नाटककार प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचं तीस वर्षापूर्वी रंगभूमीवर गाजलेलं ‘चारचौघी’ हे नाटक नव्या ‘टीम’सह पुन्हा एकदा आलंय. २०१०च्या सुमारास चॉकलेट हिरो सुनील बर्वे यांनी ‘हर्बेरियम’ हा प्रयोगशील प्रकल्प राबवला होता. भूतकाळातील निवडक पाच नाटकांचे फक्त २५ प्रयोग त्यात झाले. त्याला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. गाजलेल्या, दर्जेदार नाट्यकृतींचे स्वागत होतेच. त्यात सूर्याची पिल्ले, लहानपण देगा देवा, हमिदाबाईची कोठी, आंधळं दळतंय आणि झोपी गेलेला जागा झाला, ही पाच नाटके निवडली गेली आणि त्यांना नव्या पिढीच्या ‘दर्दी’ रसिकांनी हाऊसफुल्ल गर्दी करून दादही दिली होती. ‘जुनं ते सोनं’ हा नवाच प्रवाह त्यातून जन्माला आला. इतकंच नव्हे तर नाट्यसृष्टीची आर्थिक गणितंही त्यातून काही काळ बदलली. याचे एक साक्षीदार होते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी! त्यांनीही पूर्वी विजया मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हमिदाबाईची कोठी’चे नव्या शैलीत दिग्दर्शन केले. या प्रकल्पातून नवनव्या कल्पना, संकल्पना आकाराला आल्या. काळाच्या ओघात विस्मरणात जाणार्या नाट्यकृतींचे सादरीकरण करून एक ‘रंगदेणं’ अर्पण करण्याचा त्यामागला विचार होता आणि तो यशस्वीही झाला. त्याच वाटेवर, रंगभूमीवर आलेले हे नाटक आज ‘नवा प्रयोग’ म्हणून तिसरी घंटा वाजवते आहे.
नाटककार प्रशांत दळवी यांचे कथानक खोलवर विचार करायला लावणारे. किती तरी काळ उलटला तरी स्त्रियांचे हे भावनिक व अस्तित्वाचे प्रश्न हे पूर्णपणे सुटलेले नाहीत. उलट त्यात अधिकच गुंतागुंत झालीय. या ‘चारचौघी’ चारचौघींसारख्या नाहीत तर त्या सर्वस्वी वेगळ्या आहेत. प्रत्येकीची कथा, व्यथा हटके आहे. यातली आई ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा. एका शाळेची मुख्याध्यापिका. पसंतीच्या पुरुषासोबत लग्न न करता तिने तीन मुलींना जन्म दिलाय. ताठ मानेची आणि मुलींमागे खंबीरपणे उभी राहणारी. ही या कुटुंबाची सर्वेसर्वा. मोठी मुलगी विद्या प्राध्यापिका. तिचा नवरा दुसर्याच महिलेत गुंतलेला. विद्या तणावाखाली. गद्दार नवर्याविरुद्ध लढण्याचे बळ तिला आईमुळे मिळतेय. दुसरी मुलगी वैजू. सुशिक्षित. पण वृत्ती ही चौकटीबद्ध. पारंपारिक. तिचा नवरा श्रीकांत अहंकारी. तिचीही नवर्याकडून कुचंबना. तिसरी मुलगी विनी. कॉलेजात शिक्षण घेतेय. या वयात चक्रावून गेलेली. प्रकाशची बुद्धिमत्ता आणि वीरेनची श्रीमंती या दोन टोकांत अडकलेली. या चौघीजणी स्वतंत्र आयुष्य जगणार्या दिसत असल्या तरी पुरुषप्रधान संस्कृतीचे चटके भोगत आहेत. त्यात त्यांचा कोंडमारा होतोय. आपल्या समाजाने पुरुषाला विवाहबाह्य संबंध ठेवण्यास जणू सूट दिलीय. पण जर तोच प्रकार उलटा केला तर स्त्रियांना मात्र गुन्हेगार, बदफैली ठरविले जाते. काळाच्या ओघात आज तीस वर्षानंतर ‘लिव्ह इन रिलेशन’चा पर्याय जरी आला असला तरी त्याला सामाजिक मान्यता दिसत नाही. अशा जोडप्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं जातं. रुढी, परंपरा याचा पगडा संपलेला नाही. हेच कथानकातून जाणवते.
