प्रबोधन, गोरेगाव आणि मार्मिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्यसेवक वसंत तावडे कथा स्पर्धेतील उत्तेजनार्थ पुरस्कार विजेती कथा…
– – –
रात्रीचे साडे अकरा वाजले होते. मनीषाने रुचीची वाट बघून कंटाळून जेवून घेतलं. स्वयंपाकघर आवरून ती बेडवर आडवी पडणार इतक्यात बेल वाजली.
‘रुची आली वाटतं…’ असं स्वत:शी म्हणतं ती दरवाजा उघडायला बेडवरून उठून गेली. ती तिथे पोहचेपर्यंत बेल सारखी वाजत होती. ’अगं हो हो… आले. दोन मिनिटं थांबायला काय झालं…’ दरवाजा उघता उघडता मनीषा लटक्या रागाने म्हणाली.
घरात येऊन पटकन दरवाजा बंद करून रुची क्षणभर शांत उभी राहिली. तिचा श्वासोच्छवास वाढला होता. घामाघूम झालेली रुची खूप घाबरलेली होती. तिची ती विचित्र अवस्था बघून मनीषाही घाबरली.
‘रुची, अगं काय… काय झालं? कुणी काही त्रास दिला का? की कुणी मागे लागलं होतं…?’
रुचीने झटकन चप्पल भिरकावली आणि मनीषाचा हात धरत तिला स्वयंपाक घरातील खिडकीजवळ घेऊन आली. तिच्या कानाजवळ कुजबुजत म्हणाली, ‘तो गेटजवळ उभा असणारा माणूस बघ. तो गेले पाच दिवस माझा पाठलाग करतो आहे.’
मनीषा दचकून ओरडली, ‘काय? गेले पाच दिवस तुझा कुणीतरी पाठलाग करतंय आणि हे तू मला आता सांगतेस…‘
‘मी कन्फर्म करत होते. आज मला पक्कं समजलं की तो माझा पाठलागचं करतो आहे. आई तुला माहित आहे, मी आणि रोहन ज्या कॅफेत बसलो होतो तेथेही तो माणूस आला होता. सारखा माझ्याकडे बघत मोबाईलवर काहीतरी टाईप करत होता.‘
‘मग सरळ जाऊन जाब विचारायचा ना त्याला..‘
‘असं कसं विचारणार? रोहन आणि मी बाईकवरून आलो तर आमच्या मागे एक गाडी येताना दिसत होती. म्हणून मी रोहनला नाक्यावरच सोडायला सांगितले. तिथून मंदिराला वळसा घालून घरी येताना मी मागे बघितलं तर हा माझ्या मागे मागे चालत होता. मला एवढी भीती वाटली की विचारू नकोस… मी पळत पळत बिल्डिंगमध्ये शिरले. लिफ्टची वाट न बघता धावत आले,’ रुची पटापटा सगळं सांगत होती.
‘तू आधी शांत हो बघू. पाणी पी बरं वाटेल,‘ पाण्याच्या ग्लास देत मनीषा म्हणाली.
‘कोण असेल ग आई हा? माझा का पाठलाग करतो आहे?‘
‘रुची, मी तुला बोलले नाही; पण गेल्या आठवड्यात मलाही दोन-तीन वेळा कुणीतरी माझा पाठलाग करतं आहे असं वाटत होतं. मी यायची वेळ या आठवड्यात थोडी बदलली. म्हंटलं बघू काय होतं.‘
‘तू बाबाला बोललीस का?’
‘नाही गं… संजीव फोन कुठे उचलतो. तो ज्या वेळी करतो तेव्हा मी कामात असते.’
‘बाबाने मलाही फोन केला नाही. खरतरं त्याचे हल्ली दुबईला दौरे वाढले आहेत नाही!…’
संजीवविषयी जास्त बोलायला लागू नये म्हणून मनीषाने विषय बदलत म्हटलं, ‘बरं ते जाऊदे… तू जा, कपडे बदलून प्रâेश हो. मी जेवण गरम करते आणि वाढते.’
