जुलियन असांज जवळपास १२ वर्षांच्या तुरुंगवासातून अखेर मुक्त झाला. सरकारांनी गुप्त ठेवलेली माहिती चोरून ती वर्तनामपत्रांना देणं हा आरोप असांजवर होता.
२०१२ साली असांजनं अमेरिकन कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी लंडनमधल्या इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला. इक्वेडोरमधे राजकीय उलथापालथ झाल्यानंतर इक्वेडोरनं असांजला आश्रय नाकारला. असांज लंडनमधल्या तुरुंगात रवाना झाला. परवा त्याची सुटका झाली, तो आपल्या ऑस्ट्रेलियातल्या घरी परतला.
असांज ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे.
हेरगिरी कायद्याचा भंग केल्याचा आरोप मान्य करून जुलियन असांजनं अमेरिकन सरकारला वृत्तपत्रांचा गळा आवळायला परवानगी दिली आहे. वृत्तपत्रांच्या इतिहासातली ही एक गंभीर घटना आहे.
ज्युलियन असांजनं अमेरिकन सरकारची गुप्त माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल माफी मागितली, हेरगिरी कायद्याचा भंग केला अशी कबुली दिली आणि सुटका करून घेतली. आता त्या आरोपाखाली त्याच्यावर अमेरिकेच्या कोर्टात खटला होईल; आधीच कबुली दिलेली असल्यानं कदाचित त्याला कमी शिक्षा होईल.
या भानगडीत गुप्त माहिती प्रसिद्ध करणं हा गुन्हा ठरणार आहे. या पूर्वी अमेरिकेत अशी माहिती प्रसिद्ध करणं हा गुन्हा नव्हता, माहिती प्रसिद्ध करणं हे पेपरांचं आद्य कर्तव्य आहे असं अमेरिकन राज्यघटनेनं पहिल्या घटनादुरुस्तीनंतर मान्य केलं होतं. ट्रंप यांच्या कारकीर्दीत सुरू झालेल्या या खटल्यानं, बायडन यांच्या कारकीर्दीत असांजवर खटला भरून अमेरिकन राज्यघटना तुडवली आहे.
बराक ओबामा आणि जो बायडन यांच्या सरकारांनी खटला होऊ नये असा प्रयत्न केला. अमेरिकन सरकारचा कायदा विभाग ठाम राहिला. त्या विभागानं बायडन यांचं म्हणणं अमान्य करत खटला टोकाला नेऊन असांजला दोषी ठरवलं.
जुलियन असांजनं विकिलीक्स या संस्थेतर्फे २०१० साली अमेरिकन लष्करी दफ्तर आणि राजदूतांचे पत्रव्यवहार यातली माहिती गोळा केली. ती माहिती गार्डियन, न्यू यॉर्क टाईम्स इत्यादी वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केली. असांज हा तांत्रिकदृष्ट्या पत्रकार नव्हता, बातमीदार नव्हता. पेपरांनी त्याचा उपयोग माहितीचा उगम, सोर्स अशा स्वरूपात केला.
कुठलंही वर्तमानपत्र या रीतीनं काम करतं. अनेक माणसं आपणहून वृत्तपत्रांना माहिती देतात, वर्तमानपत्र तिचा खरेखोटेपणा पाहून ती माहिती छापतं. सरकार, बलाढ्य कॉर्पोरेशन्समधे अनेक बेकायदेशीर, अनैतिक व्यवहार होत असतात. हे व्यवहार आपल्या विवेकास पटत नाहीत असं म्हणून तिथली माणसं त्याची माहिती वृत्तपत्रांना देतात.
निक्सन यांनी कायदा, स्वातंत्र्य पायदळी तुडवून विरोधकांना नामोहरम करण्याचा उद्योग केला. एफबीआय या पोलिस खात्याच्या संचालकाला ते उद्योग दाचले, त्याने पेपरांना माहिती फोडली. त्याच माहितीच्या आधारे बॉब वुडवर्ड आणि कार्ल बर्नस्टीन यांनी टाइम्समधून बातम्यांचा पाऊस पाडला. शेवटी निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला.
वॉटरगेटमधे माहिती देणारा माणूस `आतला’ होता. विकीलिक्स प्रकरणातला माहिती देणारा माणूस, असांज, बाहेरचा होता.
इराकमधे अमेरिकेनं सैन्य घुसवलं होतं. एक अमेरिकन हेलिकॉप्टर कामगिरीवर निघालं, काहीही कारण नसताना निष्पाप नागरिकांना गोळ्या घातल्या. मेलेल्यात रोटर या वृत्तसंस्थेचा एक बातमीदार होता. रोटरनं प्रकरण धसाला लावण्याचा प्रयत्न केला, पण बलाढ्य सरकारसमोर रोटर अशक्त ठरलं.
