‘पोलीस हेल्पलाइन. बोला, मी तुमची कशा प्रकारे सहाय्यता करू शकते?’
‘मॅडम, मी आयेशा बोलते आहे. माझी मैत्रीण ज्युली गेले दोन तीन दिवस मला भेटली नाहीये आणि माझा फोन देखील उचलत नाहीये. मी तिला बघायला तिच्या घरी आले, तर दार आतून बंद आहे, पण तिचा काही प्रतिसाद येत नाहीये..’ पलीकडच्या व्यक्तीने एका दमात सगळी माहिती दिली.
‘घाबरू नका, आमचे बीट मार्शल लवकरात लवकर तिथे पोहोचतील. तुम्ही मला तिथला पत्ता व्यवस्थित सांगा.’
‘डायमंड अपार्टमेंट, चिंचवड नगर, जोशी रोड.’
हेल्पलाइनवरून संदेश मिळाला आणि हवालदार कडू आणि हवालदार जकाते गाडी उलटी वळवून तातडीने घटनास्थळी धावले. अपार्टमेंटच्या खाली घाबर्याघुबर्या अवस्थेत उभी असलेली आणि सतत इकडे तिकडे मान वळवत असलेली तरुणी आयेशाच असणार हे त्यांनी ओळखलं. आयेशा बार गर्ल अथवा डान्सर असावी हेदेखील कडूंच्या अनुभवी नजरेने बरोबर हेरले होते.
‘कितव्या मजल्यावर राहते तुमची मैत्रीण?’
‘इथेच दुसर्या मजल्यावर.. या ना..’ ती पायर्यांकडे धावली.
दोन्ही हवालदारांनी चार पाचवेळा बेल वाजवली, दरवाजा ठोठावला, मात्र खरंच काही प्रतिसाद मिळाला नाही किंवा आतमध्ये काही हालचाल देखील जाणवली नाही.
‘तुमची मैत्रीण नक्की आत आहे?’
‘१०० टक्के साहेब. तिचा डोअर लॅचवर कधीच विश्वास नव्हता. ती साधी समोरच्या बेकरीत गेली, तरी दरवाज्याला बाहेरुन मोठे कुलूप लावायची.’
दोन्ही हवालदारांनी निर्णय घेतला आणि ते दरवाज्याला भिडले. चार पाच धडकांमध्ये आतले कुलूप तुटले आणि दोघेही आत शिरले. घरात पसरलेला वास कसला आहे हे त्यांनी बरोबर ताडले आणि आयेशाला घराबाहेर काढत वरिष्ठांना फोन लावला. अवघ्या वीस मिनिटांत फोरेन्सिकच्या टीमसह इन्स्पेक्टर विजय खंडकर दारात उगवला. भराभर त्याने हातात ग्लोव्ह्ज चढवले आणि बेडरूमकडे निघाला.
‘सर, प्रेत इकडे पडले आहे किचनमध्ये.’ विजयने शांतपणे पाच मिनिटे मृतदेहाचे निरीक्षण केले आणि बाहेर येत त्याने आयेशाला बाजूला घेतले. विजय बाजूला होताच फोरेन्सिकच्या टीमने मृतदेहाचा ताबा घेतला.
‘ही तुझी मैत्रीण ज्युली.. बरोबर?’ आयेशा अजूनही विस्फारित नजरेने किचनकडेच पाहत होती.
‘ओ आयेशा मॅडम.. ही ज्युलीच आहे का?’
‘अं? हो.. साहेब.’
‘तुम्हाला शेवटची कधी भेटली होती?’
‘सर, शुक्रवारी सकाळी तिचा फोन आला होता. शॉपिंगला येते का विचारायला. पण मी माथेरानला निघाले होते, त्यामुळे नाही म्हणाले. त्यानंतर परत आमची बोलणे, भेट काही झालेच नाही.’
‘तुम्ही शहराबाहेर असता आणि नेमका तेव्हा तुमच्या मैत्रिणीचा खून होतो…’
‘साहेब, मी खरंच माथेरानला होते. कोणाबरोबर ते नाही सांगू शकत. पण हॉटेलचा पत्ता आणि तिथे आम्ही बुक केलेल्या ड्रायव्हरचा नंबर देऊ शकते.’
‘नाव सांगण्यात कसली अडचण आहे?’
‘आमच्यासारख्या बायका बर्याच गरजवंतांना हव्या असतात साहेब. गरज भागली की त्यांनी आम्हाला विसरायचे आणि आम्ही त्यांच्या नावाला.’ खालमानेनं आयेशा म्हणाली आणि विजय हळहळला.