रुची प्रâेश व्हायला गेली. मनीषा मात्र संजीवचा विचार करत होती. गेलं वर्षभर संजीवचं वागणं थोडं बदलत चालल्याचं तिला जाणवत होतं. पूर्वीही तो कामासाठी परदेशात जायचा. पण आवर्जून फोन करायचा, येताना दोघींसाठी काहीतरी भेटवस्तू आणायचा. तिला त्याच्या स्पर्शातही आतासं प्रेम जाणवत नव्हतं. तो मनीषाच्या नकळत तिचा मोबाईल बघायचा. तिचे ईमेल तपासायचा. सुरुवातीला मनीषाला वाटलं तो सहज बघत असेल. पण नंतर तिच्या लक्षात यायला लागलं की तो जाणीवपूर्वक सगळं करतो आहे, तेव्हा रुची घरात नसताना तिने त्याला विचारलेही होते. त्यावेळी त्याने दिलेली उडवाउडवीची उत्तर ऐकून ती दुखावली गेली होती. तेव्हापासून तीही त्याच्या वागण्याचं बारीक निरीक्षण करत होती.
‘आई, कसला विचार करते आहेस? जेवायला वाढ ना…’
‘काही नाही गं… माझ्यावर, तुझ्यावर लक्ष ठेवणारा कोण असेल आणि त्याचा काय फायदा असेल बरं… याचाच विचार करत होते.’
‘आपण पोलीसात जाऊया का?’
‘एकदम पोलीसात जायचं म्हणजे?’
‘सध्या पाठलागच केला आहे, पण उद्या त्याने काही बरंवाईट केलं तर?…’
विषय न वाढवता मनीषा म्हणाली, ‘तू जेव शांतपणे. आपण उद्या ठरवूया. मी जरा आराम करते. आज ऑफिसमध्ये खूप काम होतं. कंटाळले आहे मी!’
‘तू जा आई. मी जेवून जरा अभ्यास करते आणि मग झोपते.’
मनीषा बेडवर आडवी पडली तरी विचार काही मनातले जात नव्हते. तिने अंधारातच संजीवला विडियो कॉल केला. तिचा फोन दोन वेळा कट केला गेला. तिने तिसर्यांदा पुन्हा लावला, त्यावेळी विडियोत हॉटेलचं छत दिसलं.
‘हॅलो! संजीव, कुठे आहेस?’ असं म्हणत असतानाच मनीषाला एका बाईचा हसण्याचा आवाज आला. मनीषाला वाटलं अंधारात दुसर्या कुणाला फोन लागला की काय… तिने घाईने उठून लाईट लावली. फोन बरोबर लागला होता. तिने पुन्हा ‘संजीव… संजीव,‘ असं ओरडून म्हटल्यावर संजीवचा फक्त वैतागलेला आवाज आला, ‘मनीषा. मी नंतर बोलतो. प्लीज फोन ठेव.’
संजीवच्या बोलण्याने मनीषा नाराज झाली. तिने झटक्यात फोन बंद केला आणि आता त्याला स्वत:हून फोन न करण्याचा निर्धार केला.
दुसर्या दिवशी रुची कॉलेजला जाताना सारखं आपल्या मागे कुणी आहे का पहात होती. पण तिला कुणी दिसलं नाही. तिने आणि रोहनने त्या माणसाला आज रंगेहाथ पकडायचं ठरवलं होतं. पण ताे त्यांना दिसलाच नाही. घरी आल्यावर रुचीने मनीषाला हे सांगितले तेव्हा ती म्हणाली, ‘आज मी ऑफिसमधून हाफ डे घेऊन बँकेत गेले होते, तेव्हा ज्याने माझा पाठलाग केला होता तोच माणूस मला तिथे दिसला. मी त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो घाईत निघून गेला. मी बँकेच्या बाहेर येऊनही बघितले, पण तो काही दिसला नाही.’
‘आई, मला वाटतं… माझा पाठलाग करणारा आणि तुझा पाठलाग करणारा एकच माणूस असावा.’
‘असं का वाटतंय तुला? काल रात्री मला तो माणूस स्पष्ट दिसला नाही. नाहीतर मी ओळखलं असतं.’
’मी बाबाला मेसेज करून थोडक्यात सगळ्याची कल्पना दिली आहे.’
