गुजरातमध्ये झालेल्या २००२च्या हिंदू-मुस्लिम दंग्याच्या नंतरच्या काळात भारतातील बदललेली आणि बिघडलेली सामाजिक, धार्मिक, राजकीय परिस्थिती आपण बघत आहोत, त्यातून प्रत्यक्षात जात आहोत. गेल्या नऊ वर्षांत सामाजिक, धार्मिक, जातीजातींमधील पोत किती बिघडला आहे, हे जगाला वेगळं सांगण्याची गरज नाही! गुजरातमध्ये मुस्लिमांना ‘धडा’ शिकवला जात असतानाच गुजरातमधील डांग आणि लगतच्या जिल्ह्यातील ख्रिस्ती आदिवासींची ‘घरवापसी’ करण्याची मोहीम राबविण्यात आली. त्या भागातील चर्च ओस पाडण्यात आले. गुजरातमधील आदिवासी घरवापसीच्या वरवंट्यासमोर हतबल होते. त्यानंतर मैदानी प्रदेशातील आदिवासीबहुल भागांमध्ये तोच ‘प्रयोग’ राबविण्यात आला. बाहेरचे आणि स्थानिक ख्रिश्चन धर्मगुरू, ख्रिश्चन झालेल्या आदिवासी आणि अन्य लोकांना ठरवून ‘लक्ष्य’ करण्यात आले. कधी कायदा पुढे करून तर कधी साम, दंड भेदाचा वापर करण्यात आला. सोबत प्रचारक आणि माध्यमं येत गेली.
गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांपासून या ‘घरवापसी’च्या मोहिमेला भारतात फक्त यश येत नव्हते ते ईशान्येकडील राज्यांमध्ये! जिथे थोडेबहुत हिंदू वा बौद्ध असलेली गावं, वस्त्या होत्या, अशा प्रदेशांच्या आडून पूर्णवेळ प्रचार केला जात होता, केला जात आहे. पण केंद्रात आणि तिकडच्या राज्यांत गेल्या नऊ वर्षांत पूर्ण बहुमताची किंवा भागीदारीत सरकारं असतानाही ‘एक देश, एक धर्म’ याची सुरुवात होताना दिसत नसल्याची ‘सुप्त पण तीव्र’ अस्वस्थताही दिसत होती आणि आता ती खदखदून वर येते आहे.
आसाम हे ईशान्येकडील सर्वात मोठे राज्य आहे आणि बाकीची सहा राज्ये आसाममधूनच निर्माण झालेली आहेत. आसाममध्येही अप्पर आसाम आणि लोअर आसाम अशा दोन वेगवेगळ्या संस्कृती नांदतात. शिवाय तिथे बंगाली भाषक, काही प्रमाणात हिंदी भाषक, बंगाली भाषक मुसलमान आणि असमिया भाषक हिंदू आणि मुस्लिम आहेत. ब्रह्मपुत्राच्या खोर्यातील लोकांच्या अस्मितांची प्राथमिकता ही अगोदर असमिया आहे आणि मग धार्मिक आहे. आसाममध्ये हिंदू-मुस्लिम संबंध तणावाचे व्हावेत, यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याचे आपण पाहतो. गेल्या नऊ वर्षांत एनआरसी अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचा ‘खेळ’ खेळून झाला. पण त्या खेळाच्या सापळ्यात हिंदूसुद्धा मोठ्या प्रमाणावर अडकत असल्याचे बघून सध्या एनआरसीवर चर्चा केली जात नाही.
अरुणाचल प्रदेशाचे चार जिल्हे ख्रिश्चनबहुल आहेत. मेघालय, मिझोराम, नागालँड आणि मणिपूरच्या डोंगररांगांच्या प्रदेशातील बहुतेक सगळ्या जमातींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला आहे, त्या प्रदेशात अपवादानेही हिंदूधर्मीय नाहीत. शिवाय त्यांच्यात कितीही ‘सेवाभावी वृत्तीने’ काम केले तरी ते त्यांचे ‘स्वत्व’ आणि वरून धर्म सोडायला तयार नाहीत, त्यांना ‘मुख्य (धर्माच्या) प्रवाहात’ आणण्याची शक्यता वाटत नसल्याच्या उद्वेगातून उर्वरित देशात ज्याप्रमाणे मुस्लिमांच्या बाबतीत प्रचार मोहीम राबविली जातेय, त्याचप्रमाणे तिथे ख्रिश्चनांच्या बाबतीत प्रचारमोहीम राबविली जात आहे.
