शेतकरी हत्याकांडावर तोंड उघडले तर पदावरूनच गच्छंती असल्याने महाराष्ट्रातील तमाम भाजपाचे नेते तोंडातून ब्र काढीत नाहीत. प्रत्येक आंदोलन चिरडायचे नसते तर त्यावर तोड़गा काढायचा असतो हे प्रधानमंत्री मोदींना माहीत नसेल का? शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे हित तुम्हाला साधता येत नसेल तर तुम्ही सत्ता कोणत्या वर्गासाठी राबवता? बारा वर्षात जिल्हा पंचायतीपासून मोदी सरकारमधील गृह राज्यमंत्री झालेले अजय मिश्रसारखे नेते आज शेतकर्यांना चिरडतात, कारण मोदी है तो मुमकिन है.
—-
केंद्र सरकारमधील गृहराज्यमंत्री अजय मिश्र तेनी यांच्या मालकीच्या गाडीने आंदोलक शेतकर्यांना किडामुंग्यांसारखे चिरडून मारल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी भर दुपारी घडली. जो व्हिडिओ समोर आला आहे त्यानुसार महिंद्रा थार गाडी आंदोलकांच्या जथ्थ्याच्या पाठीमागून बेदरकारपणे घुसून समोर येईल त्याला चिरडत जताना दिसत आहे. त्यामागून अजून दोन गाड्या भरधाव वेगात जाताना दुसर्या व्हिडिओमध्ये दिसतात. तिसर्या व्हिडिओमध्ये काही लोक महिंद्रा गाडीची नासधूस करताना दिसतात. या घटनेत चार आंदोलक शेतकरी, एक स्थानिक पत्रकार, दोन भाजप कार्यकर्ते आणि मंत्र्याच्या गाडीचा ड्रायव्हर अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खेरी येथे घडली आहे. उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासमोर शांततामय निदर्शने करण्यास निघालेल्या आंदोलक शेतकर्यांवर हुतात्मा व्हायची वेळ का आली? आंदोलकांना चिरडून नंतर तो अपघात आहे, असे दाखवायचा कट होता का? गाडीचा मालक पंतप्रधान मोदी यांच्या कृपाशिर्वादातील गृहराज्यमंत्री असला तरी अशावेळी त्याला तात्काळ ताब्यात घ्यायची गरज होती. खरेतर त्याला पदच्युतच करायला नको होते का? केंद्रीय गृहराज्यमंत्री गुन्ह्यातील संशयित असेल तर चौकशी निष्पक्ष होईल का? मंत्र्यांच्या मुलाचा या घटनेतील सहभाग सिद्ध व्हायचा असल्याने गृह राज्यमंत्री अजय मिश्र तेनी यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे भाजपने स्वतःच ठरवून टाकले. भाजप हल्ली स्वतःची दांडी, स्वतःचा तराजू घेऊन स्वतःच न्याय तोलायला बसतो. केंद्रीय गृहराज्यमंत्र्याचा पुत्र गुन्हा करून फरार आहे. रोज एक नोटिस त्याच्या दारावर लावून वेळ मारून नेणारे उत्तर प्रदेश पोलीस हाथरसच्या पीडितेला अवेळी भडाग्नी देण्यात पुढे होते, हे यावेळी आठवायला हरकत नाही.
या घटनेत आतापर्यंत फक्त दोघांना अटक झाली आहे. शेतकरी आंदोलनासाठी ट्विटरचे टूलकिट इंटरनेटवर उघडून पाहिले म्हणून दिशा रवी या किशोरवयीन तरुणीला पोलीस बेंगळूरूहून उचलून दिल्लीच्या जेलमध्ये टाकतात, कारण तिचा बाप सरकारातील मंत्री नव्हता. क्रौर्याची परिसीमा गाठणार्या लखीमपूरच्या घटनेची तुलना कसाब आणि साथीदारांनी २६/११ला बेबंद गोळीबार करून निष्पापांची हत्या केली होती, त्या घटनेशीच करता येईल. या घटनेत भाजपचे दोन कार्यकर्ते मारले गेले.
