सध्या देशात ‘आयपीएल’चा उत्सव बहरलाय आणि त्याचा वेध घेणारे क्रिकेटप्रेमी ‘फँटसी गेमिंग’मध्ये रमू लागले आहेत. त्यामुळे सामन्याच्या आधी संघरचना करण्यात अनेक नागरिक व्यग्र होतात. हे चित्र काही तसं आजचं नाही. गेल्या काही वर्षांत ‘फँटसी गेमिंग’चं गारूड आणि त्याद्वारे मिळणारी कायद्याच्या कक्षेतील रक्कम यातच त्याच्या यशाचं गणित दडलंय. याच ‘फँटसी गेमिंग’चा घेतलेला वेध…
– – –
सोन्याची अंडी देणारी कोंबडी, हात लावलं की सोनं होईल हा वरदहस्त असलेला मिडास राजा, कल्पवृक्ष अशी अनेक मिथकं सर्वश्रुत आहेत. अनेक दशकांपासून लॉटरी नावाचा सरकारमान्य जुगार देशात सुरू आहेच. तसा लॉटरीचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा. कालांतरानं या लॉटरीचेही वैविध्यपूर्ण अविष्कार पाहायला मिळाले. क्षुल्लक रकमेची गुंतवणूक करून अफाट श्रीमंतीचं स्वप्न गरीबांना दाखवणारा हा शौक आहे. या जुगारी वृत्तीची खेळाशी सांगड घालणारे डोकेबाजच म्हणायला हवेत.
कोणताही खेळ सर्वसामान्यांशी चटकन नाळ जोडतो. क्रिकेट तर देशातला धर्मच. १९८३पासून आलेली ही लाट गेली तीन दशकं अथकपणे देशातल्या अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. अनेक देशांत मान्यता असल्यामुळे क्रिकेटवर सट्टेबाजी म्हणजेच बेटिंग राजरोसपणे, अधिकृतपणे चालते. पण भारतात सट्टा खेळायला कायद्याची बंदी आहे. त्यामुळे बेटिंग तर घ्यायचं नाही, पण जुगारी वृत्तीलाही वाट मिळवून द्यायची, या कल्पनेतून सध्याच्या कायदेशीर व्यवस्थेतून मार्ग काढणारा एक नवा प्रयोग देशात राबवण्यात आला आणि अल्पावधीत लोकप्रियही झाला, तो म्हणजे फँटसी गेमिंग.
फँटसी गेमिंगचं मायाजाल
सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० हा क्रिकेटचा वार्षिक उत्सव देशात उत्साहानं साजरा होतो आहे. मधली काही वर्षं कोरोना साथीमुळे तो देशात मनसोक्त साजरा करता आला नव्हता. पण आता क्रिकेटरसिकांच्या उधाणाला कोणतंही बंधन नाही. अर्थात, मैदानावर जाऊन सामने पाहण्याचं भाग्य थोड्यांनाच लाभतं, ते स्वप्न पूर्ण न झालेले टीव्हीवर किंवा डिजिटल माध्यमांवर सामन्याचा आस्वाद घेतात. चर्चगेट-विरार लोकलच्या गर्दीतही गटातटात हा क्रिकेट आस्वाद पाहायला मिळतो. त्यावर हिरीरीने भाष्यही सुरू असतं. आपण कधी क्रिकेटची बॅट हातात धरली नसली, क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलेलं नसलं, सीझनचा बॉल हातात घेतलेला नसला तरी क्रिकेटमध्ये इथे सगळेच तज्ज्ञ असतात… राजकारण आणि सिनेमा या विषयांत असतात तसेच. कोणता खेळाडू खेळायला हवा होता, कोणाचं काय चुकलं इथपासून ते आता इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कोण उतरणार, याबाबतच्या चावडीगप्पा सर्वत्र पाहायला मिळतात. पण, हे सगळं सामना सुरू असताना व्हायचं ना? आता नीट पाहाल तर सामना सुरू होण्याच्या आधीसुद्धा लोक व्यग्र असतात. कशात माहिती आहे? ड्रीम ११, माय ११ सर्कल, माय फॅब ११ अशा नावांच्या अनेक इंटरनेट आधारित अॅप्समध्ये ही मंडळी रमलेली असतात. ही संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे. प्रत्येक वर्षी ‘आयपीएल’ला हा आलेख उंचावतो. सुरक्षारक्षक, टॅक्सीवाला, कर्मचारी, कॉलेजची मुलं इथपासून ते मोठमोठाल्या कंपन्यांमधील अधिकारी वर्ग, उच्चभ्रू मंडळी फँटसी गेममध्ये संघ तयार करण्यात मश्गुल होतात. देशातली फँटसी गेमिंगमधील लाट ही फक्त क्रिकेटपुरतीच मर्यादित राहात नाही, तर ती आंतरराष्ट्रीय किंवा क्लब स्तरावरील फुटबॉल, कबड्डी इत्यादी खेळांपासून ते अगदी रमीपर्यंत विस्तारली आहे.
कोरोना साथीच्या कालखंडात फँटसी गेमिंगला स्थिरावण्याची संधी मिळाली. रेडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्सच्या ताज्या अहवालानुसार, ‘आयपीएल’च्या कालखंडात फँटसी गेममधील उलाढाल २९०० ते ३१०० कोटी रुपयांपर्यंत जाईल. म्हणजेच त्यात ३० ते ३५ टक्क्यांची वाढ होईल, असे म्हटले आहे.
फँटसी गेमिंग म्हणजे काय?