याचाच एक भाग म्हणून सोशल मीडियातून मोदीभक्त मंडळी मणिपूरच्या हिंसाचाराची कारणमीमांसा करण्यासाठी काही मेसेज फिरवत आहेत. ते आपल्यापैकी बहुतेकांच्या ग्रूप्सवर आलेच असतील. या मेसेजमध्ये म्हटलंय की अत्यंत हुशारीने मोदी सरकारने मणिपूरमधील मूळ भारतीयांना हक्क देण्यास सुरुवात केली आहे, या गोष्टीचा विरोधकांना राग आला आहे. मणिपूर गेली ७० वर्षे काँग्रेसच्या ताब्यात होता. मणिपूर हिंसाचारावर सर्व विरोधी पक्ष मोदी सरकारची बदनामी करत आहेत. मणिपूरचा हिंसाचार भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सामान्य लोकांना संभ्रमित करणारे हे संदेश पसरवणारे लोक मूळ विषयाला बगल देऊन ‘प्रोपोगंडा’ करून लोकात गोंधळ उडवून देण्यात माहीर आहेत. त्यात त्यांना अडचणीच्या असणार्या बाबी ते ‘खुबीने’ सांगत नाहीत. उदा. मैतेई हे आदिवासी आहेत, हे सांगताना ते म्हणतात की, ‘मणिपूरचे मूळ रहिवासी मैतेई आदिवासी आहेत. स्वातंत्र्यापूर्वी मणिपूरच्या राजांमध्ये भयंकर युद्धे झाली, अनेक दुर्बल मैतेई राजांनी शेजारील म्यानमारमधून मोठ्या संख्येने कुकी आणि रोहिंग्या हल्लेखोरांना युद्धात आपल्या सैन्यात बोलावले आणि परदेशी रोहिंग्या आणि कुकी यांच्यात मिसळून लढले.’ हे फॉरवर्ड पाठवणारे ही गोष्ट लपवून ठेवतात की, माणिपूरचे मैतेईच तिथले मूळ रहिवासी असतील, तर त्यांचा, कुकी, नागा आणि अन्य तीसेक जमातींचा ‘वांशिक गट’ एकच अर्थात ‘मंगोल’ आहे. माणिपूरचे मैतेई जर आदिवासी आहेत, तर मग ते हिंदूधर्मीय कसे? आदिवासी हिंदू नसतात. मैतेई आदिवासी असतील तर मैतेईमध्ये जाती कुठून आल्या? आदिवासी मैतेईच्यामध्ये बामोन (ब्राह्मण) सर्वश्रेष्ठ कसे? जगभरातील इतर आदिवासी जमातींमध्ये जाती व्यवस्था आणि वर्णव्यवस्था नाही, मग आदिवासी असलेल्या एकट्या मैतेईच्या मध्ये वर्ण आणि जातीव्यवस्था कुठून आली? मैतेईमध्ये सवर्ण, ओबीसी, दलित कसे? मणिपूरमध्ये जातींवर आधारित आरक्षण कसे? मैतेईमधील अनेक जाती ख्रिश्चन झालेल्या आहेत, तर त्यांना आरक्षण कोणत्या आधारावर दिले जाते? पांगल म्हटले जाणारे मुस्लिम मैतेईच्यामध्ये कुठून आले? सनामाही म्हणून वेगळी ओळख जपलेले जे निसर्गपूजक मैतेई आहेत, त्यांचं काय? म्यानमारमध्ये जे मैतेई आहेत, त्यांना तिकडे ‘कथे’ म्हणतात आणि बांगलादेशात जे मैतेई आहेत, त्यांना ‘बामोन’ किंवा ‘कथे पोन्ना’ म्हणतात. त्यांना भविष्यात माणिपूरमध्ये आणण्याचा काही ‘प्लॅन’ आहे का?