‘आय एम सॉरी. बरं, मला सांग ज्युली देखील…’
‘हो साहेब! पण तिची ठरलेली गिर्हाईकं होती. बडे बडे लोक. हा फ्लॅट, ह्या सगळ्या वस्तू त्या कमाईतल्याच आहेत,’ आयेशा स्पष्ट बोलली पण तिच्या बोलण्यात विजयला जरा असूया जाणवली.
‘ज्युलीला कोणी नातेवाईक?’
‘माझ्या माहितीत तरी नाही. तिची एकमेव मैत्रीण म्हणजे मी.’
‘ज्युलीचे कोणाशी वाद?’
‘नाही साहेब. ती आपल्या कामाशी काम ठेवणारी होती. हां, पण काही दिवसांपूर्वी सोसायटीच्या सेक्रेटरीबरोबर तिचे भांडण झालेले.’
‘कशावरून?’
‘त्याला ती एका रात्रीसाठी…’
‘तुझा पत्ता आणि फोन नंबर हवालदार कडूंकडे देऊन जा आणि हो, स्टेटमेंट द्यायला तुला पोलीस स्टेशनला यावे लागेल. तिचे बोलणे अर्धवट तोडत विजय फाड्कन बोलला आणि आत वळला.
‘डॉक्टर गानू, काय प्रोग्रेस?’
‘डोक्यात वरवंटा घालून खून करण्यात आला आहे. एकाच घावात खेळ खलास झालाय.’
‘फिंगरप्रिंट किंवा इतर पुरावा?’
‘वरवंटा हे खुनी हत्यार असल्याने काम बरेच अवघड झाले आहे. सध्या आम्ही पूर्ण घरातल्या फिंगरप्रिंट आणि शू प्रिंट कलेक्ट करत आहोत. थोड्याच वेळात तुम्हाला जागा मोकळी करून देतो.’
अॅम्ब्युलन्स ज्युलीची बॉडी घेऊन गेली आणि विजयने घर तपासायला सुरुवात केली. घरातले पैसे, दागदागिने जागच्या जागी होते. सामान मात्र पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेले होते. अर्थात खुन्याला पैशाचा मोह नव्हता, तर त्याला त्यापेक्षा देखील जास्त महत्त्वाची अशी एखादी वस्तू हवी होती. काय असावे? कागदपत्रे? एखादी महत्त्वाची डायरी? मोबाइल? येस! विजयचे डोळे चमकले.
‘कडू, घरात कुठे मोबाइल सापडतोय का ते बघायला सुरुवात करा.’
‘गानू, फॉरेन्सिकला एखादा मोबाइल किंवा डिजिटल डायरी वगैरे सापडलीये?
‘नाही! साधे रिस्टवॉच देखील सापडले नाहीये,’ गानूंच्या उत्तराने विजय चमकला.
‘कडू त्या आयेशाला फोन लावा जरा.’ कडूने फोन लावला आणि विजयकडे दिला.
‘आयेशा, ज्युली कोणते घड्याळ वापरायची काही कल्पना?’
‘सर, तिच्या मंगेश नावाच्या एका ग्राहकाने तिला स्मार्टवॉच घेऊन दिले होते. ती तेच वापरायची.’ विजयने पटल्यासारखी मान डोलवली आणि फोन ठेवून दिला. नक्कीच ज्युलीकडे असा एखादा फोटो, व्हिडिओ असणार ज्यासाठी हा प्रकार घडला हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने तपासाचा मार्ग निश्चित केला. ज्युली ज्या व्यवसायात होती, तो पाहता एखाद्या लपून काढलेल्या फोटोच्या किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ती नक्की कोणाला तरी ब्लॅकमेल करत असणार असा त्याला दाट संशय आलेला होता.
‘कडू, त्या आयेशाकडून ज्युलीचा नंबर घ्या आणि लगेच सायबरकडे जाऊ द्या. मला ज्युलीचे गेल्या वर्षभरातले सगळे कॉल्स, गेल्या तीन महिन्यातले लोकेशन्स सगळे काही हवे आहे. आणि मला त्या आयेशाचा पत्ता पाठवा जरा,’ शेवटचे वाक्य बोलत विजय जिन्यावरून खाली देखील निघाला होता. तो खाली उतरला आणि त्याने थेट सोसायटी ऑफिस गाठले. आत दोन मध्यमवयीन व्यक्ती गंभीर चेहर्याने चर्चा करत होत्या.
