नियमावली, मार्गदर्शक तत्वे तंतोतंत पाळली गेली तर दुर्घटना टाळता येतील, पण बर्याचदा राजकीय हस्तक्षेप अथवा पोलिस आणि प्रशासन यांचे हात ओले करून घाईत परवानगी मिळवली जाते. त्या भ्रष्टाचाराने दुर्घटना होतात, माणसे मरतात. भारताने विश्वचषक जिंकल्यावर काही दिवसात जो मुंबईत विजययात्रेचा कार्यक्रम झाला, ज्यात आठ लाख इतकी गर्दी दक्षिण मुंबईत जमली त्यावेळेस काटेकोर आपत्कालीन नियोजन केलेले होते का?
– – –
चेंगराचेंगरी होऊन गर्दीत गदमरून मरणे याइतके भयंकर मरण नसावे. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीत १२० जणांचा भयंकर मृत्यू झाला. मुंबईत विश्वजेत्या क्रिकेटपटूंच्या मिरवणुकीत अशा प्रकारची मोठी दुर्घटना होता होता सुदैवानेच टळली, कारण या मिरवणुकीतही चेंगराचेंगरीला सुरुवात झाली होती याची साक्ष मिरवणूक संपल्यावर पडलेला चपलांचा खच देत होता आणि मिरवणुकीतील बर्याच जणांना श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवू लागला होता, काहींना रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले, हे आता बाहेर आले आहे.
सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रेत २००५ साली आग आणि चेंगराचेंगरीत ३४० जणांचा मृत्यू झाला होता. ही हृदय हेलावून टाकणारी दुर्घटना दुर्दैवाने ती ना पहिली होती, ना शेवटची. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच कुंभमेळ्यात तीन फेब्रुवारी १९५४ रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील चेंगराचेंगरीत आठशे माणसे मृत्यू पावली. तिथपासून धार्मिक सत्संग, मेळे, सोहळे अशा कार्यक्रमांतील गर्दीत गुदमरून जीव जाण्याचे प्रकार आजवर थांबवता आले नाहीत. गेल्या काही वर्षांतील अशा घटनांची संख्या प्रचंड मोठी आहे. अगदी थोडक्यात उल्लेख करायचा तरी मोठी यादी बनते. इंदौर येथे ३१ मार्च २०२३ साली हवन व पुजाविधी सुरू असताना एक विहीर कोसळून ३६ मृत्यू, जम्मूत वैष्णोदेवी दर्शनात १ जानेवारी २०२२ साली चेंगराचेंगरीत १२ मृत्यू, आंध्रातील राजमुंद्री येथे पुष्कर उत्सवात गोदावरी नदीत स्नान करताना १४ जुलै २०१५ साली २७ मृत्यू, तीन ऑक्टोबर २०१४ला पाटणा येथील गांधी मैदानात दसरा मेळावा साजरा करताना चेंगराचेंगरीत ३२ मृत्यू, १३ ऑक्टोबर २०१३ला मध्य प्रदेशातील रतनगढ येथे नवरात्र उत्सवात चेंगराचेंगरीत ११५ मृत्यू, १९ नोव्हेंबर २०१२ला पाटणा येथे छठपूजेदरम्यान चेंगराचेंगरीत २० मृत्यू, १४ जानेवारी २०११ रोजी केरळमधील शबरीमला येथे यात्रेकरूंवर जीप चढल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत १०४ मृत्यू, ४ मार्च २०१० रोजी उत्तर प्रदेश येथील प्रतापगढ जिल्ह्यातील रिम जानकी मंदिरात कृपालू महाराजांनी फुकट कपडे आणि अन्नधान्य वाटताना झालेल्या चेंगराचेंगरीत ६३ मृत्यू , ३० सप्टेंबर २००८ साली राजस्थान येथील चामुंडा मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने झालेल्या चेंगराचेंगरीत २५० मृत्यू, अशी ही विषण्ण करणारी आकडेवारी आहे. ज्यात दोन पाच जण मृत्यू पावले आहेत, अशा घटना तर शेकडोंनी असतील. सार्वजनिक ठिकाणी होणार्या गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये या प्रकारच्या घटना थांबवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आहेत, कडक नियम आहेत, परवानग्या घेण्याची सक्ती आहे तरी आजपर्यंत अशा दुर्घटना थोपवणे कोणाला जमले नाही. याचा संपूर्ण दोष पोलीस आणि प्रशासनाला देता येत नाही. मग यात खरे दोषी कोण असतात याचा नीट विचार केला, तर असे लक्षात येते की यात बहुतेक वेळा ती आयोजकांचीच प्राथमिक चूक असते. कधी त्यांचे नियोजन चुकते, कधी गर्दीचा अंदाज चुकतो, कधी पुरेसे स्वयंसेवक नसतात. धार्मिक कार्यक्रमात नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे पोलीस आणि प्रशासनाला अवघड जागेचे दुखणे असते. भारतात आजवर चेंगराचेंगरी होण्याच्या ज्या घटना घडल्या आहेत, त्या बहुतांश घटना या धार्मिक कार्यक्रमातील ढिसाळ नियोजनाने घडल्या आहेत. २०१३ साली आपत्ती व्यवस्थापनावर संशोधन करणार्या आयजेडीडीआर या आंतरराष्ट्रीय संस्थेने एक निरीक्षण नोंदवले, ज्यानुसार भारतातील ७९ टक्के चेंगराचेंगरीच्या घटना या धार्मिक कार्यक्रमात झाल्याचे नोंदवले आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण ही संस्था थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधिपत्याखाली येते, तिचे काम देशातील आपत्ती निवारण करण्याचे, जीवितहानी व इतर हानी थोपवण्याचे आहे, त्याच प्राधिकरणाने देशातील चेंगराचेंगरीच्या घटना रोखण्यासाठी २०१४ साली मार्गदर्शक तत्वे बनवली होती. दुर्दैवाने ती तत्त्वे तंतोतंत पाळली जात नाहीत. गर्दी, जमाव आणि सभा या सर्व ठिकाणी मोठ्या संख्येत लोक एकत्र येत असले तरी त्यात मूलभूत फरक असतो. गर्दी ही कधीच शिस्तबद्ध नसते, अनियंत्रित पद्धतीने लोक जमतात. या गर्दीचा हेतू चुकीचा नसतो, ती अहिंसक असते. चुकीच्या हेतूने प्रेरित होत हिंसक गर्दी जमली असेल तर तो जमाव असतो. हीच गर्दी जर नियंत्रणात असेल, शिस्तबद्ध असेल तर ती सभा असते. एखादा हिंसक जमाव जमला असेल तर पोलिस आपल्या बळाचा संपूर्ण वापर करू शकतात, पण तीच गर्दी जर चांगल्या हेतूने जमली असेल तर पोलिसांच्या बळाच्या वापरावर मर्यादा येतात. यासारख्या अनेक बाबींचा राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण (एनडीएमए) अभ्यास करते व उपाय योजना आखते. या प्राधिकरणाने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन कोणत्याही कार्यक्रमाच्या पूर्वपरवानगी मिळवण्यासाठी आवश्यक असते. देशात नैसर्गिक अथवा मानवनिर्मित अशी कोणतीही आपत्ती आली तर हे प्राधिकरण राष्ट्रीय आपत्ती निवारण सेनाबल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारण सेनाबल (एसडीआरएफ) आणि राज्य आपत्ती निवारण प्राधिकरण (एसडीआरए) यांची मदत घेत अशा आपत्तीचा सामना करते. चेंगराचेंगरीच्या घटनेला त्वरित हाताळण्याची जबाबदारी हा याचाच भाग आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने देशातील चेंगराचेंगरीच्या घटना रोखण्यासाठी २०१४ साली मार्गदर्शक तत्वे बनवली होती आणि ती तत्वे व नियमावली प्रशंसनीय आहेत. शंभर पानांच्या नियमावलीचा अत्यंत संक्षिप्त सारांश खाली मांडला आहे, तो पाहिला तरी कार्यक्रमाची परवानगी घेणे म्हणजे सकाळी अर्ज केला आणि घेतली संध्याकाळपर्यंत परवानगी असे नसते, हे सर्वांनाच अगदी पोलिस व प्रशासनाला देखील लक्षात येईल.