मणिपुरी म्हणजेच मैतेई आणि मैतेई म्हणजेच मणिपुरी अशी मैतेईची स्वतःची ओळख आहे. शिवाय त्यांची भाषा ही मणिपुरी वा मैतेई म्हणून ओळखली जाते. या भाषेला स्वतःची लिपी असून ती केंद्राच्या सूचीत समाविष्ट आहे, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या नोकर्यांत त्याचा सर्वाधिक फायदा मैतेईना झालेला आहे की नाही? माणिपूर राज्यातील मैतेईतर आदिवासींची ओळख ही मणिपुरी अशी नसते. ती मणिपुरी कुकी, नागा वा अन्य अशी असते. ती का?
या संदेशात स्वातंत्र्यपूर्व काळात असे म्हटले, ते भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात की माणिपूरच्या स्वातंत्र्यपूर्व काळात? भारत स्वतंत्र झाला, तेव्हा मणिपूर हे स्वतंत्र संस्थान होते, जे १५ ऑक्टोबर १९४९ साली भारतात विलीन झाले. १९५६ सालापर्यंत मणिपूर हा केंद्रशासित प्रदेश होता. १९७२ साली मणिपूरला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. दरम्यानच्या काळात मणिपूर भारतात विलीन करण्यात येऊ नये, मणिपूरचे ‘स्वतंत्र अस्तित्व’ राखले जावे, यासाठी मणिपूर राज्यातील अनेक सशस्त्र गट कार्यरत होते की नव्हते? त्यात मैतेई होते की नव्हते? मणिपूरमध्ये आजही जे सशस्त्र गट कार्यरत आहेत, त्यात मैतेईचे गट नाहीत का?
मणिपुरी राजघराण्यात राज्यावर येण्यासाठी आपापसात दगाबाजी, हत्या आणि खून झाले की नाही? कौटुंबिक रक्तपात झाला की नाही? मणिपूरमध्ये किती संस्थाने वा राजे होते? ब्रम्हदेशाच्या राजाशी झालेल्या लढाईत मणिपुरी राजाच्या बाजूने एकनिष्ठपणे बंगाली वंशाचे मुस्लिम लढले की नाही? कुणाच्या विरुद्ध लढण्यासाठी कोणत्या मणिपुरी राजांनी म्यानमारमधल्या कुकी आणि रोहिंग्या मुसलमानांना आणले होते? बाहेरून बोलावून आणलेल्या कुकी आणि रोहिंग्याच्यात ‘मिसळून’ कोणते ‘दुर्बल’ मैतेई राजे कुणाविरुद्ध लढले? माणिपूरमधील ‘दुर्बळ’ मैतेई राजांनी कुकी आणि रोहिंग्यांना आमंत्रण देऊन मणिपूरमध्ये आणले होते, तर रोहिंग्या तेवढेच मायदेशी ब्रम्हदेशात परत गेले आणि कुकी तेवढे का मागे राहिले? तेव्हा मणिपूरच्या अधिपत्याखाली असलेल्या उत्तरेकडील डोंगररांगांमध्ये ‘नागा’ आणि अन्य जमाती अस्तित्वात नव्हत्या का? नागा, कुकी आणि डोंगररांगांमध्ये राहणार्या इतर जमाती मणिपूर संस्थानाची ‘रयत’ होती, ती का? अगदी सुरुवातीच्या नकाशांमध्ये इंफाळ खोर्यासह डोंगराळ भाग हा मणिपुरी संस्थानचा भाग दाखविलेला आहे.
इ. स. १८२४चं इंग्रज-बर्मा युद्ध झालं तेव्हा मणिपूरचे राजे काय करीत होते? १८३५ साली मणिपूरमध्ये ‘ब्रिटिश रेसिडेंसी’ स्थापन का झाली असावी?
