पाहून त्या वॉचमनने मला सलाम ठोकला. या घटनेने मला मी जगात कुठेही स्टँप विकू शकतो हा आत्मविश्वास दिला. काही दिवसांनी मी मार्केटिंग पद्धत बदलली. छोट्या मोठ्या कंपन्याच्या ऑफिसेसमधे जाण्यापेक्षा मी फॉर्च्युन ५०० कंपनींच्या मागे लागलो. कारण सर्वात जास्त पैसा या कंपन्यांकडे आहे आणि चांगली असेल तर महाग वस्तू विकत घ्यायला ते मागे पुढे पाहत नाहीत. इथेही वॉचमन, शिपाई, कारकून यांना ओलांडून मेन साहेबांपर्यंत पोहचावं लागायचं, मगच ऑर्डर मिळायची. रिसेप्शन काऊंटरवर जाऊन तुमचे जुने स्टँप द्या, मी नवीन स्टँपमधे सूट देतो अशी योजना सांगायचो. ‘जुना दो नया लो’ ही मात्रा लागू पडली. सहा महिन्यांतच मी या व्यवसायात स्थिरावलो. मला काम आवडू लागलं.
माझ्या व्हिजीटिंग कार्डवर ऑफिसचा फोन नंबर होता. फोन आला की शेट दुसर्या सेल्समनला ऑफिसमधे पाठवायचा, मी ऑर्डर घेतलेल्या सर्व ग्राहकांशी माझे आपुलकीचे नाते होते. ऑर्डर घ्यायला गेलेल्या इतर सेल्समनना ‘राजेशला पाठवा’ असं सांगितलं जायचं. असे अनुभव आल्यावर कंपनीने मला पेजर दिला. बँकांची हेड ऑफिसेस, सीएसटी नरिमन पॉइंटला असलेली एअरलाईन ऑफिसेस, टाटा, लोकसत्ता, फिल्म इंडस्ट्रीची ऑफिसेस अशा सगळ्या ठिकाणी मी ऑर्डर्स घेण्यासाठी आणि स्टँप बनवून देण्यासाठी मुक्त संचार करू लागलो. मयूर स्टेशनरीचा मार्वेâटिंग करणारा मुलगा ही ओळख जुनी होऊन सेल्फ इंक स्टँप प्रोवायडर राजेश सुटे अशी माझी ओळख झाली.
ऑर्डर घेतल्यापासून डिलिव्हरी देण्यापर्यंत १५ दिवसांचा अवधी जायचा. ऑर्डर घेतल्यावर ती चेन्नईहून तयार होऊन यायची, त्यानंतर त्याची डिलिव्हरी. त्यावेळच्या टेक्नॉलॉजी आणि ट्रान्सपोर्टनुसार यापेक्षा कमी वेळात सेल्फ इंक स्टॅम्प बनवून देणं शक्य नव्हतं. कुठे अगदी अर्जंट स्टँप हवा असेल तर आम्ही त्यांना पंधरा दिवसांसाठी लाकडी किंवा प्लास्टिक स्टँप बनवून देत असू आणि त्यानंतर त्यांनी ऑर्डर दिलेला सेल्फ इंक स्टँप डिलीव्हर करायचो. सेल्फ इंक स्टँप आणि रबर स्टॅम्पच्या किमतीत तीनशे पस्तीस रुपयांचा फरक असूनही, या स्टँपला मागणी होती, कारण हा स्टँप किमान दोन ते तीन वर्षे चालत असे, शाई संपली की अल्पशा किमतीत शाई भरा, स्टँप पुन्हा तयार. इतका अपडेटेड स्टँप वापरणारी व्यक्ती म्हणून इम्प्रेशन पडायचं, हा ग्राहकांना अजून एक फायदा होता. माझं प्रेझेंटेशन, ठरल्या दिवशी ऑर्डर पूर्ण करणे, चोख व्यवहार यामुळे वर्षाअखेरपर्यंत माझ्या ऑर्डर्स अजून वाढल्या. ऑर्डर्स वाढल्या तशी पगारातही थोडी वाढ झाली. या धंद्यातील कच्चा माल, स्टँप बनवण्याची पद्धत, ऑर्डर मिळवण्यासाठी केलेलं प्रेझेंटेशन, डेमो, कुठल्याही ऋतूची पर्वा न करता सायकलवरून ऑर्डरसाठी फिरणे, या सगळ्या मेहनतीच्या मानाने मिळालेली पगारवाढ फारशी समाधानकारक नव्हती.
