• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

निर्भीड आणि निःस्पृह!

- राहुल गोखले

टीम मार्मिक by टीम मार्मिक
April 14, 2022
in भाष्य
0

दि. वि. गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षाला नुकतीच (२५ मार्च) सुरुवात झाली आहे. त्यांच्या निधनालाही आता पंचवीस वर्षे उलटून गेली आहेत. मात्र त्यांच्या स्मृती अद्यापि अनेकांच्या मनात ताज्या आहेत. त्यांच्या ‘माओचे लष्करी आव्हान’ या पुस्तकाचे खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कौतुक केले होते. युद्ध मग ते भारत-पाकिस्तानचे असो किंवा आखाती युद्ध असो; त्या युद्धाचा आढावा घेणारे स्तंभलेखन हाही मराठी वृत्तपत्रांत एक पायंडाच पडून गेला. या निमित्ताने त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा हा लेख…
– – –

प्रख्यात पत्रकार आणि युद्धशास्त्राचे अभ्यासक आणि लेखक दिनकर विनायक तथा दि. वि. गोखले यांची पत्रकारिता ही सुमारे पाच दशकांची होती. या पाच दशकांत दि. वि. यांनी विपुल वृत्तपत्रीय लेखन केलेच; मात्र युद्ध आणि युद्धशास्त्र यांच्याशी संबंधित ग्रंथही सिद्ध केले. मराठीत युद्धपत्रकारिता करणारे पत्रकार अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके दुर्मिळ. त्यांत बिनीची कामगिरी बजावणारे दि. वि. होते. त्यांच्या ग्रंथांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातलीच; पण दि. वि. यांनी पत्रकारितेत केलेले प्रयोग देखील पायंडे पडणारे होते.हिंदुत्वाच्या विचारधारेवर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर दि. वि. यांची निष्ठा होती; मात्र पत्रकार म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपली विचारधारा व्यवसायनिष्ठेवर वरचढ होऊ दिली नाही. तरीही विचारधारेशी कधीही त्यांनी तडजोड केली नाही आणि ती कधी लपवली नाही. दि. वि. यांच्या जन्मशताब्दी वर्षाला नुकतीच (२५ मार्च) सुरुवात झाली. दि. वि. यांच्या निधनाला देखील आता पंचवीस वर्षे उलटून गेली आहेत. मात्र दि. वि. यांच्या स्मृती अद्यापि अनेकांच्या मनात ताज्या आहेत. कारण मराठी पत्रकारितेवर दि. वि. यांनी ठसा उमटविलेला आहे.
दि. वि. गोखले यांचे शिक्षण पुण्यात झाले आणि त्यांना पु. ग. सहस्त्रबुद्धे यांच्यासारखे गुरु लाभले. त्याच संस्कारांमुळे बहुधा दि. वि. यांचा पिंड हा ‘अभ्यासोनि प्रकटावे’ असा बनला. त्याची साक्ष त्यांचे लेख, ग्रंथ आणि भाषणे देत. वर्षभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दि. वि. पूर्णवेळ प्रचारक होते. त्यानंतर त्यांनी काही काळ सरकारी खात्यात लिपिक म्हणून आणि मग शिक्षक म्हणून नोकरी केलीही. मात्र दि. वि. यांचे मन तेथे रमले नाही आणि त्यांना पत्रकारितेचे आकर्षण वाटले. त्याच ओढीतून ते ‘नवशक्ती’ या दैनिकात उमेदवारीवर रुजू झाले. प्रभाकर पाध्ये हे समाजवादी विचारसरणीचे संपादक असतानाही दि. वि. यांनी आपली विचारधारा लपवली नाही आणि जेव्हा महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बंदी आली तेव्हा सत्याग्रह करण्यासाठी नोकरीला रामराम ठोकताना संकोच केला नाही. जीवननिष्ठांना प्राधान्य देताना दि. वि. यांनी फायदा-तोट्याचा विचार केला नाही. सत्याग्रहींची सुटका झाल्यावर दि. वि. पुन्हा नवशक्तीत आले. तेव्हा पाध्ये यांनी ‘तुमचा राजीनामा मी स्वीकारलेलाच नव्हता’ असे सांगून दि. वि. यांना पुन्हा रुजू करून घेतले. अर्थात पाध्ये यांचा हा मनाचा मोठेपणा दि. वि. यांनी एका लेखात कृतज्ञतेने नोंदला आहे. नवशक्तीत कालांतराने दि. वि. वृत्तसंपादक झाले.