मराठी प्रोपोगंडावीर पुढे म्हणतात की ‘हळूहळू कुकी आक्रमणकर्त्यांनी मणिपूरमध्ये निवासस्थान बनवून कुटुंबे वाढवण्यास सुरुवात केली. लवकरच कुकी लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. अत्यंत आक्रमक कुक्यांनी मणिपूरच्या उंच टेकड्या काबीज केल्या आणि मैती आदिवासींना तेथून पळवून लावले. मैती आदिवासी पळून जाऊन मणिपूरच्या मैदानी प्रदेशात राहू लागले. परदेशी कुकी आणि रोहिंग्यांनी मणिपूरच्या उंच टेकड्यांवर अफूची शेती सुरू केली. दुर्बळ मैतेई राजाने स्वतःच्या फायद्यासाठी आमंत्रित केलेले कुकी ‘आक्रमणकारी’ कसे काय होऊ शकतात? कुकींनी मणिपूर हे आपले निवासस्थान बनवून कुटुंबे वाढवण्यास सुरुवात केली, त्यांनी झटपट लोकसंख्या वाढविण्यासाठी कोणती प्रयोगशाळा उभारली असेल? कोणते उपाय अवलंबिले असतील? अत्यंत आक्रमक कुकी त्यांच्या हाती आलेला दुर्बळ राजा असाच सोडून देऊन, सुपीक असं इंफाळ खोरं सोडून भिकेचे डोहाळे लागल्यासारखे डोंगराळ भागात का गेले असतील? डोंगराळ भागात राहणार्या मैतेई ‘आदिवासींना’ कुकींनी पळवून सुपीक प्रदेशात पिटाळले, त्यांना हिंदू धर्मात ढकलले आणि स्वतः मात्र नापीक डोंगरावर कब्जा केला! वा! काय अफाट लॉजिक आहे! आदिवासींना स्वतःचे हित कळत नाही; हेच यावरून सिद्ध होते. बरं मग कुक्यांनी लोकसंख्या वाढविण्याचे इतके ‘प्रयत्न’ करून सुद्धा त्यांची लोकसंख्या मैतेईपेक्षा कमी का असावी? की मैतेई पण जोरात ‘काम’ करीत होते? कुक्यांनी डोंगररांगांवर ‘फक्त अफूची शेती’ करायला सुरुवात केली, तो कालखंड कोणता असेल? आणि अफूचे ग्राहक कोणते देश, राज्य, जनसमूह असतील? कुकी अफू खाऊन जगत असतील, तर ते बायका-पोरांसाठी ‘झूम’ शेतीसारखी अनुत्पादक अवघड शेती का करीत होते? अफूची झाडे नसतात हेही ‘अपप्रचारकांना’ माहीत नसावे आणि मादक पदार्थ सेवनाची समस्या फक्त कुकींच्या प्रदेशापुरती मर्यादित आहे का?
‘अपप्रचारक’ म्हणतात की, ‘मणिपूर चीन आणि म्यानमारच्या सीमेला लागून आहे. चीनने मणिपूरवर डोळा ठेऊन भारतविरोधी पक्षांना मदत करण्यास सुरुवात केली, पाकिस्ताननेही म्यानमारच्या रोहिंग्या मुस्लिमांच्या माध्यमातून मणिपूरमध्ये घुसखोरी सुरू केली आहे.’ अपप्रचारकांचा शालेय भूगोल आणि त्यासोबत इतिहास विषयही ‘कच्चा’ असावा. कारण त्यांना मणिपूरच्या आंतरराष्ट्रीय सीमेलगत फक्त म्य्ाानमार हा एकमेव देश आहे, हेच माहीत नाही. चीनची सीमा मणिपूरला लागत असेल, तर तसा नकाशा द्यायला हवा होता, म्हणजे ‘साधार’ पुरावा ‘याची डोळा’ बघता आला असता! चीनचा डोळा एकट्या मणिपूरवर कसा असेल; तो तर संपूर्ण उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांवर असेल. चीन इतका ‘स्पेसिफिक’ कधीपासून झाला? राहिली पाकिस्तानची बात, रोहिंग्याना पाकिस्तान जास्तीत जास्त आर्थिक वा शस्त्रांची मदत करू शकतो, तो थेट मदत कशी करेल? मग बांगला देशाचे काय करायचे? ज्याची पूर्व आणि ईशान्येकडील आंतरराष्ट्रीय सीमा थेट भारताला भिडते!
