मी आठ दहा वर्षांचा असेन, एका रविवारी आमच्या बिल्डिंगखालच्या पानवाल्याकडे खूप गर्दी जमलेली दिसली. मला वाटलं की हाणामारी असेल. गिरणी संप काळात गिरणगावात कशावरूनही हाणामारी होणं नित्याचं झालं होतं. मोठ्याने आवाज ऐकायला येत होते, पण गर्दीत कोणतीही हालचाल दिसत नव्हती. पुढे जाऊन पाहिलं तर पानवाल्याच्या टेपरेकॉर्डरवर नेहमीच्या गाण्याऐवजी मोठमोठ्याने बोलण्याचे आवाज येत होते आणि ते ऐकायला लोक थांबले होते हे दिसलं. एका मोठ्या म्युझिक पीसनंतर ‘लोहा लोहे को काटता है’ असा संवाद माझ्या कानावर पडला. पानाचा खप वाढवण्यासाठी आमच्या रामखिलावन भय्याने चतुराईने नेहमीच्या गाण्यांऐवजी शोले सिनेमाची ऑडियो कॅसेट लावली होती. पुढील दोन तास मी इतर लोकांसोबत मी तिथेच उभा राहून `शोले’मय झालो. तोपर्यंत सिनेमा डोळ्यांनी पाहतात, कानांनी ऐकतात हे समजलं होतं; सिनेमा फक्त ऐकलाही जाऊ शकतो हे त्या दिवशी कळलं.
तेव्हा बर्याचदा असं व्हायचं की लोक सिनेमा बघून यायचे आणि ऑडियो कॅसेट ऐकायला थांबायचे किंवा कॅसेटवर ऐकलेला सिनेमा पडद्यावर दिसतो कसा, ते बघायला थेटरच्या वार्या करायचे. गब्बरच्या बुटांचा आवाज, जय वीरूच्या मोटर सायकलचा आवाज, असरानीचं ‘आधे इधर जावं आधे उधर जाव,’ बसंतीचं ‘चल धन्नो’ हे सगळे आवाजाच्या स्वरूपात साठवले गेले, कारण ते आवाज प्रभावी होते. इतना सन्नाटा क्यू है भाई, हा संवाद ऐकताना खरोखरच निरव शांतता पसरायची, एखाद्याने तेव्हा त्या शांततेचा चुकूनही भंग केला तर भरलीच त्याची कंबक्ती. आवाज, संवाद आणि विराम हे सगळेच प्रभावी असतात, तेव्हाच त्याचे डायलॉग होतात. अशा डायलॉगवरच तर हिंदी सिनेसृष्टी बहरली आहे.
दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली राजा हरिश्चंद्र सिनेमाची निर्मिती करून भारतीय चित्रपटसृष्टीची मुहुर्तमेढ रोवली. पुढे १९३४ साली आलम आरा या सिनेमाने भारतीय चित्रपट बोलू लागला. रामायण-महाभारत, कथा कथन, नाटक यात रमणार्या सर्वसामान्य भारतीय समाजमनाला सिनेमा या माध्यमाने भुरळ घातली. पुढे सिनेमा रंगीत झाला, सिनेमाचा आवाज डॉल्बी डिजिटलमधे ऐकू येऊ लागला. सिंगल स्क्रीन थिएटरचे मल्टिप्लेक्समध्ये रूपांतर होणे अशा अनेक उलथापालथी झाल्या. सिनेमा हे दृश्यात्मक माध्यम. विनाध्वनीचा सिनेमा असू शकतो, विनादृश्यांचा सिनेमा असू शकत नाही. पण, आपला भारतीय प्रेक्षक ‘बोलपटां’चा चाहता. सिनेमा पाहून घरी जाताना दिग्दर्शकाने काय फर्स्ट क्लास क्लोज अप शॉट घेतला होता, हे तो लक्षात ठेवत नाही तर ‘मेरे पास माँ है’, ‘कितने आदमी थे’ असे डायलॉग तो लक्षात ठेवतो आणि ते बोलतो देखील. पडद्यावरील गरीब घरातला हिरो धनाढ्य, ताकदवान खलनायकाला आपल्या स्टाईलने चार गोष्टी सुनावतो, तेव्हा हिरोच्या जागी स्वतःला ठेवून सिनेप्रेक्षक ते डायलॉग
मनोमन आपल्या जीवनातील खलनायकाला उद्देशून हाणत असतात. अर्थात, सिनेमा बोलायला हवा पण तो `शब्दबंबाळ’ नसावा, हे ज्या संवादलेखकाला कळलं, त्याचे डायलॉग सुपरहिट झाले.
