निशिकांत कामतच्या ‘मदारी’ची ताकद ही त्याच्या लिखाणात, दिग्दर्शनात, अभिनयात, पार्श्वसंगीतात सर्वत्र उत्तम साधली गेलेली आहे. चित्रपटाचा गंभीर सूर हलका करायला पाणचट विनोद, उथळ भंपक गाणी नाहीत. निर्मल आणि त्याच्या मुलाच्या अपूच्या प्रसंगात भावनिक स्पर्श आहे आणि खुसखुशीतपणासुद्धा. तसंच निर्मल आणि रोहनचे संवाद हसू आणतात. गोड आहेत. ‘मदारी’चे एकंदरीत संवादच खूप खास आहेत. ‘मदारी’ हे या आपल्या मानगुटीवर बसलेल्या भ्रष्ट व्यवस्थेचं नाव आहे. जमूरा आपण आहोत हे परत एकदा जोरकसपणे कळलं असतं.
—-
इट्स जस्ट अ सिनेमा… अडीच तीन तासांचा तो पडद्यावरचा खेळ संपला की आपण म्हणतो. ती स्वप्नं, तो गुलाबी प्रणय, थिरकायला लावणारी गाणी, दे मार फाईट… काहीतरी चमचमीत खाऊन तृप्त झाल्यागत आपण त्या अंधारातून बाहेर येतो. बाहेरचा उकाडा, ट्रॅफिकचा कर्कश्य आवाज, गर्दी, धक्काबुक्की आणि आपलं सामान्यपण लक्षात आलं की स्वत:शीच हसून म्हणतो. इट्स जस्ट अ सिनेमा.
मात्र आपलं सामान्यपणच दाखवणारा सिनेमा असेल तर…?
खरं सांगायला गेलं तर आपलं सामान्यपण सांगणारा, त्यातही असामान्यत्व दाखवणारा चित्रपट असेल तरीही हे स्वप्नरंजनच आहे, हे शहाणपण आपल्याला उपजतच असतं.
म्हणूनच निशिकांत कामतच्या मदारीची सुरुवात होते इरफानच्या गुणगुणल्या आवाजात ‘बाज चूजे पर झपटा. उसे उठा ले गया. कहानी सच्ची लगती है, मगर अच्छी नहीं लगती. बाज पर पलटवार हुआ… कहानी सच्ची नहीं लगती, मगर अच्छी लगती है.’
‘मला सिनेमा करायला आवडतो. मग तो लय भारी असेल किंवा ‘दृश्यम’ किंवा ‘रॉकी हॅण्डसम’… ‘मदारी’ची कथा इरफानकडे तयार होती. त्याने मला बोलावून स्क्रिप्ट दिली. म्हणाला, तुला आवडली तर तू दिग्दर्शन कर. स्क्रिप्ट बर्यापैकी तयार होतं. माझ्या झोनमधलं होतं. मी थोडंसं त्यावर अजून काम केलं.’ निशिकांत कामतने सहज सांगितलं होतं. ‘डोंबिवली फास्ट’, ‘मुंबई मेरी जान’, ‘फोर्स’, ‘दृश्यम’, ‘लय भारी’, ‘रॉकी हॅण्डसम’ असं भरीव यश कमावलेला हा तरूण दिग्दर्शक. मध्यमवर्गातून आलेला… शहरी मध्यमवर्गाच्या भावनिक, सामाजिक कोंडमार्याच्या आणि उद्रेकाच्या गोष्टी सांगणारा.
‘मदारी’ची कथा ही अशीच एका बंडाची आहे. देशाच्या गृहमंत्र्यांच्या आठ वर्षाच्या मुलाचं अपहरण झालेलं आहे. ही बातमी कळली तर देशाच्या जनतेचा सरकारवरील विश्वास उडेल, या भयाने अतिशय गुप्तता बाळगून नचिकेत या सुरक्षा अधिकार्याला हे मिशन देण्यात येतं. पण यात अडचण अशी असते की हा गुन्हेगार ज्याने गृहमंत्र्यांच्या मुलाचं रोहनचं अपहरण केलेलं आहे, तो खंडणी किंवा कोणाची मुक्तता असल्या मागण्या न करता, त्याच्या स्वतःच्या मुलाला शोधून द्यायची जबाबदारी सरकारवर सोडतो. त्याचा मुलगा कुठल्या तरी दुर्घटनेत अडकलाय म्हणतो. इतक्या असंबद्ध क्लूवर काम करणं नचिकेतला कठीणच असतं तर दुसरीकडे हा गुन्हेगार, दहा वर्षांच्या रोहितला घेऊन उत्तर-पश्चिम भारतात फिरत राहतो. तो तांत्रिकदृष्ट्या इतका सरस आहे की त्याला ट्रॅक करणं नचिकेतच्या टीमला कठीण जातं. या सगळ्या प्रवासात आपल्याला या माणसाची दुर्दैवी गोष्ट कळते आणि आपण त्याच्याशी जोडले जातो. त्याने मदारी बनून या बलाढ्य यंत्रणेला नाचवत राहावं अशी आपली मानसिकता तयार होत जाते.