गोळीबार करणारा गनर, हेलेकॉप्टरचा पायलट यांनी घटना घडत असताना या घटनेची चर्चा आपल्या अधिकार्यांशी, फोनवरून केली होती. हेलिकॉप्टरवर चित्रीकरणाची सोय होती, त्यावर चित्रीकरण झालं होतं. या गोष्टी लष्कराच्या दफ्तरी दाखल होत्या. आपण काही वाईट केलंय, काही बेकायदेशीर आणि अमानवी कृत्य केलंय असं त्या सैनिकांना वाटलं नाही.
हीच तर गंमत असते. आईकमननं लाखो ज्यूंना जाळून मारलं. आपण गैरकृत्यं केलंय असं त्याला वाटलं नाही. तो सुखात होता, त्यानं आपल्या वरिष्ठांच्या आज्ञा पाळल्या होत्या. सरकारी सेवा प्रामाणिकपणे केल्याबद्दल त्याला बढती आणि वाहवाही मिळाली होती. आईकमन कुठल्याही सामान्य माणसाप्रमाणं आपल्या बायकापोरांमधे सुखानं जगत होता. त्यानं गुन्हाच केलेला नव्हता.
गुप्तचरांनी त्याला हुडकला. न्यूरेंबर्ग खटल्यात उभा केला. भले त्यानं देशाच्या कायद्याचं पालन केलं असेल, पण शेवटी मानवता ही देश वगैरेच्या पलीकडं असते हे तत्व मांडून न्यायाधिशांनी आईकमनला फाशी दिली.
इराकमधे अमेरिकन सैनिकांच्या हातून गैरकृत्य घडलं होतं. त्यांचं कृत्य अमानवी होतं. विकीलीक्सनं ती माहिती गोळा केली आणि पेपरांमधून मांडली. असांज किंवा विकीलीक्स म्हणजे पोलीस नव्हेत की न्यायाधीश नव्हेत. पेपरांनी माहिती, सत्य, मांडण्याचं आपलं कर्तव्य पार पाडलं.
वांधा असा झाला की या माहितीमुळं सैन्यातले ते लोक कोण होते, त्यांचे वरिष्ठ कोण होते हे उघड झालं. सरकारचं म्हणणं असं की त्यामुळं संबंधित सैनिकांना धोका पोहोचत होता, त्यांचं आयुष्य संकटात पडत होतं. विकीलीक्स प्रसिद्ध करत असलेली माहिती गुप्त स्वरूपाची असल्यानं अमेरिकेचे गुप्तहेर, नाना बुरख्यांखाली वावरणारे सीआयएचे अधिकारी इत्यादी उघडे पडणार होते, देशाचं नुकसान होणार होतं.
सरकार, देश, वाचवण्यासाठी सरकारला गुप्तता पाळावी लागते असं सरकारचं म्हणणं.
गार्डियन, टाईम्सचं म्हणणं असं की पेपर म्हणजे सरकार नसतं. सरकारनं सरकारचं पाहून घ्यावं, पेपराचं काम सत्य जनतेसमोर मांडण्याचं असतं. ती माहिती जनतेसमोर आल्यानंतर सरकारनं काय करायचं हा सरकारचा प्रश्न असतो. पेपरांचं काम सत्य मांडणं हेच असतं.
निक्सन यांचं सरकार धोक्यात आलं असतं, रशिया-चीन इत्यादी देशांनी त्याचा फायदा करून घेतला असता, अमेरिका हा देश अशक्त झाला असता वगैरे गोष्टींचा विचार सरकारनं करावा. निक्सन जे करत होते ते देशाच्या कायद्याच्या, मानवी मूल्यांच्या, स्वातंत्र्याच्या नुकसानीचं होतं आणि ते लोकांसमोर ठेवणं हे पेपरांचं कर्तव्य होतं.
प्रत्येक धटिंगण, प्रत्येक क्रूरकर्मा, प्रत्येक हुकूमशहा आपण जे काही करतो ते देशाच्या हितासाठीच असतं असा दावा करत असतो. ते खरं की खोटं हे जनतेनं ठरवायचं असतं, ते ठरवण्यासाठी आवश्यक माहिती पेपर जनतेला पुरवत असतात.