माझं मार्केटिंग स्किल मी वाढवत होतो, जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळवण्यासाठी कुठल्या ठिकाणी कुठल्या वेळी जायचं, कसं बोलायचं, या सगळ्याचा मी विचार करायचो. आता आपण स्वतः चा व्यवसाय सुरू करावा, असं वाटतं होतं. पण भांडवलाचा प्रश्न होता, शिवाय या क्षेत्रात मी केवळ एक वर्ष बघितलं होतं. एखाद्या क्षेत्राचा किमान तीन वर्षे अनुभव घेतल्याशिवाय त्यात स्वतंत्रपणे उडी मारू नये असं म्हणतात. त्यामुळे मी अजून काही काळ इथेच काम करायचं ठरवलं. पण दुसर्या बाजूला मी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू केले. कंपनीचं टार्गेट पूर्ण करून स्वतःसाठी छोट्या छोट्या ऑर्डर घेऊ लागलो. माझ्या पर्सनल ऑर्डरची सुरुवात मी अगदी एक-दोन स्टँपपासून सुरू केली. साधारण १९९७पर्यंत कंपनीचं टार्गेट पूर्ण करून मी स्वत:साठी देखील बर्यापैकी ऑर्डर घेऊ लागलो होतो. तरीही व्यवसायात उडी मारण्याचं काही धाडस होतं नव्हतं. त्यासाठी प्रोत्साहन दिलं ते एसबीआय बँकेच्या हेड ऑफिसमध्ये अॅडमिन डिपार्टमेंटला असलेल्या विजया महाजन मॅडमनी. एक दिवस ऑर्डर डिलीव्हर केल्यावर मॅडम म्हणाल्या, ‘राजेश, तुझं काम चांगलं आहे. तू कुठल्या कंपनीतर्फे येतोस याचा विचार न करता केवळ तुझ्या कामाच्या गुणवत्तेमुळे आम्ही तुला घाऊक प्रमाणात ऑर्डर देतो. हुशार आहेस, वय तुझ्या बाजूने आहे तर तू स्वत:चा व्यवसाय का सुरू करत नाहीस?’ मी अशाच प्रोत्साहनपर सूचनेची वाट बघत होतो. थोडा विचार करून निर्णय घेतला. स्टँप मार्केटिंगचं काम करून आता चार वर्षे झाली होती. या धंद्यातील खाचाखोचा मला कळत होत्या. याच क्षेत्रात काम करायचं आणि वाढवायचं हे नक्की होतं. चेन्नईला जिथे स्टँप बनायचे त्यांना संपर्क करून विचारलं, मयूर स्टेशनरीशिवाय माझ्या पर्सनल बल्क ऑर्डर पूर्ण करून देणार का? त्यांनी होकार दिला. आणि मी मयूर स्टेशनरीला थँक्यू म्हणून निरोप घेतला. मुंबईत आलो तेव्हापासून पहिले तीन महिने सोडले तर रोज मी या कंपनीसोबत जगलो होतो. माझे कुणाशीही वाद नव्हते. पगारातली असमाधानकारक वाढ सोडली तर बाकी या नोकरीत त्रास होईल असं काही नव्हतं. पण आयुष्यात जर काही निर्माण करायचं असेल, स्वत:च्या कर्तबगारीवर यशाचा शिक्का मारायचा असेल, तर चाकोरीबद्ध आयुष्य सोडावं लागतं. मयुर स्टेशनरी सोडताना माझ्या याच भावना होत्या.
सीएसटीला पी. एन. रोडच्या लक्ष्मी बिल्डिंगमध्ये स्वत:चं ऑफिस सुरू केलं. ऑर्डर्स सुरू होत्या, चेन्नईहून स्टँप्स बनून यायचे, आता त्यात दहा दिवस जात होते. यापेक्षा कमी वेळात स्टँप डिलीव्हरी करायची असेल तर स्वत:ची मशीन असणं आवश्यक होतं. ऑफिस सुरू केल्यापासून एखाद वर्षाच्या आत, म्हणजे १९९८ साली मी सन कंपनीची मॅन्युअल मशीन सत्तर हजारात विकत घेतली. ऑटोमॅटिक मशीन साडेतीन लाखांची होती, एकदम एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा मॅन्युअल मशीनचा पर्याय मला योग्य वाटला. मुंबईत स्वत:च्या ऑफिसात मशीन आल्याने, आता मी सेम डे डिलीव्हरी करू शकत होतो.
