चित्रपटसृष्टीतील बालकलाकार एक-दोन चित्रपटात इतक्या अप्रतिम भूमिका करतात की ती भूमिका म्हटली की तो किंवा तीच कलाकार नजरेसमोर उभी राहते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की यातील बहुतेक सर्व कलाकार पुढे चित्रपटसृष्टीमधून जे गायब होतात, पुढं त्यांचा ठावठिकाणाच लागत नाही. पण यालाही काही सन्माननीय अपवाद असतातच. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर दिसलेली एक छोटी मुलगी पुढील काळात एक यशस्वी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत गाजली आणि अवती-भवती प्रसिद्धीचं वलय असतानाच भरपूर निर्माते, दिग्दर्शक कामाचा आग्रह करत असतानाच चित्रपटसृष्टीतून स्वच्छानिवृत्ती स्वीकारणारी कलाकार म्हणजे बेबी शकुंतला!
`प्रभात’ निर्मित `दहा वाजता’ या चित्रपटामधून बेबी शकुंतला यांनी चित्रपटसृष्टीतल्या कारकीर्दीचा शुभारंभ केला, तोही अगदी योगायोगाने. त्यांच्या वडिलांची प्रिंटिंग प्रेस होती आणि आई `प्रभात’च्या मालकांपैकी एक विष्णुपंत दामले यांच्या नात्यातील होती. प्रभात कंपनी कोल्हापूरहून पुण्यात स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी अत्यंत दर्जेदार मराठी, हिंदी चित्रपट निर्माण करण्यास आरंभ केला. `प्रभात’ची तुतारी चित्रपटसृष्टीत निनादू लागली. रसिकांनीही `प्रभात’च्या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद दिला. सामाजिक पौराणिक विषय उत्तम तंत्रज्ञान, कथा-पटकथा-संवाद-गीतरचना-संगीत-ध्वनीमुद्रण, अभिनेते, छायाचित्रण, दिग्दर्शन आणि वितरण या चित्रपटाविषयीच्या प्रत्येक विभागात `प्रभात’चा दर्जा उत्तम होता. `प्रभात’ हे चित्रनिर्मितीचे जणू विद्यापीठच होते. अशा ठिकाणी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी काम करण्याची संधी मिळणे, ही किती अपूर्वाईची गोष्ट! शकुंतला त्यावेळी खरोखरच `बेबी’ होती. अतिशय बोलके डोळे, गोड बोलणे, भावनेप्रमाणे चेहर्यावर बदलणारे भाव आणि कुणालाही आवडेल असं लोभस रूप! `प्रभात’ने आपल्यावर दाखविलेला विश्वास बेबी शकुंतलेने सार्थ ठरविला आणि `दहा वाजता’ हा चित्रपट यशस्वी ठरला.
हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला त्यावेळी मी अगदीच लहान वयाचा होतो. त्यामुळे आईच्या मांडीवर बसून बघितलेला हा चित्रपट मला काही म्हणता काही आठवत नाही, पण `दहा वाजता’ची एक वेगळीच गंमतशीर आठवण माझ्या संग्रही आहे. `दहा वाजता’ला जाऊया का अशी चर्चा माझी आई, माझी आजी आणि आईच्या मावश्या यांच्यात चालली होती, तेव्हा आईची आजी त्यांना दरडावून म्हणाला, `ए पोरींनो! काय सिनेमा बघायचा असेल तो दिवसाढवळ्याच्या खेळाला बघायला जा, `दहा वाजता!’ नको. `दहा वाजता’ या सिनेमाच्या शीर्षकावरून हे घडलं असावं.