कपाळावर आठ्या आणत मनीषा म्हणाली, ’काही उत्तर दिलं का बाबाने?’
’बाबा म्हणाला, मी या दोन दिवसांत आलो की बघू. तोपर्यंत काळजी घ्या असं म्हणाला.’
’पोलीस कम्प्लेन्ट करा असं का नाही म्हणाला?’ मनीषाने साशंक होत विचारले.
’मी मेसेजमध्ये विचारलं होतं की आम्ही पोलीसात जाऊ का? तर म्हणाला की मी आल्यावर सगळं प्रकरण हॅन्डल करतो म्हणून…’
’मला वाटलंच…’ कसला तरी विचार करत मनीषा पटकन म्हणाली.
मनीषाने दिलेला अनपेक्षित प्रतिसाद बघून रुची गोंधळली.
ती म्हणाली, ’आई, तुझा आणि बाबाचा काही इश्यू झाला आहे का?’
‘रुची, तुला खरं तर मला काही सांगायचं नव्हतं. पण आता विषय निघाला म्हणून सांगते. तुझा बाबा बदलला आहे. तो गेलं वर्षभर तुझ्या-माझ्यावर बारीक लक्ष ठेवून आहे असं मला वाटतं.’
‘म्हणजे?…’
‘तो माझ्या आणि तुझ्या नकळत आपले फोन कॉल्स, चॅटिंग सगळं चेक करतो. इतकचं नाहीतर त्याने मला न विचारता माझीच सही घेऊन माझं बँकेचं अकाऊंट स्वत:च्या अकाऊंटला जोडून घेतलं आहे. त्यामुळे मी परवा दिलेला चेक बाऊन्स झाला. त्याचीच सगळी चौकशी करायला मी आज बँकेत गेले होते.’
‘पण बाबा असं का करेल? या वयात बाबाचं काही अफेअर वगैरे असेल का?’ साशंक होत रुचीने प्रश्न केला.
रुचीच्या बोलण्यावर मनीषाला काय उत्तर द्यावं कळेना. तिलाही तेच वाटत होतं. पण सत्य माहीत नव्हतं. ताणलेलं वातावरण हलकं करण्यासाठी ती चेहर्यावर हसू आणत म्हणाली, ‘मुलगी वयात आली आहे आणि बाबा काय अफेअर करेल का? उगाच नको ती शंका घेते.’
‘थँक गॉड… मला वाटलं आपला बाबा पन्नाशी ओलांडल्यावर सलमान खान झाला की काय?’ रुची खळखळून हसत म्हणाली.
मनीषाने चेहरा हसरा केला, पण कुठेतरी तिच्या मनात तेच घोळत होतं. गेले पाचसहा महिने तिला संजीवचं बदललेलं वागणं खटकत होतं. तो शक्य तेवढं मनीषापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होता. त्याने आपले परदेश दौरे वाढवले होते. भारतात असला की रात्री उशिरा घरी येणं व मनीषा कामावर गेल्यावर उठून ऑफिसला जाणं असा दिनक्रम त्याचा चालू होता. मनीषाला या सगळ्या गोष्टी खटकत होत्या, पण मनमोकळं बोलणं होतच नव्हतं. यावेळी मात्र मनीषाने ठरवलं की संजीव आला की जे काही आहे ते बोलून सत्य जाणून घ्यायचंच…
दोन दिवसांनी संजीव आला. पूर्वीसारखा तो उत्साही दिसत नव्हता. रुचीने त्याला विचारलेही. तेव्हा त्याने बीपी वाढल्याचे कारण दिले, पण मनीषाला माहीत होते की त्याचा उत्साह कमी होण्यामागे वेगळीच कारणे आहेत. तेच तिला जाणून घ्यायचं होतं. रुचीने गेल्या आठ-दहा दिवसांतल्या घटना संजीवला सांगितल्या. रुचीला वाटलं होतं की सगळं ऐकल्यावर आपला बाबा रागाने त्या माणसाविषयी बोलेल, त्याला शोधण्यासाठी प्रयत्न करेल. पण तसं काही झालं नाही. तो शांतपणे एवढंच म्हणाला, ‘आता तो माणूस तुझा पाठलाग करणार नाही.’