कार्यक्रमाचे स्वरूप
गर्दी जमेल अशा कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी द्यायची असेल तर आधी त्या कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घ्यावे असे मार्गदर्शक तत्व आहे. म्हणजेच तो कार्यक्रम धार्मिक, शाळा/विद्यापीठ/युवा महोत्सव, क्रीडा कार्यक्रम (मॅरेथॉन देखील), संगीत कार्यक्रम (रॉक/शास्त्रीय) अथवा राजकीय आहे हे पाहावे असे सांगितले आहे. कार्यक्रम जर धार्मिक असेल तर त्यात दुर्घटनेची शक्यता जास्त असे सरळ गणित आहे.
गर्दीचे स्वरूप
गर्दीचे व्यवस्थापन करताना ती गर्दी कशी असेल याचे आकलन असावे लागते. अपेक्षित गर्दीत जमणार्यांचे अंदाजे सरासरी वय, लिंग हे पाहून त्याचे नियंत्रण कसे करावे हे ठरवावे लागते. उदाहरणार्थ रॉक संगीताच्या कार्यक्रमाला तरुणाई येणार आणि ती थोडीफार बेभान होणार हे अपेक्षित असते तर एखाद्या सत्संगाला महिला, चाळीशीपार पुरूष व वृद्ध जास्त असू शकतात.
गर्दीचा/कार्यक्रमाचा हेतू
जमणारी गर्दी ही एकाद्या सामाजिक, राजकीय, धार्मिक उद्देशाने एकत्र आली आहे का मनोरंजनासाठी जमली आहे, याचे आकलन असणे आवश्यक असते. सहसा सामाजिक उपक्रमासाठी जमलेली गर्दी काहीएक भान ठेवून असते तर मनोरंजनासाठी जमलेली गर्दी बेभान असते. राजकीय गर्दीचे नियंत्रण ठेवण्यास पुरेसे कार्यकर्ते असतात. धार्मिक हेतूने जमलेल्या गर्दीची संख्या निश्चित करणे सोपे नसते.
कार्यक्रमाचे स्थळ
आपत्ती रोखण्यासाठी कार्यक्रमाचे स्थळ कोणते असावे हे निश्चित करणे महत्वाचे ठरते. कार्यक्रमाची जागा ही मैदानी आहे का डोंगराळ भागातील आहे हे पाहावे लागते. बहुतेक देवीची मंदिरे ही डोंगरमाथ्यावर असतात (उदा. मांढरदेवी दुर्घटना झाली ते मंदिर). त्यामुळेच अशा ठिकाणी वेगळे व्यवस्थापन लागते. कार्यक्रमाची जागा ही तात्पुरती का कायमस्वरूपी, खुली का मर्यादित व बंदिस्त, सार्वजनिक का खाजगी आहे हे लक्षात घ्यावे, तशीच त्या जागेची कमाल क्षमता देखील पाहावी हे संकेत आहेत.
सभोवतालचा परिसर
कार्यक्रम जिथे होणार त्याच्या सभोवतालचा परिसर, रस्ते, वाहनतळ हे पाहणे आवश्यक आहे. आजूबाजूची दुकाने व इतर इमारती तसेच तेथील लोकवस्ती व तिचे स्वरूप पाहाणे आवश्यक आहे.
आयोजकाची पात्रता
कार्यक्रमाचे आयोजन करणारी व्यक्ती, संस्था अथवा पक्ष यांची सक्षमता तपासणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. हाथरस येथील नुकतीच घडलेली दुर्घटना ही लायकी नसलेल्या एका बाबाला इतकी गर्दी जमवण्याची परवानगी दिल्यानेच झाली आहे. आयोजकांची कुंडली तपासली तरच निष्पाप जिवांचे मरण टळेल. आयोजक राजकीय, धार्मिक वा व्यावसायिक आहे, त्याचा आर्थिक स्तर, त्याचा आयोजनाचा अनुभव, त्याची गर्दी व्यवस्थापन करण्याची क्षमता, त्याची नियोजनाची क्षमता, त्याची जोखीम टाळण्यासाठी ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्याची तयारी अशा अनेक बाबींवर आयोजकाला किती गर्दी जमवण्याची परवानगी द्यावी याचे मूल्यांकन करावे लागते.
