कोदंडाचा टणत्कार या पुस्तकाने तेव्हाच्या महाराष्ट्रातील विचारविश्वात मोठा भूकंप घडवला. त्यातून प्रबोधनकारांचं व्यक्तिमत्त्व नव्याने घडलं.
– – –
कोदंडाचा टणत्कार या पुस्तकाने केशव सीताराम ठाकरे यांना प्रबोधनकार बनवलं, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीत हा टर्निंग पॉइंट ठरला, इतकं या पुस्तकाचं महत्त्व आहे. तरीही त्यांना हा वाद खेळताना आनंद झालेला नाही, अशी भावना त्यांनी पुस्तकाच्या शेवटच्या पॅरेग्राफमधे व्यक्त केलीय. ते लिहितात, `युद्ध मग ते प्रत्यक्ष समरांगणातील असो किंवा वाग्युद्ध असो ते वाईटच. ते सुरू असताना प्रतिपक्षियांवर सोडलेले बाण प्रथम जरी युद्धाच्या आवेशात बेगुमानपणाने आणि कठोर अंत:करणाने सोडलेले असतात, तरी युद्धाची किंवा चकमकीची परिसमाप्ती होऊन सैन्य आणि सेनानी शिबिराकडे परतू लागले म्हणजे युद्धकाळी घडलेल्या अत्याचारांबद्दल प्रत्येक योद्ध्याला वाईट वाटल्याशिवाय राहातच नाही, हा मनुष्यधर्मच आहे. भा.इ.सं.मं.ने सध्याच्या अत्यंत नाजूक परिस्थितीतच चां. का. प्रभू समाजावर अत्यंत घाणेरडे आरोप करण्यास पुढे व्हावे आणि त्या आरोपांचा प्रतिकार करण्यासाठी आम्हालाही आमचे कोदंड सज्ज करणे भाग पाडावे, ही गोष्ट अत्यंत शोकजनक भासत आहे. भगवान श्रीकृष्ण त्यांना सुबुद्धी देवो! ओम शांतिः शांतिः शांतिः`.
हे पुस्तक अनेक दृष्टींनी अभूतपूर्व आहे. त्याला मिळालेला प्रतिसादही तसाच होता. ‘माझी जीवनगाथा’मध्ये प्रबोधनकारांनी या प्रतिसादाविषयी म्हटलंय, `समोरच्या प्रतिस्पर्ध्याच्या विद्वत्तेचा नि तपश्चर्येचा योग्य तो आदर राखून रोखठोक अस्सल ऐतिहासिक पुराव्यांनी त्यांची विधाने सफाचट कशी खोडता येतात, ते आजही त्या पुस्तकाचे वाचनाने कोणालाही पटवून घेता येईल. टणत्काराच्या सहा हजार प्रती अवघ्या पंधरवड्यात महाराष्ट्रभर खपल्या. ब्रिटिश सरकारलाही भारत इतिहास संशोधन मंडळाच्या खट्याळपणाची खात्री पटली आणि मंडळाला चालू असलेली वार्षिक दोन हजार रुपयांची ग्रांट बंद करण्यात आली. या पुस्तकाने तमाम ब्राह्मणेतर जमातींची झोप उडाली. जदुनाथ सरकार, ग्वालेरचे श्री. लेले, रा. ब. सरदेसाई, रा. ब. जोशी प्रभृती अनेक इतिहास पंडितांनी आणि पत्रकारांनी टणत्काराला पाठिंबा दिला.`