‘बाबा त्या माणसाला कसा थांबवणार? त्याने तर त्याला पाहिलेही नाही,’ असा मनातला विचार रुचीने सांगायचा प्रयत्न केला, तेव्हा संजीवनं कामाचं निमित्त काढून तिथून काढता पाय घेतला. मनीषा शांतपणे सगळं पहात होती. तिने संजीवशी बोलण्याचा प्रयत्नच केला नाही. ती आपली रोजची कामं करत राहिली. रुची मात्र बाबाच्या अशा वागण्याने खट्टू झाली. तिने मनीषाला संजीवविषयी विचारायचा प्रयत्न केला, पण ती ऑफिसला जायच्या घाईत होती. रुचीच्या लक्षात आलं की आपले आईबाबा एकमेकांना टाळत आहेत आणि त्यामुळे ते एकमेकांशी मोकळेपणाने बोलत नाहीयेत. तिच्या मनात आलं की आपण आई-बाबाला त्यांचा प्रॉब्लेम
सॉल्व करायला वेळ देऊया. त्यांच्यातलं मिसअंडस्टॅन्डिंग दोन दिवसात दूर होईल आणि त्यांच्यातलं नातं पहिल्यासारखं होईल… हा विचार करून रुची आपलं कॉलेज, अभ्यास यात व्यग्र झाली.
त्या दिवसानंतर रुचीचा कुणीही पाठलाग केला नाही किंवा तो पाठलाग करणारा माणूसही दिसला नाही. मनीषानेही त्या माणसाविषयी काही सांगितले नाही. त्यानंतर संजीव दुबईला दोनतीन वेळा जाऊन आला, तरी रुची आणि मनीषाला कसली अडचण आली नाही. रुचीला वाटलं की सगळं पूर्वीसारखं नॉर्मल झालं आहे. आईबाबा त्यांच्या त्यांच्या विश्वात मग्न आहेत. पण हा तिच्या मनातला भ्रमाचा भोपळा एक दिवस फुटला आणि तिला आईबाबाच्या नात्यातलं वितुष्ट पाहायला मिळालं.
एका मध्यरात्री रुचीला कुणाच्या तरी ओरडण्याने अचानक जाग आली. थोड्या वेळाने भांडी पडल्याचा, कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. तिने कानोसा घेतला, तर रडण्याचा आवाज आईचा होता. बाबाही मोठ्याने ओरडत होता. ती ताडकन बेडवरून उठली व दरवाजा उघडून हॉलमध्ये आली. पहाते तर काय दारुची बाटली फुटून काचा सगळीकडे पडल्या होत्या. आईच्या हाताला लागलं होतं. रडत रडत ती वाहणारं रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत होती. रुचीला असं अचानक आलेलं बघून संजीवचं बोलणं बंद झालं. तो शांत होऊन खुर्चीवर जाऊन बसला. मनीषा मुसमुसत जमिनीकडे नजर लावून बसली. रुचीला कुणाला काय बोलावं कळेना. तिने पटकन फर्स्टएड बॉक्स आणून मनीषाची जखम औषध लावून बांधली. तिला पाणी प्यायला दिलं. तिच्या हाताला धरून तिला उठवलं आणि सोफ्यावर बसवलं. नंतर पडलेल्या काचा कपड्याने गोळा केल्या. सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवल्या. सगळं घर आवरून झालं. मनीषा व संजीव गप्प होते. रात्री पुन्हा तमाशा नको म्हणून रुची बाबाला म्हणाली, ‘बाबा, आपण उद्या या विषयावर बोलणार आहोत. कुणीच कुठे जाणार नाही. खरं तर आता बोलायला हवं, पण तुमची मन:स्थिती बरोबर नाही आणि रात्र खूप झाली आहे. तेव्हा आपण उद्या बोलूया.’
रुचीच्या परखड वक्तव्याने आईबाबा नरमले. मनीषा काही न बोलता बेडरूममध्ये गेली व दरवाजा बंद करून बेडवर आडवी झाली, तर संजीव सोफ्यावरचं आडवा पडला.