अपप्रचारक मिशनर्यांबद्दल म्हणतात की, ‘सर्वात मोठा कट ख्रिश्चन मिशनर्यांनी रचला. मिशनर्यांनी मणिपूरच्या मागासलेल्या आदिवासी भागात दोन हजारांहून अधिक चर्च बांधले आणि ख्रिश्चन मिशनर्यांनी वेगाने धर्मांतराला सुरुवात केली. ज्यामध्ये बहुतांश मैती आदिवासींचे ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यात आले.’ अपप्रचारक एकीकडे मैतेई हिंदू असल्याचे न सांगता ‘मूळ भारतीय’ असल्याचे सांगतात आणि दुसरीकडे म्हणतात की, मैतेईंना एका कटाद्वारे ख्रिस्ती केले!
अपप्रचारक मंडळींना काही प्रश्न विचारावेसे वाटतात आणि त्यांच्या सामान्यज्ञानात थोडी भर घालावीशी वाटते ती ही की अमेरिकन बाप्टिस्ट ख्रिश्चन मिशनरी मणिपूरमध्ये काल-परवा आलेत का? ईशान्येकडील राज्यांतील आदिवासींना ‘सिव्हीलईज्ड’ करण्यासाठी आणि सेवाभावी काम करण्यासाठी बाप्टिस्ट मिशनर्यांना ब्रिटिश सरकारने परवानगी दिली होती, पण त्याला सरकारचा पाठिंबा नव्हता. माणिपूरमध्ये १८९४ साली बाप्टिस्ट मिशनरी विल्यम पेटिग्यू आले, राजाच्या अनुमतीने मणिपूरमध्ये त्यांनी १८८६ साली बाप्टिस्ट मिशनची स्थापना केली, ती थंकूल नागांच्या प्रदेशात, मैतेईच्या नव्हे! त्यांनी सुरुवातीला तिथं चर्चेस बांधली नाहीत (तसेही खरे सेवाभावी ख्रिश्चन मिशनरी कधीही अगोदर चर्च बांधत नाहीत). त्यांनी स्थानिक नागांच्या आणि इतर जमातींच्या भाषा अवगत केल्या, शाळा सुरू केल्या, पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम ठरविला, स्थानिकांच्या भाषेला लिपी आणि व्याकरण दिलं, वैद्यकीय सेवा सुरू केल्या. माणिपूरमध्ये थंकुल नागांच्या प्रदेशात १९०१ साली सोखर इथं पाहिलं फ्युन्गयो बाप्टिस्ट चर्च उभं राहिलं. चर्च ज्या शाळा चालवीत असे, त्या शाळेतील विद्यार्थ्यांना तत्कालीन मणिपूर सरकारकडून, ज्याचे राजे हिंदू होते, ‘तीन रुपयांची शिष्यवृत्ती’ दिली जात असे. ती का दिली जात असावी? १८९३ साली मैतेई असलेली पहिली महिला बाप्टिस्ट ख्रिश्चन झाली ती निंगोल काबोक्लेई. ती मणिपूरमध्ये नव्हे, तर आजच्या बांगला देशात असलेल्या सिल्हटमध्ये. बाप्टिस्ट मिशनर्यांनी एक कट रचून एका दिवसात दोन हजार चर्चेस बांधली असतील, ती काय रातोरात? मणिपूरमध्ये आलेल्या मिशनर्यांनी सेवाभावी काम काय फक्त कुक्यांमध्ये केलं का? त्यांनी नागा आणि अन्य आदिवासींच्या भागातच नव्हे, तर ईशान्येकडील बहुतेक सगळ्या आदिवासींमध्ये सेवाभावी काम केलेलं आहे. मणिपूरमधील फक्त कुकीच नव्हे, तर नागा आणि अन्य जमातींसाठी पण त्याच प्रकारचे काम सुरू होते, जे कुकीबहुल भागात सुरू होते, तेच नागा आणि अन्य जमातींच्या भागातही सुरू होते.