कोणताही खेळ मैदानावर खेळला जातो, तेव्हा त्यात कोणते खेळाडू चमकतील, त्यांची कामगिरी कशी होईल, याचे ठोकताळे बांधले जातात. हा अंदाज किंवा विश्लेषण अनेकजण करतात. पण फँटसी गेमिंगमध्ये ऑनलाइन पद्धतीनं काल्पनिक किंवा आभासी म्हणता येईल असा संघ बनवला जातो. यात सर्वोत्तम खेळू शकतील अशा खेळाडूंना आपले कर्णधार आणि उपकर्णधार बनवता येतात. प्रत्यक्षात खेळ मैदानावर सुरू होतो. त्याआधीच ही संघरचना बंद होते. त्यानंतर वास्तव सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीनुसार सांख्यिकी पद्धतीनं या आभासी खेळाडूंच्या खात्यावर गुण जमा होतात. त्याची एकंदर बेरीज करून झालेले एकूण गुण हेच देशातील अनेक फँटसी गेमिंग खेळणार्या व्यक्तींमध्ये स्पर्धा घडवून आणतात. सर्वाधिक गुण मिळवणार्या व्यक्तींमध्ये बक्षिसाची रक्कम समान पातळीवर विभाजित करून त्यांच्या अॅपवर उपलब्ध होते. ती त्यांना त्वरित बँक खात्यावर हस्तांतरितही करता येते. उदाहरणार्थ, आज अ आणि ब संघात सामना आहे. त्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व खेळाडूंचे यष्टीरक्षक, फलंदाज, अष्टपैलू आणि गोलंदाज असे वर्गीकरण उपलब्ध असते. त्यानुसार आपल्याला दोन्ही संघांमधून मिळून सर्वोत्तम कामगिरी करतील असे ११ खेळाडू निवडायचे असतात. त्यानंतर एक कर्णधार आणि उपकर्णधारही निवडल्यावर संघरचना सबमिट केल्यावर आपला संघ गेमिंगमध्ये सामील होतो. मग खेळाडूंची कामगिरी कशी होईल, त्यानुसार आपल्याला यशापयश मिळतं.
फँटसी गेमिंगबाबतचे प्रश्न
भारतात सट्टेबाजीला कायदेशीर बंदी आहे. त्यामुळे काही जणांना फँटसी गेमिंगच्या कायदेशीरपणाबाबत शंका निर्माण होतात. हा जुगार किंवा सट्टेबाजीचाच प्रकार असून त्यापासून स्वत:ला दूर ठेवलेलंच बरं अशी काही नागरिक स्वत:ची समजूतही काढतात. काही वर्षांपूर्वी तीन महिन्यांत दाम दुप्पट करणार्या काही खासगी योजनांमध्ये पैसे गुंतवल्यानं हात पोळलेले असंख्य नागरिक सल्लागाराच्या भूमिकेत जाऊन हा मार्ग अयोग्य असल्याची ग्वाही देतात.
भारतीय दंड विधेयकातील कलम क्रमांक १९ (१) (जी) नुसार फँटसी गेमिंग हा कौशल्याचा खेळ आहे. जो खेळणार्याला त्याचं कौशल्य, ज्ञान, गुणवत्ता, रणनीती वापरावी लागते. या खेळात नशिबावर जिंकता येत नाही, तर निर्णय आणि विश्लेषण क्षमता हे दोन गुण महत्त्वाचे असतात. फँटसी गेमिंगवरील सट्टेबाजी आणि जुगाराचे आक्षेप फेटाळताना फेब्रुवारी २०२०मध्ये राजस्थान उच्च न्यायालयानं हा ‘कौशल्याचा खेळ’ म्हणजेच ‘गेम ऑफ स्किल्स’ असल्याचं नमूद केलं.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानेही ‘गेम ऑफ स्किल्स’ आणि ‘गेम ऑफ चान्स’ यातील फरक अधोरेखित केला आहे. जेव्हा खेळाचा निकाल प्रामुख्याने कौशल्यानं ठरवला जातो, तेव्हा तो कौशल्याचा खेळ असतो. जेव्हा निकाल प्रामुख्यानं योगायोगानं ठरवला जातो, तेव्हा तो संधीचा खेळ असतो. त्यामुळेच फँटसी गेमिंगला देशात परवानगी आहे. पण काही राज्य सरकारांनी मात्र बंदी घातलेली आहे. गेल्या काही वर्षांत तर फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी स्पोर्ट्स (एफआयएफएस) अशी देशातील शिखर संघटनाही अस्तित्वात आली आहे.
फँटसीचा आलेख उंचावतोय
जसे मोठमोठाले चॅनेल्स रिअॅलिटी शोजमध्ये सर्वसामान्य घरातल्या व्यक्तीचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावनिक कथा गुंफतात. तशाच प्रकारे आता फँटसी लीग खेळून गरीब व्यक्तीला स्वप्नपूर्ती करणारे पैसे मिळाले, अशा कथा या उद्योगातील मंडळीही मांडू लागली आहेत. गेल्या दोन वर्षांत फँटसी गेमिंग क्षेत्रात झपाट्यानं वाढ झाली आहे. २०२२च्या अखेरीस देशातील ५१ कोटी नागरिक हे खेळ खेळत असल्याची नोंद आढळते. रॉकेटवेगानं जाणार्या फँटसी गेमिंग बाजारपेठेत २०२५च्या अखेरीस १५,००० कोटी रुपयांची उलाढाल होईल, असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे एकंदरीतच फँटसी गेमिंग हे विस्तारणारे क्षेत्र असल्याचे सिद्ध होते. त्यात नशीब आजमावायचं की हात पोळून घ्यायचे, हे ज्याचं त्याने ठरवायचं.