(बकालवाडीची पोलीस चौकी. बाहेर आक्रमक आंदोलक. कुठल्याशा हवालदाराच्या विरोधात घोषणाबाजी चालुय. त्यांना बाहेर गावातल्या काही प्रतिष्ठितांनी थोपवलंय. दरवाज्याआडून पोलीस निरीक्षक भीत भीत डोकावून बघतोय. तर ज्याच्या नावानं इतका गोंधळ माजलाय तो हवालदार आत केबिनमध्ये टेबलावर पाय टाकून निवांत बसलेला. एक चहावाला किटली घेऊन आत येतो, मागोमाग एक तंटामुक्त समितीचा सदस्य आत येतो.)
चहावाला : (एक कप चहा भरतो.) का हो साहेब, काय झालं? लोकं काहून खवळले एव्हढे?
(हवालदाराच्या चेहर्यावरली माशीही हलत नाही.)
सदस्य : नेमकं झालं काय? बाहेर पार मुर्दाबादच्या घोषणा चालुय तुमच्या नावानं.
चहावाला : म्हणजे साहेबांवर खवळलेत का लोकं? काही पार काठ्या घेऊन बाहेर काढा म्हणताय. काही सस्पेंडची मागणी करताय. त्यांना आपल्या काही पोरांनी अडवलेय बाहेर. पण काय प्रकरण आहे हे साहेब?
हवालदार : (पायावरली धूळ रुमालानं उडवत, चहाचा कप नाकाजवळ नेत) अँ?
सदस्य : अहो काहीजण तुम्ही कुठंश्या केलेल्या लाठीमाराबद्दल बोलताय. तुम्ही कुठं लाठ्या चालवल्यात का? आंदोलनात, उपोषणात वगैरे?
हवालदार : अँ? नाही. (हात झटकतो.)
सदस्य : अहो, काही जणांचे डोके फुटलेत. काही फ्रँक्चर झालेत. लहान मुलं, बायामाणसं, काही म्हातारे सुद्धा झोडलेत म्हणे तुम्ही!
हवालदार : आमचा वैचारिक वारसा महात्म्यांवर शेणगोळे फेकण्यापासून ते बंदूक चालवण्यापर्यंतचा. आम्ही थातुरमातुरांची डोकीबिकी फोडत नसतो. तेव्हा हे शक्यच नाही.
सदस्य : अहो, काय बोलताय तुम्ही? व्हायरल व्हिडीओत तुम्ही स्वतः त्या म्हातारीच्या डोक्यात काठी टाकताना दिसताय.
चहावाला : ते पाचवी-सहावीचं पोरगं धडाड तुमचं नाव घेतंय. साताठ साक्षीदार बाहेर उभेत. कम्प्लेंट लिहून घ्या म्हणताय ते!
सदस्य : ते काय! खिडकीतून आवाज येतोय लोकांचा! घोषणा देताय लोकं!
चहावाला : ही लोकं दगडं नाही ना फेकायची?
सदस्य : ओ, खरं काय ते सांगा! तुम्ही खरंच लाठीमार केलाय की नाही ते!
चहावाला : अहो, ते व्हिडीओत दिसताय आणि पुरावे असल्यावर आणखी काय विचारायचं?
सदस्य : एकदाचं सांगून टाका की…
हवालदार : (शेंडी खाजवत)डोकी फुटली म्हणताय?
चहावाला : हो!
हवालदार : मग तो मी नसंल!
सदस्य : आता हे काय लॉजिक?
हवालदार : अहो, मी देवापुढं नारळ फोडतो, त्याचेबी दोन तुकडे होतात. आणि तुम्ही म्हणता मी होतो नि फक्त डोकं नॉमिनल फुटलं? शक्यच नाही!
चहावाला : अहो, मी व्हिडीओ बघितलाय, त्यात तुम्हीच दिसताय…
हवालदार : हां, माझ्या काठीला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे तसा! तिनं काही केलं असेल तर नाही सांगता येणार!!
सदस्य : हे काय? काठी निर्जीव असते! तुम्ही काहीही बोलाल?
हवालदार : आता चांद्रयान देखील निर्जीव आहे, पण पोहोचलंच ना चंद्रावर? मग माझी काठी पडली असेल कुणाच्या डोक्यात त्यात माझा काय दोष?
चहावाला : (सदस्याच्या कानात पुटपुटतो) मागे याने रिफायनरी विरोधकांवर नि आदिवासींवर सुद्धा लाठ्या चालवल्यात. फार माजोरडा आहे हा!!
सदस्य : (चहावाल्याच्या कानात) त्यामुळं बाहेर लोकं याला निलंबित करा म्हणताय.
हवालदार : काय कानात सांगताय? सगळ्या कानांचं कनेक्शन मी हजारदा हॅक केलंय, त्यासाठी मी ‘शुक्ला’त… सॉरी शुल्कात कपात करत नसतो.
सदस्य : पण तुमच्या सोबतचे शिपाई देखील लाठीमारात होतेच की! आता तुमच्या आदेशाशिवाय ते थोडेच लाठ्या चालवतील काय?
हवालदार : त्यांनी त्यांच्या पातळीवर घेतलेल्या निर्णयाला, केलेल्या कृत्याला मी कसा जबाबदार असेन?
सदस्य : पण आता बाहेर लोकं भडकलीत, त्यांना कसं शांत करणार?
हवालदार : त्यात काय? त्यांच्यापुढं जाऊन माफी मागीन मी! तशीही शाखेत माफी मागायची जॅम सवय लागलेली.
चहावाला : शाखेत?
हवालदार : वाहतूक शाखेत असल्यापासून म्हणतोय मी! हे हांजी, हांजी करणं. माफी मागणं वगैरे संस्कार तिथलेच!
सदस्य : (चहावाल्याच्या कानात) पेटवापेटवी, पळवापळवी नि शेकल्यावर शेपट्या घालून पळणं, हेही तिथलंच!
हवालदार : आणि वाटलंच तर माजी पोलीस पाटलाची एक समिती नेमू. चालेल ना? (हवालदार उठून दोघांकडं बघत निघून जातो.)
चहावाला : इथं असंय, इथला निरीक्षक याला काही निलंबित करू शकत नाही. कारण तो या हवालदाराच्या सासर्याच्या वशिल्यानं बढती मिळवून आलेला, त्यामुळं तो याला काही बोलत नाही, अन् दुसरा हवालदार दुसर्या बीटला ड्युटी करतो, तो इकडं लक्ष देत नाही. इथं हाच राजा!
सदस्य : अन् पब्लिकचं कसंय, येडं असो वा हुकूमशहा, जोवर वर्मी घाव बसत नाही तोवर सगळ्यांना सहन करते. एकदा वर्मावर लाठी बसली की अश्रूधुराच्या नळकांड्या न फोडता ढसाढसा रडायला लावते.