तेराव्या-चौदाव्या शतकात माणिपूरमध्ये प्रामुख्याने बंगाल प्रांतातून जे ब्राह्मण गेले होते, त्यांनी मैतेईंमध्ये कोणते सामाजिक कार्य केले, जसे ख्रिश्चन मिशनर्यांनी केले? ईशान्येकडील राज्यांत मिशनर्यांनी आदिवासींची सक्तीने धर्मांतरे केल्याची काही उदाहरणे असतील तर तीही द्यावीत. ईशान्येकडील राज्यांतील आदिवासी जमातींसमोर शतकानुशतके धर्म स्वीकारण्यासाठी बौद्ध आणि वैष्णव वा हिंदू असे पर्याय होते, तरीही त्यांनी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला असावा? महत्वाची गोष्ट म्हणजे मैतेईंमधील उच्चवर्णीय लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला नाही, तर मैतेईंमधील खालच्या जातींतील लोकांनी स्वीकारलेला आहे! एकवेळ आदिवासी जमातींचे समजून घेता येईल, पण ‘मूळ भारतीय’ मैतेईंमधील खालच्या जातींतील लोकांनी ख्रिस्ती धर्मात का प्रवेश केला असेल?
अपप्रचारकांची खरी गोची अशी झालेली आहे की, ते ईशान्येकडील राज्यांमध्ये ‘सामाजिक सेवा’ करण्यासाठी अंमळ उशिरा गेले. तिकडे ख्रिस्ती धर्माचा प्रसार होऊन आता शंभर ते दीडशे वर्षांचा कालखंड उलटला आहे. चौथ्या-पाचव्या पिढीत ख्रिस्ती धर्म चांगला रुजला आहे. परदेशी मिशनरी स्थानिकांकडे धर्माची सूत्रं सोपवून कधीच मायदेशी गेलेले आहेत; त्यामुळे अपप्रचारकांना मिशनर्यांच्या नावाने ‘पांचजन्य’ करता येत नाही. अपप्रचारक म्हणतात की (हे पण त्यांच्याच शब्दांत) ‘१९८१मध्ये झालेल्या भीषण हिंसाचारात मणिपूर सतत जळत होते. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. १० हजारांहून अधिक मैती आदिवासी मारले गेले, त्यानंतर इंदिरा गांधी जागे झाल्या आणि सैन्य पाठवण्यात आले आणि शांतता झाली. शांतता करारात मैती जमिनीवर राहतील आणि कुकी वरच्या टेकड्यांवर राहतील, असे ठरले होते, त्यामुळे शांतता झाली. ज्यात मूळ मैतींना खूप त्रास सहन करावा लागला. हळूहळू कुकी, रोहिंग्या आणि नागा समुदायांनी मणिपूरच्या उंच टेकड्यांमध्ये अफूची मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू केली. हजारो शेतांत अफूची शेती सुरू झाली, कोट्यवधी रुपयांचा व्यापार सुरू झाला, त्यामुळे ड्रग्ज माफिया आणि दहशतवादी संघटना सक्रिय झाल्या आणि मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा पुरवठा सुरू झाला.’
