(पंचनामा) – प्रसाद ताम्हनकर
रेणुकापूर म्हणजे तसे बडे गाव. गेली चाळीस वर्षे गावात रायकर घराण्याची सत्ता होती. बाळासाहेब रायकर म्हणतील त्याचप्रमाणे गावचे राजकारण हालत असे. बाळासाहेब आता साठीला आले होते, अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी वडिलांकडून म्हणजे आप्पा रायकरांकडून सरपंचपदाची सूत्रे घेतली आणि ते गावाचा प्रमुख चेहरा बनले ते बनलेच. अनेक निवडणुका आल्या, पक्ष आले गेले पण रायकरांची पकड कधी ढिली झाली नाही. साम-दम-दंड भेद हरप्रकारे सत्ता फक्त रायकरांकडेच पाणी भरत राहिली.
सरपंचपद महिलांसाठी राखीव झाले तेव्हा बाळासाहेबांच्या पत्नी वत्सलाबाई सरपंचपदावरती आरूढ झाल्या येवढाच काय तो बदल. सूत्रे मात्र बाळासाहेबांकडेच राहिली. मात्र काही दिवसांपूर्वीच वत्सलाबाईंचे अचानक निधन झाले आणि बाळासाहेबांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला.
बाळासाहेबांचे चिरंजीव राजेशराव अवघ्या पंचवीस वर्षाचे आणि अविवाहित. घरात बाई माणूसच नाही म्हणल्यावरती आता सरपंचपदाचे होणार कसे ही उत्सुकता सगळीकडेच लागून राहिलेली. गावात बाळासाहेबांचे उघड विरोधक तसे फारच कमी, पण या घटनेने तेदेखील सगळी ताकद गोळा करून सत्ताबदलाची स्वप्ने पाहायला लागले होते.
रविवारच्या सकाळी बाळासाहेब जरासे विचारातच झोपाळ्यावरती झोके घेत असताना, इन्स्पेक्टर साळव्यांनी प्रवेश केला. नमस्कार चमत्कार झाल्यावरती साळवींनी थोडेसे चिंतेतच बाळासाहेबांना येण्याचे कारण कथन केले. आदल्या रात्री राजेशकडून दारूच्या नशेत नाना थत्तेंच्या मुलीचा रागिणीचा विनयभंग झाल्याची तक्रार सकाळीच स्टेशनात दाखल झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात आल्याने साळवी स्वत:च वाड्यावरती हजर झाले होते. नाना थत्तेंचे नाव ऐकून बाळासाहेबांची चिंता अजूनच वाढली. नानासाहेब थत्ते म्हणजे बाळासाहेबांच्या विरुद्ध उघडपणे दंड थोपटणारे पहिले विरोधक. बाळासाहेबांच्या ताकदीपुढे त्यांचे फारसे काही चालले नाही; पण एक भक्कम विरोधक म्हणून त्यांचे प्रस्थ वाढतच चालले होते.
साखर कारखान्यातील भ्रष्टाचार, पतसंस्थेतील घोळ अशा अनेक प्रकरणाची लक्तरे नानासाहेबांनी दहा वर्षापूर्वी मोठ्या खुबीने बाहेर काढली होती. नानासाहेबांच्या या कर्तृत्वाची हळुहळू आमदार खासदारदेखील दखल घेऊ लागले होते आणि काहीतरी राजकीय भूकंप घडणार असा अंदाज सर्वांना येऊ लागला होता. अशा पेटत्या वातावरणातच एके दिवशी नानासाहेबांच्या शेतातल्या घरावर दरोडा पडला आणि त्यात नानासाहेब आणि शेतावरचा मजूर असे दोघेही ठार मारले गेले. ‘दरोड्याला प्रतिकार केल्याने झालेल्या हत्या’ अशीच याची सरकार दरबारी नोंद झाली असली तरी बाळासाहेबांचा यामागचा हात न समजण्याइतके गावकरी खुळे नव्हते. कालांतराने काही संशयित पकडले गेले आणि पुराव्याअभावी सुटले देखील; मात्र नानासाहेबांच्या नावाचे भूत अध्येमध्ये डोके वर काढतच राहिले.
बाळासाहेबांनी अथक प्रयत्नांनी रागिणीची समजूत घातली, अगदी एका क्षणी तिच्यासमोर हात देखील जोडले आणि केस परत घेण्यास तिला राजी केले. मात्र पहिल्याच भेटीत या तरुणीचा आक्रमक स्वभाव, प्रचंड आत्मविश्वास आणि बेरडपणा बाळासाहेबांना चांगलाच चिंतेत टाकून गेला होता. त्यातच कारखान्याच्या राजकारणावरून त्यांचे आणि नव्या आमदारसाहेबांचे संबंध चांगलेच ताणले गेले होते आणि त्यांचीच फूस रागिणीच्या मागे असावी असा त्यांना ठाम विश्वास होता. त्याच वेळी स्वत:च गाडीला सायकलने धडक मारून खाली पडलेल्या आणि वर चार लोकं गोळा करून तमाशा केलेल्या रागिणीचा आपण नक्की कसा आणि काय विनयभंग केला या चिंतेत राजेश होता.