त्यांच्या हत्येचे समर्थन होऊच शकत नाही. आंदोलकानी कायदा हातात घेतला असेल तर ते चुकीचे आहे आणि त्यांनादेखील अटक व शिक्षा झालीच पाहिजे. पण मुळात भाजपचे कार्यकर्ते तिथे नक्की कशासाठी गेले होते, ते सत्यही बाहेर आले पाहिजे. पोलिसांनी आरोपीना ताबडतोब बेडया ठोकायला हव्यात असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. आरोपीला अटक करण्याऐवजी पोलिसांनी प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांना स्थानबद्ध करण्यात तत्परता दाखवली. राकेश टिकैत यांना मात्र पूर्ण मोकळीक दिली होती. त्या आधारे मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना सरकारने नोकरी आणि पंचेचाळीस लाखांची मदत जाहीर करून तात्कालिक समेट केला. यात टिकैत यांची भूमिका वादात सापडली आहे आणि हीच सगळ्या शेतकरी आंदोलकांची पण भूमिका मानायची का यावर वाद सुरू आहेत?
केंद्र सरकार, उत्तर प्रदेश प्रशासन, पोलीस आणि भाजप या प्रकरणात असंवेदनशीलपणे वागत असले तरी देशातील प्रत्येक संवेदनशील नागरिक या घटनेने व्यथित आहे.
अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्रीपदाचा त्याग करणार्या पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीजींची परंपरा पंतप्रधानांच्या कार्यालयाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अशा मूल्याधिष्ठित राजकारणाची थोडी चाड असती तर आतापर्यंत निदान गृह राज्यमंत्री अजय मिश्र तेनी यांचा राजीनामा त्यांनी घेतला असता. पण असे करायला पंतप्रधान मोदी हे शास्त्रींसारखे महात्मा गांधीचे शिष्य नाहीत. विरोधकांनी बौद्धिक प्रामाणिकपणा दाखवावा असे पंतप्रधान नुकतेच म्हणाले. लखीमपूरच्या हत्याकांडावर ते चकार शब्द काढत नसतील तर ते स्वत: सर्वोच्च संसदीय पदाशी खरेच प्रामाणिक आहेत का? शेतकरी हत्याकांडावर शब्दही न बोलता मोदी अयोध्येत यंदा दीपोत्सव कसा होणार हे सविस्तर सांगताहेत. त्यांना इव्हेंटबाजीपलीकडे काही खरोखरच करता येते का? असले दीपोत्सव आणि झगमगाट करून लोकांच्या धार्मिक भावना जागवून मतांचा जोगवा मागण्याचा उदात्त हेतू आहे. खरोखरचा विकास केला असता तर जाती आणि धर्माचे गणित जुळवत बसावे लागले नसते. सत्तेसाठी एखाद्या गुन्हेगाराला पाठिशी घातले गेले नसते. पौर्णिमेला रात्री दिवे लागू नका असे मोदी म्हणाले. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या कारभाराने विकासाचे इतके दिवे लावले आहेत की यापुढे जिथे जिथे भाजप सत्तेत आहे तिथे रस्त्यावरील विजेचे दिवे कायमचे काढून टाकायला हरकत नाही.
लखीमपूर खेरी येथील घटनेवर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया येणे नैसर्गिक होते. अशावेळी बरेच नेते एकदोन दिवस थांबून फायदा-नुकसान यांचे गणित पाहून मग निवांतपणे विरोधाचा सूर पकडतात. पण काही तासांतच प्रियांका गांधी लखीमपूरला निघाल्या. कानपूरच्या मनीष गुप्ता या व्यावसायिकाची गोरखपूरमध्ये ज्या पद्धतीने हत्या झाली ते पाहता उत्तर प्रदेशला कोणी जायला धजावेल, तरी का? पण प्रियांका आणि राहुल गांधी लखीमपूरला पोहोचले. प्रियांका गांधींची गाडी अपरात्री पोलिसांकडून रस्त्यात अडवण्यात आली.
