गणपती बाप्पा मोरया!!…
बाप्पाच्या आगमनाची वाट सर्वजण आतुरतेनं दरवर्षी पाहात असतात. तुम्हीही पाहात असाल. नागपंचमी झाली की गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. एकदा गणेशोत्सव सुरू झाला की सगळ्यांचीच धमाल असते. घरातल्या सगळ्यांबरोबरच शेजारीपाजारी, सोसायटी, गाव आणि मित्रमंडळी एकत्र येऊन धम्माल गणेशोत्सव साजरा करतात. हीच तर खासियत आहे ह्या सणाची…
गणपतीची सुट्टी सुरू व्हायच्या आधी दोन-तीन दिवस शाळा कॉलेजला सुट्टी टाकून गणपतीचं डेकोरेशन, लायटिंग आणि मुख्य म्हणजे खाण्याचे पदार्थ बनवून घेणे, याची लगबग सुरू होते. मग गणेश चतुर्थीला गणपतीच्या दुकानात किंवा कुंभाराकडे फायनल केलेली बाप्पांची मूर्ती घेऊन येणं हा एक सोहळाच असतो… बाप्पाचे बोलके डोळे, विशाल कान, लंबोदर आणि वळणदार सोंड असलेली मूर्ती पाहून भरी वाटते… मी निमशहरी भागात राहातो. सकाळी उठून रानात जाऊन शोधून आणलेल्या दुर्वा निवडायच्या. त्यांची व्यवस्थित मोजणी करुन २१ दुर्वांची एक अशा जास्तीत जास्त जुड्या करायच्या याची एक मज्जाच असते. एवढंच नाही तर दुर्वा आणायला गेल्यावर वाटेतील चिंचेच्या झाडाच्या नुकत्याच लागलेल्या कोवळ्या चिंचा हमखास पाडून आणत असे. आई त्याची मस्त चटणी बनवायची. दुर्वांच्या जुड्या देवपूजा करताना बाप्पाच्या हातात ठेवणे यासाठी नेक्स्ट लेव्हलची श्रद्धा लागते… आणि आईने बनवलेल्या मोदकांचा आस्वाद तर काय सांगायलाच नको… त्यात तर स्पर्धाच लावावीशी वाटते, की मोदक मला जास्त आवडतात की बाप्पाला…?
गणेशोत्सवाचं मला आवडणारं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सामूहिक आरती. ही आरती करताना कापूर, उदबत्ती आणि धूप यांचा सुगंध घरभर पसरल्यावर एक प्रकारचं भक्तिमय वातावरण तयार होतं. आणि त्यात आरती सुरू झाली की एका लयीत सगळे टाळ्या, घंटा आणि टाळ वाजवतात…
…‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची…’ सुरू झालं की पाठोपाठ किमान ५-६ आरत्या सहज म्हटल्या जात. शेवटी ‘घालीन लोटांगण’ सुरू झालं की प्रसादाची ओढ लागते. तुम्हाला आरत्या म्हणता येतात का? नाही? तरी काही चिंता नाही म्हणा. आता फोनवर तुम्ही कोणतीही आरती प्ले करु शकता. सो डोन्ट वरी..! पण आरत्या पाठ करून म्हणण्यात जास्त मजा आहे. आरती संपली की मग प्रसाद म्हणून मस्त उकडीचे मोदक खायचे… गणेशोत्सवात जेवणाचीही मौज असते. नेहमीच काहीतरी सुंदर पक्वान्न घरी केलंच जातं. या सगळ्याची मजा घेत यावर्षी मस्त गणेशोत्सव साजरा करूया… चला लागा तयारीला आतापासूनच…