पण ‘मदारी’ फक्त हा पाठशिवणीचा खेळ राहत नाही. ‘मदारी’ नुसता या समाजव्यवस्थेत पिचलेल्या नागरिकांचा आवाज बनत नाही. त्याही पलीकडे जातो. चित्रपटात नायक निर्मल मदारी असला तरी प्रत्यक्षात कायदा, राजकीय नेते, धनाढ्य उद्योगपती, समाजातील प्रतिष्ठित माणसं, तथाकथित पत्रकार, मोक्याच्या ठिकाणी कामाला असणारे लोक, धंदेवाले या सार्यांचं हे नेक्सस एक मदारी बनून सामान्य जनतेला माकड बनवून खेळवत आहेत… हे परखड सत्य मांडतो.
हे परखड सत्य मांडणारे चित्रपट आले नाहीत असं नाही. समाजातला, सामान्यांचा राग व्यक्त करणारे, उद्रेक मांडणारे, सोशल अँगर असणारे कैक सिनेमे येऊन गेलेत. येत राहतील.
‘मदारी’चं वैशिष्ट्य हे की एका प्रसंगातली किरकोळ झटापट वगळता हाणामारी, हिंसाचार हे या रिव्हेंज ड्रामामध्ये नाहीतच. हिंसा कुठे होत असेल तर निर्मलचा भूतकाळ उलगडताना. आणि ती हिंसा होते प्रेक्षकांची मनं जखमी करत. एकटा पालक असणार्या निर्मल आणि त्याचा बछडा अपूची कथा बघताना.
काही वर्षांपूर्वी जेव्हा सीरियामध्ये यादवी माजली होती तेव्हा एक फोटो प्रसिद्ध झाला होता, एका माणसाचा मृत मुलाला मांडीवर घेऊन विमनस्क अवस्थेत बसलेला, धुळीने माखलेला. आणि खाली लिहिलं होतं. ‘जेव्हा एखाद्या माणसाचं मूल मारलं जातं… तेव्हा तो दहशतवादी बनतो.’ त्याही मागे जाऊन १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटात बळी पडलेल्या एका मुलाच्या बापाचा आक्रोश आठवतो… त्या अलीकडे-पलीकडे जाऊन अनेक घटना, मग ते साखळी स्फोट असोत की रेल्वे, बस दुर्घटना की पूल कोसळणे…अनेक लोकांचं क्षणात संपून जाणं… छिन्नविच्छिन्न होऊन आप्तांसाठी एक क्रमांक बनून राहाणं.
‘तीन नंबर?’ पूल दुर्घटनेत गेलेल्या तरुण मुलाचा बाप, सरकारी कार्यालयात क्लेम मागायला आलाय. बाजूला बसलेल्या निर्मलचा आणि त्याचा दुवा म्हणजे दोघांची पुलाच्या ढिगार्याखाली गाडली गेलेली पोरं. ‘तीन नंबर? तुम चेक का क्या करोगे?’ म्हातारा निर्मलला विचारतो. हरवलेल्या नजरेने काहीसा वेडसर वाटणारा निर्मल बरळतो, ‘मैं ना इसका एक खंजर बनाऊंगा. और जिसने मेरे बेटे को मारा है उसके छाती में घोप दुंगा.’
हा अदृश्य खंजीर लेखिका शैलजा केजरीवाल, दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी प्रेक्षकांच्या हातात नाही तर मनात दिलेला आहे, हे या सामाजिक उद्रेकपटाचं वैशिष्ट्य आहे. एका प्रसंगात निर्मल रोहनला म्हणतो, मी जे करतोय, सांगतोय ते तुला आज नाही कळणार. कदाचित दहा-पंधरा वर्षांनंतर कळेल. मी का आणि काय करतोय. तोच लहानगा रोहन चित्रपट संपताना दाराबाहेर पडत असताना मागे वळून निर्मलकडे पाहतो आणि म्हणतो कदाचित दहा पंधरा वर्ष नाही लागणार. मला समजायला लागलं आहे आताच.