दुसर्या दिवशी रुची सकाळी लवकर उठली. तिने चहा बनवला. बाबाला उपमा व आईसाठी सँडविच बनवले. रात्रभर मनीषाला झोप लागली नव्हती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. रुची तिला बोलवायला बेडरूममध्ये गेली. तिने चेहर्यावर हसं आणून आईला ‘गुड मॉर्निंग’ म्हटलं. मनीषाने शक्य तेवढा चेहरा हसरा ठेवत तिला ‘गुड मॉर्निंग’ केलं.
‘आई, तुझं आवरलं असेल तर बाहेर चल. चहा पी फ्रेश वाटेल…’
पडत्या फळाची आज्ञा मानून मनीषा बाहेर आली. संजीव सोफ्यावर आडवा पडलेला होता. त्या दोघी आल्याची चाहूल लागताच तो उठला आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. रुचीने मनीषाला चहा व नाष्टा आणून हातात दिला. मनीषाचे डोळे भरून आले.
रुची तिच्या जवळ बसत म्हणाली, ‘आई, आधी शांतपणे चहा पी व नाश्ता खा… तुला पित्त होईल म्हणून उपमा दिला नाही. चीज घालून मस्त सॅण्डविच बनवलं आहे.’
मनीषाने भरल्या डोळ्यांनी एकदा रुचीकडे पाहिले. प्रेमाने तिच्या गालाला हात लावला आणि सावकाश सॅण्डविच खाऊ लागली. संजीव फ्रेश होऊन आला आणि सोफ्यावर शांत बसला. रुचीने त्यालाही चहा, नाश्ता दिला. ती दोघांकडे पहात होती. दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर देत नव्हते. घरात कधी नव्हे ती स्मशानशांतता होती. इतक्या वर्षाच्या संसारात पहिल्यांदाच मनीषा आणि संजीव यांच एवढं मोठं भांडण झालं होतं आणि संजीवने मनीषावर हात उचलला होता. त्याला त्या गोष्टीचा पश्चात्ताप होत होता. रुची आपल्याविषयी काय विचार करील याचीच चिंता दोघांना लागली होती. दोघांचं खाऊन झाल्यावर रुचीने बोलायला सुरुवात केली.
‘काल रात्री जे झालं ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं. मी एवढ्या वर्षांत तुम्हा दोघांना कधी एवढं भांडताना पाहिलं नाही. मग आता असं नेमकं काय घडलं की तुम्ही एवढं भांडलात? बाबा, नेमकं काय झालं की तू आईवर या वयात हात उचललास?’
रुचीच्या या प्रश्नाने संजीव व मनीषा दोघेही एकमेकांकडे पाहायला लागले. आता शांत राहण्यात काही अर्थ नाही हे संजीवला कळून चुकलं होतं. त्याने डोळ्यावरचा चष्मा काढला. एकदा तोंडावरून हात फिरवला आणि पुन्हा लावला. जरासं खाकरून तो म्हणाला, ‘तुला माहीत नाही रुची, तुझ्या आईने काय केलं आहे?’
मनीषा रागाने फणकारत म्हणाली, ‘काय केलं म्हणजे? कुठे कुणाबरोबर पळून गेले नाही की कुठे लफडं करत फिरले नाही. स्वत:सारखं समजतो आहे मला… तू, तू काय काय करतोस ते सांग ना आधी…’
‘मी… मी काय केलं. तूच माझ्यावर संशय घेते आहेस म्हणून दुबईत माझ्यामागे डिटेक्टिव्ह पाठवलास ना…’
‘काय डिटेक्टिव्ह?’ आश्चर्यचकीत होत रुची म्हणाली.
‘नाहीतर काय! दोन महिन्यापूर्वी मी दुबईला गेलो त्यावेळी या संशयी बाईने चार लाख रुपये खर्च करून माझ्यामागे डिटेक्टिव्ह पाठवला. मी त्याला रंगेहाथ पकडला, नाही तर मला कळलेच नसते हिचे हे असले फालतू धंदे.’