आपली कारवाई मानवतेच्या भलाईसाठी, लोकशाहीच्या भलाईसाठी होती असा दावा अमेरिका वियेतमान युद्धात करत होती. मारू नका हो अशी याचना करणारी नागडी उघडी मुलं समोर दिसत असताना अमेरिकन सैनिकांनी त्यांना गोळ्या घालून मारलं. ते फोटो छापू नका असा दबाव पेपरांवर होता, ते फोटो छापणं हा देशद्रोह होईल असं म्हणत सरकार पेपरांना खटल्यात गोवण्याच्या विचारात होतं. स्वत:ला जाळून घेणार्या भिक्षूचा फोटो जेव्हा सरकारची नाराजी पत्करून पेपरांनी छापला तिथून वियेतनाममधलं सत्य समोर आलं.
इराकमधे, अफगाणिस्तानात, जे काही माती मसण अमेरिकेला करायचं होतं ते अमेरिकेनं खुश्शाल करावं. तिथल्या घटना लोकांसमोर ठेवणं हे आपलं कर्तव्य होतं असं अमेरिका, युरोपातले पेपर म्हणाले, त्यांनी विकिलिक्सनं दिलेली माहिती छापली.
सुरुवातीला अमेरिकन लष्करात विश्लेषक म्हणून काम करणार्या चेल्सी मॅनिंगनं कागदपत्र डाऊनलोड केले, झेरॉक्स केले, असांजकडे सोपवले. मॅनिंगला नोकरीच्या अटींचा भंग केल्याबद्दल तुरुंगवास झाला. पण त्या आधी असांजनं हॅकिंगचं तंत्र अवगत केलं होतं. असाजनं ऑस्ट्रेलियात असताना १९९०च्या दशकात अनेक बँकांच्या कॉम्प्युटरमध्ये घुसून तिथली माहिती काढली होती, ऑस्ट्रेलियाच्या सरकारी कॉम्प्युटरमधेही तो घुसला होता. खरं म्हणजे तो पत्रकार नव्हता. कॉम्प्युटरमध्ये घुसणं, त्यातली कोडेड माहिती डिकोड करणं यात त्याला प्रचंड रस होता. तो उद्योग करण्यात त्याला प्रचंड थरार मिळत असे. तीच त्याची प्रेरणा होती. हे उद्योग केल्याबद्दल असांजला ऑस्ट्रेलियात शिक्षाही झाली होती. एकदा तर त्याला २५० वर्षांची शिक्षा होतेय की काय अशा वळणावर खटला पोचला होता.
हे कसब त्यानं नंतर राजदूत आणि सरकारं यांच्यातला पत्रव्यवहार हस्तगत करण्यासाठी वापरलं. त्याला कळलं की या माहितीला माध्यमात मागणी आहे. तिथून विकिलिक्स २००६ साली सुरू झालं. जबाबदार आणि प्रतिष्ठित पेपरांचे संपादक, प्रतिनिधी त्याच्याबरोबर तासनतास बसत. माहितीची शहानिशा करत. २०१० साली अमेरिकी हेलिकॉप्टरचा व्हिडियो त्यानं प्रसिद्ध केला आणि बोंब झाली. त्यानंतर त्यानं हज्जारो कागदपत्र वृत्तपत्रांना दिले.
सरकारांची पंचाईत झाली. पण त्याला कोणत्या कायद्याखाली पकडावं ते अमेरिकेला कळेना. एक तर तो ऑस्ट्रेलियाचा नागरिक. दुसरं म्हणजे तांत्रिकदृष्ट्या पत्रकार नाही. अमेरिकेनं स्वीडिश सरकारशी संगनमत करून त्याला बलात्काराच्या आरोपाखाली पकडलं आणि खटला लावला. स्वीडिश सरकारनं पकडायचं आणि अमेरिकेच्या स्वाधीन करायची अशी अमेरिकेची आयडिया. अमेरिकेत गेला की त्याला मरेपर्यंत तुरुंगवास किंवा फाशीही होणार हे नक्की. असांज पळाला. दुनियाभर फिरला. मग इक्वेडोरचा आश्रय, नंतर ब्रिटीश जेल. सुमारे १२ वर्षं तो तुरुंगवासात होता. शेवटी पाच वर्षं रीतसर तुरुंगवास, त्याआधी दूतावासात अडकलेला, ब्रिटीश पोलीस त्याला बाहेर पडू देत नव्हते.
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा लढा देणार्या संस्था, पत्रकार आणि वकिलांनी त्याचा लढा लढवला.
हेरगिरी कायद्याचा भंग ही तडजोड त्यानं स्वीकारलीय. काहीशी कमी शिक्षा होईल अशी त्याची अपेक्षा आहे.
असा खटला भरता येतो, जिंकता येतो असा पायंडा पडला की इथून पुढं सरकारची कोणतीही गुप्त माहिती, दडवलेली माहिती, प्रसिद्ध करणं वृत्तपत्रांना जड जाईल.
सरकार आता वृत्तपत्रांच्या गळ्यापासून एक इंच अंतरावर पोचलं आहे.