ही माझ्यासाठी आणि कस्टमरसाठीही आनंदाची गोष्ट होती.
मी माझी एक सिस्टम बनवली, आठवड्याच्या वारांनुसार भाग ठरवून त्यानुसार त्या त्या भागात मार्वेâटिंग आणि डिलीव्हरीसाठी जाऊ लागलो. सकाळी ऑर्डर दिलेले स्टँप त्याच दिवशी संध्याकाळी आणि संध्याकाळी ऑर्डर दिलेले स्टँप दुसर्या दिवशी सकाळी डिलीव्हर करू लागलो.
कॉम्प्युटरवर स्टॅम्पचे डिझाईन बनवताना काही वेळेस स्पेलिंग मिस्टेक व्हायच्या किंवा फॉन्ट मनाजोगे न वाटल्याने ग्राहकांनी स्टँप परत केले, तर त्यात माझं आर्थिक नुकसान व्हायचं. दोन स्टँप आणि मेहनत जाऊनही पैसे एकाच स्टँपचे मिळायचे. ग्राहकाचं काम खोळंबून राहायचं ते वेगळंच. हे टाळण्यासाठी प्रूफ पाठवून चेक करून घेऊ लागलो. असाच स्टँप बनणार त्यामुळे लक्षपूर्वक प्रूफ तपासा.’ असं सांगितल्यावर ग्राहकही कितीही मोठी ऑर्डर असली तरी सगळी प्रुफे नीट तपासून देऊ लागले. यामुळे एकदा बनवून दिलेला स्टँप परत येण्याचं प्रमाण जवळ जवळ शून्य झालं.
वर्ल्ड ट्रेड सेंटरला बरीच नवी ऑफिसेस सुरू असत, त्यांना डेमो देऊन तिथूनही ऑर्डर्स येत होत्या. मला काहीतरी वेगळं करावंसं वाटत होतं. एखाद्या मोठ्या कंपनीचा स्टँप वेंडर होणं हे माझ्यासाठी आणि त्या कंपनीसाठीही सोयीस्कर असायचं. बरेच डिपार्टमेंट असल्याने, दर ठराविक दिवसांनी ऑर्डर्स येऊ शकतात आणि पेमेंट सायकल सुरू राहते. असे कॉन्टॅक्ट तयार होण्यासाठी वरळी नेहरू सेंटर हॉलमधे होणार्या बिझिनेस एक्जीबिशनमधे मी स्टॉल लावला. बर्याच कंपन्यांनी डेमो आवडल्याने त्यांचे व्हिजिटिंग कार्ड दिले. त्या सगळ्या कंपन्यांना जाऊन भेटलो, त्यातूनच मला सीमेन्स कंपनीच्या भारतातील सर्व ब्रँचेसची ऑर्डर मिळाली. ठाणे बेलापूर पट्ट्यातल्या अनेक कंपन्या मिळाल्या.
व्यवसाय स्थिरस्थावर झाल्यावर ‘आता लग्न कर’ असं घरून सगळेच वारंवार सांगू लागले. सर्वांच्या पसंती आणि संमतीने वैशालीशी २००४मध्ये माझा विवाह झाला. वैशाली एलआयसीत काम करत होती. आम्हा दोघांचंही काम सुरळीत सुरू होतं काही वर्षांनी वैशालीचं प्रमोशन होऊन तिला पुणे ब्रँचला बदली मिळाली. समोर दोन पर्याय होते, तिने नोकरी सोडणं किंवा मग आम्ही पुण्याला शिफ्ट होणं. आम्ही विचारविनिमय करून २०१२ला पुण्याला शिफ्ट होण्याचा पर्याय निवडला. आठवड्यातून तीन दिवस सह्याद्री एक्सप्रेसने मी पुणे-मुंबई अपडाऊन करू लागलो. हळूहळू मुंबईतला व्यवसाय आवरून पुण्यात व्यवसाय वाढवायचा असं ठरवलं होतं; पण मुंबईतला व्यवसाय बघता ते इतक्या लवकर शक्य होईल असं वाटतं नव्हतं. म्हणून ठाण्यात एक ऑफिस घेऊन मुंबईचा व्यवसाय तिथून करू लागलो.
