– चारुहास साटम
‘चौकीदार चोर है’, ही अत्यंत आकर्षक (आणि समर्पक) घोषणा देऊन राहुल गांधी यांनी राफेल भ्रष्टाचाराविरुद्ध दोन वर्षांपूर्वी युद्धाची तुतारी फुंकली तेव्हा मोदींना घाम फुटला होता हे नाकारता येणार नाही. त्यातच, विश्वासार्हतेच्या बाबतीत ज्यांची जगातील काही मोजक्या पत्रकारांमध्ये गणना होते त्या ‘द हिंदू’ च्या एन. राम यांनी एकापाठोपाठ एक खळबळजनक बातम्या प्रसिद्ध करून रान पेटवलं होतं. प्रशांत भूषण यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने अनाकलनीय भूमिका घेऊन फेटाळल्या म्हणून मोदी या काटेरी जाळ्यातून अंगावर ओरखडा सुद्धा न येता सुखरूप बाहेर पडले.
पण हे पिशाच्च त्यांची अशी सहजासहजी पाठ सोडायला तयार नाही अशा घटना घडू लागल्या आहेत. सुशेन गुप्ता या मध्यस्थाला (सोप्या भाषेत आपण त्याला दलाल म्हणू) २.३ बिलियन युरोची दलाली या राफेल खरेदी व्यवहारात मिळाली असा स्फोट ‘मिडियापार्ट’ या प्रâान्समधील एका शोधक पत्रकारिता संस्थेने गेल्या आठवड्यात केला. आधीच चावून चोथा झालेल्या या विषयावर आता आणखी नवीन काय असणार आहे असा प्रश्न स्वाभाविकच कुणालाही पडेल. तद्वत, या नव्या आणि भयप्रद गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे.
मुळात सुशेन गुप्ता हे नावच या प्रकरणात नवं आहे. युपीए सरकारच्या काळात ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीत जो कथित भ्रष्टाचार झाला, त्यात याचं नाव आहे. अंमलबजावणी संचालयाने (ईडी) त्याची कसून चौकशी केली होती जी अजून संपलेली नाही. त्यानंतर मनमोहन सिंग सरकारने याला खड्यासारखा बाजूला ठेवला होता. पण संरक्षण खरेदीतील दलालांचा हा माफिया जगभर पसरलेला आहे. वेगवेगळ्या सरकारांमधे यांचे लागेबांधे खूप खोलवर असतात. २०१४ साली तो पुन्हा सक्रिय झाला. इंटरडेव, आणि इंटरसेलर या त्याच्या मॉरिशस आणि सिंगापूर इथे नोंदणी झालेल्या सॉफ्टवेअर कंपन्यांना राफेल बनवणारी दसॉ आणि विमानांना शस्त्रसज्ज करणारी तिची सहकंपनी थेल्स यांच्याकडून ‘सॉफ्टवेअरचं’ कंत्राट मिळालं. जागतिक दर्जाची विमानं आणि शस्त्रं बनवणार्या या कंपन्या कुठल्यातरी फुटकळ कंपन्याचं सॉफ्टवेअर का वापरतील, हा एक बाळबोध प्रश्न उपस्थित होतो. असो.
युपीए सरकारचा करार फक्त विमानांसाठी होता. आम्ही शस्त्रसज्ज विमानं आणली म्हणून किंमत वाढली असा बचाव मोदी सरकारने त्यावेळी केला होता हे जर आठवत असेल तर थेल्सला सुशेन गुप्ताचं सॉफ्टवेअर का आवडलं हे सहज लक्षात येईल. मिडियापार्टच्या बातमीनुसार, भारतीय संरक्षण मंत्रालय, तिथले नोकरशहा, संरक्षण दलांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी सुशेनने सूत जमवलं. ते किती घट्ट होतं? अशा मोठ्या खरेदीची किंमत विक्रेत्याबरोबर ठरवण्यासाठी संरक्षण खात्याची एक वाटाघाटी समिती असते. तिच्या बैठकांचे इतिवृत्तांत त्याने दसॉला वाटाघाटी सुरु होण्यापूर्वीच पुरवले होते. त्याच्या कॉम्प्युटरमध्ये अनेक नोंदी आहेत. त्यात ७.८७ बिलियन युरो हा एक आकडा सापडतो. २० जानेवारी २०१६ या दिवशी दसॉ आणि भारतीय वाटाघाटी समितीच्या बैठकीत दसॉने नेमका हाच आकडा एकूण किंमत म्हणून सांगितला. हा योगायोग समजणार्यांचं देव भलं करो.
राफेलच्या वाटाघाटी वेगाने पुढे सरकत नाहीत हे दिसल्यावर काही संरक्षण अधिकार्यांनी त्याच ताकदीच्या, त्याच क्षमतेच्या, पण खूप कमी किंमतीच्या ‘युरोफायटर्स’ या जर्मन विमानांचा विचार करायचा प्रस्ताव मांडला होता. त्यासाठी त्यांनी तुलनात्मक तक्ताही तयार केला होता. हा तक्तासुद्धा सुशेनमार्फत दसॉकडे आधीच पोहोचला होता, असं मिडियापार्ट म्हणते. थोडक्यात, वाटाघाटींमध्ये दसॉ भारतीय संरक्षण खात्याच्या एक पाऊल पुढे राहील याची पूर्ण काळजी सुशेनने घेतली. सत्ताधारी भाजपाच्या खासदारांना ‘सांभाळण्याची’ जबाबदारी सुद्धा सुशेनकडेच होती, असा मिडियापार्टचा दावा आहे. आणखी धक्कादायक बाब पुढे आहे. इंटलिजन्स ऑनलाईन ही प्रâान्समधील अजून एक वेबसाईट आहे. ‘इंडियन एव्हिक्ट्रॉनिक्स’ या एका कंपनीचे अध्यक्ष असलेले सुशेनचे वडील आणि त्याचा भाऊ सुशांत हे अमित शहा यांचे घनिष्ठ मित्र आहेत अशी बातमी या वेबसाईटने दिल्याचं ‘द वायर’ मध्ये प्रसिद्ध झालं आहे.
कॉंग्रेसने पत्रकार परिषद घेऊन याला पुन्हा चर्चेत आणायचा प्रयत्न जरूर केला. हा देशद्रोह आहे, ही सरळसरळ हेरगिरी आहे, असं रणजीत सुरजेवाला म्हणाले. सुशेन आधीच ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात संशयित असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. पण ईडी काय म्हणते? ईडी म्हणते, ही दोन संपूर्ण वेगळी प्रकरणं आहेत. आम्ही सरमिसळ करूशकत नाही. वेगळ्या शब्दात, नाही! गुप्ता आता गुप्त राहिलेला नाही. बोफोर्स प्रकरणात क्वात्रोचीवर शरसंधान करणारे आता मूग गिळून बसलेत. हेरगिरीच करायची तर आपल्याच भारतीय माणसाला करू दे, ती आत्मनिर्भरता आहे, असं सुद्धा म्हणायला हे मागेपुढे पहाणार नाहीत. तथापि, त्यांना इतिहासाचं स्मरण करून द्यायलाच हवं. बोफोर्स प्रकरणात विरोधकांची मागणी मान्य करून, संसदीय चौकशी नेमून, राजीव गांधी त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. हे जीवाचा वीट येईपर्यंत ‘परीक्षा पे चर्चा’ करतात.
– चारुहास साटम
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि माध्यम सल्लागार आहेत.)