पुढं पुण्यात आल्यावर `प्रभात’ चित्रपटगृहात `प्रभात’ सप्ताहात `प्रभात’चे सर्व चित्रपट आवर्जून बघितले. `माणूस’, `शेजारी’, `रामशास्त्री’, `दहा वाजता’, `संत जनाबाई’ आणि `प्रभात’चे अनेक चित्रपट मी जेव्हा अधिक बाईकाईने बघू लागलो, त्यावेळी एक गोष्ट विशेष प्रकर्षाने माझ्या लक्षात आली, ती म्हणजे बेबी शकुंतला आणि इतर कलाकार यांच्या अभिनय सादर करण्याच्या पद्धतीत जाणवण्याइतका असलेला फरक! काही अपवाद वगळता इतर सण स्त्री-पुरुष कलाकारांचा अभिनय, बोलणे हे काहीसे कॅमेर्यासमोर आपण कृती करत आहोत, बोलत आहोत, रडत आहोत, हसत आहोत या दडपणाखाली किंवा दिग्दर्शकाने आपल्याला जे करायला सांगितले आहे त्याबरहुकूम करत आहोत. या भावनेने केलेले आहे. त्यात काहीसा कृत्रीमपणा आहे. बेबी शकुंतलाच्या बाबतीत तो अंशभरही नाही. `दहा वाजता’ आणि `रामशास्त्री’ या दोन्ही चित्रपटांतील त्यांच्या भूमिका या दृष्टीने लक्षणीय आहेत. `दहा वाजता’मध्ये एक छोटासाच प्रसंग आहे. मोठा भाऊ, दादा विमनस्क आहे. त्याला जेवायला घेऊन ये असं आई मुलीला सांगते. मला भूक नाही असं दादा सांगतो, त्याला हाताला धरून घेऊन ये, असं आई फर्मावते. हे असे हेलपाटे घालताना बेबी शकुंतला यांनी आपल्या दोन वेण्या ज्या पद्धतीने सहजपणे पुढेमागे केल्यात त्याला तोड नाही. ज्या कल्पकतेने दिग्दर्शकाने त्यांच्याकडून हे करून घेतले त्या दिग्दर्शकाला आणि ज्या सहजतेने बेबी शकुंतला यांनी ते केले, त्या दोघांनाही सलाम!
त्याच चित्रपटात `गोड गुपित कळलंं मला’ हे सहज भावगीतही बेबी शकुंतला यांच्या तोंडी आहे. अत्यंत निरागस भावनेने त्यांनी ते साकारले आहे. या मुलीचे उपजतच असलेले अभिनयगुण अधोरेखित होतात. `रामशास्त्री’ हा `प्रभात’चा असाच माईलस्टोन ठरलेला चित्रपट. अनंत मराठे (छोटा रामशास्त्री) आणि बेबी शकुंतला (जानकी- रामशास्त्रींची पत्नी) किती सुरेख जोडी. नवर्याला `अरे-तुरे करणारी’, आम्हाला भूक लागली आहे, असं सांगणारी आणि सागरगोटे खेळता खेळता
`दोन घडीचा डाव
याला जीवन असे नाव’
असं द्वंद्वगीत म्हणणारी.
शांताराम आठवले यांची प्रासादिक काव्यरचना केशवराव भोळे यांचे योग्य वातावरण निर्माण करणारे संगीत आणि अनंत मराठे आणि बेबी शकुंतलेची राम-जानकीची जोडी! बेबी शकुंतला त्यात परकर पोलक्यात आहेत. दृष्ट काढावी अशी जोडी! आता त्याला अरे राम असं म्हणायचं नाही असं सासूबाईंनी बजावल्यावर अहो, जाहो म्हणताना उडालेली तारांबळ सारंच काही वारंवार रुपेरी पडद्यावर बघण्यासारखे वस्तुपाठ आहेत.
`सीता स्वयंवर’ आणि `मायाबाजार’ या चित्रपटांनी तर बेबी शकुंतलेने आमच्या काळजाचा एकदम ताबाच घेतला.