‘दुबईत मैत्रिणीबरोबर मज्जा मारताना, लाखो रुपये उडवताना बायको नाही आठवली. गेले वर्षभर कामाच्या निमित्ताने दुबई दौरे करत जे रंग उधळले ते सगळं उघड झालं, मी जाब विचारला, म्हणून काल आकाशपाताळ एक केलंस ना…’
‘पण मी म्हणतो तुला काय गरज होती माझ्यावर नजर ठेवायची. हल्ली सगळेच परदेशात गेले की थोडी एन्जॉयमेन्ट करतात. मीही थोडी केली. त्यात काय बिघडलं? शेवटी घरीच येणार आहे ना…‘
संजीवचे हे उत्तर रुचीला अपेक्षित नव्हतं. ती अवाक होऊन आपल्या बदललेल्या बाबाकडे बघत राहिली. आईबाबाचे आरोप-प्रत्यारोप तिच्यासमोर त्यांच वेगळं रूप दाखवत होते.
’बघितलंस रुची, तुझ्या बाबाला आपल्या व्यभिचाराविषयी काही वाटत नाही. आपलं वागणं चुकलं याचीही त्याला लाज वाटत नाही.’
’यात लाज वाटण्यासारखं काय आहे. रुची, तुझी आई मागासलेल्या विचारांची आहे. आजकाल हे असले रिलेशनशिप कॉमन झाले आहेत.’
’अच्छा, मग आता मी किंवा रुचीने असे तुझ्या नकळत रिलेशन ठेवलेले चालतील ना…’ मनीषा कुत्सितपणे म्हणाली.
संजीवला काय बोलावं कळेना. तो उत्तर देत नाही हे बघून मनीषाने आपला तोंडाचा पट्टा पुन्हा चालू केला, ‘मला सांग, तू आमच्या मागे तपास करायला माणसं का लावली आहेस?’
‘कसला तपास? मी… मला नाही माहीत तुमच्या मागे कोण लागलं ते?’ संजीव उडवाउडवीचं उत्तर देत म्हणाला.
‘रुची, किती खोटं बोलतो हा माणूस. याच्या सांगण्यावरूनच त्या माणसाने माझा, तुझा पाठलाग केला असणार. त्याचा आपल्यावर विश्वास नाही म्हणून त्याचे हे असले फालतू चाळे चालू आहेत…’
रुची दोघांचं बोलणं अवाक होऊन ऐकत होती. बाबाला कुणीतरी आवडलं म्हणून त्याने या वयात दुसर्या स्त्रीबरोबर रिलेशन ठेवणं, आईने बाबावर नजर ठेवायला डिटेक्टिव्ह पाठवणं, मग बाबानेही तसंच करणं हे सगळं रुचीला खरं तर आवडलं नव्हतं. तसं पहायला गेलं तर आजच्या पिढीला रिलेशन ठेवायला आणि ते बदलायला वेळ लागत नाही. लिव्ह इन रिलेशनशिपवर विश्वास ठेवून अनेक जण असे रिलेशन बदलत रहातात हे रुचीला माहीत होतं. कुणी, कुणाशी, कधी-कुठे रिलेशन ठेवायचं ही तशी पहायला गेली तर वैयक्तिक गोष्ट आहे. पण याचा परिणाम दुसर्याच्या आयुष्यावर जर वाईट होत असेल तर त्या त्या माणसाने रिलेशन ठेवताना याचा विचार करायला हवा असं रुचीला वाटत होतं. त्यामुळे बाबाचं बोलणं तिला पटलं नाही. आई-बाबांच्या नात्याला हे अचानक आलेलं वळण कसं सरळ करावं याचा रुची गंभीरपणे विचार करू लागली.
थोडा वेळ सगळेच शांत बसले. नात्याचा गुंता सोडवण्यासाठी डिटेक्टिव्हच्या मदतीने शोध घेणं उपयोगाचं नाही. उलट त्यामुळे नातं अजून ताणतं. असं ताणलेलं नातं जास्त काळ टिकत नाही. नात्यातला दुरावा, निर्माण झालेला गैरसमज वेळच्या वेळी दूर करून नातं सांधायला हवं. कुटुंबात निर्माण होत असणार्या वादळाचा शोध घ्यायला कुणी परका डिटेक्टिव्ह उपयोगाचा नसतो. परक्या माणसाच्या सहभागामुळे नात्यातली चुकीची गोष्ट शोधता शोधता नातं दुरावतं व ते नातं सांधणं नंतर अवघड होत जातं. रुचीने हीच गोष्ट शांतपणे आईबाबांना समजावून सांगितली.