‘या साहेब. कोणी केला हो तिचा खून?’
‘ते समजायला थोडा वेळ लागेल अजून. तुमच्यापैकी सेक्रेटरी कोण आहे?’
‘मी आहे साहेब,’ नुकतीच कोणाकडून तरी एक कानफडीत खाल्ल्यासारखा चेहरा असणारा माणूस उत्तर देता झाला.
‘तुम्ही ज्युलीला ओळखत होतात?’
‘फारसा नाही. एक सोसायटी मेंबर म्हणून ओळखायचो.’
‘अच्छा! सोसायटी मेंबर म्हणून कशी होती ज्युली?’
‘आता मेलेल्या माणसाबद्दल काही बोलू नये साहेब, पण इतकी वाईट वृत्तीची स्त्री माझ्या बघण्यात नाही. प्रत्येकवेळी कोणी वेगळा पुरुष तिला न्यायला किंवा सोडायला यायचा. निर्लज्जपणे सोसायटीच्या आवारात सिगारेटी फुंकायची, कधी बोलायची वेळ आलीच तर हिच्या तोंडाला कायम दारूचा वास. सोसायटीतले लोक पार वैतागले होते ह्या बयेला.’
‘आणि अशा दुर्गुणी, निर्लज्ज बाईला तुम्ही एका रात्रीसाठी जवळ करायला निघाला होतात?’
‘काय बोलताय काय साहेब? पोलीस आहात म्हणून..’
‘माझ्याकडे साक्षीदार आहे!’
‘साहेब असे काही घडलेले नाही. ओला, सुका कचरा वेगळा टाकत जा म्हणून सांगायला गेलो तर माझ्याच अंगावर आली. ‘तुझ्यात काय दम आहे?’ विचारायला लागली. मग मी पण रागाने बोलून गेलो की ये रात्री मग दाखवतो! माझा उद्देश वाईट नव्हता साहेब. देवाशपथ!’ डोळा तिरळा करत त्याने गळा चिमटीत पकडला आणि विजयला हसू दाबणे अवघड झाले.
‘ठीक ठीक. पण अशा स्त्रीला तुम्ही सोसायटीत जागा दिली म्हणजे..’
‘फार वरपर्यंत ओळखी होत्या साहेब तिच्या. तिचे आणि मेन रोडवरच्या सोनाराचे लफडे होते साहेब. त्यानेच बहुदा तिला इथे जागा मिळवून दिली. आली त्यावेळी वाटले नव्हते अशी असेल..’ इथले काम संपल्याचे विजयच्या लक्षात आले आणि तो सोनाराचा पत्ता घेऊन तिकडे रवाना झाला.
‘एम. डी. ज्वेलर्स.’ दुकानाच्या नावाचा बोर्ड जेवढा चमकदार होता, त्या मानाने दुकान अगदीच किरकोळ वाटत होते. दोन छोट्या शोकेस आणि त्यामध्ये मळकट बॉक्समधले १०-१२ मरगळले दागिने सोडले तर दुकानात फार काही माल दिसत नव्हता.
‘या साहेब बसा. सोनाराच्या दुकानात पोलीस म्हणजे…’ एक उमदा तरुण स्वागत करत म्हणाला.
‘तुमच्या दुकानात फार काही माल दिसत नाहीये..’
‘हे दुकान म्हणजे खरे तर माझे ऑफिस आहे साहेब. मी मनोज दादलानी. आमचा खरा धंदा सोन्याच्या मण्यांचा आणि दागिने घडवण्याचा आहे. तो कारखान्यावर चालतो, वडील सांभाळतात. मी इथे बसून व्यवहाराचे पाहतो.’
‘तुम्ही ज्युलीला कसे काय ओळखता?’
‘कोण ज्युली?’
‘डायमंड अपार्टमेंटवाली.’
‘अच्छा ती.. ती एक दोनदा सोन्याचे मणी घ्यायला आली होती साहेब.’
‘दोन भेटीत बरीच ओळख झाली म्हणायची..’ समोरचा तरुण गुळमुळीत हसला.
‘ज्युलीचा खून झालाय,’ शांतपणे विजय म्हणाला आणि समोरचा तरुण अक्षरशः खुर्चीत उडून पुन्हा खाली बसला. त्याला एक तर खरंच शॉक बसला होता किंवा तो उत्कृष्ट अभिनय करत होता.
‘खे खे खूण??’
