खाणे, पिणे किंवा जेवण ही गोष्ट माझ्या अतिआवडीची. वेगवेगळ्या देशातील, समाजातील विविध खाद्यपदार्थ चाखणे हे नित्य कर्म आणि ओघाने मग विविध ठिकाणी जाणे आलेच.
आम्ही तरुण होतो तेव्हा (विश्वास ठेवा, असे काही मी पचकेन हे मला स्वप्नातही वाटले नव्हते, पण आजकाल असे बोलावे लागते राव) तर जेवण खाण्यात दोनेक ठळक निवडी असायच्या. शाकाहारी, मांसाहारी… आणि काही लोकांच्या बाबतीत कांदा लसूण काही ठराविक पदार्थ किंवा कंद वर्ज्य.
अगदी साधे सोपे सरळ नियम, आयुष्य खूप सरधोपट होते.
असे पुराण लावायचा उद्देश काय, तर एका प्रसिद्ध शेफने जाहीर सांगितलं की माझ्या रेस्टॉरंटमधे लोकांना व्हेगन काही मिळणार नाही!!!! तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय असाल तर व्हेगन जेवण पद्धती तुम्हाला माहीत असेलच.
तर आजकाल जेवणात हजारो नियम, उपनियम स्वखुशीने घालून घेतलेली मंडळी दिसतात. स्वखुशीने म्हणजे घरच्यांच्या किंवा धार्मिक कारणाने नाही, तर आपल्याला वाटते म्हणून. आणि माझ्यासारख्या सरधोपट लोकांच्या डोक्याला शॉट लागतो…
आता म्हणाल, दुसरा कोण काय जेवतो याने मला काय त्रास?… तर त्रास असा की अलीकडे कोणाला घरी जेवायला बोलावायचे तर तुम्ही शाकाहारी की मांसाहारी हे विचारून भागत नाही, तर तुम्ही वेगन, नो कार्ब, एथिकल फूडवाले, नो नट्स, यापैकी कोणते आहात? हे पण विचारावे लागते. इतके की त्यापेक्षा त्यांना झोमॅटोची कुपने देणे परवडेल.
एका तरुण जोडप्याला केळवण करायचे होते. जोडपे मिलेनियल… म्हणजे इथल्या सर्वसामान्य समस्यांपेक्षा जगातील अडचणी महत्त्वाच्या वाटणारे लोक असतात, त्यातले.
आम्ही प्लास्टिक वापरत नाही, ही बाटली घेऊन फिरतो, आम्ही पर्यावरण जागरूक आहोत, हे आल्या आल्या आम्हाला सांगून बोअर केलं. आणि गंमत म्हणजे हे दोघे आले होते एका मोठ्या, पेट्रोलपिऊ एसयूव्हीमधून, जी मायलेजपेक्षा धूर जास्त देते. पण पाहुणे असल्याने आम्ही चूप!! मग चहा विचारला, तर दूध नको, आमंड मिल्क असेल तर चालेल… आमंड मिल्क म्हणजे बदाम दूध!!! सहज गुगल केलं आणि किंमत बघून फेफरे आले.
मुद्दा काय की हल्ली असले नमुने रग्गड मिळतील. कोणीतरी सेलीब्रेटी आपण व्हेगन आहोत म्हणते, कोणी ब्लॅक लाइव्ज मॅटर सांगते, कोणी समुद्रातील व्हेलबद्दल आवाज उठवते आणि भारतातील ही झुंड सोशल मीडियावर पेटून उठते.
मला वरील सर्व गोष्टी पूर्ण पटतात, पण जगातील सुधारणेचा झेंडा खांद्यावर घेण्यापेक्षा आपल्या घरात काय होते ते बघायला हवे की नाही? लॉकडाऊनमध्ये एका बापलेकाचा व्हिडिओ आला होता. मुलगा अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय युवकावर पोलिसांनी अत्याचार करून त्याला कसा ठार मारला याबद्दल बापाला सांगत होता, बापाने ऐकून घेतले आणि शांतपणे म्हणाला, बाळा हे झाले ते वाईटच आहे, पण तू घरातील आईचे लाईफ बघशील का? घरात मदतीला कोणी नाही, मी ऑफिस कामात, तू नुसता लोळत असतोस, आई आणि मी सर्व कामे करतोय, तेव्हा अवर लाईफ ऑल्सो मॅटर्स ड्युड…
आजच्या बहुतेक मिलेनियल तरुणांची मनोवृत्ती दाखवायला हे उदाहरण पुरेसे आहे. असले नमुने भरपूर मिळतात. खास करून सुपर मार्केटमध्ये. ब्रेड नाही, दूध-दही नाही, नॉन व्हेज बिलकुल नाही, पण ट्रॉलीमध्ये मॅगी, सॉस, कोल्ड ड्रिंक्स, जाम हे पदार्थ ठासून भरलेले…
असला विरोधाभास भारतात खूप मिळेल. तुम्ही तुम्हाला जे हवे ते खा अथवा खाऊ नका, पण आम्ही खातोय ते सुखाने खाऊंद्यात लेको. पण नाही, सेल्फ सर्व्हिस रेस्टॉरंटमध्ये माझ्या प्लेटकडे डोळे विस्फारून बघणार्या अनेक तरुण पोट्ट्यांना मी पाहिले आहे.