एकदा वरील सर्व बाबी समाधानकारक वाटल्या, तरच मग त्या आयोजकाकडून कार्यक्रमस्थळाचा आराखडा मागवला जावा, ज्यात आत व बाहेर येण्याची प्रवेशद्वारे, मार्गिका आणि इतर आपत्कालीन उपाययोजना, उदा. आगरोधक उपाययोजना, यांची नोंद असावी असे नियम आहेत. एकदा हा आराखडा मंजूर झाल्यावर मग त्या ठिकाणचे संबधित पोलिस, अग्निशमन दल, प्रशासन यांनी एक रंगीत तालीम घ्यायची असते.
थोडक्यात जर नियमावली, मार्गदर्शक तत्वे तंतोतंत पाळली गेली तर दुर्घटना टाळता येतील, पण बर्याचदा राजकीय हस्तक्षेप अथवा पोलिस आणि प्रशासन यांचे हात ओले करून घाईत परवानगी मिळवली जाते. त्या भ्रष्टाचाराने दुर्घटना होतात, माणसे मरतात, बातम्या येतात. थोड्या दिवसाने परत तेच होते जे आधी झाले. भारताने विश्वचषक जिंकल्यावर काही दिवसात जो मुंबईत विजययात्रेचा कार्यक्रम झाला, ज्यात आठ लाख इतकी गर्दी दक्षिण मुंबईत जमली त्यावेळेस काटेकोर आपत्कालीन नियोजन केलेले होते का? वर निर्देशित नियम व तत्वे न पाळता निव्वळ भाजपाला श्रेय लाटायचे म्हणून घाईत नियोजन केले असेल तर ते योग्य ठरते का? असे प्रश्न फक्त दुर्घटना घडल्यावर विचारायचे असतात का? एखादी दुर्घटना घडली नाही म्हणून लाखोंच्या जिवाशी खेळ करायचे कार्यक्रम नियम तोडून आयोजित केले तर चालेल का?
हा लेख लिहीत असताना पुरी येथील जगन्नाथ यात्रेत एका भाविकाचा मृत्यू झाला. एकाच भाविकाचा मृत्यू झाल्याने त्याची मोठी बातमी झाली नाही. थोडक्यात मृतांचा आकडा मोठा असेल तर मोठी बातमी होणे ही माध्यमातून जन्माला आलेली एक विकृती आहे तसे नसते तर अनेकांना विविध त्रास आणि किरकोळ दुखापती झालेल्या मुंबईतल्या क्रिकेट विश्वचषक विजय यात्रेवरही माध्यमांमध्ये सडकून टीका व्हायला हवी होती. खारघरमध्ये एका लहान मॅरेथॉनसाठी आयोजकांना नुकतीच परवानगी नाकारली गेली. ते कदाचित योग्य देखील असेल. पण मग तेच पोलिस त्याच खारघरमध्ये लाखो भाविकांची गर्दी जमवणार्या महाराष्ट्र भूषण किंवा तथाकथित अश्वमेध यज्ञांच्या कार्यक्रमांना परवानगी देताना इतके काटेकोर वागतात का? अत्यंत खुले व मोठे मैदान असून देखील ढिसाळ नियोजन व पोलिसांच्या बेपर्वाईने खारघरच्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात निष्पाप भाविकांवर जीव गमावण्याची वेळ आली. आजवरच्या झालेल्या घटना निव्वळ दुर्दैवी म्हणून सोडून द्यायच्या का त्यातून बोध घेत त्या टाळायच्या हे ठरवायची निर्णायक वेळ आता येऊन ठेपली आहे. नाहीतर हाथरस तो झाकी है, बडे हादसे बाकी है असेच होईल, हे अत्यंत नाईलाजाने नमूद करावेसे वाटते.