(पंतोजींचा ऐतवारवाडा, दरबार ए खास. तिथे कारकून श्री ऐतोबा छप्पनझुरळे सिंहासन नि इतर आसनांवरच्या गाद्यागिरद्या एक करून भरभक्कम अंथरूण करून विष्णू अवतारात पहुडलेले. शेजारी एक शिपाई कोपभर चहा घेऊन, शक्य तितक्या झुरळांना चहापान करवित बसलेला… ऐतोबा कौतुक सोहळा न्याहाळताय.)
शिपाई : …तुम्ही टंचगंगेच्या खोर्यातील पंतोजींच्या विजयश्रीची कथा ऐकवणार होतात?
ऐतोबा : (लागलेली तंद्री भंगते) अँ?
शिपाई : टंचगंगा नि…
ऐतोबा : ते होय? तर टंचगंगेचं खोरं तसं मुख्य चार डोंगराच्या पायथ्याशी, तशा छोट्या-मोठ्या दोन-तीन गढ्या त्याच भागात.
शिपाई : पण तिथे अंमल कुणाचा होता?
ऐतोबा : बाकी तिन्ही डोंगरावर वसलेले तीन किल्ले. तिथे सत्ता वेगळ्या, तर गढ्यांवर सामंतशाह्या.
शिपाई : आणि पंतोजी? त्यांच्या पूर्वी त्या खोर्यात कुणी शूर गेलाच नव्हता का?
ऐतोबा : नाही, नाही. तेथील एक किल्ला पूर्वीच शाहच्या अंमलाखाली आणलेला.
शिपाई : मग खोरं ताब्यात घेऊन चौथाई, सरदेशमुखी वसूल करावयाला अडसर कसला?
ऐतोबा : ते तीन किल्ले नि तिथले किल्लेदार!
शिपाई : मग ज्यादा कुमक मागवून किल्ल्यांना सुरुंग लावून बुरुज उडवून द्यायचे की? ब्यादशाह तो खुश हो जाते?
ऐतोबा : बात दिल की थी!
शिपाई : काय? ब्यादशाह सलामत प्रेमात पडले?
ऐतोबा : छट्! पंतोजी!
शिपाई : काय सांगता?
ऐतोबा : हो तं! त्या मुलूखगिरीचा इतिहासच तसा होता. पूर्वीही कुणी राव तो प्रांत जिंकावयास गेलेले. ते खोरे जिंकून नि दोन राण्या मिळवून परत आलेले!
शिपाई : पण पंतोजी कुठल्या किल्ल्यावरील सुंदरीच्या प्रेमात पडलेले?
ऐतोबा : ते प्रथम प्रेमात पडले नाहीत, त्यांना पाडलं गेलं…
शिपाई : म्हणजे?
ऐतोबा : ब्यादशाहला पंतोजींचा मानस आधीच कळालेला, त्यामुळे त्यांनी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी एक किल्लेदारांशी सोयरिकेची बोलणी लावलेली, त्यातून खोरे जिंकण्याचा मनसुबा देखील पुरा होत होता…
शिपाई : पुढे?
ऐतोबा : पुढे काय? पंतोजी एके दिवशी भल्या पहाटे दुसर्याच किल्ल्याच्या किल्लेदार पुत्रीला पळवून घेऊन आलेले…
शिपाई : व्वा! मर्दा! काय डाव टाकला!!!
ऐतोबा : दगडाचा डाव? दिस उजडायच्या येळी ती पोर मेण्यासह पळून गेली.
शिपाई : असं घडलं काय नेमकं?
ऐतोबा : हा पंतोजी निव्वळ कंजूष. धांदरट. उतावीळ, अविवेकी!
शिपाई : मग खोरं जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले की नाही?
ऐतोबा : कसलं काय? मनसुबा फसल्यावर त्यांची मनस्थिती ढासळली. त्यात खोर्यातले तिन्ही किल्लेदार नि त्या लहान-सहान गढ्या मिळून एकत्रित मुकाबल्याला उभे ठाकले…
शिपाई : श्रीमंत रणशूर पंतोजी प्रतिकाराला वा प्रतिचढाईला पुढे गेले असतील निश्चित…? हो ना?
ऐतोबा : (आजूबाजूला पाहत) कुठे सांगू नका! हा पंतोजी डरपोक आहे. ब्यादशाहने कुमक पाठवली, गोलंदाज, तिरंदाज, तोफखाना सर्व काही पाठवलं. पण हा पळण्यावर ठाम.
शिपाई : पण अखेर विजयश्री त्यांनीच मिळवली ना?
ऐतोबा : कसलं काय? त्यानंतर अडीच एक वर्ष दस्तुरखुद्द शाहने अनेक सरदार-उमराव वेढ्याला पाठवले. पण तिन्ही किल्ले डगमगले नाही…
शिपाई : एवढा काळ पंतोजी करत काय होते मग?
ऐतोबा : वेषांतर करून पहिल्याच किल्ल्याच्या किल्लेदाराच्या पुत्रीला भेटावयास जात…
शिपाई : हे खोरं कुणी जिंकू शकलं की नाही?
ऐतोबा : अखेर एक दिवशी पहिल्या किल्ल्याची तटबंदी ढासळली, अर्थात सुभेदार कन्या बुरुजावरले स्वार घेऊन पंतोजींना सामील झाली, निशाण बदललं गेलं, फत्ते झाल्याची साखर वाटली गेली…
शिपाई : हा तर दगा! यात पंतोजी जिंकले कुठं?
ऐतोबा : असं कसं? त्या बरोबर इतरही गढ्या पडल्या. काहीक सामंतांनी आपापल्या कन्या ‘नजराण्यात’ दिल्या.
शिपाई : तरीही पट्टराणीचा मान पहिल्या सुभेदार कन्येलाच मिळाला असेल की!
ऐतोबा : आता जितक्या राणीवश्यात स्त्रिया त्या मान मागणारच, बरं प्रत्येकजणीचा दावा, त्यांच्यामुळेच मुलुख मिळाल्याचा.
शिपाई : त्यात काय? न्यायसभा भरवून सोक्षमोक्ष लावायचा की?
ऐतोबा : केलंही असतं पण…
शिपाई : पण काय?
ऐतोबा : त्या दुसर्या किल्ल्याच्या भीड चेपलेल्या सुभेदार पुत्रीने चौकीपहारे उठवून किल्ल्याचं दार उघडलं, स्वतःचं निशाण उतरवत बापाला कैद करायचा यत्न केलेला…
शिपाई : हे कधी घडलं?
ऐतोबा : एवढ्यात! ती कन्यका आपल्या सखींसह उजळ माथ्यानं सर्वांसमक्ष इथे आलीय…
शिपाई : मुलुखाचं राहु देत! पंतोजी काय करताय?
ऐतोबा : सकाळी ह्या पाच-पंचवीस कन्यकांसाठी चूल फुंकत होते, आता नदीवर लुगडी घेऊन गेलेत, थोड्या वेळाने ‘उज्ज्वल भविष्यासाठी’ ह्या गाद्यागिरद्या धुवायला नेतील…
शिपाई : थोडक्यात सुभेदार पंतोजींचा ‘रामा गडी’ झालाय तर…