अनंत मराठे (राम) आणि बेबी शकुंतला (सीता) ही सुयोग्य जोडी `सीता स्वयंवर’मध्ये होती. गदिमांची कथा, पटकथा, संवाद गीतरचना सुधीर फडके यांचे संगीत यामुळे घराघरात `सीता स्वयंवरा’ची स्तुती होऊ लागली. घरातील सर्वांना लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत एकत्रपणे `सीता स्वयंवर’ बघण्यासाठी कुटुंबे चित्रमंदिरावर गर्दी होऊ लागली. बेबी शकुंतलेचे लोभस रूप, केतकीचा रंग, पाणीदार डोळे, शेलाटा बांधा, गोड हसणं आणि राजस मुद्रा या सार्यांनीच रसिकांचे मनावर मोहिनी टाकली.
मनोरथा चल त्या नगरीला
भूलोकीच्या अमरावतीला
स्वप्न मार्ग हा
सडे शिंपले चंद्रकरांनी
शीतल वारा सारथी होऊनी
अयोध्येच्या नेई दिशेला
मनोरथा चल त्या नगरीला
त्याचप्रमाणे,
`हे वदन तुझे की कमळ निळे
का नयन पाहता होती खुळे
ही गीते उपवर तरुणींच्या ओठांवर घोळू लागली.
असाच एक किस्सा `सीता स्वयंवर’ या चित्रपटाच्या वेळेचा. गदिमांनी त्यात एक नृत्यगीत लिहिलं होतं. पण काही केल्या मनासारखी चाल सुधीर फडकेंना (बाबूजी) सुचत नव्हती. त्याच वेळेला त्यांनी कधीतरी ऐकलेली एक हिंदी तर्ज त्यांच्या मनात घोळू लागली. या चालीवर गदिमांकडून गीत रचून घेतलं तर, पण? पण हा ‘पण’ फार महत्त्वाचा होता. चालीवर गीताचे शब्द रचणं गदिमांना सहज शक्य होतं, पण मनापासून आवडत नव्हतं. तरीही धाडस करून बाबूजींनी ती धून अण्णांना ऐकवली आणि काय हो चमत्कार एरवी चालीवर शब्द न रचण्याची आग्रही भूमिका घेणारे अण्णा, त्यांनी हळुवारपणे कागदावर गीत लिहिलं,
`पैंजण पायी माझ्या रुणुझुणू बोले रे
आनंदाच्या वर्तनात तनमन डोले रे
बेबी शकुंतलेची सीतेची भूमिका विलक्षण गाजली. बालपणीचा तिचा अल्लडपणा शिवधनुष्याचा घोडा घोडा करून त्यावरून अंगणभर बागडणं. विवाह मंडपातील सलज्जता आणि प्रभू श्रीरामांनी धनुर्भंग करताच चेहर्यावर उमटलेला आनंदी भाव, हे सारे बारकावे बेबी शकुंतला यांनी अत्यंत सहजपणे अभिनयामधून प्रगट केले होते.
सीता स्वयंवरच्या पाठोपाठ आला महाभारतातील प्रसंगावर आधारित `मायाबाजार’ हा चित्रपट. उत्तरा (बेबी शकुंतला) आणि अभिमन्यू (बालकराम) ही जोडी या चित्रपटात होती. शिवाय शाहू मोडक, दुर्गा खोटे, वसंत ठेंगडी, उषा मराठे (उषा किरण) यांच्याही भूमिका होत्या. उषा मराठे यांनी याच चित्रपटाद्वारे या सृष्टीत प्रवेश केला. त्यांनी रुक्मिणीची भूमिका केली होती.
विझले रत्नदीप नगरात
आता जागे व्हा यदुनाथ
जागी झाली सुवर्णनगरी
अरुणासह ये उषा सुंदरी
सोन्याची नव प्रभा पसरली
सोन्याच्या दारात
आता जागे व्हा यदुनाथ।।
हे नितांतसुंदर गीत त्यांच्यावर चित्रित झालं आहे. या चित्रपटातील सर्वच गीतरचना, उत्तम संगीतसाजासह अवतरली.