तिने स्पष्टपणे त्या दोघांना विचारलं, ‘तुम्हाला आता एकत्र रहावंसं वाटत नाही का? जर नसेल वाटत तर वेगळे व्हा. नाहीतरी या वयात लोक ग्रे डिव्होर्स घेतात. उगाच नातं कशाला ताणता?…’
रुचीच्या या प्रश्नाने संजीव व मनीषा दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांना डिव्होर्स माहीत होता, पण हे ग्रे डिव्होर्स प्रकरण कळेना. दोघंही बोलत नाही हे बघून रुची म्हणाली, ’आईबाबा, मी काय म्हणते ते कळतंय का?’
’रुची, तू ते ग्रे डिव्होर्स… म्हणजे नेमकं… तुझ्या मते आम्ही नेमकं काय करायला हवं…’
’बाबा, तुला ग्रे डिव्होर्स नाही माहीत… तू परदेशात इतक्या वेळा जाऊन आलास. अरे, तिथलीच कल्पना ती…’
संजीव कोड्यात पडलेला बघून रुचीने मनीषाला विचारले, ’आई, तुलाही याविषयी माहीत नाही का?’
’रुची, तू सरळसरळ सांग बरं काय ते…’ त्रासिक मुद्रेने मनीषा म्हणाली.
ग्रे डिव्होर्स शब्दांनी आईबाबांचे भांबावलेले चेहरे बघून खरं तर रुचीला हसूच आलं. पण चेहर्यावर हसू न आणता ती गंभीर चेहरा करत म्हणाली, ’सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन जो डिव्होर्स घेत आहेत, तो ग्रे डिव्होर्सच आहे.’
’ते चित्रपटातले कलाकार आहेत. त्यांना काय? आज ग्रे डिव्होर्स घेतील आणि उद्या रेड घेतील…’ थोडं रागात मनीषा उत्तरली.
’आई, तुला ग्रे डिव्होर्स कळला नाही. ज्यांनी पन्नाशी ओलंडली आहे, ज्यांचे केस पांढरे झाले आहेत, परदेशात त्यांना ग्रे हेअर असणारे स्त्रीपुरुष म्हटलं जातं, अशांनी घटस्फोट घेणं म्हणजे ग्रे डिव्होर्स. तुम्ही पण आता त्याच कॅटेगरीमध्ये येता, म्हणून म्हटलं की सध्याच्या ट्रेन्डनुसार ग्रे डिव्होर्स घेऊन मोकळं व्हा…’
‘ग्रे डिव्होर्स’ शब्द वेगळा असला तरी त्याचा अर्थ घटस्फोट घेणं हाच आहे हे कळल्यावर संजीव आणि मनीषा गंभीर झाले.
खरंच नातं संपवायचं का? आपण घेतलेल्या शोधाने आपला २५ वर्षांचा संसार मोडायचा की शोधलेल्या गोष्टी सुधारायच्या. मनीषाचे डोळे भरून आले. तिने संजीवकडे पाहिलं. तोही अस्वस्थ झाला होता. आपलं वागणं चुकलं असं त्यालाही आता वाटायला लागलं होतं. पण कुणीच काही बोलत नव्हतं.