हिंदी सिनेमातील सर्वात रोमँटिक पुरुष अशी ज्याची ओळख आहे तो शाहरुख जेव्हा म्हणतो, तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या अथवा ध्येयाच्या इतक्या असोशीने प्रेमात पडा की ते यशस्वी करण्यासाठी संपूर्ण विश्वच तुमच्या पाठीशी उभं राहील… पावलो कोएल्होकडून उसनवारी करून रचलेला `इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है… कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है। कहते हैं किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है।’ हा संवाद शाहरुखच्या मुखातून आला की प्रेक्षक मनातल्या मनात प्रेमाच्या गावाला जातो.
प्रेमात पडण्याच्या वयातल्या मुलाला आपलं जिच्यावर प्रेम आहे तिचं आपल्यावर प्रेम आहे का, हे समजून घेण्याची युक्ती राजू बन गया जंटलमॅन सिनेमातला नाना पाटेकर आणि दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे मधील राज हे दोघे सांगतात… `अगर वो तुमसे प्यार करती है तो वो एक बार पलट के देखेगी…पलट… पलट… पलट.. अरे हाय की नी नाय काय!
आपले अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन साहेब हे उत्तम अभिनयासोबतच दमदार आवाज आणि संवादफेकीसाठीही ओळखले जातात. जंजीर सिनेमात एका सीनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये खुर्चीला लाथ मारून अमिताभ प्राणला म्हणतो, ‘जब तक बैठनेको ना कहा जाये, सिधी तरह खडे रहो. ये पुलिस स्टेशन है,तुम्हारे बाप का घर नहीं!’ इथेच अमिताभ या वादळाचा जन्म झाला, जे आजतागायात सुरू आहे. `हम जहाँ खडे होते हैं, लाईन वहीं से शुरू होती है,’ असं म्हटल्यावर सगळे समकालीन हिरो बॉक्स ऑफिसच्या रांगेत त्याच्या मागे जावून उभे राहिले असं गंमतीने म्हणावं लागेल.
गंभीर मुद्रेने पडद्यावर ढिशुम ढिशुम हाणामारी करणारा अमिताभ कवी बनून सिलसिलामध्ये म्हणतो, मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो ऐसा होता, तुम ये कहती, तुम वो कहती, तुम इस बात पे हैरान होती, तुम इस बात पे कितनी हंसती, तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता, मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं।’
जली को आग कहते हैं, बुझी को राख कहत्ो है, जिस राख से बारूद बनता है उसे विश्वनाथ कहते है, हा डायलॉग शत्रुघ्न सिन्हाची ओळख बनला. मग शत्रुची ओळखच डायलॉगबाजी ही झाली आणि प्रत्येक सिनेमात शत्रुच्या तोंडी टाळीखेचक संवाद असलेच पाहिजेत, असा निर्मात्यांचा आग्रह असायचा. ‘खामोश’ या एका शब्दाच्या उच्चारणावर शत्रुघ्न सिन्हाच्या कॉपीराइटच होऊन बसला आहे.
अमजद खान : कितने आदमी थे?; राजकुमार : जानी… जिसके घर शीशे के होते है, वो दूसरों के घर में पत्थर नहीं फेका करते, चिनॉय सेठ; अजय देवगण : आता माझी सटकली; नाना पाटेकर : साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता हैं हे आणि असे अनेक संवाद त्या त्या नायक/खलनायकाची ओळख बनून बसले आहेत. आधी रोमँटिक हिरो आणि नंतर अॅक्शन हिरो झालेले धर्मेंद्र यांचा ‘कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा’ हा डायलॉग
ऐकून खलनायकच काय तर रस्त्यावरील कुत्रे देखील घाबरायचे. धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल याच्या अभिनयाला मर्यादा आहेत. त्याच्या मोठ्या इनिंगचं श्रेय जातं संवादफेकीला. दामिनी सिनेमातला ‘ढाई किलो का हाथ’… घातक, घायल, बॉर्डर, इंडियन या सिनेमांतली धारदार डायलॉगबाजी त्याला लार्जर दॅन लाइफ प्रतिमा देऊन गेली. दूध मांगोगे खीर देंगे कश्मीर मांगोगे तो चीर देंगे आणि हिंदुस्थान झिंदाबाद हे संवाद त्याच्या तोंडून उमटले की बॉक्स ऑफीस झिंदाबाद झालाच म्हणून समजा!