अपप्रचारक हे सांगत नाहीत की, मणिपूरमध्ये भारतात सामील होण्याला विरोध करणारे सशस्त्र गट कार्यरत होते. ते गट सरकारी आस्थापना आणि भारतीय निमलष्करी दलांवर आणि भारतीय लष्करांवर हल्ले करीत असत. त्या सशस्त्र गटांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी भारत सरकारने १९८० साली मणिपूर राज्य ‘अशांत प्रदेश’ म्हणून घोषित करून तिथं सैन्यदलांना विशेष अधिकार देणारा अफ्स्पा हा वादग्रस्त कायदा लागू केला. तरीही माणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकली नाही, कारण गावांच्या सीमा आणि जमिनीच्या मालकीवरून नागा आणि कुकी यांच्यात सशस्त्र संघर्ष सुरू होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी अचानक जाग्या झाल्या असतील असे वाटत नाही. कारण सशस्त्र गट विरुद्ध सरकारी आस्थापना आणि भारतीय लष्करी दले असा सशस्त्र संघर्ष होताच, त्यात कुकी आणि नागा यांच्या संघर्षाची भर पडल्याने रक्तपात वाढला. म्हणून इंदिरा गांधीनी ‘अफस्पा’ सारखी पावलं उचलली. त्या संघर्षात दहा हजार मैतेई मारले गेल्याचे कोणते पुरावे आहेत? मारले गेल्यात फक्त मैतेईच होते आणि अन्य जमातींचे लोक मारले गेले नाहीत? इंदिरा गांधी यांनी केलेला तो करार कुठं आहे, ज्यात म्हटलंय की, ‘कुकी डोंगररांगांवर राहतील आणि मैतेई मैदानी प्रदेशात’? मुळात मैतेई हे शतकानुशतके इंफाळ नदीच्या सुपीक प्रदेशात राहात आलेले आहेत. इंफाळ खोर्यात मैतेई वंशाच्या राजांचे राज्य होते. ‘नदीच्या काठी संस्कृती विकास पावते!’ हे गृहीतक मणिपुरी अर्थात मैतेईंनाही लागू पडते. तीसपेक्षा जास्त जमाती असलेल्या राज्यातील किती जमाती इंफाळ खोर्यात राहात होत्या? वा मैतेई संस्कृतीने जसे मुस्लिम सामावून घेतले तशा सामावून घेतल्या? कुकी आणि अन्य जमाती या माणिपूरच्या दक्षिणेकडे राहतात, ते सरसकट सगळे अफूच्या व्यवसायात आहेत आणि त्यातून त्यांच्या वाढलेल्या ‘माफियागिरी’ वर आत्ताचे सरकार लगाम घालीत असल्याने कुकींमधील ‘असंतोष’ वाढला असल्याचा निष्कर्ष कोणत्या आधारावर काढला जात आहे? अपप्रचारकांकडून मणिपूरच्या उत्तरेला असणार्या सात नागा जमाती आणि मारम यांची सद्यस्थितीत दखल का घेतली जात नाही? मुळात हिमालयाच्या डोंगररांगांवर मोठ्या प्रमाणावर कोणतीही शेती करणे शक्य आहे का?
अपप्रचारक म्हणतात,’ २००८मध्ये पुन्हा एकदा भीषण गृहयुद्ध सुरू झाले, त्यानंतर सोनिया गांधींच्या सूचनेवरून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने कुकी आणि धर्मांतरित ख्रिश्चनांसह मैतेई आदिवासींशी करार केला आणि अफूच्या शेतीला अधिकृत मान्यता देऊन. मणिपूरच्या उंच टेकड्यांमध्ये ‘पोलिसांनी कारवाई न करण्याचे आश्वासन दिले’. त्यानंतर मणिपूरमधून संपूर्ण भारतात ड्रग्ज वेगाने पाठवले जाऊ लागले. मणिपूर हे अंमली पदार्थांचा सुवर्ण त्रिकोण बनले आहे. चीनने अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि म्यानमार या देशांना झपाट्याने आर्थिक मदत करून मणिपूरमधून पिकवलेले अफू भारतातील इतर राज्यांमध्ये पाठवले आणि पंजाबसारख्या राज्यांना मादक पदार्थ पाठवायला सुरुवात केली.’
खरा मुद्दा असा आहे की, २२ ऑगस्ट २००८ साली झालेला हा करार मैतेईंशी झालेला करार नसून तो मणिपूरमधील सुमारे तीस सशस्त्र गटांपैकी पंचवीस गट, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात झालेला शांतता करार आहे. त्या करारावर पंचवीस सशस्त्र गटांच्या प्रमुखांच्या स्वाक्षर्या आहेत. तेव्हापासून मणिपूरमध्ये एसओओ म्हणजे सस्पेन्शन ऑफ ऑपरेशनची सुरुवात झाली. भारतातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये सरकारच्या परवानगीनेच अफूची शेती केली जाते. माणिपूरमध्ये त्याच प्रकारे सरकारच्या संमतीने अफूची कायदेशीर शेती केली जात असेल, तर त्यांच्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय? म्हणजे मैदानी प्रदेशातील राज्यांतील काही हिंदू शेतकरी अफूची वैध शेती करतात ते कायदेशीर आणि माणिपूरमधील ख्रिश्चन आदिवासी सरकारशी झालेल्या तथाकथित कारारानुसार अफूची शेती करतात ती बेकायदेशीर?