पुण्यात राहून या प्रतिसादाचे साक्षीदार असणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनीही याचं महत्त्व नोंदवून ठेवलंय. प्रबोधनकारांच्या साठीच्या निमित्ताने पुढे १६ सप्टेंबर १९४५च्या नवयुगच्या संपादकीयात ते लिहितात, `या पुस्तकातील ठाकरे यांच्या बिनतोड पुराव्याला आणि कोटिक्रमाला उत्तर देण्याची खुद्द राजवाडे यांची देखील प्राज्ञा झाली नाही. मान खाली घालून त्यांना आपला पराभव मुकाट्याने कबूल करणे भाग पडले. सर यदुनाथ सरकार यांनी आपल्या शिवचरित्रात या पुस्तकाचा गौरवपर उल्लेख केलेला आहे. या पुस्तकाच्याच आधारावर भारत इतिहास संशोधक मंडळाची वार्षिक तैनात मुंबई सरकारने अगदी परवापरवापर्यंत बंद केलेली होती. ठाकरे यांचा हा कोदण्डाचा टणत्कार सबंध महाराष्ट्रात कित्येक दिवस तरी गाजून राहिला होता. त्या पुस्तकाच्या हजारो प्रती महाराष्ट्रात घरोघरी खपल्या आणि त्यांच्या प्रकाशाने महाराष्ट्रातील निद्रिस्त ब्राह्मणेतर जनता एकदम जागृत झाली. त्यामुळे एक निधड्या छातीचा लढवय्या लेखक आणि प्राणघातक प्रहार करणारा टीकाकार म्हणून ठाकरे यांचे नाव एकदम प्रामुख्याने महाराष्ट्रापुढे आले आणि द्रोणाचार्यांना आपल्या तेजस्वी शरसंधानाने कोदण्डधारी अर्जुनाने जसे हतवीर्य करून टाकले, त्याप्रमाणे महाराष्ट्रातील मी मी म्हणणार्या सुप्रतिष्ठित इतिहासाचार्यांना आणि संशोधकांना आपल्या कोदण्डाच्या टणत्काराने गर्भगळीत करून त्या कोदण्डधारी कायस्थ कलमबहाद्दराने त्यांच्यावर मात केली.`
आचार्य अत्रेंनी नोंदवलेली ही निरीक्षणं फारच महत्त्वाची आहेत. त्यातून प्रबोधनकारांच्या मांडणीचं आणि कोदण्डाचा टणत्कार या ग्रंथाचं महत्त्व अधोरेखित होतं. आश्चर्य म्हणजे अत्रेंनी यात राजवाडेंची तुलना द्रोणाचार्यांशी आणि प्रबोधनकारांची अर्जुनाशी केली आहे. दोन पिढ्यांचे प्रतिनिधी म्हणून ही तुलना चालू शकते. पण प्रबोधनकार काही राजवाडेंचे शिष्य नव्हते. पण त्या काळातल्या सर्वच इतिहास अभ्यासकांप्रमाणे त्यांच्यावरही राजवाडेंच्या इतिहासाच्या मांडणीचा प्रभाव होताच. तो नंतरही अनेकदा डोकावतो. त्यातून प्रबोधनकारांच्या मांडणीत अनेकदा विरोधाभास जाणवतो. उदाहरणार्थ, छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभारणीच्या कार्यात संतपरंपरेने केलेल्या जागृतीचा हातभार होता, या न्या. रानडेंच्या सिद्धांताच्या विरोधातली भूमिका प्रबोधनकारांनी पुण्यातल्या वसंत व्याख्यानमालेत मांडली होती. ही मांडणी राजवाडेंच्या मांडणीनुसारच होती. त्यावर साहित्यसम्राट न. चिं. केळकरांनी मल्लिनाथीही केली होती की एरव्ही दक्षिणोतर तोंड असणार्या या दोघांचं यावर मात्र एकमत आहे. शिवाय इतिहासाचा नवा बहुजनी दृष्टिकोन मांडणार्या या ग्रंथाची सुरुवात ‘जय जय रघुवीर समर्थ’ अशी केलेली, हेही आहेच. मात्र कोदंडाच्या टणत्कारच्या निमित्ताने प्रबोधनकार राजवाडेंच्या भूमिकेपासून लांब जाऊ लागले, ते अंतर भविष्यात वाढतच गेलं.