जानी राजकुमार नेमका कुठे पाहून डायलॉग बोलणार आहे, याचा पत्ता खुद्द कॅमेरामनला देखील नसायचा. ते त्यांच्या खास स्टायलीत बोलायचे, चिनॉय सेठ, जिनके अपने घर शीशे के हों, वो दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते. ‘वक्त’मधील हा डायलॉग प्रचंड गाजला. यानंतर राजकुमार जो दिसेल त्यावर डायलॉग फेकायला लागले. जब राजेश्वर दोस्ती निभाता है तो अफसाने लिक्खे जाते हैं… और जब दुश्मनी करता है तो तारीख बन जाती है… बिल्ली के दांत गिरे नहीं और चला शेर के मुंह में हाथ डालने. ये बदतमीज हरकतें अपने बाप के सामने घर के आंगन में करना, सडकों पर नहीं… अपना तो उसूल है, पहले मुलाकात, फिर बात, और फिर जरुरत पडे तो लात… हम आंखों से सुरमा नहीं चुराते, हम आंखें ही चुरा लेते हैं… ही यादी संपणारी नाही.
बंबईया हिंदीतील संवाद असो की लगान सिनेमात वापरलेली अवधी भाषा असो, हिंदी सिनेमात वेगवेगळ्या प्रांतातील व्यक्तिरेखा डायलॉग म्हणताना त्या त्या भाषेचा लहेजा वापरतात. सिनेमाचे जसे सिक्वेल होतात तसे डायलॉगचे देखील होतात, १९५२ सालच्या तमाशा सिनेमात अशोक कुमार म्हणाले होते, कोई हार कर जीत जाता है और कोई जीत कर हार जाता हैं, याच डायलॉगचा पुढील भाग शाहरुख बाजीगर सिनेमात पूर्ण करतो… कभी-कभी जीतने के लिए कुछ हारना पडता है…और हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं.’
सिनेमातील हिरोच डायलॉगमुळे लक्षात राहतात असं नाही, तर अगदी छोट्या भूमिकेतील छोटीशी लाइनही कलाकाराला अजरामर करून जाऊ शकते. १९६४ साली हकीकत या सिनेमातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या मॅकमोहन यांनी कारकीर्दीत अनेक छोट्या मोठ्या लांबीच्या भूमिका साकारल्या, पण ते हिंदी सिनेमाच्या इतिहासात अजरामर झाले ते ‘शोले’मधल्या सांबाच्या रुपाने. या चित्रपटात त्यांना फक्त एक डायलॉग होता, `सरदार… पूरे पचास हजार.’ या एका ओळीने मॅकमोहन यांना सिनेकारकीर्दीत दोनशेपेक्षा जास्त चित्रपट मिळवून दिले.
मॅकमोहनप्रमाणेच अगदी लहानातील लहान भूमिकेतील कलाकार लक्षात राहील असे डायलॉग लेखक सलीम जावेद यांनी लिहिले होते शोलेमध्ये. ‘हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं’ (असरानी), ‘इतना सन्नाटा क्यों है भाई?’ (ए. के. हंगल), ‘सरदार, मैंने आपका नमक खाया है सरदार’ (विजू खोटे), ‘चल धन्नो आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है’ (हेमा मालिनी), ‘बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना’ (धर्मेंद्र), `तुम्हारा नाम क्या है, बसंती’ (अमिताभ बच्चन), ‘ये हाथ नहीं फांसी का फंदा है’ (संजीव कुमार) आणि गब्बर सिंगचे तर किती संवाद… ‘ये हाथ हमको दे दे ठाकुर!, ‘कितने आदमी थे?, ‘यहां से पचास-पचास कोस दूर गांव में, जब बच्चा रोता है, तो मां कहती है बेटा सो जा, सो जा नहीं तो गब्बर सिंह जाएगा’, ‘जो डर गया समझो मर गया’, ‘बहुत याराना लगता है’, ‘गब्बर के ताप से तुम्हें एक ही आदमी बचा सकता है… खुद गब्बर!
