अजित पवार आणि भाजपचा म्होतूर झाला. एकनाथ शिंदे लवकरच (अ)नाथ होणार. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ‘नरो वा कुंजरो वा’ अशा नटसम्राटाच्या भूमिकेत महाराष्ट्राच्या जनतेसमोर भुलभुलैय्या उभा करीत आहेत. २१ जून २०२२ ते जून २०२३ या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. शिंदे आणि मिंधे यांच्या सुरत पलायनानंतर तीन आठवड्यांत सत्तांतराचे तीन अंक पार पडले. शिंदे सरकारचे एक वर्ष संपले. वर्षश्राद्ध होताच दुतोंडी गांडुळ तीन तोंडी झाल्याने लवकरच दशक्रिया विधीही होईल. भाजपची साम, दाम, दंड, भेद ही कूटनीती कारणीभूत ठरली आहे. सुरुवातीला शिंदे-मिंधे गट कमकुवत ठेवणे व शिवसेना संपवणे हा एककलमी कार्यक्रम हे ‘उद्घाटन सरकार’ करीत होते. आता राष्ट्रवादीकडे नजर वळली आहे.
अजित पवार भाजपासोबत जाणार अशी चर्चा दोन महिन्यांपासून चालू होती. त्यांना गळाला लावून भाजपने शरद पवारांवर सूड उगवला आहे. शरदरावांच्या ५५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील सर्वात वाईट असा कालखंड आहे. या अभूतपूर्व पिछाहाटीच्या पार्श्वभूमीवर ‘चलो कर्हा ड’ची त्यांनी हाक दिली. कर्हारडनंतर ९ जुलैपासून महाआघाडीचा झंझावात महाराष्ट्रभर मार्गक्रमण करणार, अशी प्रसादचिन्हे दिसत आहेत.
मात्र या अतिबिकट प्रसंगी ‘महाराष्ट्रमन’ काय चिंतित आहे? काय आशा करीत आहे? काय स्वप्ने पाहात आहे? वडापाव खाऊन, पायाला भिंगरी लावून शिवसेना वाढवणारे शिवसैनिक, मनसैनिक दोन भावांच्या मीलनाची अपेक्षा करीत आहेत. उर्मिला मातोंडकरांनी ‘खुपते तेथे गुप्ते’ या कार्यक्रमात राज व उद्धव एकत्र आल्यास महाराष्ट्राचे कल्याण होईल असे उद्गार काढल्यावर टीव्ही पाहणार्या लाखो प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. हेच आहे महाराष्ट्रमन!
भाजपची चाल, ‘फोडा-तोडा’ नीती, प्रचंड आर्थिक ताकद आणि मागील नऊ वर्षांतील भाजपची ‘ऑपरेशन लोटस’ पाहिली. ‘ईडी’चा देशभरचा वरवंटा पाहता केवळ दोन भावांच्या आघाडीने भाजपच्या पराभवाचे वर्तुळ पूर्ण होणार नाही. प्रत्येक बूथवरील नव्हे तर प्रत्येक ‘पन्ना’चे भाजपचे बजेट चक्रावून टाकणार आहे. धर्म, जात, प्रांत यांचे पोलरायझेशन, अवाढव्य वचने, माध्यमांची हुजरेगिरी या सर्वांवर मात करून महाराष्ट्राला हा सामना जिंकायचा आहे. म्हणून व्यापक लोकशाही आघाडी उभारणे ही काळाची गरज आहे. भारताची घटना, लोकशाही, स्वायत्त संस्था, सेक्युलर भारताचे स्वप्न यांच्या रक्षणासाठी भाजपाचा पूर्ण पराभव होणे अत्यावश्यक आहे.
राहुल गांधी यांनी एक आशादायी विधान केले आहे. काँग्रेस व्यापक विचार करणार. प्रसंगी त्यागास तयार आहे. असे जाहीर अभिवचन त्यांनी दिले आहे. प्रत्येक राज्यात वेगवेगळे प्रश्न आहेत. वेगवेगळ्या राजकीय अस्मिता आहेत. त्यांना छेद न देता देशाचा विचार करणारी राजकारणी मंडळी देशभर पसरलेली आहेत. सर्व छटांचे काँग्रेस प्रवाह, थोडेफार मतभेद असणारे डावे पक्ष, प्रादेशिक अस्मिता जोपासणारे प्रादेशिक पक्ष यांनी निदान ‘एकास एक’ अशी भाजपशी लढणारी आघाडी करावी, असे ‘भारतीय जनमानस’ आहे.
ईशान्य भारतातील सेव्हन सिस्टरमध्ये प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचरण करणारे लोक आहेत. दक्षिण भारतात ‘द्रविड वंश’ प्रबळ आहे. पंजाबात शीख धर्माचे प्राबल्य आहे. २२ कोटी मुसलमान भारतात आहेत. ते मुख्यत: ‘काऊ बेल्ट’मध्ये राहतात. विविधतेने नटलेल्या व विविधतेत ‘एकता’ टिकवणार्या भारताचे भविष्यकालीन चित्र कसे असेल? कसे असावे? यासाठीही भाजपचा पराभव झाला पाहिजे.
धर्म, जात, प्रांत असा संकुचितवाद वाढविणार्या किंबहुना तेच भांडवल वापरणार्यांना अडविण्याची ही एक संधी आहे. ७५ वर्षांपासूनचा मानवतेला ललामभूत असलेला भारत टिकवण्याचे साधन म्हणून येणार्या निवडणुकांकडे पाहिले पाहिजे.
आजच्या महाराष्ट्राचे चित्र काय आहे? मुख्यमंत्री शिवसेनेचा, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादीचा आणि सरकार भाजपचे.
अशा वेळी भारताला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर येऊन पडली आहे. प्रबोधनकारांच्या स्वप्नातील महाराष्ट्राची घडी विस्कटता कामा नये. काँग्रेस, पवार साहेबांची राष्ट्रवादी, वंचित आघाडी, डावे पक्ष, अबू आझमी यांचा पक्ष, शेकाप यांची पुन्हा संयुक्त महाराष्ट्र समिती तयार व्हावी. १९५७ची पुनरावृत्ती व्हावी. एक महामंथन व्हावे अशी सह्याद्रीच्या सैनिकांची इच्छा आहे.
सामान्य भारतीयांच्या मनात राजकारणाविषयी निर्माण होत असलेली तिडीक, तुच्छता आणि अनास्था हे नुकसान भरून काढण्याचे एक महान कार्य, दीपस्तंभ बनून महाराष्ट्राने करावे. महाराष्ट्रातील पक्षप्रमुखांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करावी. जात, धर्म, भाषानिहाय असे भौगोलिक पोलरायझेशन देशाचे भविष्य बिघडवील. म्हणूनच व्यापक लोकशाही आघाडी स्थापन करणे काळाची गरज आहे.