नाटककार म्हणून एका वास्तवाला हात घालणारी संहिता लक्षवेधी होती आणि आजही आहे. कथानक प्रसंगातून मांडताना चौघीजणींची स्वभावचित्रणे प्रभावीपणे नजरेत भरतात. संवादांचा वेगही चांगला सांभाळला आहे. चर्चानाट्य किंवा वैचारिक नाट्य म्हणून कंटाळवाणे होण्याची शक्यता वाटली तरी त्यावर मात करून यातला संघर्ष आणि अंतर्मनातील वादळे पकड घेतात. संहिता चाकोरीबाहेरची आणि बंडखोरही. त्याला चांगली जोड मिळालीय ती दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांची. दोघांचं ट्युनिंग आजवर मस्त जुळलं आहे. या नव्या सादरीकरणातही त्याचा प्रत्यय येतो. स्त्रियांच्या समस्या तसेच संघर्ष हा तीस वर्षांपूर्वी होता, तोच असल्याने संहितेत कुठलाही बदल दिसत नाहीत. उलट नव्या दमात याचा आविष्कार होतोय, जो आजच्या सामाजिक परिस्थितीतही कायम आहे. जग बदलले पण प्रवृत्ती कायमच!
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या पाठीशी असलेला प्रदीर्घ अनुभव ही आणखी एक जमेची बाजू. ज्या रसिकांनी पूर्वी प्रयोग बघितला आहे, त्यांच्याकडून तुलना होण्याची जरूर शक्यता आहे. पण दोन प्रयोगांतील मध्यंतरात ‘नवं ते देखील सोनंच!’ असल्याची बोलकी प्रतिक्रिया उमटते. फिट्ट शोभून दिसणार्या दिग्गज कलाकारांची निवड ही बाजी मारते. तसेच काही प्रसंग हे ज्या प्रकारे हळुवारपणे उंचीवर नेण्यात आलेत, त्यात ‘दिग्दर्शक’ नजरेत भरतो. स्त्री-व्यथा मांडणार्या अनेक संहितांपेक्षा हे नाट्य वेगळेपणाने भरलेलं. त्यात सुसूत्रता आहे. तसेच नाट्याचा प्रारंभ, मध्य आणि शेवट यात नाटककार आणि दिग्दर्शकाने भावनिक खेळ ताकदीने बारकाव्यांसह मांडलेला दिसतो.
१५ ऑगस्ट १९९१ रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला. त्यात वंदना गुप्ते, आसावरी जोशी, प्रतीक्षा लोणकर, दीपा श्रीराम या चौघीजणी बंडखोर व्यक्तिरेखा म्हणून उभ्या राहिल्या. सात एक वर्षात याचे हजारावर प्रयोग झाले. ठळक जिवंत व्यक्तिरेखांमुळे हे नाट्य चर्चेत होतं. आज या नव्या सादरीकरणात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आईच्या भूमिकेत, तर मुक्ता बर्वे (विद्या), कादंबरी कदम (वैजू), सर्वात लहान मुलगी विनी (पर्ण पेठे) असे नेमके तुल्यबळ व सशक्त भूमिकावाटप करण्यात आलेय. जे शोभून दिसते.
गांधी चित्रपटातल्या ‘कस्तुरबा’च्या भूमिकेमुळे जगभरात पोहचलेल्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आईची कणखर भूमिका जिवंत केलीय. एका परिपक्व अभिनेत्रीचे दर्शन त्यांच्या आईतून पदोपदी होते. संवादफेक विलक्षणच. मुक्ता बर्वे या गुणी अभिनेत्रीची मनातली घुसमट हेलावून सोडते. संवाद पकड घेणारे. कादंबरी कदम आणि पर्ण पेठे यांनीही भूमिकांमध्ये सफाईदारपणे रंग भरलेत. या चौघीजणींच्या निवडीतूनच पहिली पायरी यशस्वी झालीय आणि रंगमंचावरली भट्टीही सुरेख जुळून आलीय. जी आजकाल अभावानेच दिसते. चौघींचे मुखवटे अस्वस्थ करून सोडतात. त्या लक्षात राहतात.
या चौघीजणींच्या जीवनात डोकावणारे पुरुषही तितकेच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांनीही नाटकाचा तोल सांभाळण्यासाठी सहाय्य केलंय. बिनधास्त श्रीकांतच्या भूमिकेत निनाद लिमये याची सहजता सुरेखच. विरेन बनलेला पार्थ केतकर याची देहबोली छाप पाडून जाते. श्रेयस राजे याचा प्रकाश हा गंभीरतेकडे झुकणारा. या तिघांचं चौघीजणींशी ट्युनिंग चांगलं जमलय. नाट्य रंगतदार करण्यात यांचाही वाटा आहे.