मुंबईतला व्यवसाय आटोक्यात आणत मग पुण्यात व्यवसाय करायला सुरुवात केली. सेल्फ इंक स्टँप पुण्यातही चांगली डिमांड मिळवत होते. मुलगी कुंजन हिच्या शाळेत पुस्तके घेण्यासाठी गेलो. कुंजनचं शाळेचं ओळखपत्र अजून बनवलं नव्हतं. शाळेत मुलांबरोबर पालकांचाही इंटरव्ह्यू असतो, तेव्हा त्यांनी माझा व्यवसाय विचारला, तो कळल्यावर तुम्ही शाळेची ओळखपत्रेही बनवून देता का, असं त्यांनी विचारलं. मुंबईला एका मित्राला शंभर सव्वाशे ओळखपत्र बनवायला मी मदत केली होती. त्या बळावर मी हो सांगितलं. लगेच शाळेकडून मला पंधराशे मुलांचं ओळखपत्र बनवण्याची ऑर्डर मिळाली. इतक्या मुलांचे फोटो काढायचे, हा थोडा चॅलेंजिंग विषय होता. फोटोची साईज, त्यात चेहेरा किती असला पाहिजे, गणवेश कुठवर दिसला पाहिजे, लाइट्स सगळ्या मुलांसाठी एकाच प्रकारचे हवे. एका शाळेचे ओळखपत्र वाटण्यासाठी लेआऊट अगदी सेम हवा. हे जुळवताना थोड्याफार चुका झाल्या. १५००मधले १० ओळखपत्रं फोटोमुळे पुन्हा बनवावी लागली, पण बाकी काम उत्तम झालं. त्यातून त्याचं शाळेच्या इतर शाखांचं काम मिळालं.
एकाच डिझाईनच्या ओळखपत्रामुळे विद्यार्थी ओळखले जायचे, पण पाल्यांना सोडायला येणारे पालक, रिक्षाचालक आणि इतर नातेवाईक यांचं काय? स्वत: पालक असल्याने पाल्याची सुरक्षितता हा माझ्यासाठी महत्वाचा विषय आहे. त्यातूनच पॅरेंट आयकार्डची कल्पना सुचली. शाळेलाही ही कल्पना आवडली. पालकांकडूनही या कल्पनेचं स्वागत झालं. स्टुडंट आणि पॅरेंट अशा दोन्ही आयकार्डचं काम माझ्याकडे आलं. या कामात मी अजून टेक्नॉलॉजी आणली. आता एक प्रिंटेड फॉर्म विद्यार्थ्यांना देतो त्यावर ते माहिती भरून स्वत:चा आणि पालकांचा फोटो त्यावर लावून देतात आणि तो फोटो स्कॅन करून मी ओळखपत्र बनवून देतो. यामुळे शाळेत जाऊन फोटो काढण्याचा विद्यार्थ्यांचा आणि माझाही वेळ वाचायचा. हे काम जलद होऊ लागल्यावर शाळेत लागणारे विविध बॅज बनवण्याचं काम माझ्याकडे आलं. शाळेत असणारे हाऊसेस, मॉनिटर्स, कॅप्टन हे सगळे बॅज एका शाळेसाठी बनवताना इतरही शाळांची कामे माझ्याकडे आली. यात अजून काय नावीन्य आणता येईल याचा विचार सुरू आहे.’
अगदी बारशापासून बाराव्यापर्यंत शिक्क्यांची गरज पडतेच. जन्ममृत्यूचा दाखला असो की सातबाराचा उतारा, बहुमूल्य आभूषणांची खरेदीही कागदावर शिक्का पडल्याशिवाय पूर्ण होत नाही. सहीशिक्क्याशिवाय कागदपत्रे ग्राह्य धरले जात नाहीत. व्यवसाय करायचा तर मोठी उलाढाल हवी, हे प्रत्येक वेळी खरं नसतं. लोकांची गरज ओळखून कमी भांडवलात होणारा व्यवसाय केला आणि टप्प्याटप्प्याने पुढे गेलो, तर स्थायी स्वरूपाच्या, सदैव वाढत्या व्यावसायिक यशावर शिक्कामोर्तब झालेच म्हणून समजा.