कोणत्याही अभिनेत्याची संवादकला हळू हळू बहरत जाते. दिवाना, राजू बन गया जंटलमनमध्ये डायलॉगबाजी न करणारा शाहरुख खान आज जवान सिनेमात खर्जदार आवाजात बोलतो, `बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर’ तेव्हा सगळं थिएटर उसळतं. वयानुसारही आवाजात बदल होत जातो म्हणूनच ‘कयामात से कयामत’मधील आमीर खान कमी पॉज घेत असे. आज तो दोन ओळींमध्ये अमोल पालेकर यांच्यापेक्षाही जास्त पॉज घेऊन बोलतो. सनी देओलचा बेताबमधला प्रेमळ आवाज कानाला गोड वाटतो, तर ‘गदर’ सिनेमातला हँडपंप उखडून केलेली गर्जना ऐकल्यावर सिनेमागृहातील स्पीकर फाटतो की काय अशी भीती वाटते.
रेडिओवर नेहमी ऐकल्यामुळे जशी गाणी लक्षात राहतात आणि हिट होतात त्याप्रमाणे मिमिक्री आर्टिस्ट हिरोंची नक्कल करत डायलॉग बोलतात, त्यामुळे ते डायलॉग आपल्या जास्त लक्षात राहतात. ‘हटा सावन की घटा’ आणि ‘कोई शक?’ या डायलॉगशिवाय मिथुनची नक्कल होऊ शकत नाही. अर्थात, अभिनेते काही सर्व सिनेमांत एकसारखा आवाज काढत नाहीत, एकच लहेजा पकडत नाहीत. शक्ती कपूर प्रत्येक भूमिकेत ‘आऊ ललिता’ असं लाडात बोलत नाही.
सिनेमात आवाज इतका महत्त्वाचा असतो की इथे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट अशीही कलावंतांची एक श्रेणी आहे. एखादा कलाकार शूटिंगमध्ये व्यग्र असेल किंवा आजारी असेल तेव्हा व्हॉइस-ओव्हर कलाकार त्या भूमिकेला आवाज देतो. एखादा अभिनेता अचानक दगावला तर त्याच्या आवाजाविना निर्मात्यांचे खूप मोठे पैशांचं नुकसान होऊ शकतं अशा वेळेला त्या अभिनेत्याचं डबिंग हे कसलेले व्हॉइस-ओव्हर कलाकार करतात. संजीव कुमारच्या आकस्मिक निधनानंतर त्याच्या सिनेमांचं डबिंग सुदेश भोसले यांनी इतक्या सफाईने केलं होतं की तो संजीवचाच आवाज वाटतो. अभिनेते पिंचू कपूर, विनोद मेहरा यांचं आकस्मिक निधन झालं होतं, तेव्हा चेतन सशितल यांनी सिनेमाचे डबिंग पूर्ण केलं होतं. काही वेळा बजेट इश्यूमुळे निर्मात्याकडे कलाकारांना द्यायला पैसे नसतात. पंकज कपूर हे त्यांच्या भरदार आवाजासाठी ओळखले जातात. पण ‘रोजा’ सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे हिंदी डबिंग दुसर्या डबिंग आर्टिस्टकडून करून घेण्यात आलं होतं.
सिनेमात भूमिकेसाठी काढलेला आवाज आणि कलावंताचा प्रत्यक्ष आयुष्यातील आवाज अतिशय वेगळा असू शकतो. यात सर्वात ठसठशीत नाव म्हणजे जॉनी वॉकर. त्यांनी बहुतेक सगळ्या भूमिकांमध्ये चिरका आवाज रेकून काढलेला आहे. पण, त्यांचा खरा आवाज खूपच वेगळा, नॉर्मल आहे.
सिनेमात टाळ्या मिळवून देणारे संवाद फक्त पुरुषांनाच दिले जात नाहीत, तर अभिनेत्रींनी देखील संवादातून ओळख निर्माण केली आहे. एक चुटकी सिंदूर की क़ीमत तुम क्या जानो रमेश बाबू (दीपिका पदुकोण), चल धन्नो, आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है (हेमामालिनी), मेरे करण अर्जुन आएँगे (राखी), दोस्ती का एक उसूल है, नो सॉरी नो थैंक यू… (भाग्यश्री), कुछ कुछ होता है राहुल, तुम नहीं समझोगे (काजोल), थप्पड से डर नहीं लगता साहब प्यार से लगता है (सोनाक्षी सिन्हा), मैं अपनी फेवरेट हूँ (करिना कपूर), हे संवाद आठवा. शिवाय, मैं तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हूँ… छोड दो मुझे, भगवान के लिए छोड दो मुझे… बेटा मैने तुम्हारे लिये गाजर का हलवा बनाया है, हे संवाद तर असंख्य अभिनेत्रींनी उच्चारले असतील.