‘मदारी’चा शेवट, हे दृश्य आज चित्रपटापेक्षा जास्त लोकप्रिय झालेलं आहे. ते लिहिण्याचा मोह आवरत नाही. या शेवटच्या दृश्यात एलपीजी गॅस सिलेंडरवर बसलेला रोहन म्हणजे आपण जनता आहोत. किंवा येणारी मतदारांची पिढी. जिच्या समोर देशाचा गृहमंत्री फार मोठं सत्य उघड करतो. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधला खेळ. एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेले हे तट. नाण्यात नाही तर अशक्य अशा वाटणार्या आणि तुम्ही आम्ही लिहू शकणार नाही, अशा रकमांचा तोबरा गिळूनही परत तोंड उघडणारे अजगर. वरून तमाशा आतून मुजरा असलेलं हे सत्ता, विरोधी पक्ष, लालफीतशाही, कंत्राटदार, कायदा, व्यवस्था, पत्रकारिता यांचं जग. गृहमंत्री गोस्वामी म्हणतो, आमच्यात जे खरोखर प्रामाणिक आहेत त्यांना बाजूला काढलं जातं. सत्ता त्यांनाच दिली जाते जे कमावू शकतात.
‘मॅथ्स गलत है तुम्हारा. एकसो बीस करोड कहाँ हो तुम लोग? तुम तो जाती, धर्म सब में बंटें हुए हो,’ या गोस्वामीच्या हिणवण्यावर निर्मल गप्प बसतो. उत्तर द्यायला त्याच्याकडेही काही नाही. ना तुमच्या आमच्याकडे. आपण पिळवणूक करून घ्यायलाच जन्माला आलो आहोत अशी आपली समजूत हे नेक्सस दिवसेंदिवस गडद करत जातं.
‘आयडियल व्होटर था मैं. आपल्या जगात खुश. आपल्या भाकरीची सोय बघणारा. पाच वर्षांनी नियमित मत देणारा. न्यूज चॅनलवर जे सांगतील ते खरं मानणारा… पण जर तुम्ही माझ्या दुनियेची वाट लावलीत तर… मैं तुम्हारी दुनिया में घुस जाऊंगा.’
‘मदारी’ची ताकद ही त्याच्या लिखाणात, दिग्दर्शनात, अभिनयात, पार्श्वसंगीतात सर्वत्र उत्तम साधली गेलेली आहे. चित्रपटाचा गंभीर सूर हलका करायला पाणचट विनोद, उथळ भंपक गाणी नाहीत. निर्मल आणि त्याच्या मुलाच्या अपूच्या प्रसंगात भावनिक स्पर्श आहे आणि खुसखुशीतपणासुद्धा. तसंच निर्मल आणि रोहनचे संवाद हसू आणतात. गोड आहेत. ‘मदारी’चे एकंदरीत संवादच खूप खास आहेत. फार पल्लेदार आणि स्टायलिश न लिहिता, ‘देखो आठ साल के बच्चे को पता है पॉवर क्या है’ किंवा ‘बडा मुंह करके कोई खा रहा था, मेरा बच्चा उस में खो गया है’, असे भिडणारे संवाद नुसते लक्षात राहत नाहीत तर आपण ते ऐकून कुठेतरी हताश होत मान डोलावतो. एका प्रसंगात एक सरकारी बाबू जेव्हा त्याला एक पूल, बांधल्यानंतर पंचवीस वर्षांनी पडला हे कळतं तेव्हा खूप दयाळू लोक होते बांधणारे असं म्हणतो.