विशेष म्हणजे प्रबोधनकार फक्त पुस्तकी युक्तिवाद करून थांबले नाहीत. त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळातही त्यावर चर्चा घडवून आणली. ज्या पोथीच्या आधारे राजवाडेंनी कायस्थांवर टीका केली होती, ती पोथीच प्रबोधनकारांनी सातारा राजवाड्यातल्या कागदपत्रांमधून मिळवली. त्यांचे मित्र प्रसिद्ध इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांच्यामार्फत मंडळात सक्रिय होते. त्याच्यामार्फत त्यांनी तो दस्तऐवज मंडळात सादर केला. त्या बैठकीला स्वतः राजवाडे हजर होते. त्यावर दोन्ही बाजूंनी चर्चा झाली. उपस्थितांनी त्या कागदपत्रांची काटेकोर चिकित्सा केली. छत्रपती प्रतापसिंहांच्या काळात त्यांना पदभ्रष्ट करण्याच्या कारस्थानाचा एक भाग म्हणून चिंतामणराव सांगलीकर याने कायस्थ प्रभू, मराठे आणि इतर जमाती यांच्याविरुद्ध बनावट दस्तऐवज बनवण्याचा कारखाना सुरू केला होता. त्यातलीच ही बनावट पोथी आहे, हे मंडळाने मान्य केलं. फेक न्यूज घडवण्याचे कारखाने फक्त आजच्या काळातच नव्हते, तर त्या काळातही होते आणि प्रबोधनकारांनी त्याला जोरदार तडाखा दिला होता. आज तेच काम करणार्या पत्रकारांना तुरुंगात जावं लागतंय. प्रबोधनकारांनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागलेच. दुसर्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत ते लिहितात, `भिक्षुकी कारस्थानांमुळे क्रान्तीचक्रांत सर्वस्वाचा होम झाला असता आणि हुंडाविध्वंसनाच्या चळवळीमुळे आमच्यावर बिथरलेल्या कायस्थ प्रभू निंदकांचा जोर भयंकर असतांहि ही द्वितियावृत्ती लिहून काढण्याइतकी मनाची शांती ज्या भगवान श्रीकृष्णाने अभंग राखिली, त्याला अनन्य भावें साष्टांग प्रणिपात करून हा टणत्कार निस्पृह व विवेकी देशबांधवांना विचारक्रांतीकारक होवो, अशी अपेक्षा करतो.`
असं असलं तरी खुद्द इतिहासाचार्य राजवाडे यांनी प्रबोधनकारांची टीका खुल्या मनाने स्वीकारली असं दिसतं. त्यांनी पुढील काळात प्रबोधनकारांचा गौरवच केलेला दिसतो. स्वतः प्रबोधनकारांनी ते लिहून ठेवलेलं आहे, `मी लावीन तो शोध नि देईन तो बोध महाराष्ट्राने शिरसावंद्य मानावा, नव्हे, मानलाच पाहिजे, एवढा ज्यांचा वास्तव अधिकार नि प्रतिष्ठेचा दरारा, त्याच राजवाड्यांवर त्यांचा तसला शोध नि बोध आरपार खोटा ठरविण्याचे अपूर्व धाडस करणारा मी. तेव्हा राजवाडे अगदी चवताळलेले असतील, असा अनेकांचा समज होता. पण त्याच सुमारास पुण्याला पहिले साहित्य संमेलन झाले. त्याच्या अध्यक्षीय भाषणाच्या पुस्तिकेत राजवाड्यांना मान्य असलेल्या ७०-७५ मर्हाठी लेखकांची जी यादी दिली आहे. त्यात त्यांनी माझ्या मर्हाठी कलमबहाद्दरीचा उल्लेख केलेला आहे. इतकेच नव्हे, तर पुढे ९ जुलै १९१९ रोजी झालेल्या ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास या अडीचशे पानी इतिहासविषयक ग्रंथावर धुळ्याच्या `इतिहास आणि ऐतिहासिक` मासिकात राजवाड्यांनी माझ्या महाराष्ट्राभिमानाचा प्रांजळ गौरव आणि राष्ट्रैक्याबद्दलची माझी तळमळ यांचा स्पष्ट उल्लेख करून अनुकूल अभिप्राय दिलेला आहे.`