मराठी चित्रपटांत अशी ही बनवबानवी या सिनेमाचे वसंत सबनीस यांनी लिहिलेले डायलॉग अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. धनंजय माने इथेच राहतात का?… सारखं सारखं त्याच झाडावर काय?….जाऊ बाई, नका हो इतक्यात जाऊ… हा माझा बायको पार्वती… आमच्या शेजारी राहते, नवर्याने टाकलंय तिला… इतके हिट संवाद असलेला हा मराठीतील एक लई भारी चित्रपट होता. ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमातील आ रा रा… मी प्लास्टिक आहे. आम्हीं बैल लावू बैल… त्ये बी जोडीनं… नांगरासकट!’ या टाळीबाज डायलॉगसोबत ‘शेती विकायची नसते हो… राखायची असते’ हा संवाद मनाला खूप भावला..! शून्य मिनिटात आलो, असं म्हणून लोक तासभर उशिरा येतात, ही ‘देऊळ’ सिनेमाची कृपा. झपाटलेला सिनेमातील दिलीप प्रभावळकर यांनी आवाज दिलेला बाहुल्यामधील तात्या विंचू `ओम भगभूगे भगनी भागोदरी ओम फट् स्वाहा’ असा विचित्र मृत्युंजय मंत्र म्हणत जेव्हा तो लक्ष्याच्या छातीवर बसायचा तेव्हा तो जणूकाही आपल्याच छातीवर बसून आपले प्राण घेणार आहे असं प्रेक्षकाला वाटायचं.. ही डायलॉगफेकीची ताकत आहे.
मराठी चित्रपटांचे डायलॉग फेमस करण्याचं श्रेय जातं ते समाज माध्यमात फिरणार्या मीम्सना. आजची तरुण हुशार मंडळी क्रिएटिव्ह पद्धतीने आजचे संदर्भ जुन्या मराठी चित्रपटांच्या डायलॉगना देत असतात. निळू फुले यांचा `बाई वाड्यावर या’ हा डायलॉग तर शेकडो मीम्सची जान आहे.
फिल्मी डायलॉग हा व्यावसायिक चित्रपटांचा जीव असला तरी काही संवादविरहित सिनेमांचे प्रयोग देखील आपल्याकडे झालेले आहेत. त्यातला सर्वपरिचित असा प्रयोग कमल हसनने पुष्पक सिनेमातून केला होता. या सिनेमात संवादांची जागा उत्कृष्ट पार्श्वसंगीताने भरून काढली होती… या अबोल सिनेमांना बॉक्स ऑफिसवर फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे ही शाखा बहरली नाही.
टेलिव्हिजनवरचे आवाज कर्कश्श भासतात. कारण, टीव्ही मालिका गृहिणी घरातलं काम करत पाहत असतात, यामुळेच मालिकेतील खलनायिका नायिकेच्या विरुद्ध काय कटकारस्थान करते हे दिवाणखान्यातून स्वयंपाकघरात ऐकू येण्यासाठी मालिकांचा आवाज वाढवलेला असतो. याउलट सिनेमाचा आवाज हा सर्वसाधारण पातळीचा असतो. पण काही प्रसंग उठावदार बनवण्यासाठी आणि उत्कंठावर्धक बनवण्यासाठी त्या त्या प्रसंगांच्या आधी आणि प्रसंगांच्या वेळी आवाजाची पातळी वाढवली जाते.
हल्ली यू ट्यूब, इंस्टाग्रामवर मोटिवेशन देणारे बोकळलेत, पण बाबुमोशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है, उसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं… हम सब तो रंगमंच की कठपुतलियां है जिनकी डोर उपरवाले की उंगलियों में बंधी है. जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं, हा आनंद सिनेमातला संवाद कोणत्याही असाध्य आजाराला सामोरं जाण्यासाठी औषधांच्या जोडीने उपयोगी पडतो. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार (भगवान के भरोसे मत बैठिये, क्या पता भगवान हमारे भरोसे बैठे हो), शिक्षणाचा मूलमंत्र देणारे (सक्सेस के पीछे मत भागो, काबिल बनो, काबिल… कामयाबी झक मार के पीछे आएगी’) अनेक डायलॉग आधीपासून लिहिले गेले आहेत. ‘आज मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है?’ या प्रश्नावर ‘मेरे पास डायलॉग है’ हे उत्तर ऐकून मोगॅम्बो खुश हुआ, असा आनंद मिळतोच ना!