एरवी संयमी आणि मितभाषी असणार्या प्रियांका गांधीनी पोलिसांसमोर रणचंडिकेचा अवतार धारण केला आणि त्या थेट चालत निघाल्या. प्रियांका, अखिलेश यादव आणि नेत्यांना स्थानबद्धतेत ठेवणारे आदित्यनाथ हे स्वतंत्र भारतातले सर्वात डरपोक मुख्यमंत्री आहेत. लोकशाहीमध्ये जनतेच्या आणि विरोधकांच्या रोषाला सामोरे जाण्याची जी एक निडरता आणि सचोटी लागते पंतप्रधानांकडे नाही, तर आदित्यनाथांकडे कुठून असणार? आडात नाही ते पोहर्यात कुठून येणार?
पोलिसांच्या आणि दमनयंत्रणांच्या आड राहून कारभार करायची ब्रिटीश सरकारची विकृती भाजपाकडे कशी काय आली? भगवी वस्त्रे सर्वोच्च त्याग आणि निडरतेचे प्रतीक आहेत. शेतकरी हत्याकांडातील कसाबांना पाठीशी घालणार्यांनी भगवे कपडे आता काढून ठेवावेत. आदित्यनाथांनी न्यायाची थोडी जरी बूज राखली असती तर सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांना स्वतःहून या प्रकरणाची दखल घ्यावी लागली असती का? या घटनेत शहीद झालेल्या हुतात्म्याच्या आजारी आईच्या उपचारांची सोय करा असा आदेश रामण्णा यांच्या खंडपीठाला द्यावा लागला. मोदी आणि आदित्यनाथ यांना मृतांच्या कुटुंबियांना साधे भेटावेसेही वाटत नाही. भाजपाची तळी उचलणारे सिनेकलाकार, क्रिकेटवीर, उद्योगपती या घटनेवर गप्प का आहेत? सत्तेची इतकी मग्रूरी? अन्नदाता देशद्रोही कसा आहे हे आयटी सेलमधील थोतांडातून पटवून देण्यात मेहनत आणि पैसा खर्च करून काही साध्य होणार नाही. असल्या थोतांडाला जनता चाळीस पैसे पण किंमत देत नाही. ट्रॅक्टर रॅलीनंतर आंदोलकांपुढे रोज लोटांगण घालून पाठीत सळक भरायची पाळी केंद्र सरकारातील मोठ्या मंत्र्यांवर आली होती, हे सरकार विसरले की काय?
शेतकरी हत्याकांडावर तोंड उघडले तर पदावरूनच गच्छंती असल्याने महाराष्ट्रातील तमाम भाजपाचे नेते तोंडातून ब्र काढीत नाहीत. प्रत्येक आंदोलन चिरडायचे नसते तर त्यावर तोडगा काढायचा असतो हे प्रधानमंत्री मोदींना माहीत नसेल का? शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे हित तुम्हाला साधता येत नसेल तर तुम्ही सत्ता कोणत्या वर्गासाठी राबवता? बारा वर्षात जिल्हा पंचायतीपासून मोदी सरकारमधील गृह राज्यमंत्री झालेले अजय मिश्रसारखे नेते आज शेतकर्यांना चिरडतात, कारण मोदी है तो मुमकिन है. निवडणुकीत जनता आपल्या नावावर मते देते या अहंभावाने मोदी पछाडलेले आहेत. भाजपा सत्तेतून कधीही हद्दपार होणार नाही या दंभातून एककल्ली कारभार केला जात आहे. पण शेतकर्यांनी आणि कष्टकर्यांनी सत्ता सोडायची नोटिस दिल्लीच्या सीमेवर चिकटवली आहे. प्रियांका गांधी यांनी सीतापूर गेस्ट हाऊसमध्ये झाडू मारल्यावर कुचेष्टा करणारे भाजपावाले ममतांनी त्यांची कशी वाताहात केली ते इतक्या लगेच विसरले? शेतकरी, कष्टकरी भाजपाविरोधात उभे राहिले तर काशीच्या घाटावर गरूडपुराण वाचायची पाळी भाजपावर पाच महिन्यात येऊ शकते.
– संतोष देशपांडे
(लेखक राजकीय विश्लेषक आहेत)