राजवाडेंच्या कंपूमधील महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे इत्यादी इतिहासकारांनी पुढे त्यांच्या इतर जातींचा पाणउतारा करणारा इतिहास लिहिण्याचा खोडसाळपणा चालूच ठेवला. प्रबोधनकारांनी त्यालाही तितक्याच दणक्यात उत्तरं दिली. तेव्हा त्यांनी या लेखकांच्या निमित्ताने राजवाडेंच्या चुका दाखवून दिल्याच. पण विशेष म्हणजे त्यांच्या मनात राजवाडेंनी इतिहास संशोधनासाठी केलेल्या मूलभूत मेहनतीविषयी आदर कायम राहिला. राजवाडेंच्या मृत्यूनंतर त्यांनी ‘प्रबोधन’मध्ये एक श्रद्धांजलीपर हृद्य स्फुट लिहिलंय. त्यात त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाविषयी गौरवोद्गार काढले आहेत. ते `प्रबोधनमधील प्रबोधनकार` या त्रिखंडात्मक ग्रंथात मुळातून वाचायला हवेत.
विरोधी विचारांचे असूनही परस्पर आदर कायम ठेवण्याची महाराष्ट्राची परंपरा आहेच. राजवाडे आणि प्रबोधनकार या दोघांनीही आपण त्या परंपरेतलेच असल्याचं सिद्ध केलं होतं. या वादाच्या दरम्यान हीच परंपरा महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनीही सुरू ठेवली. वक्तृत्वशास्त्र ग्रंथाच्या प्रकाशनापासून दत्तोपंत प्रबोधनकारांचे जवळचे मित्र होते. पण ते राजवाडेंच्या प्रभावातले महत्त्वाचे इतिहासकार. त्यामुळे ते भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीसही होते. प्रबोधनकारांनी मंडळाला लावलेल्या सुरूंगाचे धक्के त्यांनाही लागत होते. तरीही त्यांनी कधीही तक्रार केली नाही किंवा प्रबोधनकारांचा अनादर केला नाही. उलट ते या वादावर एकमेकांशी चर्चा करत होते. त्यावर दत्तोपंतांचं मत आजही मोलाचं आहे, `वादांचं काय घेऊन बसलात? संशोधनात वाद होणारच नि ते झालेच पाहिजेत. राजवाडे काय किंवा कोणी आणखी काय? मुद्दे चुकलेले असतील, तर हल्ला होणारच. त्यात काय एवढे?`
प्रबोधनकारांनी कोदंडाचा टणत्कारची दुसरी आवृत्ती २५ एप्रिल १९२५ला प्रकाशित केली. त्यात त्यांनी नंतरच्या काळात इतिहासावर प्रबोधनमध्ये लिहिलेले काही लेख प्रकाशित केलेत. शिवाय आधीच्या आवृत्तीत काही दावे स्पष्ट होत नव्हते. ते अधिक स्पष्ट केलेत. विशेषतः छत्रपती संभाजीराजांच्या चरित्रावर पूर्णपणे नवीन प्रकाश पाडणारा ऐतिहासिक मजकूर वाचकांसाठी याच पुस्तकातून पहिल्यांदा समोर आला. त्यावर ते लिहितात, `प्रस्तुतचे पुस्तक प्रथमतः भारत इतिहास संशोधन मंडळास प्रत्युत्तरादाखल म्हणून जरी लिहिले होते. तरी विधाने स्पष्ट करताना घातलेल्या चर्चात्मक मजकुरामुळे, त्याचे एकांगी स्वरूप जाऊन, त्याला एका इतिहास विषयक चिकित्सक निबंधाचे स्वरूप आले आहे. किंबहुना असेही म्हणता येईल की, हे पुस्तक म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाचे सहस्य अचूक पटविणारे हॅन्डबुकच होय.`