१९६२च्या सुमारास ‘महाराष्ट्र टाइम्स’ दैनिक सुरु करण्याची तयारी सुरु होती आणि साहजिकच अन्य वृत्तपत्रांतून पत्रकारांचा शोध सुरु होता. दि. वि. यांना ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये वृत्तसंपादक नेमण्यात आले. ‘महाराष्ट्र टाइम्स’चा पैस मोठा होता आणि दि. वि. यांनी कोणतीही कसर न सोडता ‘महाराष्ट्र टाइम्स’ला आकार दिला. भारतीय खेळांचे दि. वि. हे पुरस्कर्ते होते. वृत्तपत्राचे अखेरचे पान हे क्रीडाविषयक बातम्यांसाठी राखीव ठेवणे आणि त्या बातम्या विस्ताराने देणे याची मराठी वृत्तपत्रसृष्टीत सुरुवात दि. वि. यांनी केली आणि मग तो मराठी वृत्तपत्रांत पायंडाच पडला. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले. या युद्धाने भारताच्या युद्धनीतीमधील अनेक उणीवा दृग्गोचर केल्या. तथापि या युद्धाच्या बातम्यांच्या पलीकडे जाऊन युद्धाचे विश्लेषण करून वाचकांना ‘शहाणे करून सोडावे’ या हेतूने दि. वि. यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये स्तंभलेखन सुरु केले. त्या लेखांना कमालीची लोकप्रियता लाभली आणि त्याचे पुढे ‘माओचे लष्करी आव्हान’ हे पुस्तक प्रकाशित झाले. खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या पुस्तकाचे कौतुक केले होते. पुस्तकाला पु. ल. देशपांडे यांची प्रस्तावना होती. तीत पु. ल. यांनी लिहिले होते- ‘गोखल्यांच्या भाषेला ओघ आहे. कारण विचारांचे गोंधळात टाकणारे भोवरे त्यांच्या डोक्यात नाहीत… चिनी आक्रमणासंबंधी माझे सारे प्राथमिक शिक्षण गोखल्यांच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून लिहिलेल्या या लेखांमुळे झाले’. हे पुस्तक वाचकप्रिय ठरले आणि त्याच्या आवृत्त्या निघाल्याच; पण युद्ध मग ते भारत-पाकिस्तानचे असो किंवा आखाती युद्ध असो; त्या युद्धाचा आढावा घेणारे स्तंभलेखन हाही मराठी वृत्तपत्रांत एक पायंडाच पडून गेला. याची मुहूर्तमेढ दि. वि. यांनी रोवली.
‘महाराष्ट्र टाइम्स’चे वृत्तसंपादक असताना आणि या जबाबदारीचा धबडगा मोठा असतानाही दि. वि. यांनी दोन गोष्टी निगुतीने केल्या- एक म्हणजे व्यासंग आणि दुसरी म्हणजे सामाजिक चळवळी-संस्थांमध्ये सक्रिय सहभाग. याच व्यासंगातून त्यांनी पुढे ‘पहिले महायुद्ध’ आणि ‘युद्धनेतृत्व’ हे ग्रंथ सिद्ध केले. यातील ‘पहिले महायुद्ध’ हा ग्रंथ दि. वि. यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंझार स्मृतीस तर ‘युद्धनेतृत्व’ हा ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तेजस्वी स्मृतीस अर्पण केला होता. हे दोन्ही ग्रंथ मराठी भाषेचे वैभव ठरले आहेत. केवळ ‘युद्धस्य कथा रम्या:’ असे या ग्रंथांचे स्वरूप नसून व्यूहनीतीपासून समाजजीवनावर युद्धाच्या झालेल्या परिणामांपर्यंत अनेकांगी धांडोळा दि. वि. यांनी या ग्रंथांत घेतलेला आहे. ‘माणूस’च्या १९७६च्या अंकात ‘पहिले महायुद्ध’ या ग्रंथाची समीक्षा करताना प्रा. ग. प्र. प्रधान यांनी लिहिले होते- ‘गोखल्यांच्या लेखनाचे मला खास आवडलेले वैशिष्ट्य म्हणजे नाट्यमय घटना वर्णन करताना त्यांनी लेखनाला नाटकीपणा येणार नाही याची खबरदारी घेतली… गोखल्यांच्या लेखनात युद्धाचे वास्तव चित्रण करताना हृद्य असा संयम आढळतो’.
लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात यांच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद दि. वि. यांनी ‘माझी शिपाईगिरी’ या शीर्षकाने केला. त्या अनुवादाला निवेदन लिहिताना थोरात यांनी लिहिले होते- ‘अधिकारयुक्त वाणीने मराठी भाषेत, लष्करी विषयांवर लिहिणारे त्यांच्या (दि. वि. यांच्या) तोडीचे फारसे लेखक मला तरी दिसत नाहीत. क्लॉसविट्झच्या ‘ऑन वॉर’ या गाजलेल्या ग्रंथाचे चिकित्सक रूपांतर मराठीत करून तर दि. वि. यांनी मोठेच कार्य केले. आपल्या अखेरच्या काळात हे भाषांतर पूर्ण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता आणि भाषांतर पूर्ण करुनच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तथापि या ग्रंथाचे प्रकाशन झाल्याचे मात्र ते पाहू शकले नाहीत. दि. वि. यांचे लेखन हे गोळीबंद असे आणि पत्रकारांनी बातमी देताना अथवा लेखन करताना गुळमुळीत असता कामा नये असा त्यांचा आग्रह असे. त्यांच्या याच नेमकेपणाच्या वृत्तीमुळे आर. के. लक्ष्मण यांच्या ‘टाइम्स’मधील व्यंगचित्रांचा मजकूर ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आणण्याची जबाबदारी दि. वि. यांना देण्यात आली होती. कारण लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांची खरी खुमारी ही त्याखालील टिप्पणीत असे. मराठीत तो मजकूर येताना ती खुमारी हरवता कामा नये यासाठी दि. वि. यांची निवड ही अतिशय समर्पक अशीच होती. पुढे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये दि. वि. सहसंपादक झाले आणि ‘धावते जग’ सदरातील त्यांचे लेखन हे विषयनिवडीपासून शीर्षकांपर्यंत लक्षवेधी ठरले.