‘हो! खे खे खूण! आता पटापट इथे बोलायला लागणार आहेस, का चौकीत नेऊ?’
‘ती मला ब्लॅकमेल करत होती साहेब!’ समोरचा तरुण फाडकन बोलला आणि आता शॉक बसायची पाळी विजयची होती. ‘सगळे नीट सांग मला..’
‘ती इथे बरेचदा यायची. आमची चांगली ओळख झाली. ती कॉलगर्ल आहे ह्याची मला कल्पना होती. मी देखील फार काही सज्जन माणूस आहे असे नाही. एके दिवशी मी, माझा मित्र नागेश आणि जयंत अशा तिघांनी माझ्या अलिबागच्या फार्महाऊसला जायचा बेत केला होता. नवी एंजॉयमेंट म्हणून मी ज्युलीला देखील आमंत्रित केले आणि तीच माझी सर्वात मोठी चूक ठरली.’
‘का असे काय घडले तिथे?’
‘त्या रात्री आम्ही भरपूर दारू प्यायलो. जयंत नेहमीप्रमाणे त्याचा कोटा पूर्ण करून पाय मोकळे करायला गेला. तो आम्हाला गुडनाईट करून गेला आणि आम्ही पुन्हा एकदा मैफिल सजवली. ह्यावेळी मात्र आम्ही जरा जास्ती बहकलो आणि आळीपाळीने आम्ही ज्युलीचा भोग घेतला. ती कोण आहे ह्याची कल्पना असल्याने आम्हाला गिल्टी वगैरे वाटले नाही. तिने देखील तिचा मोबदला पैशात वसूल केला.’
‘मग अडचण आली कुठे?’
‘आम्ही परत आलो आणि चार दिवसांनी मला आणि नागेशला एका अननोन नंबरवरून एक व्हिडिओ मिळाला. त्यात आमचे आणि ज्युलीचे…’
‘ओह! किती पैशाची मागणी झाली?’
‘पाच पाच लाख.’
‘दिलेत?’
‘नागेश तयार नव्हता. त्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्याने पोलिसात जायचे ठरवले, पण मी त्याला रोखले. हे माझ्या घरी आणि सासरी कळले असते, तर मी देशोधडीला लागलो असतो. श्ोवटी आम्ही त्या ब्लॅकमेलरशी बराच वाद घातला आणि शेवटी सात लाखात तडजोड केली.’
‘हे सगळे किती दिवस चालले?’
‘दोन दिवस आमचे वाद होत होते. शेवटी तिसर्या दिवशी तडजोड झाली.’
‘पैसे कुठे आणि कोणाला दिले?’
‘ती निर्लज्ज ज्युली स्वत: येऊन घेऊन गेली. त्यानंतर तिने पुन्हा एकदा तीन लाख लुबाडले आणि मागच्या आठवड्यात पुन्हा पाच लाखाची मागणी केली होती. आता तिने नागेशकडे दुर्लक्ष करून फक्त मलाच लुबाडायला सुरूवात केली होती. उद्या तिने दिलेली मुदत संपत होती.’
‘म्हणजे ह्या वेळी देखील तू पैसे देणार होतास?’
‘नाही. ह्यावेळी मी सावध व्हावे आणि पोलिसांकडे चलावे असा नागेशचा हट्ट होता. मी त्यावरच विचार करत होतो आणि तेवढ्यात तुम्ही ही बातमी घेऊन आलात.’
विजयने काही वेळ शांतपणे विचार केला आणि सरळ मनोजच्या हातात बेड्या घातल्या.
‘ओ साहेब… अहो ऐका तरी..’ मनोजच्या गयावयांकडे दुर्लक्ष करत त्याला सरळ गाडीत नेऊन बसवले.
‘जयंत, त्या रात्री नक्की असे घडले?’
‘हो साहेब. मी कधीच ताबा सुटेपर्यंत पीत नाही. विश्वास ठेवा साहेब. माझ्यासमोर त्या रात्री जे काही घडले त्याबद्दल मनोजने मोबदला म्हणून ज्युलीला पंचवीस हजार रुपये दिले होते. तिने देखील स्वीकारले होते. तिला त्यानंतर दुर्बुद्धी का सुचली कळत नाही. पण विश्वास ठेवा साहेब मनोज अय्याश असेल पण तो खुनी नक्की नाही.’
जयंत त्याची साक्ष नोंदवून गेला आणि विजयने नागेशला साक्षीला बोलावले.