मुंबईत एक काळ असा होता की सकाळी घर सोडून निघालेली व्यक्ती संध्याकाळी घरच्यांना परत दिसेल का याची शाश्वती नसायची. निशिकांत कामत मुंबईकर. त्याचे ‘डोंबिवली फास्ट’, ‘मुंबई मेरी जान’ हे सिनेमे या आणि अशा महानगरातील लोकांच्या, या व्यवस्थेत कुढत तरीही साजरा करत जगण्याचं वास्तव दाखवतात. स्वतः निशिकांत अनेकदा बसने प्रवास करत असे. सामान्य माणसाची नस त्याला नक्की सापडली होती. म्हणूनच ‘मदारी’मधून तो कुठेही एखादी व्यक्ती खलनायक म्हणून स्थापित करत नाही, ना लाचखोर लोकांचा गब्बर बनून कुठेही खून पाडत बसत. दिग्दर्शक म्हणून ‘मदारी’ हा निशिकांत कामतचा शेवटचा चित्रपट. धोनीने षटकार मारून सामना जिंकावा, तसा हा जबरदस्त सिनेमा देऊन निशिकांतने
मॅच संपवली. ‘मदारी’ वारंवार पहावा त्याच्या दृष्यात्मक सौंदर्यासाठी, घट्ट पटकथा आणि पुढे काय ही उत्सुकता कायम ठेवणार्या निशिकांत कामतच्या कथनशैलीसाठी. चित्रपटात मुर्दाड, भ्रष्ट व्यवस्थेचा बदला, पलटवार हा कथेचा गाभा असला तरी एका बापाची तगमग आणि सत्य शोधण्याचा प्रवास म्हणून मदारीला प्रस्तुत करण्याचं दिग्दर्शकीय कौशल्य अफलातून.
इरफान हा चित्रपट करण्याकरता फार आग्रही होता. त्याची पत्नी निर्मात्यांपैकी एक आहे. चित्रपट पूर्ण झाला की आपण नेहमीप्रमाणेच इरफानमय झाले असतो. हा माणूस कुठल्याही पात्राला इरफान बनवून टाकतो. म्हणजे निर्मल हा एक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातला तंत्रज्ञ कसा असेल हे निर्मलच्या मित्रांना विचारावं तर ते म्हणतील, इरफानसारखा असेल. तीव्रता, व्याकुळता, मनातली खदखद, डोकं भंडावून सोडणार्या आठवणी… इरफान अक्षरशः आपली पकड घेतो. त्याच्या वटारलेल्या डोळ्यात, जलदगतीने बोलण्यात आपण आपल्याला शोधू लागतो. मैं आम लोगों की तरह ही दिखता हूँ, हे फक्त तपास अधिकारी नचिकेतला पटत नाही तर निर्मल आपल्यात खोल घुसलेला असतो. हे इरफानचं कलाकार म्हणून मोठं असणं आहे.
काय योगायोग आहे. २०२०मध्ये इरफान आणि निशिकांत दोघेही डाव अर्धा सोडून गेलेत.
‘मदारी’ म्हणून यांनी अजून खूप खेळ दाखवायचे हाेते आपल्याला. नुकसान आपलं आहे. सिनेमाचं आहे.
बाकी कलाकारांमध्ये जिमी शेरगिल, तुषार दळवी, उदय टिकेकर यांनी कामगिरी चोख पार पाडली आहे. लहानग्या विशेष बन्सलने कमाल केली आहे. ‘ये स्टॉकहोम सिंड्रोम तो नहीं?’ म्हणत तो निर्मलकडे बघत गोड हसतो. बापाची पॉवर त्याला माहिती आहे पण कळली नाही असं ते वय. खूप सुंदर काम केलं आहे पोराने.
दोन गाणी आहेत. एक काळीज पिळवटून टाकणारं आणि एक हाताच्या मुठीत डमरू आणून अंगात वारं भरणारं… खास उल्लेख अप्रतिम पार्श्वसंगीताचा.
स्पॉयलर अलर्ट देऊन एक लिहावंस वाटतं. ‘मदारी’ हा सगळ्या उद्रेकपटांमध्ये वेगळा आहे कारण इथे गोष्ट संपत नाही. कोणी मारलं जाऊन प्रेक्षकांना ताबडतोब न्याय मिळत नाही.
‘मदारी’मध्ये, राजकारण्यांची मिलीभगत, भ्रष्टाचार के लिये सरकार बनती है, हे सगळं टीव्ही चॅनेलवरून जनतेला दाखवल्यानंतर अतिशय शांतपणे निर्मल खोलीतल्या सगळ्यांना म्हणतो, ‘चलो फिर… निकल जाओ.’ मदार्याचा खेळ संपला असतो.
पण सिनेमा संपवून बाहेरच्या जगात आलेल्या आपल्याला मात्र ‘मदारी’ हे या आपल्या मानगुटीवर बसलेल्या भ्रष्ट व्यवस्थेचं नाव आहे. जमूरा आपण आहोत हे परत एकदा जोरकसपणे कळलं असतं.
मग आपण म्हणतो.
इट्स जस्ट अ सिनेमा…
– गुरुदत्त सोनसुरकर
(लेखक चित्रपट रसिक, लघुपट दिग्दर्शक आणि जाहिरात व्यावसायिक आहेत)