अनेक सामाजिक चळवळी आणि संस्थांशी दि. वि. यांचा निकटचा संबंध होता; अनेकांचे ते मार्गदर्शक होते. ग्राहक पंचायतीचे ते संस्थापक सदस्य होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या उभारणीत त्यांचा सुरुवातीपासून सहभाग होता. रा. के. लेले स्मृती समिती, ग्रामायन, देवल यांचा म्हैसाळ प्रकल्प, फाय फाऊण्डेशन इत्यादींशी ते वेगवेगळ्या भूमिकांत निगडित होते. पत्रकार संघाच्या जडणघडणीत देखील दि. वि. यांचा वाटा मोठा आहे. एक खरे, कुठेही असले तरी दि. वि. यांचा एक आधार वाटे. याचे कारण त्यांच्या उमद्या स्वभावात आणि स्वतःविषयी अबोल पण दुसर्‍याच्या छोट्याशाही कामगिरीचे तोंडभरून कौतुक करण्याच्या दिलखुलास वृत्तीमध्ये होते. कोणाविषयीही उणा शब्द दि. वि. यांनी कधी वापरला नाही. विचारधारेशी निष्ठा राखताना आणि प्रसंगी त्यासाठी त्याग करताना देखील सर्व विचारधारांच्या लोकांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध होते. विचारधारेशी एकनिष्ठ असणे म्हणजे एकारलेले असायलाच हवे असे नाही याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या याच उमद्या वृत्तीने त्यांना अजातशत्रू बनविले होते. त्यांच्या भाषणांत आशयसमृद्धता असे; पण जेव्हा ते गप्पा मारत असत तेव्हा त्यात अनौपचारिकपणा असे आणि नर्मविनोद असे. त्यांच्या गप्पांनाही मैफिलीचे स्वरूप प्राप्त होत असे. दि. वि. यांचा मोठेपणा ठाऊक असलेल्यांना त्यांचा दरारा वाटे; पण तितकाच आधारही वाटे. दि. वि. म्हणजे मूर्तिमंत चैतन्याचे प्रतीक होते. आलेल्या संकटांना, अडचणींना त्यांनी आपल्या मूलतः प्रसन्न स्वभावावर मात करू दिली नाही.
प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी दि. वि. यांना अतीव आदर होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची घनिष्ट मैत्री होती आणि दि. वि. यांचे १९९६ साली देहावसान झाले तेव्हा श्रद्धांजली वाहताना बाळासाहेबांनी, ‘घरोब्याचे संबंध असलेला एक हक्काचा जुना मित्र गेला. माझा आवडता मित्र गेला’, अशी प्रतिक्रिया दिली होती. ‘सामना’ आणि ‘मार्मिक’ यांच्यावर दि. वि. यांचा लोभ होता. ‘मोरूचा बाप मोरूला म्हणाला’ नावाचे नर्मविनोदी सदर दि. वि. ‘मार्मिक’मध्ये लिहीत असत. ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून निवृत्त झाल्यावर ‘मार्मिक’मधून ते पाक्षिक स्तंभ लिहीत. तो काळ अयोध्या आंदोलनाचा होता आणि दि. वि. यांच्या लेखणीला विशेष धार चढली होती. त्यावेळी ‘मार्मिक’मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखांची शीर्षके जरी पाहिली तरी याची साक्ष पटेल. उदा. ‘हिंदुत्वरथाची दौड’; ‘मशीद? छे, मंदिरच!’ इत्यादी. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत ‘हिंदूंनी स्वसंरक्षण करणे हा प्रत्येक हिंदूचा अधिकार आहे’ असे म्हटले होते. त्या मुलाखतीच्या आशयावर ‘मार्मिक’मध्ये लिहिलेल्या लेखाचे शीर्षक होते: ‘लोकमान्य टिळक म्हणाले तेच..!’
दि. वि. यांचे व्यक्तिमत्व बहुपेडी होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ झाला आहे. निःस्पृह, निर्भीड, झुंझार, व्यासंगी, तत्त्वनिष्ठ, उमदे, दिलदार, या विशेषणांनी दि. वि. यांचे वर्णन अनेकांनी केले आहे. दि. ाfव. यांचे स्मरण म्हणजे त्यांच्या या गुणसमुच्चयाचे स्मरण होय!

Previous Post

महिलांना फ्रंटसीटवर आणणारी WOW अमृता!

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post
बाळासाहेबांचे फटकारे…

बाळासाहेबांचे फटकारे...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.