अफू-अफू म्हणत असतानाच अपप्रचारक म्यानमारमधून येणारे स्थलांतरित कुकी आणि रोहिंग्याचा बागुलबुवा दाखवीत आहेत. जर म्यानमारमधून इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित येत आहेत, तर भारत-म्यानमारच्या सीमेवरचे भारतीय सैनिक त्यांना का अडवत नाहीत? आंतरराष्ट्रीय सीमेवरील कायदा आणि सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी ही केंद्रीय गृह मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची असते ना?
मैतेईंचा समावेश थेट अनुसूचित जमातींमध्ये करायचा असेल, तर अगोदर मैतेई आदिवासी होते हे ‘सिद्ध’ करावे लागेल. ते ऐतिहासिक, जमातीय अभ्यासावरून सिद्ध करता येणे शक्य नाही, याची जाणीव असल्याने हा सगळा थयथयाट चाललेला आहे. समजा मैतेई ‘वैष्णव’ नसते तर किंवा कुकी ‘हिंदू’ झाले तर? मणिपूरमधील सगळ्या आदिम जमाती शतकानुशतके डोंगररांगांवर राहात आलेल्या आहेत, हे वास्तव कसं नाकारता येईल? सुपीक असलेल्या इंफाळ नदीच्या मैदानी खोर्यात मैतेई राजघराण्याच्या आधिपत्याखाली राहात आलेले आहेत आणि त्याचे त्यांना लाभ मिळालेले आहेत. माणिपूरच्या आधिपत्याखाली असलेल्या डोंगररांगांवर राहणार्या आदिवासींना इंफाळच्या खोर्यात कोणते स्थान होते? इंफाळचे खोरे मानवी वस्त्यांसाठी कमी पडत आहे, हे वास्तव आहे. भारतीय राज्यघटनेने मणिपूरला ३७१(सी) कलमानुसार विशेष दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यानुसार आदिवासी मैतेईच्या प्रदेशात स्थावर मालमत्ता खरेदी करू शकतात आणि गेल्या काही वर्षांत आदिवासींची आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे त्यांनी तशी खरेदी केलेली आहे. आदिवासींना आपल्या जमिनी विकणारे मैतेईच असतील ना? हे ही खरं आहे की, आदिवासींच्या भागात बिगरआदिवासी स्थावर मालमत्ता खरेदी करू शकत नाहीत. मग त्यासाठी मैतेईनी आम्हीही ‘आदिवासी होतो म्हणून आम्हाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला पाहिजे’ या मागणीचा ‘शॉर्टकट’ काढला. मैतेई आदिवासी भागातील जमिनी विकत मागत असते, तर एकवेळ समजू शकले असते, पण त्यांचा ‘आदिवासी’ होण्यामागे दुहेरी हेतू आहे. त्यांना आदिवासी झाल्यावर ३७१ (सी) या कायद्याचं ‘कवच’ही हवं आहे. आदिवासी होऊन जमिनी घेतल्यावर त्या जमिनी मणिपूर राज्याबाहेरील नागरिकांनी घेऊ नयेत त्यापासून त्यांना संरक्षणही हवंय. म्हणून मैतेई किंवा त्यांच्या वतीने सरसावलेले अपप्रचारक काश्मीरला लागू असलेले कलम ३७० जसे रद्द केले तसे कलम ३७१(सी) रद्द करण्याबद्दल ब्र काढत नाहीत. अत्यंत ‘आवश्यक हिंसाचाराची’ झळ फक्त आदिवासींना बसत नसून हिंदूंनाही बसत आहे, त्याचे काय? मणिपूरमधले वैष्णव तेवढेच मूळ भारतीय असतील तर मैतेई ख्रिश्चनांचे काय?