हे झाले खाण्याविषयी… पण बाकी म्हणाल तरी सर्व आनंद असतो. अनेकांना भारताचे राष्ट्रपती माहित नसतात, गेला बाजार एका कार्ट्याने उद्धव ठाकरे कोण यावर ‘मुंबई के मुख्यमंत्री’ असे उत्तर दिले होते.
प्रत्येक पिढी वेगळी असते, पण आजकाल तरुण पिढी पूर्ण वेगळी आहे हे पटू लागले आहे. वाचन नाही, चौफर माहिती नाही, देशातील घडामोडींबद्दल कल्पना नाही, पण वंदे भारत गाडी काय तुफान आहे, नोटबंदी किती यशस्वी ठरली, प्राचीन काळी आपण विमाने उडवत होतो, याबद्दल भरभरून सांगतील आणि हेच धोकादायक आहे.
कारण संधी मिळाली की पहिले छूट फॉरेनमध्ये स्थायिक होऊन मग इथल्या लोकांना देशभक्ती शिकवण्याचे पुण्यकर्म ही लोकं इमाने इतबारे पार पाडतात.
राजकीय पक्ष किंवा विचारसरणी कोणतीही असू शकते. किंबहुना सकस समाज व्यवस्थेसाठी ती असावीच, पण तरुण पिढी जेव्हा अशा विचारांची कास धरते तेव्हा तो चिंतेचा विषय होतो. इथे भारतातच नाही तर जगात उजव्या, कडव्या विचारांनी भारलेल्या तरुण पिढीची संख्या वाढू लागली आहे, हे चिंताजनक आहे.
आधी पण उजवे, कट्टर लोक होते. नाही असे नाही, पण तरुण वर्ग तुलनेत कमी असायचा, आता चित्र वेगळे आहे. यातील विरोधाभास असा की हे लोक स्वतः मात्र पुढारलेल्या किंवा आधुनिक गोष्टी करतात. उर्वरित जनतेने सनातन वागावे ही त्यांची अपेक्षा.
तरुण पिढीला हुकूमशाही भावते असे आजकाल वाटू लागले आहे. एकेकाळी जर्मनीत हिटलरला प्रबळ पाठिंबा तरुण वर्ग आणि स्त्रिया यांचा होता. भारतात हा तरुण वर्ग प्रामुख्याने महानगर आणि निमशहरी, इतकेच नाही तर ग्रामीण भागातील पण आहे. इथेच ग्यानाबाची मेख आढळेल. असे का? हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा आहे. अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक संबंध त्यात येतात.
विषय सुरू झाला होता बदाम दुधापासून… ब्रेड मिळत नाही तर केक खा ही मनोवृत्ती इथे असते. व्हेज चिकन किंवा मॉक मीट, हा त्यातील एक उपप्रकार. मला वाटते तुम्ही ठरवून व्हेगन की काय झालात, मग तुम्हाला का हवेय बदाम दूध आणि
मॉक मीट? जुन्या काळात लोक ठणठणीत शाकाहारी किंवा मांसाहारी असायचे, आजकाल हे डोक्याला नवा शॉट होऊन राहिले आहे.
आपण हे नियम पाळतो म्हणजे आपण फार क्रांतिकारी वागतो अशी या लोकांची धारणा असते. अनेक वर्षे आधी एका माणसाने आपल्या लाखो देशवासीयांना पूर्ण कपडे मिळत नाहीत हे बघून फक्त धोतर आणि पंचा इतकेच कपडे वापरायचा निर्णय घेतला होता. त्याला क्रांतिकारक निर्णय म्हणतात, तुमचे निर्णय फारतर वांतिकारक असतील लेको.
ते व्हेगन की काय तुम्ही असाल, तर मग पर्याय का हवेत? दूध, मांस, मासे, अंडी सरळ बंद करा. त्यांच्यासारख्या चवीचे शाकाहारी पर्याय कशाला हवेत? शाकाहारी पदार्थ चविष्ट नसतात का? त्यांची सवय लावा की. सोयाबीनचं मांस बनवून का खाताय? कशाला हवेत सेम टु सेम मांसाहारी चवीचे कबाब? किंवा अश्वत्थाम्याच्या आईने जसे पीठ कालवून दूध म्हणून दिले होते तसे करा, पण ते नाही. उगा काहीतरी एखादा झेंडा घायचा आणि नाचायचे…
मिलेनियल आणि त्यापुढची जनरेशन झेड (गुगल करा) हे लोक सध्या डोक्याला शॉट झालेत. आपण सर्वज्ञानी आणि आतापर्यंत जे घडते ते चूक असे ठरवून ही कार्टी आमच्यासारख्या लोकांना अहमहमिकेने सुधारायला सरसावत असतात. यांचे काय करायचे हे मला अजून उमगले नाहीये!!!
डोक्यालाच नाही, तर पूर्ण मज्जासंस्थेलाच शॉट झालाय…