तांत्रिकदृष्ट्याही नाट्य कुठेही मागे पडणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आलीय. नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी एका मुख्याध्यापिकेचं घर उभं करताना त्यात हालचालींना जराही अडसर होणार नाही याची दक्षता घेतली आहे. त्यातील रंगसंगती शोभून दिसणारी. खुर्ची, टेबल, कपाट याची रचना सुयोग्यच. नेपथ्यरचनेवर परिश्रम दिसतात. अशोक पत्की यांचं संगीत काही प्रसंगातील ताणतणाव अधिकच अधोरेखित करतात. त्यातून वातावरणनिर्मिती चांगली होते. रवि-रसिक यांची प्रकाशयोजना आणि प्रतिभा जोशी-भाग्यश्री जाधव यांची वेशभूषा समर्पकच. उल्लेश खंदारे यांनी रंगभूषेची जबाबदारी उत्तम पार पाडलीय. तांत्रिक बाजू नाटक बहारदार होण्यास सहाय्य करणार्या. नाटक उत्कर्षबिंदूपर्यंत पोहचविण्यासाठीची सारी जुळवाजुळवही अप्रतिमच.
विजय तेंडुलकरांच्या ‘कमला’ या नाटकात एका खेडूत स्त्रीच्या खरेदी-विक्रीचा प्रकार होता, तर पु. ल. देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’त रस्त्यावरच्या फुलवालीला मुख्य प्रवाहात आणण्याचे कथानक होते. वसंतराव कानेटकरांनी शांता निसळ यांच्या कादंबरीवरून ‘पंखांना ओढ पावलांची’ यात मनाच्या कोंडमार्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारी स्त्री दाखवली. पुढे ‘उंबरठा’ हा चित्रपटही त्यावर आला. जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष’मध्ये पुरुषी प्रवृत्तीची शिकार बनलेली अंबिका विसरता येणार नाही. सावित्री, वर्षाव, मित्राची गोष्ट, दुभंग, स्पर्श अमृताचा, बॅरिस्टर, पर्याय, माझं काय चुकलं अशी अनेक नाटके स्त्रियांच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांना स्पर्श करणारी. या वाटेवर प्रशांत दळवी याचं ‘चारचौघी’ हे एक इतिहास रचणारं नाटक. यात वैवाहिक जीवनातल्या समस्यांकडे तळापर्यंत पोहचून त्यातलं नाट्य पकडण्यात आलंय. त्यामुळेच ‘चारचौघी’ची ‘काळाच्या पुढचं नाटक’ अशी ओळख झालीय. डॉ. श्रीराम लागू यांनी तर या नाटकाची तुलना ही चक्क युजीन ओनील यांच्या संहितेशी केली होती.
वयोवृद्धांचा भावनिक प्रश्न आणि त्याला सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न ‘नाटकाकार-दिग्दर्शक’ या जोडगोळीने ‘संज्याछाया’ या नव्या नाटकात केलाय. आणि तीसएक वर्षापूर्वीचं रुढ चाकोरीबद्ध जीवन जगण्यापेक्षा वेगळं जीवन जगणार्या स्त्रियांचा प्रश्न ‘चारचौघी’तून आलाय. योगायोग म्हणजे दोन्ही नाटक एकाच वेळी रंगभूमीवर पोहचली आहेत. जी रंगभूमीवरील नाटकांच्या सामाजिक, कौटुंबिक विषयांवर दिशादर्शक ठरतात. ‘चारचौघी’ या नाटकाचा प्रयोग संपतो तरी त्याने निर्माण केलेला तणाव, चिंता, अस्वस्थपणा हा मात्र सलत राहतो आणि हीच पसंतीची पावती ठरते. एकूणच आविष्कारातली उत्कटता विलक्षणच. ही एकेकाळी गाजलेली अशी नाटके नव्या पिढीने पुन्हा-पुन्हा पाहावीत. जी निश्चितच पर्वणी ठरेल.
शिवसेनाप्रमुखांची आठवण
‘विस्मरणात जाणारी पण आशयघन मराठी नाटके पुन्हा रंगभूमीवर आलीच पाहिजे! तरुणपिढीला त्यातून आपल्या नाट्यसंस्कृतीचे दर्शन घडेल!’ ही अपेक्षा व्यक्त केली होती हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. २०१० साली ‘हर्बेरियम’ या नाट्यप्रकल्पाची माहिती देण्यासाठी ‘मातोश्री’वर सुनील आणि अपर्णा बर्वे यांनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यावेळी अशा दर्जेदार नाटकांचे पुनरुज्जीवन करण्याची सूचनाही शिवसेनाप्रमुखांनी केली होती. या प्रयोगामुळे त्या भेटीची आठवण येते.
चारचौघी
लेखक – प्रशांत दळवी
दिग्दर्शक – चंद्रकांत कुलकर्णी
संगीत – अशोक पत्की
नेपथ्य – संदेश बेंद्रे
प्रकाश – रवि – रसिक
वेशभूषा – प्रणिता जोशी, भाग्यश्री जाधव
रंगभूषा – प्रणित बोडके
निर्माता – श्रीपाद पद्माकर
निर्मिती – जिगीषा