`आठवतो का बालपणा’, `नगरवासीहो या हो या, जुने टाकूनी नवीन घ्या’, ‘आश्रम की हरीचे हे गोकुळ’, ‘का असा गेलास तू, ना बोलता ना सांगता’ अशी एक से एक सरस गीते या चित्रपटात होती. बेबी शकुंतला या `मायाबाजार’ या अत्यंत साजिर्या गोजिर्या भूमिकेत होत्या.
`मायाबाजार’मधील एका गीतासंबंधी विशेष माहिती दिलीच पाहिजे. ‘प्रभात’ स्टुडिओमध्ये (आताचे एफटीआय) चित्रीकरण सुरू होते. `गदिमा’ यांनी एक गीत लिहून बाबूजींकडे दिले. बाबूजींनी ते वाचले आणि म्हणाले काय माडगूळकर, कसलं समरगीताच्या चालीवरचं गीत लिहिले आहे? दुसरं लिहा. माडगूळकर त्यावर उसळून म्हणाले, `या गीतात शब्द, यमक वगैरे चुका नाहीत ना? मग मी दुसरे गीत पुन्हा लिहीणार नाही. चाल लावायची असेल तर लावा, नाहीतर…’ सुधीर फडके रागारागाने ते गीत घेऊन गेले. थोड्याच वेळात त्यांचा निरोप आला, चाल बांधली आहे. ऐकून जा, माडगूळकरांनी गीताची चाल ऐकली आणि ते गहिवरले. ते गीत होते,
‘चांदण्यात चालू दे,
मंद नाव नाविका
तरंगती जलपरी
संथ चंद्र चंद्रिका’
यानंतर अत्यंत लोकप्रिय झालेल्या चांदण्या गीताचे प्रत्यक्ष शूटिंग भर दुपारी तीन वाजता `प्रभात’ स्टुडिओमधील कृत्रिम तलावात बेबी शकुंतला आणि बालकराम यांच्यावर झाले आहे.
कॅमेरामन होते ई. महंमद! चित्रपटसृष्टी म्हणजे प्रति ब्रह्मदेवाचीच सृष्टी!
‘चिमणी पाखरं’ (हिंदी आवृत्ती ‘नन्हे मुन्ने’) या चित्रपटात अगदी वेगळ्या भूमिकेत होती बेबी शकुंतला. चाळीत राहणारी, वडील टॅक्सी ड्राईव्हर, आई प्राथमिक शाळेत शिक्षिका आणि लहान तीन भावंडांची मोठी बहीण, परकर पोलकं नेसणारी, सर्वांची जिवापाड काळजी वाहणारी. `चिमण्या पाखरांचं चिमणं घरकुल’ असं आपल्या भावंडांबरोबर गाणं गाणारी! आई मरण पावते, वडील तुरुंगात अशी अवस्था झालेली. आपल्या आईचं पातळ नेसून प्रथमच खोलीतून बाहेर येते. आई! असं म्हणत धाकटी भावंडं तिला लटकतात. सर्वांच्या अभिनयाची कसोटी पाहणारा हा अगदी छोटासाच प्रसंग! पण बेबी शकुंतला आणि बालकलाकारांनी उत्कटतेने रंगवला आहे.
त्यांनी ‘अखेर जमलं’, `अबोली, `सौभाग्य’, `कल्याण खजिना’, `मी दारू सोडली’, `संत बहिणाबाई’, `शारदा’ अशा अनेक मराठी चित्रपटांमधून लक्षणीय भूमिका आहेत. त्यांना चित्रपट संस्था आणि दिग्दर्शकही अतिशय समर्थ भेटले. `प्रभात’, `प्रभाकर’, `आल्हाद’, `माणिक’ अशा चित्रसंस्था आणि भालजी प्ोंढारकर, राजा नेने, दत्ता धर्माधिकारी, अनंत माने, विश्राम बेडेकर असे दिग्दर्शक मिळाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बेबी शकुंतला यांनी उपजतच असलेल्या अभिनयकलेला समृद्ध केलं.