आमदारसाहेबांचे बोलावणे आले आणि जरा अनिच्छेनेच बाळासाहेब त्यांना भेटायला गेले. इकडची तिकडची बोलणी झाल्यावरती आमदारसाहेबांनी एक वर्तमानपत्र बाळासाहेबांसमोर फेकले. ते तसे एक लंगोटीपत्रच होते, पण त्यात कोणाचेच नाव न घेता विनयभंगाच्या प्रकरणाची समग्र हकिगत छापलेली होती. गावातल्या सर्वात मोठ्या सत्ताधीशाने आपल्या मुलाचे नाव वाचवण्यासाठी सर्व प्रकारच्या चाली खेळल्याचे अगदी खास नमूद करण्यात आले होते. ठिणगीचा वणवा होण्याची शक्यता नक्कीच नाकारता येत नव्हती. आमदारसाहेबांचाच या मागे हात होता हे नक्की, पण ‘आपलेच दात..’ अशी अवस्था झाल्याने बाळासाहेबांना काहीच सुचेना झाले होते.
असे अनेक आमदार-खासदार बाळासाहेबांनी व्यवस्थित हाताळले होते. हा तर अवघ्या तिशीतला नवशिका खेळाडू होता, पण त्याच्या या चालीने मात्र बाळासाहेबांना चांगलेच कोंडीत पकडले होते. शेवटी त्यांनी ‘तुम्हाला काय वाटते साहेब?’ असे विचारत कोंडी कबूल केली. आमदार साहेबांच्या चेहर्यावर पसरलेले विजयी हास्य कुठेतरी त्यांच्या सत्तेच्या अभिमानावरती खोल वार करून केले. ‘बाळकाका, तुम्ही आम्हाला वडिलांच्या जागी. तुम्हाला असे अडचणीत आम्हाला देखील बघवत नाही. बातमी वाचल्यापासून मी सतत यातून काही घडायच्या आत बाहेर कसे पडावे याचाच मार्ग शोधत होतो. मला एक मार्ग सुचलाय, तुम्हाला कसा वाटतो बघा. गावचे सरपंचपद रिकामे आहे आणि निवडणूक जवळ येत आहे. अशातच हा प्रसंग घडलेला. आता घरातून देखील उभे राहण्यासारखे कोणी नाही. ऐनवेळी भरवसा देखील कोणाचा करायचा? अशावेळी आपण सर्व शक्तीने या रागिणीलाच निवडून आणले तर? दोनेक महिन्यात रागिणी तुमची सून होईल आणि एकाच दगडात बरेच पक्षी देखील सहज मारले जातील.’
आमदारसाहेबांच्या बोलण्यावरती बाळासाहेबांनी बराच विचार केला. प्रतिष्ठा, घराणे याचा विचार करायची ही वेळ नाही हे त्यांना उमजले होते. मात्र हा रागिणी नावाचा निखारा पदरात बांधून घ्यावा की नको या विचाराने मात्र ते अस्वस्थ झाले होते. सत्ता राखणे तर अत्यावश्यक होते. सत्ता एकदा गेली की भलेभले कसे देशोधडीला लागतात हे त्यांनी गेल्या चाळीस वर्षात फार जवळून पाहिले होते. शेवटी राजेशला व्यवस्थित समजावत त्यांनी आमदार साहेबांनी सुचवलेला रस्ताच निवडायचे ठरवले आणि ते पुढच्या तयारीला लागले.
काही दिवसांतच एकमताने रागिणीची सरपंचपदी निवड झाली आणि सत्कार स्वीकारण्यासाठी तिला आमदार निवासातून बोलावणे आले. आमदार साहेब बंगल्यातच उभारलेल्या प्रशस्त कार्यालयात पेपर वाचत बसले होते. रागिणी आली आणि त्यांनी स्वत: उठून तिचे स्वागत केले. अभिनंदनाचे चार बोल झाल्यावरती आमदारांनी रागिणीला पुढील कार्याबद्दल विचारणा केली. ‘साहेब.. येवढ्या मोठ्या पदाचा मान मिळणे हे माझे सौभाग्यच आहे. या पदाचा गावासाठी जास्तीत जास्त उपयोग कसा होईल हेच मला बघायचे आहे. सगळ्यात आधी मी गावातल्या कारखान्यातील आणि पतपेढीतील भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी सरकारला विनंती करते आहे. यात दोषी आढळणार्यांवरती कडक कारवाई व्हावी अशी देखील विनंती आहे…’
आमदार साहेब मोठ्या कौतुकाने रागिणीकडे बघत होते. ‘आणि काही मागणी आहे का नव्या सरपंचबाईंची?’ त्यांनी मिष्किलीने विचारले.
‘हो आहे तर! गुन्हेगारांवरती तुमची वक्रदृष्टी पडायलाच हवी, मात्र ‘आपल्या’ माणसांवरची मायेची पाखर ढळायला नाही हवी…’ एवढे बोलून रागिणी खुदकन हसली आणि आमदार साहेबांच्या मिठीत विसावली.
– प्रसाद ताम्हनकर
(लेखकाचे गुन्हेगारी कथालेखनावर प्रभुत्व आहे)