शेवटी रुची म्हणाली, ‘मला वाटतं, आईबाबा, तुम्ही खरंच वेगळं व्हा. मला माहीत आहे. माझं मत तुम्हाला आवडणार नाही. नवराबायकोचं नातं एकदा संशयाच्या भोवर्यात अडकलं की सगळ्यांचीच फरपट होते. आपली सगळ्यांची फरपट होण्यापेक्षा तुम्ही स्वतंत्र व्हा, म्हणजे कुणालाच त्रास होणार नाही. तसंही माझं आता लास्ट इयर आहे. माझी चिंता करू नका. मला तुम्ही दोघे हवे आहात. आयुष्यभर माझ्या आईबाबांनी तुटलेल्या नात्यात प्रेम शोधणं मला आवडणार नाही. एकमेकांना दूषणं देत वेगळं होण्यापेक्षा बोलून, ठरवून वेगळं व्हा. अजून काय सांगू…’
रुचीचा कंठ दाटून आला होता. २५ वर्षांच्या सुखी संसारात असा प्रसंग येईल असे संजीव व मनीषाला कधी वाटले नव्हते. नातं असं पणाला लागलेलं दिसताच दोघेही गांगरले. संजीव नरमाईने मनीषाकडे पहात म्हणाला, ‘माझं चुकलं. मला क्षमा कर. या वयात दुसर्या स्त्रीशी मी संबंध ठेवायला नको होते. तुला पटणार नाही, पण माझं तुझ्याशिवाय कुणावर प्रेम नाही. एका मोहाच्या क्षणी माझा पाय घसरला. हे मी तुला सांगणार होतो, पण माझी हिंमत झाली नाही. तुला टाळत राहिलो आणि तुझ्यापासून दूर होत गेलो. जिच्याशी मी नातं जोडलं होतं नंतर ती मला ब्लॅकमेल करायला लागली. तुम्हाला त्रास देण्याच्या धमक्या देऊ लागली. म्हणून मग मला तुमच्यावर लक्ष ठेवायला माणूस ठेवायला लागला. तुम्हाला कुणी धमकीचा फोन किंवा मेल करतं का हे पाहण्यासाठी तुमचा मोबाईल तपासायला लागलो. तू घाबरून परस्पर कुणाला पैसे देऊ नयेस म्हणून तुझं अकाऊंट मी तुला न सांगता माझ्या अकाऊंटशी जोडून घेतलं होतं.’
‘बाबा, हे तू आम्हाला आधी विश्वासात घेऊन स्पष्ट सांगायला हवं होतंस’, थोडं रागावत रुचीने नाराजी व्यक्त केली.
‘रुची, खरं सांगू, मी घाबरलो होतो… मला वाटलं तुम्ही मला समजून नाही घेतलं तर… मला तुम्हाला गमवायचं नाही.’ संजीव डोळ्यात पाणी आणून बोलत होता.
मनीषा आपल्या जागेवरून उठून संजीवजवळ आली. त्याच्याविषयीचा तिचा राग मावळला होता. त्याचा हात हातात घेत ती म्हणाली, ‘संजीव, तुझ्या वागण्याचा मला खूप त्रास झाला रे… पण तू अजूनही माझा, रुचीचा विचार करतोस हे ऐकून बरं वाटलं. तू एकदा बोलायला हवं होतंस. ‘
संजीवच्या भरल्या डोळ्यांतून अश्रू टपकू लागले. त्याने मनीषाचा हात घट्ट धरत म्हटलं, ‘मनीषा, मला तुम्हा दोघींना सोडून नाही राहायचं. तुमच्याशिवाय आयुष्याची कल्पना मी नाही करू शकत… आपण पूर्वीसारखं आयुष्य पुन्हा जगूया काय?’
मनीषाने होकारार्थी मान हलवली.
रुचीने धावत येऊन संजीवला व मनीषाला मिठी मारली. ती म्हणाली, ’आईबाबा, रात्रभर मी खूप टेन्स होते. सकाळपासून तुमचं बोलणं ऐकून वाटलं आता आपलं कुटुंब तुटतं की काय? पण आई, तू बाबाची एवढी मोठी चूक पदरात घेतलीस. तू ग्रेट आहेस… आता दोघंही लक्षात ठेवा, प्रेमाचा शोध घेण्यासाठी बाहेर जाऊ नका. प्रेमाचा शोध आपल्या प्रेमाच्या माणसाशी बोलून घ्या, म्हणजे नको असणारे प्रश्न निर्माण होणार नाहीत.’ रुचीने स्मित करत वातावरणातला तणाव नाहीसा करण्याचा प्रयत्न केला.
आज आपल्या मुलीमुळे पती-पत्नीतल्या प्रेमाचा शोध आपण नव्याने घेऊ शकलो हे मनीषाला जाणवलं. तिचं तुटणारं कुटुंब सावरलं होतं. तिने मनात देवाचे आभार मानले आणि रुचीला प्रेमाने कुरवाळत स्वच्छ मनाने संजीवकडे पाहिलं…