वास्तविक मराठी चित्रपटापेक्षाही त्यांच्या भूमिका असलेल्या हिंदी चित्रपटांची संख्या अधिक म्हणजे जवळजवळ चाळीसच्या घरात आहे. त्यावर खरोखर स्वतंत्र लेखच लिहिणे आवश्यक आहे. ‘रामशास्त्री’ (१९४२), ‘तारामती’, ‘बचपन’ (१९४९), ‘बच्चों का खेल’ (१९४६), ‘मोती’ (१९४७), ‘शिकायत’ (१९४८), ‘बिराज बहू’ (१९५४), ‘झमेला’ (१९५३), ‘जय महालक्ष्मी’ (१९५१), ‘मालती माधव’… असे अनेक हिंदी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. त्यातील १४ चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला आहे. किशोर साहू, केदार शर्मा, बी. आर. चोप्रा असे दिग्दर्शक त्यांना लाभले. हिंदी चित्रपटसृष्टीतील सौंदर्याची अनभिषिक्त सम्राज्ञी मधुबाला ही बेबी शकुंतला यांची घट्ट मैत्रीण होती. त्यांनी राम मराठे यांच्याकडून गायनाचे आणि गुरू पार्वती कुमार यांच्याकडून नृत्याची धडेही गिरवले होते.
त्यांना त्यांच्या चित्रपटातील, यशस्वी कारकीर्दीबद्दल `प्रभात पुरस्कार’, `महाराष्ट्र राज्य पुरस्कार’, `शाहू मोडक पुरस्कार’, `कोल्हापूरचा करवीर गौरव पुरस्कार’, ‘जीवन गौरव पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले.
खानदानी सौंदर्य, केतकी वर्ण, नाजूक जिवणी, मध्यम सडसडीत बांधा, तलम, नेटक्या, निवडक फिकट रंगाच्या साड्या, दोन्ही खांद्यावर लपेटून घेतलेला घरंदाज पदर, मंद स्मित आणि सहजसुंदर अभिनय आणि खासगी जीवनात अत्यंत सौहार्दपूर्ण वागणूक या अनेक गुणांमुळे बेबी शकुंतला लोकप्रिय झाल्या होत्या.
या अनेक गुणांच्या एकत्रित जीवनामुळे बेबी शकुंतला यांची कला-कारकीर्द उंचावत होती. एमजीएम या हॉलिवुडच्या कंपनीकडून त्यांना ऑफरही आली होती, पण…
…बसर्गेचे इनामदार श्रीमंत खंडेराव (बाबसाहेब) नाडगौडे यांच्याबरोबर १९५४मध्ये त्यांनी विवाह केला आणि त्यानंतर त्यांनी चित्रपटक्षेत्रामधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. निर्णय खरोखरच कठीण होता. यश खुणावत असताना, रसिकांच्या मनात आदराचे स्थान असताना सौंदर्याचे कमल विकसित होत असताना आणि अभिनयाचे क्षेत्र विस्तारत असताना स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणं आणि पुढील सारं आयुष्य एक संसारदक्ष स्त्रीच्या भूमिकेत स्वीकारणं ही खरोखरच दिव्य अशीच गोष्ट पुढली जवळजवळ ६२ वर्षे त्या संसारी स्त्री या नात्याने करून दाखवली आणि कोल्हापूर मुक्कामी १८ जानेवारी २०१५ रोजी वयाच्या ८२ वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सौ. उमादेवी खंडेराव नाडगौडे हे त्यांचे लग्नानंतरचे नामकरण, पण त्यांच्या रसिकांच्या हृदयात त्या विराजमान आहेत त्या `बेबी शकुंतला’ या नावानेच.