‘साहेब, मनोज चुकला असेल पण इतका त्रास सहन केल्यानंतर कोणत्या माणसाचा तोल ढळणार नाही?’
‘तू किती लाख दिलेस?’
‘दोन लाख..’
‘त्यानंतर पुन्हा काही मागणी?’
‘नाही साहेब. माझे पैसे पण मनोजने स्वत: कडचे दिले होते. माझी आर्थिक परिस्थिती आणि मी बेधडक पोलिसांकडे जायला तयार झालेलो पाहून बहुदा त्यांनी माझा नाद सोडला होता. पण मनोजचा गाढवपणा काही कमी होत नव्हता आणि तो लुबाडला जात होता. मी मनात असून देखील काही करू शकत नव्हतो.’ मनोजने रागारागाने समोरच्या टेबलवर बुक्की मारली.
‘आणि म्हणून मग तू ज्युलीचा काटा दूर केलास…’ शांतपणे विजयने विचारले आणि नागेशच्या चेहर्यावरील भाव झर्रकन बदलले.’
‘काय बोलताय साहेब तुम्ही हे?’
विजयने शांतपणे दोन कागद नागेशच्या समोर फेकले.
‘तुझ्या मोबाइल नंबरचे आणि ज्युलीच्या नंबरचे सविस्तर कॉल डिटेल्स, लोकेशन सगळे ह्यात आहे.’
‘बरं मग?’
‘तुम्हा दोघांना ज्या अननोन नंबरवरून तो व्हिडिओ पाठवण्यात आला, त्याच नंबरवरून ज्युलीला दोन वेळा फोन करण्यात आला होता. ह्याचा अर्थ ज्युलीबरोबर दुसरा देखील कोणी ह्यात सामील होता.’
‘मग त्या माणसाने ज्युलीला कशावरून मारले नसेल? तावातावाने नागेश ओरडला.
‘त्यानेच तिला मारले आहे नागेश आणि तो दुसरा माणूस तू आहेस! ज्यावेळी ज्युलीचा खून झाला तेव्हा तुझे मोबाइल लोकेशन जोशी रोडच दाखवत आहे. जेव्हा जेव्हा मनोजने ब्लॅकमेलरला पैसे दिले, तेव्हा तेव्हा तुझा बँक बॅलेन्स वाढत गेला आहे. डायमंड समोरच्या इस्टेट एजंटने देखील तुला ओळखले आहे!’ त्याच्यापेक्षा दुप्पट आवाजात विजय ओरडला आणि नागेशने हाताच्या दोन्ही पंज्यात चेहरा लपवला.
‘साहेब, माझी परिस्थिती फारशी चांगली नसली तरी बाहेरख्यालीपणा कमी झाला नव्हता. अशा धंद्यांमध्येच माझी मनोज आणि ज्युली अशी दोघांशी ओळख झाली. मला मनोजच्या श्रीमंतीचा आणि भित्रेपणाचा हळूहळू अंदाज यायला लागला आणि मी झटपट श्रीमंत होण्याचा प्लॅन आखला. मी ज्युलीला पैशाचे आमिष दाखवून त्यात सामील केले. त्यानंतर मोठ्या मुश्किलीने मी ज्युलीला मनोजच्या दुकानाजवळ घर मिळवून दिले. तिने दोन तीन भेटीतच मनोजला गुंडाळले आणि माझे काम आणखी सोपे झाले.’
‘तो व्हिडिओ तूच शूट केला होतास ना?’
‘हो साहेब. आणि माझा संशय येऊ नये म्हणून मी माझा आणि ज्युलीचा व्हिडिओ देखील शूट केला होता. एकाचवेळी दोघांना त्यांचे व्हिडिओ मिळाल्याने कोणालाच माझा संशय आला नाही. त्या मूर्ख मनोजने तर माझे पैसे देखील देण्याची तयारी दाखवली.’
‘पण मग अचानक हा खून?’
‘ज्युलीची हाव वाढायला लागली होती साहेब आणि आता माझ्याकडे आलेला पैसा बघून तिला तिच्या मोबदल्याबरोबरच माझ्या कमाईत देखील हिस्सा हवा वाटायला लागला होता. त्या दिवशी तर तिने पंचवीस लाखाच्या बदल्यात मनोजला ब्लॅकमेलरची ओळख सांगायची धमकी दिली आणि मी धास्तावलो. मी तिच्या घरी पोहोचलो आणि आमच्यात वाद झाला. रागाच्या भरात मी तिथेच किचनमध्ये असलेला वरवंटा उचलला आणि….’